आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही. यातील काही अगदीच व्यक्तिगत वाटतील पण बोलणं गरजेचं आहे.
१. सर्वात पहिली गोष्ट मला आठवते ती म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतर, कितीतरी वेळ (अगदी गुंगीत असूनही ) मला वाटत होते की, आपले पहिले बाळ झाले आहे आणि मला झोप का येतेय? एक दोन वेळा हॉस्पिटलच्या बेबी-केअर मधेही ठेवले आणि तेच वाटत राहिले. आज परत फिरून पाहताना वाटतं की, त्या वेळी मी स्वतःच इतकी दमलेली होते. त्यात हे विचार नसते केले तरी चालले असते. सर्व प्रोसेसमध्ये इतके परिश्रम झालेलं असतात की बाळाची कुणी काळजी घेत असेल तर उगाच स्वतःला 'वाईट आई' असे लेबल लावून घ्यायची काहीच गरज नाहीये. त्यासाठी सर्वाना भरपूर संधी मिळतातच.
२. लगेचच आता बाळाला द्यायला दूध कसे येणार असा प्रश्न पडतो. आणि यात बाळाला प्यायला काय ही भीती सर्वात जास्त असते. पुन्हा एकदा, हा काही नळ नाही की सुरु केला की पाणी येईल. त्यामुळे जो काही वेळ त्यासाठी लागत असेल तो घ्यावा. त्यासाठी स्वतःला काळजीत टाकायचे नाही. नंतर तेच दूध थांबवावे कसे हाही प्रश्न पडेल. तोवर बाळाला देण्यासाठी अनेक पर्याय असतात. ते नक्की वापरावे.
३. घरी आल्यावर बाळाला कुठे ठेवायचं, आपण कुठे झोपायचं यात वेळ जातोच. पण तोवर हॉस्पिटलमध्ये कुणीतरी असतं काही लागलं तर सांगायला. पण घरी आल्यावर काय अशी थोडी काळजी असतेच. पण अशावेळी, बाळाला फक्त दूध द्यायचे, ढेकर द्यायचा आणि स्वतःही खूप खायचे प्यायचे इतकेच लक्षात ठेवायचे. कारण त्या वयात बाळ २०-२२ तास झोपतंच. पण तितकेच ते दिवस खूप दमवणारेही असतात. आपलं आयुष्य आता असंच असणार का अशी एक भीतीही वाटतेच. तर उत्तर आहे, नाही ! मला वाटतं की पहिले २-३ महिने थोडे दमवणारे असतातच. पण हळूहळू बाळाचे रुटीन बदलत जाते आणि आपल्यालाही त्याची कल्पना येते. इतकेच लक्षात ठेवायचे की हे सुरुवातीचे दोनेक महिने शांतपणे काढायचे.
४. आता हे सर्व होत असताना, अतिशय हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्यामुळे अनेकदा उगाच चिडचिड होते, रडू येणे, कणकण येणे हे होतेच. अशावेळी जे वाटतंय ते सरळ सांगून टाकायचे. 'आई' म्हणून अगदी प्रत्येकवेळेला 'भारी' वाटलंच पाहिजे असे नाही. हे सर्व होणे साहजिक आहे, पण ते स्वतःजवळ ठेवणे हे जास्त त्रासदायक आहे.
५. दूध यायला लागल्यावर, छाती भरून येते आणि अशावेळी खूप गरम व्हायला लागते. अशा वेळी बाळाला दूध देणे किंवा काढून घेणे किंवा अंघोळ करून घेणे असे अनेक उपाय करू शकता. मुख्य म्हणजे, थोडे दिवस उंच उशी घेऊन मान आणि वरचा भाग थोडा उंच ठेवणे यामुळे झोपेत होणार त्रास कमी होतो.
६. बाळाला सांभाळणे, त्याला स्वीकारणे, त्याला नावाने हाक मारणे या सर्व गोष्टी एकदम येत नाहीत. कुठलीही व्यक्ती स्वीकारायला थोडासा का होईना वेळ लागतो. तसेच आहे हेही. "आई" म्हणून आपण लगेच एक "महान" व्यक्ती होऊ शकत नाही. त्यात मग, बाळ रडत असताना घाईने का होईना चार घास खाऊन घेणे, त्याला कुणी बघत असेल तर झोपून जाणे यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. मी वाचले होते, As a new parent, accept all help you get. आणि ते बरोबरही आहे.
७. आता बाळाला स्वीकारणे हा एक भाग आणि आपल्या नवऱ्याला बाळासोबत वाटून घेणे हा दुसरा भाग. अनेकवेळा असेही वाटू शकते की नवरा आपल्यापेक्षा बाळाकडेच जास्त बघत आहे. मला असे वाटते की हेही वाटणे साहजिक आहे. त्यासाठी काही वाटलं तर हक्काने नवऱ्याला सांगावं. उगाच माझ्या मनात असे विचार येऊच कसे शकतात असे वाटून स्वतःला त्रास का करून घ्यायचा?
८. तीच गोष्ट जवळच्या बाकी व्यक्तींची. आपल्या आई किंवा सासूलाही या सर्व गोष्टी आठवत असतातच असे नाही. त्यात जुने-नवे, योग्य-अयोग्य असे अनेक वाद होतात. पण त्यातून शांतपणेच मार्ग काढायला हवा. कुणीही कुणाचेही वाईट चिंतत नाही हे डोक्यात ठेवायला हवे.
९. सर्वात अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे पहिले मूल होण्याच्या आधीचा काळ केवळ दोघांचा असतो. त्यामुळे उठून कुठेही कधीही फिरून आले. एखाद्या कार्यक्रमाला, सिनेमाला जाऊन आले. यामध्ये खुपसा विचार करायला लागत नाही. पण आता घरात बांधल्यासारखे होते. आपले आयुष्य असेच जाणार की काय असे विचारही येतात. कधी कधी तुमच्या मित्र- मैत्रिणी तुमच्याशिवाय बाहेरही जातात. तेव्हा वाईट वाटणे साहजिक आहे. पण हे सर्व तात्पुरते आहे हे लक्षात ठेवायचे. बाळ थोडे मोठे झाले की त्याला घेऊनही(किंवा कुणी सांभाळणारे असेल तर सोडूनही) आपण जाऊ शकतो हे डोक्यात ठेवले पाहिजे. Its not end of the world.
१०. आपल्या मानसिकतेसोबत, शारीरिक बदलही खूप होत असतात. छाती ओघळले, स्तनांचा आकार वाढणे, पोटाची कातडी गोळा होणे हे सर्व होतेच. त्यात इतक्या सर्व गोंधळात केसांवर कंगवा फिरवायलाही वेळ नसतो. मग कधी चुकून जुना ती शर्ट घालून पाहिला की अजून वाईट वाटते. आपण आधी कसे दिसत होतो आणि आता कसे दिसतो यावरून. जे बदल होत आहेत ते बदलू शकत नाही. पण त्यातून बाहेर यायला अनेक पर्याय आहेत आणि ते लवकरच करता येतीलही. पण बाळ दोन महिन्याचंही नाही आणि आधीच वाढलेल्या वजनाची काळजी करायची, हे योग्य नाही. कालांतराने (म्हणजे साधारण बाळ सहा महिन्याचे झाल्यावर) आपण व्यायाम, डाएट इ करून मूळ रूपात येऊ शकतो. हे मी दोनही मुलांच्या वेळी अनुभवले आहे.
११. नोकरी वर कसे जाणार, काही आठवतही नाहीये इ वाटते. पुन्हा एकदा ते साहजिक आहे. पण बाळ तीनेक महिन्याचे झाल्यावर एकदा ऑफिसला गेले की सर्व आठवते आपोआप. आणि हो, Its not end of your career !
खूप बोलले. मला खात्री आहे अजूनही काही मुद्दे राहिले असतीलही. पण जे आहेत ते मांडायचेच होते. अनेकदा, केवळ माझ्यासारखं अजून कुणीतरी आहे हेही कळलं तरी पुष्कळ असतं. म्हणून हा प्रपंच. यात बाळाबद्दल जास्त काही लिहिले नाही कारण त्याचा विचार आपण करतच असतो. पण त्याचसोबत आपण आपलाही विचार केला पाहिजे. मला वाटतं की, आजपर्यंत आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या 'आई' च्या इमेज मध्ये आपण बसत नाहीयेत अशी भीतीही वाटायला लागलेली असते. 'आई म्हणून मी इतकी स्वार्थी विचार का करतेय' असं वाटून उगाच त्रास करून घ्यायचा नाही इतकंच सांगायचं आहे.
बाळ झाल्यानंतर नऊ महिन्यानी पुन्हा एकदा आपण आपल्याकडे पूर्वीसारखे बघण्याचा प्रयत्न करतो. पण तोवर अनेक बदल झालेले असतात. पण म्हणून आपण अचानकपणे कुणीतरी दुसरी व्यक्ती होऊ शकत नाही. ते बदल स्वीकारायला वेळ द्यायला हवा. आणि जे आपल्याला वाटतंय ते वाटूनही घ्यायचं. हळूहळू आयुष्य पूर्वीसारखं नसलं तरी त्या पहिल्या तीन महिन्यापेक्षा बरंच सुधारतं. पुन्हा एकदा, Its not end of the world ! :) तोवर All The Best. :)
पोस्ट जवळ जवळ संपलीच असे वाटत असतानाही काही डोक्यात होतेच, ते असे. आई होणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, पण अनेकवेळा अनेकजणी त्याला 'कारण' बनवतात, बऱ्याच गोष्टींपासून वाचण्यासाठी. एखादे काम करायचे नसेल किंवा त्याला थोडे जरी प्रयत्न लागणार असतील तर, 'अगं, मुलांमुळे कुठे जमतंय?' असं कारण काढू नका. It shouldnt become an excuse to run away from things. उलट आपण त्यांना सोबत घेऊन अजून काही करून शकतो यातून जी शक्ती मिळते ती जास्त चांगली असते. मला तरी वाटते की मी आई झाल्यापासून जास्त स्ट्रॉंग झाले आहे. असो. थांबतेच आता. पुन्हा कधी तरी अजून याच मुद्द्यावर काही असेल तर नक्की लिहीन. तुम्हाला कुणाला असेच काही अनुभव आले असतील तर नक्की सांगा. आणि ही पोस्टही आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment