मला ना कधी कधी आपण खूप भारी आहोत असं वाटतं. म्हणजे अगदी नवऱ्याला "तुला कधी शोधूनही अशी बायको मिळाली असती का?" हा प्रश्न तर दिवसातून एकदा तरी विचारतेच. त्यात मग मुलांच्या शाळेची एखादी गोष्ट आठवणीत ठेवलेली असो वा घराच्या एखाद्या कोपऱ्यात कुठे बारीकशी वस्तू शोधून दिलेली असो. कारण काहीही पुरतं. आणि त्यात परवा दसऱ्याला घरी पुरणपोळी, कटाची आमटी केली. मग तर काय बोलायलाच नको. आठवडाभर चांगले जेवण नाही झाले तरी चालेल इतकं भारी झालं जेवण. पोरांनाही खूप आवडल्या पोळ्या.
संध्याकाळी सहाला सुरु करून नऊच्या आत जेवणही करून घ्यायचे म्हणजे काही खायचे काम नाहीये. :) असो. कौतुक पुरे. एकतर तो ऑफिसचा दिवस, त्यात इथे व्हाट्स अप वर येणारे मेसेज सोडले तर सण आहे असं वाटण्यासारखं काहीच नाही. मग घरी जाऊन काही विशेष करण्याचा उत्साह कुठून येणार? पण ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मला मागे मी एकदा बनवलेल्या पुरणपोळीची आठवण झाली. २००८ मध्ये केली होती. :) त्यानंतर आताच. तर तेव्हा माझे जेवण बनवण्याचा स्पीड आणि कौशल्य दोन्हीही कमीच होते. अगदी थोडीच डाळ घातली होती. गूळ कोरडा असल्याने खिसून घेता येत नव्हता आणि कडक होता त्यामुळे फुटत नव्हता. म्हणून मी डोकं चालवून तो सर्व गूळ मायक्रोवेव्हमध्ये घातला. म्हटलं वितळून जाईल जरा. आता मला काय माहित काय होते ते. ३०-४० सेकंदात तो ताडताड उडून मायक्रोवेव्ह आतून काळा पडला होता. ते घर सोडताना तोही लोकांना देऊन आलो. विकत कोण घेणार?
तर यावेळी मी अशा चुका करणार नव्हते. त्यात गूळ मिक्सरमध्ये मस्त बारीक होतो हेही कळलं होतं. त्यामुळे डाळ बरोबर शिजली, गूळ बरोबर झाला, पुरणही थंड झाल्यावर बरोबर झाले. सगळ्यात महत्वाचे, एकही पोळी फुटली नाही. मग इतके सर्व झाल्यावर भारी वाटणारच ना? शेजाऱ्यांनाही दोन ज्यादा पोळ्या केल्या. पोरांना कळत नव्हतं नक्की काय आहे आज? मग मी साध्या शब्दात स्वनिकला सांगत होते. म्हटलं, "चांगले आणि वाईट यांची लढाई झाली तर कोण जिंकलं पाहिजे?". त्याने बरोबर उत्तर दिलं. म्हटलं,"बरोबर. म्हणून आज सगळे सेलिब्रेट करत आहेत. The win of Good over Bad." त्याला ते पटलं. त्याने सानुलाही नंतर तेच प्रश्न विचारून तिला समजावून सांगितलं. कधी कधी एखादी संध्याकाळ 'साध्या पासून एकदम किती स्पेशल होऊन जाते ना?
आम्ही तसे बरेच सण करतोच. पण त्यासोबत हे खायचे पदार्थ केल्याने किती फरक पडतो ना? त्याच दिवशी मी आणि माझी ऑफिसमधली शेजारीण बोलत होतो. ती मला सांगत होती की तिने त्या रविवारी भजी केल्या होत्या. म्हणाली,"मुलांना खूप मस्त वाटलं खायला. आपल्याला आपल्या आई-वडिलांनी सर्व दिले म्हणून आपल्याला माहित झाले. आपण तब्येतीच्या नादात या सर्व गोष्टी करत नाही. मग मुलांना कसे मिळणार ना?" मला ते पटलेही. अर्थात भजी करायला कुणाला खास कारण लागेल असे नाही. त्यात मुलांचे निमित्त असेल तर मग काय? पण खरंच, आम्हालाही आई अनेकदा पापड, कुरवड्या तळून द्यायची. फराळ, पुरणपोळी आणि दिवाळीचे अनेक पदार्थ, त्यांनी केले म्हणून आपण चाखले. परवा सानूने पोळी आणि दूध खाल्ले तर किती छान वाटले. आता आमच्या खायच्या यादीत अजून भर नक्की पडणार आहे. :)
त. टी.: कृपया पोळीचे डाळ -गूळ इ चे माप विचारू नये. सर्व अंदाजे घातले होते. :D
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment