Wednesday, November 30, 2016

एक न पाठवलेली गोष्ट

       ती सकाळची दुसरी झोप काढून उठली. सकाळी ५.३०-६ पासून नवऱ्याचा डबा, मुलाला उठवून, आवरून शाळेत पाठवणे सर्व ७ च्या आत होऊन जातं. मग उगाच कधी चहा घेत, पेपर वाचत वेळ घालवायचा तर कधी असा एखादी डुलकी काढून. कधी लिहायची इच्छा असली की मग कामाला मावशी आल्या तरी तिचं उठणं व्हायचं नाही. त्या आपलं दिलेलं काम करून निघून जायच्या. तर कधी अगदीच त्यांच्याशी गप्पा मारत त्यांचंही काम थांबवून बसायची. मावशींना आता सवय झाली होती तिच्या अशा वागण्याची. त्याही ती बोलायला लागली की घरचं सांगायच्या, कधी शेजारणीचं. गेले तीनचार दिवस डोक्यात सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. अनेक विचार एकत्र होत होते आणि काही स्वतःचेच विचार पटतही नव्हते. लिखाण ठरलेल्या तारखेला द्यायचं असल्याने ते पूर्ण करणंही जरुरीचं होतं. कसं आणि काय काय लिहावं सुचत नव्हतं.
        आताही, अनेकवेळा डिलीट करून तिने पुन्हा लिहायला सुरुवात केली. ..... "वृषाली तणतणत घरी आली. असंच कशावरून तरी तिचं तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबत छोटंसं भांडण झालं होतं. भांडण कुठलं, वाद फक्त. पण जवळच्या मैत्रिणीशी झालेला छोटासा वादही अगदी मोठा वाटतो. आणि मग कशातच लक्ष लागत नाही. जगात आपलं कुणीच नाही असं वाटतं. जाऊ दे, म्हणून तिने आपलं काम उरकायला सुरुवात केली. आशिष आला, जेवण झाले, सगळं आवरून ते निघाले. हे सर्व चालू असताना तिचे विचार मात्र कमी होत नव्हते. त्याला तर काही लक्षातही आले नाही, तो त्याच्याच नादात होता."................ शी... किती बोअर आहे. मैत्रिणीशी भांडण झालं, मग पुढे काय? असं काय असणार आहे मैत्रिणीशी भांडायला? आणि अगदी असेल काही मोठंसं, पण ते काय होतंच असतं सगळीकडे? उगाच 'गिर्ल्फ्रेंड्स' या विषयावर किती आणि काय लिहिणार? तिला अनेकवेळा जीवश्च मैत्रिणींशी झालेलं भांडण आठवलं, त्यात मनावर येणारं उदासीचं वलय आणि कंटाळवाणा जाणार दिवसही. पण मग पुढे काय?..... त्याच त्या मैत्रिणींवर लिहिलेल्या कविताही आठवल्या आणि तिने तो विषय सोडून दिला.

       वैतागून ती बाहेर आली. मावशींसाठी भांडी काढूनच ठेवलेली होती.त्या मुकाट्याने आपलं काम करत होत्या. पण तिला कुठे करमत होतं? ती बाथरुमसमोर जाऊन उभी राहिली. तिला पाहून त्याही मग बोलू लागल्या,"पोराला काल रात्री यायला उशीर झाला.  आजकाल पोरं जरा मोटी झाली की लक्ष द्याया लागतंय. नायतर लगेच दारू येतीयच हातात. कुटं जाताय, काय करताय सारखं विचाराय लागतंय."
तीबोलली,"होय. अभ्यास कर म्हणावं त्याला. तुम्ही पण त्याला लगेच कामाला लावू नका. जरा शिकू दे, म्हणजे चांगली नोकरी लागेल. लहान वयात हातात पैसे आले की अजून वेगळेच उद्योग सुरु व्हायचे."
त्यांच्याशी ती आजतागायत सर्व विषयांवर बोलली होती. मुलीच्या लवकर होणाऱ्या लग्नापासून, दारुड्या नवऱ्यापर्यंत. माहेरपणाला आलेल्या पोरीच्या धडाधड होणाऱ्या पोरांपासून जावयाच्या मागण्यांपर्यंत. रोज एक वेगळी कथा असायची. त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी तिची एक कादंबरी होऊन गेली असती. पण स्वतः न घेतलेल्या अनुभवांवर लिहिणं म्हणजे उगाच आपणच प्रश्न शोधून आपणच त्यांची उत्तरं द्यायची असं वाटत होतं. शिवाय 'गरीब, कामवाली बाई आणि तिचे अनुभव' यावर काही कमी गोष्टी लिहिल्या नसतील, तेही तिच्यासारख्या तिसऱ्याच बाईने. त्यामुळे तिने तो नाद केंव्हाच सोडून दिला होता.
बराच वेळ झाल्यावर, त्यांच्याशी बोलत बोलत तिने संध्याकाळची भाजी निवडायला सुरुवात केली.
"भेंडी कशी आणली ताई तुम्ही?", मावशी.
"२० ला पाव होती. किती महाग काय बोलायलाच नको."
"तुम्ही त्या कोपऱ्याव नका घेत जाऊ, लै दर लावतुय तो."
"हो, पण मग सकाळी गाडी घेऊन जावं लागतं मंडईला. इतक्या ट्रॅफिकमध्ये नको वाटतं.हे जवळ आहे ना? त्याचेच पैसे घेतो तो, दुसरं काय?"
दोघीही एक मिनिट त्या कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याचा चेहरा आणि त्यांचे भांज्याचे दर आठवत रमल्या. तिने भाजी धुवून, चिरून, डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवली. तिकडे मावशींनी केर, फरशी करून घेतलं. घर कसं चकाचक दिसत होतं. मावशींना 'उद्या लवकर या' म्हणून ती कामाला लागली.

        कपडे मशिनमधे धुवायला लावले, कालचे वाळलेले कपडे नीट घडी करून जागेवर ठेवले. बाल्कनीत कुंड्याना पाणी घातलं. वाढलेल्या मोगऱ्याकडे पाहताना तिला 'त्याची' आठवण झाली. त्याला खूप आवडायची जास्वंद. तिलाही, पण दुरूनच, वास घ्यायला. उगाच ते तोडून त्याचा गजरा वगैरे तर तिला अगदीच 'जुनाट' वाटायचं. "कुणी घालतं का रे गजरा आजकाल?" म्हणत तिने तो नाकारलाही होता. हेच नाही, अशा अनेक गोष्टी तिला त्याच्या जुनाट वाटायच्या. 'तुम्ही भारतीय पुरुष म्हणजे ना? शेवटी तुम्हाला आम्ही साडीतच छान दिसणार. ", कितीतरी वेळा ती त्याला गमतीने म्हणायची. तिने कधी नव्हे ते नेसलेल्या साडीत पाहणारी त्याची नजर तिला आठवली. उगाच तिच्या काहीतरी डोक्यात आलं आलं आणि ती आत गेली लिहायला.

"इतक्या वर्षांनी ते दोघे समोरासमोर आले होते, तेही असं अनपेक्षित, परदेशात. आपल्याला न विचारता असं पाहुणा म्हणून कुणालाही उचलून आणल्याबद्दल नवऱ्यावर राग येत होता की त्याला इतक्या दिवसांनी पाहून रडू, हेच तिला कळत नव्हतं. ती आपल्यावर चिडलीय समजून नवरा तिला मदत करत होता. कसंबसं जेवण उरकलं आणि आवरायचं काम आपल्यावर घेत नवऱ्याने तिला त्याच्याशी बोलायला बसवलं. टेबलावर राहिलेलं 'त्या'चं ताटही उचलून नेलं नव्हतं त्याने. आणि तिला एकदम 'त्या'च्या 'जुनाट' विचारांचा राग आला पुन्हा एकदा...."

          लिहिता लिहिता तिला अजूनच चिडचिड झाली. तिने वैतागून सर्व लिहिलेले डिलीट करून टाकले......... कितीवेळा तेच तेच लिहिणार? तेच जुने विचार असलेले पुरुष, त्याच नवीन विचारांच्या स्त्रिया आणि त्यांचे अफेअर? कितीवेळा जुना बॉयफ्रेंड समोर येणार आहे आणि कितीवेळा नवराच चांगला वाटणार आहे? कितीवेळा लग्न झाल्यावर, 'नवराच कसा योग्य साथीदार आहे हे' समजावून सांगणार आहे. तेही कुणाला? स्वतःला? कदाचित असेल किंवा नसेलही.... आणि बंडखोरीचं म्हणावं तर तीही काही कमी जणींनी केलीय का? किती वेळा बंड पुकारणार आहे? समाजाविरुद्ध, घरच्यांविरुद्ध, स्वतःच्याच बुरसटलेल्या विचारांविरुद्ध? तिला अजून वैताग आला. कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली. भानावर आली तसं तिला टेबलावर पडलेला पसारा, त्याच्या खणात असलेला कचरा, सर्व दिसू लागलं. वैतागून तिने लॅपटॉप बंद केला आणि घर आवरायला घेतलं.......  पुन्हा एकदा......
       दुपार होत आली, पोटात थोडी भुकेची जाणीव झाली. तिने फ्रिजमध्ये सकाळी कापून ठेवलेलं सॅलड काढलं, सकाळीच केलेली एक पोळी-भाजी आणि टीव्ही समोर बसली. जेवता जेवता, 'आम्ही सारे खवैय्ये' बघून झालं. जरा कुठे एखादी सिरीयल पाहतेय तोवर तिच्या मैत्रिणीचा फोन आला उचलू की नको विचारात तिने तो उचलला.
"काय गं, भांडण झालं म्हणून फोन उचलणार नव्हतीस की काय?", पलीकडून मोकळ्या आवाजात हसून प्रश्न आला आणि बराच वेळ हसून दोघीनी बराच वेळ गप्पा मारल्या. सकाळपासून आपल्याला का उदास वाटत होतं याचं उत्तर तिला मिळालं होतं. मुलाला आणायची वेळ झाल्यावर तिने घाईत फोन ठेवला आणि खाली गेली. बसमधून त्याला घेऊन येताना शेजारणीशी गप्पाही झाल्या. घरी आल्यावर त्याला खायला देऊन, टीव्ही लावून दिला. पुढे त्याला स्विमिंग क्लास आणि होमवर्कही होतंच.
         तिने त्याची तयारी केली, स्वतःही आवरून मुलाला क्लासला घेऊन गेली. क्लासमधून येताना घरातल्या दोन चार छोट्या मोठया वस्तूही घेऊन आली. घरी आल्यावर त्याला अभ्यासाला जबरदस्तीने बसवावं लागलं. जरा चिडचिड- रडारड करून अभ्यास करवून घेऊन त्याला खेळायला सोडून तिने जेवणाची तयारी सुरु केली. कधी कधी तिला वाटायचं सकाळ-संध्याकाळ तेच रहाटगाडगं सुरु, काही वेगळं काम होतंच नाही. ती वैतागली, घाईघाईत एक भाजी चपाती उरकून मुलाला घेऊन आली. थोड्या वेळात नवराही आलाच. सोबत जेवणं, गप्पा,टीव्ही सर्व झालंही. तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे हे त्याला दिसतही होतं. त्याने विचारल्यावर 'काहीही नाही' म्हणून तिने टाळलं होतं. टीव्ही पाहताना मधेच त्याने विचारलं," संध्याकाळी प्लम्बरला भेटून आलीस का?".
"अर्रर्रर्रर्रर्र" म्हणत तिने जीभ चावली. त्याने तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि म्हणाला, "निदान हे तरी काम करायचंस ना?".
ती,"अरे हो विसरले ना. सॉरी. उद्या बोलते नक्की."
त्याचा चेहरा अजून वैतागलेलाच होता. ती दुर्लक्ष करत समोर बघत राहिली. काहीतरी डोक्यात आलं म्हणून उठून गेली आत आणि लिहायला लागली.

"करमरकर सर, तुमच्या मासिकाने माझ्याकडून अशा लेखाची मागणी करावी म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, मी सध्या घरीच असते. घरी असते म्हणजे, बाहेरही पडतेच, घरातली, बाहेरची कामेही करतेच. नोकरी सोडणं हा पर्याय मीच स्वतः निवडला होता. मुलाला सांभाळणे आणि कधीही घरी बसून ज्या आवडीच्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करायच्या असं ठरवलं होतं आणि ते आवडलंही होतं. कधी कधी कंटाळवाणे दिवस येतातच, पण ते होणारंच होतं. ते तर नोकरीतही होतंच. उलट स्त्री म्हणून मी या अशा गोष्टी करणे स्वाभाविक समजले जात असल्याने मला त्यांचं कुठलंही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. उलट माझ्या जागी नवरा घरी राहिला असता तर त्याला मात्र द्यावं लागलं असतं. त्यामुळे मी घरी राहून स्वतःचे छंद पूर्ण करू शकते ही माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे. असो.
         घरी आल्यावर 'घरी बसून इतकंही काम करू शकत नाहीस का?' म्हणणाऱ्या नवऱ्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही किंवा रागही येत नाही. मी इतकी weak नाही. माझ्या जागी तो घरी बसला असता तर मीही हेच विचारलं असतं. मी दिवसभर किती कामं करते आणि तरीही 'housewife' म्हणून मला कुणीही किंमत देत नाही असं मला वाटत नाही. प्रत्येक लग्नातच काय किंवा कुठल्याही नात्यात एक देवाणघेवाण असतेच, अगदी नोकरीतही असते. प्रत्येकाच्या अपेक्षा असतातच, भांडणं, रुसवे-फुगवे असतातच. पण म्हणून त्यात मला स्वतःला 'अशक्त' म्हणवून घ्यायला मला आवडत नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने काहीतरी लिहायचा विचार होता. अनेक विषय डोक्यात आले पण त्यातला कुठलाही आधी लिहिला गेला नाहीये असं वाटलं नाही. शिवाय त्यात मी माझे विचार मांडताना मी स्वतःला एक 'व्यक्ती' ना समजता 'स्त्री' म्हणून वेगळं काढू पाहतेय हे मला पटलं नाही. खास महिलादिनासाठी लिहून मी माझं 'स्त्री' पण सिद्ध करावं किंवा उगाच काहीतरी लिहून माझं जे हे 'व्यक्ती' मत्व आहे ते घालवायची अजिबात इच्छा होत नाहीये. म्हणून मी कुठलीही गोष्ट पाठवू शकत नाही. क्षमस्व. लोभ असावा.

अपर्णा. "

इतकं लिहून तिने ती मेल पाठवून दिली आणि पुन्हा टीव्ही बघायला गेली.

विद्या भुतकर.

       

Monday, November 28, 2016

हॅलो किट्टी

           बॉस्टनला आल्यावर नवीन नोकरी लागल्यावर एक मोठ्ठा प्रश्न होता तो म्हणजे 'डबा कसा न्यायचा?'. एक तर पर्समध्ये आधीच वॉलेट, लॅपटॉप, चार्जर, फोन आणि बराच कचरा असायचा. त्यात थंडी असताना स्वेटर, जॅकेट असणारच. शिवाय हे सगळं जाता येताना २-२ ट्रेन मधून ना हरवता घेऊन जायचं-यायचं. त्यामुळे यात अजून एक वेगळी पिशवी डब्यासाठी कशी न्यायची असा गहन प्रश्न होता. :)  पण पातळ भाज्या, तेल यातलं काहीही पर्समधल्या सामानावर पडण्याची रिस्क घेऊ शकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने, मळखाऊ असणारा आणि त्यामुळे मुळातच मळकट दिसणारा असा एक लंचबॉक्स घेऊन आले होते.
        पहिल्याच दिवशी तो घेऊन गेले तेंव्हा सारखी भीती वाटत होती की तो कुठेतरी राहील की काय. एका ऑफिसातल्या मुलीला म्हटलंही की माझा लंच बॉक्स विसरायची दाट शंका आहे मला. त्यावर ती म्हणाली,"Eventually its going to happen, you know that right?". म्हणजे कधी ना कधी हे घडणारंच आहे याची मनाने तयारी करून ठेवायलाच लागणार होती. तरीही वर्षभर अनेक ट्रेनचे डब्बे, बस यातून तो मी सुखरूप घरी परत आणला होता. पण एक दिवस स्टेशनवरून मुलांसाठी खाऊ घेतला आणि बसमधून उतरताना हातात दोन पिशव्या मोजल्या आणि उतरले. :) ती दुसरी पिशवी खाऊची होती आणि डब्बा कुठेतरी विसरला होताच. :( असो. गाडीत बसल्यावर नवऱ्याला सांगत होते तर मुलांना गोंधळ घातला. "तू डबा हरवलास? कसा काय? कुठे? आता मिळणार नाही? " असे अनेक प्रश्नाला तोंड द्यायला लागलं.
         दुसऱ्या दिवसापासून प्रश्न होताच, डबा कसा नेणार? काही दिवस एक जाडजूड पेपर बॅगही नेली. मध्ये जोरात येणाऱ्या पावसात तिचा चुरा होऊन काचेचा एक डबा स्टेशनवर आपटल्यावर लोकांच्या नजरेपासून कुठं लपावं असं झालं होतं. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न सुरु. बरं, असं नाही की मी बाहेर कुठे जात नाही. अनेकवेळा अनेक ठिकाणी खरेदीला गेलेय पण या लंचबॉक्सचं काही लक्षात राहत नाही. अगदी सोमवारी सकाळी डबे समोर दिसले की चिडचिड होते स्वतःवर दोन दिवसात बॅग विकत घेतली नाही म्हणून. या विकेंडलाही भरपूर खरेदी झाली पण तरीही लंचबॉक्स राहीलाच.
        आज सकाळी सानुला म्हटले तुझी नवीन बॅग घेऊन जाते तू तुझा जुना बॉक्स ने, पण ऐकतील ती पोरं कसली? तिची एक पिशवी जरा कमी डिसाईनची आहे आणि जुनी 'हॅलो किट्टी' ची. आता ती हॅलो किट्टी ची बॅग कुठे नेणार? पण नाईलाज होता. मी डबे त्यात भरल्यावर पोरांचे प्रश्न सुरु झाले,'तू खरंच हा लंचबॉक्स नेणार आहेस?". म्हटलं ,"हो". त्यावर, स्वनिकने माझ्या हरवलेल्या लंचबॉक्सचा उल्लेख करायचा चान्स सोडला नाही. मग म्हणाला,"लोक हसले तर?".  म्हटलं, "मीही त्यांच्यासोबत हसणार.". सानू म्हणाली,"कदाचित ऑफिसमध्ये मोठे लोक आहेत त्यामुळे ते काही बोलणार नाहीत." म्हटलं,"इट्स ओके." आणि तो हॅलो किट्टी चा लंचबॉक्स घेऊन निघाले.
       ट्रेनमध्ये आणि चालतानाही अगदी ते हॅलो किट्टी चं चित्र आतल्या बाजूला ठेवूनच गेले. तरीही शेजारी बसणाऱ्या आणि दिवसातून एखादं वाक्य बोलणाऱ्या मुलाने विचारलेच,"Hello Kitty?". म्हटलं, "हो, मुलीचा आहे." पुढे जेवायला मैत्रिणींसोबत गेले तेंव्हा त्यावर बोलणं झालंच. हसून म्हटलंही,"बाकी सर्व शॉपिंग केली पण या लंचबॉक्सचं काही लक्षात राहात नाही". घरी आले आणि त्यातून सुटले. आता उद्या काय करायचं हा प्रश्न आहेच. पण त्याहून मोठा एक प्रश्न पडलाय.
         आपण इतके मोठे, शिकलेले आणि बरेच कॉन्फिडन्टही. तरीही अशी एखादी वस्तू घेऊन फिरताना,'लोक काय म्हणतील' हा विचार थोडा का होईना येतोच. तर मग शाळेत जाताना या मुलांचं काय होत असेल? इथे तर राहणं, वागणं, बोलणं, खाणं, संस्कृती या सर्व वेगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मित्र-मैत्रिणी बनवणे यासारखं अवघड काम नाही. "fitting in' आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे तर त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. चुकून तोच हॅलो किट्टीचा डबा स्वनिकला दिला तर त्याला कसं वाटेल? आजकाल मुलांना योग्य-अयोग्य सांगणे, समजावणे आणि त्यातून त्यांना ते पटले तरीही तितकी हिम्मत ठेऊन योग्य ते करणे, बोलणे यासाठी पुढे किती मोठ्ठ काम आहे काय माहित? आज त्यांच्या प्रश्नातून त्यांच्या मनात असणारे विचार समोर येत होते. त्यांनाही पुढे कधी असा डबा घेऊन जात येईल का? आणि तेही जास्त अवघडल्यासारखे न वाटून घेता?


विद्या भुतकर.

Sunday, November 27, 2016

वांगेपुराण

       मागच्या आठवड्यात वांग्याची भाजी केली. आता म्हणाल, ही काय सांगायची गोष्ट आहे का? वांग्याची भाजी सर्वानाच आवडते असं नाहीये पण मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने ती करते ती साधारण बऱ्याच लोकांना आवडते. अर्थात ती काही खास माझी रेसिपी नाहीये. आईची त्याच्याहून छान होते आणि मी जी करते त्यातही तिनेच केलेला मसाला असतो म्हणून ती तशी होते. त्यात गेले काही दिवस बरं नसल्याने नीट जेवण बनवणं झालंच नव्हतं. म्हणून आज शेवटी मस्त वांगे, चपाती, वरण, भात हे सर्व बनवलं. असो.
          हे वांगेपुराण सांगायचं कारण म्हणजे, दर वेळी वांगी केली की ती केवळ मी आणि संदीप आनंदाने खातो.पण ही अशी एक डिश आहे की ती केल्यावर शेजारी जाऊन एक वाटी देऊन यायची इच्छा होतेच. अनेकवेळा नवीन ठिकाणी असताना वांगी केल्यावर ती देण्यासाठी कुणी शेजारी नाहीत याचंही वाईट वाटलं आहे. कधी ऑफिसमध्ये मैत्रिणींसाठी नेली आहे परंतु ताजी भाजी बनवल्यानंतर, आई आम्हाला जशी सांगायची 'जरा जाऊन देऊन या रे ' तसं करण्यात मजा औरच असते. नवीन घराशेजारी सख्खी महाराष्ट्रातील शेजारीण मिळाली आणि माझा एक प्रश्न सुटला. :) आजही तिच्याकडे ताट देऊन आले.
         आता यात ती भाजी खूप ग्रेट असते असे नाही पण कुणालातरी आपल्या हातचे खायला देण्यात मजा येते. आम्ही लहान असताना, वेगवेगळ्या काकूंचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे. ते कधी घरी आले की अगदी थोडं थोडं वाटून खायला लागायचं. रोजच्या जेवणापेक्षा एकदम वेगळं काहीतरी अचानक मिळायचं. त्यात आमच्या एका काकूंची अळूवडीही होती. आजही कधी त्यांना कळले आम्ही येणार आहे तर त्या नक्की घेऊन येतात. त्या छोट्याशा गोष्टीने काहीतरी स्पेशल मिळाल्याचा आनंद असायचा. अर्थात हे असे देणे-घेणे आईकडूनही असायचे. आम्ही सायकल वरून जाऊन द्यायचे. कुणालातरी आठवणीने डबा पाठवून देणे किती छान आहे ना? एकाच बिल्डिंगमध्ये असताना तर दूरही जावे लागत नाही. 
       बरं एखाद्याचा काही पदार्थ आवडतो म्हणून आईने आमच्यासाठी रेसिपी विचारून ते तसे प्रयोग करूनही पाहिले आहेत. कधी कधी तर आम्हाला शंकाही यायची की त्या रेसिपीमधला एखादा महत्वाचा घटक मुद्दाम तर सांगायचा विसरला नसेल ना? :) कारण कितीही प्रयत्न केले तरी त्या काकूंसारखा तो पदार्थ व्हायचाच नाही. मग आम्हीही नाद सोडून द्यायचो. प्रत्येकाच्या हातची चव वेगळीच असते हे कळायला बराच वेळ गेला. आता मुलांसाठी काही बनवताना लक्षात येते आपणही आईला असेच म्हणायचो,'त्यांच्यासारखे नाही झाले'. :) कळतं की कितीही काहीही केले तरी ती अगदी सेम चव येत नाहीच. आणि ज्याच्या त्याच्या हाताची चव आणि त्यांचा तो पदार्थ आवडीने खाण्यातच खरी मजा असते. पण त्यासाठी ते तसे शेजारीही पाहिजेत आणि आवडीने करून घालणारे लोकही. :) आजच्या त्या वांग्याने पुन्हा या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली.

विद्या भुतकर. 


Sunday, November 20, 2016

कधीच वाटलं नव्हतं

 सोबत वेळ घालवू तसं नातं बदलत जातं. कधी काळी पाहिलेल्या स्वप्नांपेक्षा एकदम निराळं आणि तरीही आवडणारं, नव्याने प्रेम दाखवणारं. :) 

Wednesday, November 16, 2016

यू आर माय सनशाईन

    
मागच्या आठवड्यापासून इथे 'डे लाईट सेव्हिंग' सुरु झालं. की संपलं? कळत नाही. हे म्हणजे डोळ्याची दूरदृष्टिता म्हणजे कसे जवळचे दिसत नाही त्या टाईप मध्ये आहे असे मला वाटते. मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा म्हणून उन्हाळ्यात सर्व घड्याळे एकेक तास पुढे केली जातात. आणि अर्थातच थंडीत पुन्हा मागे. म्हणजे काय तर साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका रविवारी मध्यरात्री २ दोन वाजलेले असताना, २ वाजलेत असं म्हणायचंच नाही, १ वाजलाय म्हणायचं आणि त्यामुळे सकाळी तुम्ही रोज ६ वाजता उठत असाल तर त्यादिवशी त्याच वेळेला तेव्हा सात वाजलेले असणार. आणि थंडीत संध्याकाळी ५ वाजता सूर्यास्त होत असेल तर तो ४ वाजताच होणार. जाऊ दे. जास्त स्पष्टीकरण देत नाही. मलाच कसंबसं समजलंय.
         पण या वेळेच्या बदलाने होतं काय तर, घरातील सर्व घड्याळ (फोन सोडून) स्वतः बदलावी लागतात. बरेचवेळा जी वेळ आहे ती योग्य आहे का बदलायची राहिलेय हे कळत नाही. सकाळी उठून पोरांना एक तास पुढे किंवा मागे रुटीन लावावं लागतं. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वेडीच झाले होते. म्हणलं सर्व घड्याळातील वेळ बदलायची? तर नुसती घडयाळे नाहीत, ट्रेन, बस यांच्या वेळा, ऑफिस हे सर्व तर झालंच. पण अमेरिकेतील या बदलाने तिकडे ऑफशोअरला काम करणाऱ्या भारतातील लोकांनाही पुढे मागे करावे लागते. प्रत्येक सर्व्हर, सिस्टीमचे घड्याळ बदलायचे तेही दर सहा महिन्यांनी आणि बदललेल्या दुसऱ्या दिवशी सर्व नॉर्मल चालू आहे असेच वागायचे. मला तर अजूनही अवघड जातं ते.
        पण सर्वात जास्त त्रास मला याचा होतो तो थंडीत. एकतर आधीच दिवस छोटा झालेला असतो. थंडी वाढलेली असते आणि त्यात अचानक दुपारी ४ वाजताच एकदम अंधार पडायला लागतो. ऑफिसातून कितीही लवकर निघा, बाहेर पडताना अंधार आहेच. त्यामुळे जणू दिवस संपूनच गेलाय असं वाटतं. मुलांना बाहेर खेळण्यासाठी असेही पूरक वातावरण नसते त्यात अंधाराची भर. थंडी आणि अंधार यातून घरी पोहोचल्यावर भूक लागल्यावर खूप खाल्लेही जाते. व्यायाम वगैरे साठी अजिबात उत्साह नसतो. मस्त गरम चहा, नास्ता घेऊन पांघरुणात बसून टीव्ही बघावा असं वाटतं. अशा वेळी माणूस घरात एकटा राहत असेल तर 'डिप्रेशन' येण्याच्या शक्यता अजून वाढतात. शिवाय वजन वाढते ते वेगळेच.
       बर्फ पडू लागल्यावर दिवसा काचेतून दिसणारं ऊनही निरुपयोगी होतं. मला नेहमी प्रश्न पडायचा हे चित्रपटात बर्फ आणि ऊन कसं काय दाखवत असतील. आता प्रत्यक्षात पाहिल्यावर कळतंय की ऊन नुसतं नावाला असतं. तापमान कमीच असतं त्यामुळे बर्फ वितळतच नाही. हे सर्व अनुभवल्यावर आणि त्यानंतर भारतात राहिल्यावर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. १. आपल्याकडे भारतात 'सूर्य प्रकाश' आणि पूरक तापमान किती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे.  २. आणि आपण त्याचा किती कमी प्रमाणात उपयोग करून घेतो.
         योगामध्ये आपल्या पूर्वजांनी जे सूर्याचे नमन केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मला पटू लागले आहे. सुरुवात करायची तर, सूर्यप्रकाश नसल्याने ज्या त्वचेच्या व्याधी किंवा व्हिटॅमिन डी चा अभाव हे इथल्या लोकांत जाणवते ते भारतात कमी होऊ शकते. लहानपणी थंडीत आजोबा आम्हाला सकाळी उन्हांत बसायला सांगायचे त्यांच्यासोबत आम्हीही 'उन्हं खातं' बसायचो. :) पण आजकाल आपण सूर्यप्रकाश नुसता बघायलाही बाहेर थांबत नाही. सकाळी उठून चालत जाणे तर दूरच. इथे बॉस्टन किंवा जिथे थंडी ६-६ महिने असते अशा ठिकाणी मुलांचे खेळावरही परिणाम होतो. त्यांना कुठे खेळायला न्यायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. भारतात आपल्याला पाऊस आणि कडक उन्हाळा सोडला तर जवळजवळ ८ महिने व्यायामाला पूरक वातावरण असते. तरीही मुलांच्या खेळांकडे कमी लक्ष असते (निदान इथल्या मुलांच्या तुलनेत तरी). बाहेर मुले खेळताना दिसणेही तसे पूर्वीपेक्षा कमीच आहे. पण व्यायाम आणि एखादा नीट शिकलेला खेळ यांचे प्रमाण अजून कमी.
       तसेच शेतीचेही आहे. शेतकऱ्यांच्या गरिबीमुळे आणि नवीन प्रकल्पांच्या अभावामुळे असलेल्या सूर्यप्रकाशाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेत नाहीये असे वाटते. इथे लोकांना थंडीत भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. आमच्या घरात सध्या एक तुळस आहे, तिला मी आता घरात ठेवले आहे आणि रोज सकाळी जमेल तसे उन येईल त्या त्या जागी तिला फिरवत राहते. पण तेही आता पुरेसे वाटत नाहीये आणि मला बहुदा 'प्लांट लाईट' आणावा लागणार आहे. ज्यातून सूर्यप्रकाशासारखे किरण तिला मिळतील. अनेक लोकांना असे रोपे टिकवताना पाहून वाटते मी भारतात असताना का इतकी निष्काळजी राहिले? तेव्हाही थोडे लक्ष लावून झाडे जागवायला हवी होती.
       इथे अनेक वेळा बाल्कनीत कपडे वाळत घातलेत म्हणजे भारतीय असणार असे जोक मी ऐकलेत. आणि मलाही कधी वाटायचं की जाऊ दे ते कपडे ड्रायर लाच टाकावेत. उगाच कशाला बाल्कनीत कपडे? पण मी भारतात कपडे धुवायचे मशीन बघत असताना ड्रायर पाहिला त्यात कपडे वाळवण्यासाठी आणि धुण्यासाठी मिळून ३ तास लागणारे सायकल होते. म्हणजे किती ती इलेक्ट्रिसिटी वाया. गेल्या २-३ वर्षात माझ्या लक्षात आलं आहे की खरंच इतका सूर्यप्रकाश उपलब्ध असताना का मी तो ड्रायर वापरायचा हट्ट करायचा? आणि इतकी वीजही वाया? आपल्याकडे हा एक रिसोर्स आहे त्याचा वापर करून घेतलाच पाहिजे आणि त्यामुळे मला तसे कपडे वाळवणे अतिशय योग्य वाटते. आपल्याकडे अजून सोलर प्लॅण्टही अजून व्हायला हवेत ज्याने त्याची पूर्ण क्षमता वापरली जाईल.
      उन्हाचा आपल्या शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होतो. जसे पावसाळी वातावरण उदास करते तसेच ऊन प्रसन्न करते. सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या खिडकीतून किंवा बाल्कनीत येणारे ऊन कितीतरी उत्साह देऊन जाते. पण किती जण ते अनुभवण्यासाठी लक्ष देतात? कारण आपण ऊन गृहीत धरतो असे मला वाटते. आज नाही पाहिले, उद्या असेलच. त्यात कडक उन्हाच्या त्रासाचाही भाग असतो थोडा, पण जाणीवपूर्वक सूर्यप्रकाश अनुभवणे खूप कमी झाले आहे असे वाटते. इथे लोकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे मिळेल तेंव्हा ते त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. खरंच आपण अनेकदा मुलांना किंवा जवळच्या व्यक्तीला म्हणतो, you are my sunshine'.  म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला सूर्यप्रकाशाइतकीच आनंद देते, उजेड देते आणि आपल्याला प्रसन्न करते. त्यामुळे मी तर म्हणते 'Sunshine is our sunshine'. आणि आपण त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे, लवकरच  !!

विद्या भुतकर.

Tuesday, November 15, 2016

Monday, November 14, 2016

कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे

        परवा रात्री घरी येत असताना जुनी गाणी गाडीत लावली आणि खूप वर्षांनी 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' ऐकलं. एकूणच घर-संसाराच्या गराड्यात बऱ्याच गोष्टी हरवल्यात असं वाटतं त्यातली ही एक. आठवणीने जगजीतची गाणी ऐकलीत असं झाल्याला कित्येक वर्षं लोटलीत. खूप वर्षांनी जुनं काहीतरी मिळाल्याचा आनंद होताच पण त्यासोबत एक उदासीही. यावेळी तो जगात नाहीये ही जाणीव होत राहिली. कितीही प्रयत्न केला तरी त्या गाण्याचा पलीकडे जाऊन त्याची उणीव भासत होती. अगदी 'RIP जगजीत' म्हणून अनेक पोस्ट दिसल्या होत्या ना? तेव्हा पण ते तितकं जाणवलं नसेल. 
         खरंतर मीच जाणवून घेतलं नव्हतं. आजही फक्त एकच समाधान आहे की जगजीत सिंगची एक का होईना कॉन्सर्टला जाऊन आले आहे. जवळून ते भारलेलं वातावरण पाहिलं, अनुभवलं आहे. ते केलं नसतं तर मात्र किती रुखरुख राहिली असती माहित नाही.
        गेल्या काही वर्षात जवळच्या अनेक व्यक्ती गेल्यात. त्यात सर्वात जवळचे आजोबा. यातल्या कुठल्याच व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मी नव्हते. आता हे चांगलं की वाईट हे माहित नाही. कारण त्या त्या व्यक्तीला आपण शेवटचे भेटलोय किंवा त्यांना खरंच निरोप दिलाय असं जे म्हणतात ना त्यातलं काहीच नाही. त्यामुळे होतं काय की आजही त्यांच्या आठवणी येतात तेंव्हा ते केवळ फक्त खूप दिवस भेटलो नाहीये इतकाच विचार करून. आजोबा, मामा, मामी, आत्या यांचे रेफरन्स संदीपशी बोलताना अजूनही तसेच येतात. पण कधीतरी असेच कुठल्यातरी क्षणी ते या जगात नसल्याची जाणीव होते आणि उदास वाटत राहतं.
       खरंच आपण इतके व्यस्त झालेलो असतो की या अशा आठवणी क्वचितच मनाला थांबवून ठेवतात. अर्थात अजून जवळच्या व्यक्तीही असतात ज्यांची पदोपदीही आठवण येत राहते. पण तरीही आपण मनाला कुठेही काहीही जाणवू देत नाही. आणि जाणवलं तरी ते तसंच धरून बसायला तितकी उसंत नसते. पण असे कधीतरी एखादं गाणं, प्रसंग, खायचा पदार्थ, सवयी, सणवार... यातले काहीतरी घडते आणि त्या व्यक्तीची आठवण करून देते. जगजीत सिंगचं गाणं खूप दिवसांनी ऐकल्यावर तसंच वाटलं. त्याच्यासोबत आणि बाकीही आठवणी...
       त्यात आणि आजकाल 'तुम बिन-२' मधलं 'कोई फरियाद' सध्या येत राहतं रेडियोवर आणि त्यात तोच जगजीतचा आवाज...'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे....' कधी कधी त्याला गाऊ देते, आठवणीत जाऊन येते. पण कधी धीरच होत नाही आणि पुढचं गाणं सुरु करून टाकते. दिवस तसेच जात राहतात.... पण शब्द सोडत नाहीत... 'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे.... जागते जागते एक उम्र कटी हो जैसे.......'   

ही पोस्ट अशाच मनात असलेल्या अनेक फिर्यादींसाठी ....... 
 
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, November 11, 2016

'सगळं ठीक आहे ना?'




विद्या भुतकर.

https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Thursday, November 10, 2016

निनावी

खरंच कधी कधी काही नात्यांना काय नाव द्यावं कळत नाही. अनेकवेळा त्यातली जी गंमत आहे, जे प्रेम आहे, जो अर्थ आहे तो त्यांना नाव देऊन पूर्ण नाहीसा करून टाकतो आणि मग त्या नाव दिलेल्या नात्यांकडून असलेल्या अपेक्षाही त्याच्यासोबत येतात. नाही का?



विद्या भुतकर.


Wednesday, November 09, 2016

ट्रिक ऑर ट्रीट

       परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही  काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .
          आजकाल मुलांना गोळ्या, बिस्किटे, चिप्स हे इतक्या सहजपणे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते की साधे किराणा आणायला गेल्यावरही एकतर त्यांची रडारड होते किंवा आम्हाला समोर दिसणारे चॉकलेट किंवा बिस्कीट घ्यावे तरी लागते. सुदैवाने मुले बरेचवेळा ऐकतात. पण प्रत्येकवेळी शक्य होत नाही. आणि जसे जसे ते मोठे होत आहेत, त्यांना समजावणे किंवा नकार देणे अवघड जात आहे. त्यात शाळेत मुलांच्या डब्यात कधी कधी अगदीच 'जंक फूड' येते, तेव्हा 'मला का ते मिळत नाही?' यावर उत्तर देणे अवघड जातेय. एक-दोन वेळा आम्ही स्वनिकला मग डब्यात जेवणासोबत चिप्सही दिले होते. बरं, पुढे जाऊन याच सर्व गोष्टी वाढदिवसालाही मिळतात. चिप्स, चॉकलेट हे प्रत्येक पार्टीत असतेच. त्यातून बाहेर पडणे अजूनच अवघड जातेय.
        घरी असताना बरेचदा त्यांना जे खातोय ते योग्य का आहे हे समजावून सांगतो. इतके की एक-दोन वेळा मी काहीतरी विसरले असताना स्वनिकने मला 'बदाम खाण्याचा' सल्ला दिला. :) सुदैवाने त्यांना सलाड आणि फळे खूप आवडते. तरीही मी केलेल्या भाज्या, वरण, चपाती खाणे अगदी तिखट जेवणही करणे यात थोडे वाद होतात. पण त्यांना आता वेगवेगळे सूप, सलाड, भाज्या आवडत आहेत. कधी सान्वी डाळ भाताची खिचडी करायला सांगते किंवा स्वनिक भेंडीची भाजी. अशावेळी आपण जे त्यांना शिकवत आहोत त्याचा खूप आनंद होतो. पण त्यासाठी तितकाच पेशन्स ठेवावा लागतो.
       परवाच मी डब्यात दिलेला चपातीचा रोल तसाच परत आला. त्यात सान्वीनेही पावभाजी खायला नाटक केले. हे सर्व इतके वैतागवाणे होते की चिडचिड झाली खूप. डब्यात दिलेले बरेचसे जेवण तसेच परत आल्यावर किती आणि काय समजवायचे असा प्रश्न पडतो. कधी ते मोठे होतील आणि स्वतःची काळजी घेतील या विचार वैताग येतो. काळ मात्र मला एक मोठा आनंदाचा धक्का मिळाला.  डबा पूर्ण संपलेला होता. म्हटले काय विशेष आज? स्वनिकने शाळेत माझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवले होते. कार्ड मध्ये लिहिले होते, "Aai tu best cook aahe". :) तेही त्याने मराठी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटले मी केलेला पास्ता आवडतो म्हणून त्याने लिहिलेय कि काय? तर म्हणे,"तू परवा केलेलं वरण खूप छान झालं होतं म्हणून मी हे ग्रीटिंग केलं तुझ्यासाठी".
       आता एक आई म्हणून मला झालेला आनंद तर होताच.  पण अनेकदा त्यांच्या न खाल्लेल्या डब्याकडे पाहून होणारी चिडचिड, त्यांना अनेक भारतीय पदार्थातील असलेला आनंद ना समजणं, चॉकलेट-चिप्स, जंक फूड पासून वाचवण्यासाठी कष्ट घेणे इ यावरून खूप दमायला होते. पुढे जाऊन कधी त्यांना आपल्या जेवणाची किंमत राहील का असे वाटतेही. त्यात कधी कधी हे असे क्षण मात्र एक नवीन आशा नक्कीच देतात, पुढेही योग्य ते करत राहण्याची. :) त्यांना योग्य-अयोग्य शिकवण्यासाठी कितीही ट्रिक्स वापराव्या लागल्या तरी चालेल हे अशी ट्रीट  मिळणार असेल तर. होय ना?

विद्या भुतकर.

Tuesday, November 08, 2016

बाबा अभ्यास घेतात तेंव्हा

          आज काल संदीप सानूचा अभ्यास घ्यायला लागलेला आहे. मी जेवण बनवत असताना तेव्हढाच वेळी कामी लागतो आणि माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पेशन्स आहे म्हणून खरंतर त्याला हे काम दिलेलं असतं. पण गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून मला एक ट्रेंड लक्षात आला आणि बऱ्याचशा अभ्यास घेणाऱ्या बाबांचा, इन्कलुडींग आमचे. :) आमची अभ्यास घेण्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. खरंतर शाळेतून अक्ख्या वर्षभरासाठी 'नो होमवर्क' पॉलिसी अवलंबली आहे म्हणे. तरी आम्ही आमच्या परीने थोडं फार घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अभ्यास करून घेण्यासाठी योग्य पध्द्त कुठली यावर माहितीचा धागा काढला पाहिजे. पण तोवर ही यादी तरी देते:
१. अभ्यासाला घे म्हटलं की पोराने लगेच घेतलं पाहिजे. (इथे आईला माहित असतं की आपलं पोरगं काही एका शब्दात ऐकणारं नाहीये.) थोड्या दिवसात मग, 'हे बघ असं असतं हजार वेळा सांगूनही ऐकत नाही लगेच बसायला' असं आईला ऐकून घ्यावं लागतं.
२. मूळ विषय सोडून एरवी कसे ते पोर आपण सांगितलेलं अजिबात ऐकत नाही यावर आईला आणि पोराला दोन चार शब्द ऐकावे लागतातच. पुढे अभ्यासाला बसताना पोराने कधीही पेन्सिल, वही इ साहित्य एकत्र घेतलेलं नसतं. त्यावरून पेन्सिल घेतली का? खोडरबर घेतलंस का? असे प्रश्न चढ्या आवाजात होतात.कधी अभ्यास करताना पेन्सिल तुटलीच तर मग ते पोर शार्पनर शोधायला म्हणून पळून जातं ते १० मिनिट येत नाही. कारण ते जागेवर सापडलं नाही म्हणून अजून ऐकून घ्यावं लागणार असतं.
३. एकदाचं पोर जागेवर बसलं की अभ्यास सुरु झाल्यावर सर्वात पहिली सूचना येते,"नीट बस. पाठीला पोक काढून बसू नकोस. लोळू नकोस."
४. वैतागून पोर सरळ बसलं की पुढची सूचना,"जरा पेन्सिल नीट धार की, काय ते अक्षर ?". एकतर इथे पोराने पेन्सिल कशीही धरली तरी त्यातून फक्त अक्षर उठतंय ना इतकंच पाहतात. त्यात मग ती वाकडी का सरळ हे कोण बघणार?
५. पाच वेळा पेन्सिलीची सूचना झाल्यानंतर खरा अभ्यास सुरु होतो. जरा कुठे पहिलं गणित झालं की,"हा सांग १८+९ मध्ये १८ मध्ये टेन्स (दहाच्या जागी किती) आणि वन्स किती आहेत? पोराने हवेत पाहिलं की," ते काय हवेत दिसत आहेत का? लिही, १८ची फोड, १-१०, ८-१. नीट नवीन ओळीत लिही.
६. हेच कधी इंग्रजी असेल तर, बोल मोठ्याने बोल. स्पष्ट बोल, वर छताकडे बघू नकोस. किती वेळा सांगितलं आहे लगेच लिहायचं, नुसतं हवेत बघत बसू नकोस.
७. पोराने लिहायला सुरुवात केली की आमच्याकडे एक प्रॉब्लेम होतो. पोरींचे केस डोळ्यावर येतात. मग, केस का मोकळे सोडलेत? जरा नीट बांधत जा की. मग आईकडे मोर्चा वळतो," जरा हिच्या केसांचं काहीतरी कर. नाहीतर कापून आण. पोरीने रबर शोधून आणून केस बांधेपर्यंत ५ मिनिटं जातात.
८. सगळं होईपर्यंत जेवायची वेळ झालेली असते. पोराला कंटाळाही आलेला असतो. "बरोबर टीव्ही बघताना झोप येत नाही. अभ्यास करायला लागलं की झोप येते लगेच. " हे ऐकून घ्यावं लागतं.
९. कधी जेवणाच्या निमित्ताने का होईना पोराची सुटका होते किंवा कधी आई-बाबांचंच कसं पोराला बिघडवलं आहे यावरून जोरात भांडण सुरु होतं आणि मधल्या मध्ये पोर पळून जातं.

मी अभ्यास घेते तेंव्हाही काही ग्रेट होतं असं नाही. पण मी थोडी माहिती वाचली होती त्याप्रमाणे सुरुवातीचे तयारी करायचे चे प्रॉब्लेम आहेत ते सोपे आहेत. उगाच पेन्सिल, पेपर, खोडरबर घेणे किंवा नीट बसणे यासारख्या गोष्टीत ठराविक ठिकाणी सर्व सामान ठेवणे, नियमित बसायची,नीट जागा असणे इ असेल तर सुरुवातीचे बरेच वाद कमी होतात.. नवऱ्याला तेही सांगून झाले आहे पण काही ना काही होतेच. अर्थात हे सर्व किस्से एकाच दिवशी होतात असं नाही पण या यादीतील एक तर होतोच बाबा अभ्यास घेतात तेंव्हा. बरोबर ना?  :)

विद्या भुतकर.

Monday, November 07, 2016

Live in the moment

       मागच्या आठवड्यात 'ऑफिसातल्या पाट्या' बद्दल लिहिताना विचार करत होते की ते जुनं ऑफिस काही इतकंही जवळचं नव्हतं की त्याची आठवण यावी. केवळ एकंच वर्ष तिथे झालेलं आणि असेही इतके छोटे डेस्क होते की याच्यापेक्षा दुसरे काहीही चालेल असं वाटलं होतं. आणि आता इतके वर्षात थोडी का होईना नवीन ऑफिसची क्रेझ तशी कमी झालेली असेल असंही वाटत होतं. त्यामुळे आपण अगदीच 'कूल' असल्यासारखे आज मी ऑफिसच्या नवीन बिल्डिंगला गेले. ट्रेनमधून उतरल्यावर जातानाच एकदम वाटलं, 'अरे मागच्या ऑफिसला २-३ मिनिटंच चालायला लागत होतं. आता १० मिनिटे लागत आहेत. :('  नकळत माझ्या तुलना सुरु झाल्या होत्या.
        आता गेल्यावर नवीन ऑफिसच्या निमीत्ताने मस्त नाश्ता ठेवला होता. नवीन डेस्कवर एकेक छान फूलही ठेवलेलं होतं. कितीही नाही म्हटलं तरी बाकीच्या मैत्रिणींसोबत तिथल्या नवेपणात मीही हरवून गेले. बाथरूम कुठे, कॅफे कुठेय, कसा आहे, नवीन बिल्डिंगच्या आजूबाजूला काय काय आहे? म्हणजे मी कितीही नाही म्हटलं तरी जुन्या बिल्डींगच्या आठवणी आणि तुलना होतंच होत्या आणि त्यासोबत नवीन बिल्डिंगच्या नवेपणाचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक मैत्रीण ऑफिसला कशी पोहोचली, कुणी कुणाला सोडलं, इथपासून अगदी ऑफिस सुटेपर्यंत मैत्रिणींच्या डेस्कवरील वेगवेगळ्या फुलांचे फोटो काढून त्याचं एक कोलाजही बनवलं. एकूण काय मी कितीही निरुत्साह दाखवला तरी या बदलाचा माझ्यावर नक्कीच परिणाम झाला होता. पण तो मान्य करायला मला तिथे एक दिवस घालवावा लागला.
         आम्ही शिकागोला असताना आमच्या बिल्डिंगमध्ये अनेक लोकांशी ओळखी झाल्या. अनेकदा आम्ही पॉटलक करायचो. नुकतंच लग्न झालेलं आणि अशा संसारी गोष्टी करायची सवय नव्हती, किंवा तेव्हा मुलंही नव्हती त्यामुळे मुलांचे विषय आले की आपण काय करणार असे प्रश्नही पडायचे. या सगळ्या लोकांच्या त्या त्या भेटी इतक्या खास असतील हे मात्र ते तिथून निघून गेल्यावर जाणवलं. आजही दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या पार्ट्या आणि गम्मत आठवत राहते. पण ते जाणवायला बाकी ठिकाणी राहून बघायला लागलं. ते इतके स्पेशल असतील हे तेव्हा जाणवलं असतं तर कदाचित अजून जास्त भेटलो असतो. असे अनेक वेळा त्या त्या ठिकाणी राहत असताना तिथल्या अनेक चांगल्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या ज्या तिथून निघाल्यावर जाणवल्या.
        आजही एक हुरहूर वाटली होती ती म्हणजे त्या जुन्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या बाहेरचा एक आवडता व्ह्यू होता, त्याचा फोटो काढला नाही. कदाचित तिथे परत जाऊन काढताही येईल पण प्रत्येक वेळी अशी संधी मिळेल असं नाही. तीच गोष्ट बॉस्टनची झाली आहे. इथे येऊन साधारण दीडेक वर्ष झालंय आणि अजूनही पुण्यातल्या आठवणी येत राहतात आणि बॉस्टन 'आपलं' वाटत नाही. कदाचित त्याची किंमत कळायला इथून बाहेर पडायला लागेल. 'live in the moment' किंवा जे आहे त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे, इ इ कितीही वेळा बोललं आणि कितीही मान्य असलं तरी प्रत्यक्षात ते स्वीकारणं, अंमलात आणणं किती कठीण आहे नाही? कितीही ठरवलं तरी आहे ते सोडून मागच्या आठवणीत आणि पुढच्या स्वप्नांत मन जातंच. असो, सध्यातरी आजचं ते फुलांचं कोलाज पोस्ट करतेय, आज काहीतरी छोटंसं पण आनंद घेऊन केलेलं.

विद्या भुतकर.

Sunday, November 06, 2016

फसलेले क्षण

           थोड्या दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिथे एक मॅनेजर आली होती जिने पांढरास्वेटर घातला होता काळे पोकळ गोल असलेला आणि डार्क पिंक पॅन्ट(फुशिया म्हणतात तो). एकदम भारी दिसत होतं कॉम्बिनेशन. तिकडे मोठ्या लोकांची भाषणं सुरु झाल्यावर रिकामटेकडं डोकं त्या ड्रेसवर खिळलं. हातांना काही चाळा म्हणून मी पेपरवर ते काळे गोल गोल काढत बसले आणि मनात विचार आला असा एखादं चित्र कॅनवासवर काढलं तर? पांढऱ्या शुभ्र कॅनवासवर काळे गोळे( एकदम पेनाने रेघोट्या काढल्यासारखे) आणि १/४ हिस्सा फुशिया रंगाचा. एकदा डोक्यात आल्यावर ते ट्राय करायचा विचार पक्का झालाच. दिवाळीमुळे वेळही मिळत नव्हता. शेवटी दिवाळीचा फराळ करून संपल्यावर थोडा वेळ मिळाला आणि मी ते चित्र काढून बघितलंच. :) 
          एकतर ऍक्रिलिकमध्ये जो मला फुशिया वाटत होता तो कॅनवास वर वेगळाच निघाला. कॅनवास कितीही व्हाईट दिसत असला तरी त्याच्यावर आपण ब्रशने दिलेला व्हाईट वेगळाच असतो त्यामुळे तेही दोन चार हात मारले. आता ते काळे गोल कशाने काढायचे हा प्रश्न होता. पेन्सिलने सुरु केले तर थोडे फिकट आले. रोल पेन काही कॅनवास वर उठेना मग सरळ स्केचपेनने काढले. आता एकूण जे चित्र तयार झाले ते मी मनात काढलेल्या इमेजपेक्षा अगदीच सामान्य होतं. कितीही वेळा कितीही तऱ्हेने पाहिलं तरी ते सामान्यच होतं. :) ते काढल्यावर अजूनही दोन चार काढून पाहायचा विचार होता पण सध्या हा निकाल पाहून धीर होत नाहीये. 
         हे माझं पाहिल्यान्दाच झालं नाहीये. अनेकवेळा एखादी रेसिपी डोक्यात येते आणि ती माझ्या डोक्यात एकदम भारी दिसत असते. सर्व सामान आणून तसे कधी एकदा बनवतेय असं होतं. फार क्वचितवेळा खरंच अगदी मनात आहे तसं प्रत्यक्षातही येतं. अनेकवेळा अगदीच प्रयत्न फसतो तर काही वेळा 'ठीक होती' म्हणत पुढच्या वेळी करायचा हुरूपही राहतो. अनेकवेळा एखादं गाणं गातानाही एखादी गिरकी किती छान घेतलीय म्हणत तोंड उघडलं की संपलं. डोक्यात असलेली ती ट्यून बाहेर पडताना वेगळीच झालेली असते. थोडं हिरमुसलं होतं मन की आपल्याला ते येत नाहीये म्हणून. पण तिथेच थांबत नाही. पुन्हा कधी असंच छान गाणं लागलं की पुन्हा प्रयत्न करतंच. 
       कधी, आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीला मनातलं सांगायचं असेल तर मनात अनेक विचार येतात. असं बोलू की तसं बोलू? आता विचार करा मी ही वाक्ये लिहितेय जी एखाद्याला मोठ्याने बोलून दाखवायची आहेत,"मला ना तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत असताना कसं एकदम मोकळं, कम्फरटेबल वाटतं. आपण सोबत असताना दुसऱ्या कुणाचीच गरज नाहीये असं वाटतं. " मला खात्री आहे की ही आणि अशी अनेक वाक्यं कधी ना कधी आपल्याला कुणालातरी बोलायची असतात.. पण प्रत्यक्षात बोलताना मात्र काहीतरी वेगळंच होतं. ते शब्द डोक्यात कितीही पर्फेक्ट वाटत असले तरी बाहेर पडताना वेगळेच वाटतात आणि मग ते बोलणं लांबतंच. अगदी कुणाला सॉरी म्हणतानाही किंवा एखाद्या जवळच्या मित्राला समजावून सांगताना, कितीही योग्य वाटले तरी ते विचार बाहेर पडताना हवे तसे येतातच असं नाही. मग कधी थोडी धावपळ होते तर कधी ब्रेक-अप. :) 
         हे सर्व विचार, ही वर म्हणाले ती गाणी किंवा एखादी रेसिपी केव्हा एकदा बाहेर पडेल असं होतं तेव्हा त्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आणि तो केलाच पाहिजे असं मला वाटतं. एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी थोडी रिस्कही घेतली पाहिजे. पण बरेचदा असे मनात येणारे विचार नेगेटिव्हही असतात. एखाद्यावर असणारा प्रचंड राग, एखाद्या नातेवाईकाला पुढच्या वेळी भेटल्यावर सुनावायची एखादी गोष्ट, टोमणा, मनात शंभर वेळा रिपीट केलेलं असतं. "अजून एकदा ते असं करू देत मग मी सोडणार नाही, बोलणारंच" असं स्वतःला हजार वेळा बजावलेलं असतं. आणि एखादा असा क्षण येतोही जिथे आपण खरंच ऐकवतो आणि फसलेल्या त्या रेसिपीसारखे किंवा बेसुऱ्या गाण्यासारखे ते बाहेर पडलेले शब्द चुकीचे वाटतात आपले आपल्यालाच. कितीही झालं तरी ते शब्द परत येणार नसतात. मनात कितीही राग असला तरी समोरच्या माणसाचा खरंच तो हेतू नसतो किंवा असला तरी प्रत्यक्षांत कुणी असे आपल्याला बोलेल अशी त्यांनी अपेक्षा केलेली नसते. 
       तो एक क्षण अनेक वर्षांची मैत्री तोडायलाही कमी करत नाही मग. त्यात कधी मग जवळचे नातेवाईक असतात तर कधी आई-वडील आणि आपली मुलंही. हे असे फसलेले क्षण कितीही केलं तरी आयुष्यभरासाठी डोक्यात राहतात आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्याही. अशा वेळी मात्र दुरुस्तीची संधी क्वचितच मिळते. माझ्या फटकळ किंवा चटकन राग येण्याच्या स्वभावामुळे असे क्षण मीही मोजलेत आणि त्यांची किंमतही. त्यामुळे बाकी गोष्टीत कितीही प्रयोग केले तरी या अशा बोलण्याच्या बाबतीत मात्र प्रयोग नकोत असं मला वाटतं. त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो, किंवा मनात आतून चिडचिड करून घेते किंवा संदीपला, आईला वगैरे सांगते. पण रागाने फटकळ बोलून पश्चातापाच्या यादीत अजून काही भर घालायची नाही असं ठरवतेय. हळूहळू प्रयत्न करतेय ते क्षण येऊ न देण्याचा. बघू कितपत जमतेय. पण तोवर गाणी, रेसिपी आणि चित्रं मात्र नक्कीच काढत राहणार कितीही चुकले तरी. :) 



विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
      

Friday, November 04, 2016

पानगळ

सध्या आक्खा गाव या रंगांत बुडालेला आहे. रोज वावरताना हीच झाडे नियमित दिसत असतात पण अचानक एके दिवशी त्यांचे रंग डोळ्यात भरू लागतात. कधी कधी चुकून ड्राइव्ह करताना मी रस्त्यात थांबून जाईन की काय असं वाटतं. कित्येक वेळा रस्त्यात गाडी बाजूला लावून काही फोटोही काढले. आता तर काय घराजवळच हे असं सुंदर जंगल दिसत आहे. त्यामुळे कितीही फोटो काढले तरी मन भरत नाहीये. भारतातल्या उन्हाळा, हिवाळा पावसाळा यांची मजा वेगळी आणि ही अशी रंगान-श्रीमंत सुंदर पानगळ वेगळी. झाडांवर पिकल्यानंतर , साध्या बारीक पावसाच्या सरीनेही किंवा वाऱ्याने झडून जातील इतकी नाजूक. आज आहे तर उद्या नाही. जोवर आहे तोवर तुम्हीही पाहून घ्या. :)