Wednesday, November 16, 2016

यू आर माय सनशाईन

    
मागच्या आठवड्यापासून इथे 'डे लाईट सेव्हिंग' सुरु झालं. की संपलं? कळत नाही. हे म्हणजे डोळ्याची दूरदृष्टिता म्हणजे कसे जवळचे दिसत नाही त्या टाईप मध्ये आहे असे मला वाटते. मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा म्हणून उन्हाळ्यात सर्व घड्याळे एकेक तास पुढे केली जातात. आणि अर्थातच थंडीत पुन्हा मागे. म्हणजे काय तर साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका रविवारी मध्यरात्री २ दोन वाजलेले असताना, २ वाजलेत असं म्हणायचंच नाही, १ वाजलाय म्हणायचं आणि त्यामुळे सकाळी तुम्ही रोज ६ वाजता उठत असाल तर त्यादिवशी त्याच वेळेला तेव्हा सात वाजलेले असणार. आणि थंडीत संध्याकाळी ५ वाजता सूर्यास्त होत असेल तर तो ४ वाजताच होणार. जाऊ दे. जास्त स्पष्टीकरण देत नाही. मलाच कसंबसं समजलंय.
         पण या वेळेच्या बदलाने होतं काय तर, घरातील सर्व घड्याळ (फोन सोडून) स्वतः बदलावी लागतात. बरेचवेळा जी वेळ आहे ती योग्य आहे का बदलायची राहिलेय हे कळत नाही. सकाळी उठून पोरांना एक तास पुढे किंवा मागे रुटीन लावावं लागतं. मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वेडीच झाले होते. म्हणलं सर्व घड्याळातील वेळ बदलायची? तर नुसती घडयाळे नाहीत, ट्रेन, बस यांच्या वेळा, ऑफिस हे सर्व तर झालंच. पण अमेरिकेतील या बदलाने तिकडे ऑफशोअरला काम करणाऱ्या भारतातील लोकांनाही पुढे मागे करावे लागते. प्रत्येक सर्व्हर, सिस्टीमचे घड्याळ बदलायचे तेही दर सहा महिन्यांनी आणि बदललेल्या दुसऱ्या दिवशी सर्व नॉर्मल चालू आहे असेच वागायचे. मला तर अजूनही अवघड जातं ते.
        पण सर्वात जास्त त्रास मला याचा होतो तो थंडीत. एकतर आधीच दिवस छोटा झालेला असतो. थंडी वाढलेली असते आणि त्यात अचानक दुपारी ४ वाजताच एकदम अंधार पडायला लागतो. ऑफिसातून कितीही लवकर निघा, बाहेर पडताना अंधार आहेच. त्यामुळे जणू दिवस संपूनच गेलाय असं वाटतं. मुलांना बाहेर खेळण्यासाठी असेही पूरक वातावरण नसते त्यात अंधाराची भर. थंडी आणि अंधार यातून घरी पोहोचल्यावर भूक लागल्यावर खूप खाल्लेही जाते. व्यायाम वगैरे साठी अजिबात उत्साह नसतो. मस्त गरम चहा, नास्ता घेऊन पांघरुणात बसून टीव्ही बघावा असं वाटतं. अशा वेळी माणूस घरात एकटा राहत असेल तर 'डिप्रेशन' येण्याच्या शक्यता अजून वाढतात. शिवाय वजन वाढते ते वेगळेच.
       बर्फ पडू लागल्यावर दिवसा काचेतून दिसणारं ऊनही निरुपयोगी होतं. मला नेहमी प्रश्न पडायचा हे चित्रपटात बर्फ आणि ऊन कसं काय दाखवत असतील. आता प्रत्यक्षात पाहिल्यावर कळतंय की ऊन नुसतं नावाला असतं. तापमान कमीच असतं त्यामुळे बर्फ वितळतच नाही. हे सर्व अनुभवल्यावर आणि त्यानंतर भारतात राहिल्यावर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. १. आपल्याकडे भारतात 'सूर्य प्रकाश' आणि पूरक तापमान किती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे.  २. आणि आपण त्याचा किती कमी प्रमाणात उपयोग करून घेतो.
         योगामध्ये आपल्या पूर्वजांनी जे सूर्याचे नमन केले आहे ते अतिशय योग्य आहे असे मला पटू लागले आहे. सुरुवात करायची तर, सूर्यप्रकाश नसल्याने ज्या त्वचेच्या व्याधी किंवा व्हिटॅमिन डी चा अभाव हे इथल्या लोकांत जाणवते ते भारतात कमी होऊ शकते. लहानपणी थंडीत आजोबा आम्हाला सकाळी उन्हांत बसायला सांगायचे त्यांच्यासोबत आम्हीही 'उन्हं खातं' बसायचो. :) पण आजकाल आपण सूर्यप्रकाश नुसता बघायलाही बाहेर थांबत नाही. सकाळी उठून चालत जाणे तर दूरच. इथे बॉस्टन किंवा जिथे थंडी ६-६ महिने असते अशा ठिकाणी मुलांचे खेळावरही परिणाम होतो. त्यांना कुठे खेळायला न्यायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. भारतात आपल्याला पाऊस आणि कडक उन्हाळा सोडला तर जवळजवळ ८ महिने व्यायामाला पूरक वातावरण असते. तरीही मुलांच्या खेळांकडे कमी लक्ष असते (निदान इथल्या मुलांच्या तुलनेत तरी). बाहेर मुले खेळताना दिसणेही तसे पूर्वीपेक्षा कमीच आहे. पण व्यायाम आणि एखादा नीट शिकलेला खेळ यांचे प्रमाण अजून कमी.
       तसेच शेतीचेही आहे. शेतकऱ्यांच्या गरिबीमुळे आणि नवीन प्रकल्पांच्या अभावामुळे असलेल्या सूर्यप्रकाशाचा आपण पुरेपूर उपयोग करून घेत नाहीये असे वाटते. इथे लोकांना थंडीत भाज्या परदेशातून आयात कराव्या लागतात. आमच्या घरात सध्या एक तुळस आहे, तिला मी आता घरात ठेवले आहे आणि रोज सकाळी जमेल तसे उन येईल त्या त्या जागी तिला फिरवत राहते. पण तेही आता पुरेसे वाटत नाहीये आणि मला बहुदा 'प्लांट लाईट' आणावा लागणार आहे. ज्यातून सूर्यप्रकाशासारखे किरण तिला मिळतील. अनेक लोकांना असे रोपे टिकवताना पाहून वाटते मी भारतात असताना का इतकी निष्काळजी राहिले? तेव्हाही थोडे लक्ष लावून झाडे जागवायला हवी होती.
       इथे अनेक वेळा बाल्कनीत कपडे वाळत घातलेत म्हणजे भारतीय असणार असे जोक मी ऐकलेत. आणि मलाही कधी वाटायचं की जाऊ दे ते कपडे ड्रायर लाच टाकावेत. उगाच कशाला बाल्कनीत कपडे? पण मी भारतात कपडे धुवायचे मशीन बघत असताना ड्रायर पाहिला त्यात कपडे वाळवण्यासाठी आणि धुण्यासाठी मिळून ३ तास लागणारे सायकल होते. म्हणजे किती ती इलेक्ट्रिसिटी वाया. गेल्या २-३ वर्षात माझ्या लक्षात आलं आहे की खरंच इतका सूर्यप्रकाश उपलब्ध असताना का मी तो ड्रायर वापरायचा हट्ट करायचा? आणि इतकी वीजही वाया? आपल्याकडे हा एक रिसोर्स आहे त्याचा वापर करून घेतलाच पाहिजे आणि त्यामुळे मला तसे कपडे वाळवणे अतिशय योग्य वाटते. आपल्याकडे अजून सोलर प्लॅण्टही अजून व्हायला हवेत ज्याने त्याची पूर्ण क्षमता वापरली जाईल.
      उन्हाचा आपल्या शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम होतो. जसे पावसाळी वातावरण उदास करते तसेच ऊन प्रसन्न करते. सकाळी किंवा संध्याकाळी घराच्या खिडकीतून किंवा बाल्कनीत येणारे ऊन कितीतरी उत्साह देऊन जाते. पण किती जण ते अनुभवण्यासाठी लक्ष देतात? कारण आपण ऊन गृहीत धरतो असे मला वाटते. आज नाही पाहिले, उद्या असेलच. त्यात कडक उन्हाच्या त्रासाचाही भाग असतो थोडा, पण जाणीवपूर्वक सूर्यप्रकाश अनुभवणे खूप कमी झाले आहे असे वाटते. इथे लोकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे मिळेल तेंव्हा ते त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. खरंच आपण अनेकदा मुलांना किंवा जवळच्या व्यक्तीला म्हणतो, you are my sunshine'.  म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला सूर्यप्रकाशाइतकीच आनंद देते, उजेड देते आणि आपल्याला प्रसन्न करते. त्यामुळे मी तर म्हणते 'Sunshine is our sunshine'. आणि आपण त्याची किंमत करायला शिकलं पाहिजे, लवकरच  !!

विद्या भुतकर.

No comments: