Monday, November 14, 2016

कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे

        परवा रात्री घरी येत असताना जुनी गाणी गाडीत लावली आणि खूप वर्षांनी 'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो' ऐकलं. एकूणच घर-संसाराच्या गराड्यात बऱ्याच गोष्टी हरवल्यात असं वाटतं त्यातली ही एक. आठवणीने जगजीतची गाणी ऐकलीत असं झाल्याला कित्येक वर्षं लोटलीत. खूप वर्षांनी जुनं काहीतरी मिळाल्याचा आनंद होताच पण त्यासोबत एक उदासीही. यावेळी तो जगात नाहीये ही जाणीव होत राहिली. कितीही प्रयत्न केला तरी त्या गाण्याचा पलीकडे जाऊन त्याची उणीव भासत होती. अगदी 'RIP जगजीत' म्हणून अनेक पोस्ट दिसल्या होत्या ना? तेव्हा पण ते तितकं जाणवलं नसेल. 
         खरंतर मीच जाणवून घेतलं नव्हतं. आजही फक्त एकच समाधान आहे की जगजीत सिंगची एक का होईना कॉन्सर्टला जाऊन आले आहे. जवळून ते भारलेलं वातावरण पाहिलं, अनुभवलं आहे. ते केलं नसतं तर मात्र किती रुखरुख राहिली असती माहित नाही.
        गेल्या काही वर्षात जवळच्या अनेक व्यक्ती गेल्यात. त्यात सर्वात जवळचे आजोबा. यातल्या कुठल्याच व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मी नव्हते. आता हे चांगलं की वाईट हे माहित नाही. कारण त्या त्या व्यक्तीला आपण शेवटचे भेटलोय किंवा त्यांना खरंच निरोप दिलाय असं जे म्हणतात ना त्यातलं काहीच नाही. त्यामुळे होतं काय की आजही त्यांच्या आठवणी येतात तेंव्हा ते केवळ फक्त खूप दिवस भेटलो नाहीये इतकाच विचार करून. आजोबा, मामा, मामी, आत्या यांचे रेफरन्स संदीपशी बोलताना अजूनही तसेच येतात. पण कधीतरी असेच कुठल्यातरी क्षणी ते या जगात नसल्याची जाणीव होते आणि उदास वाटत राहतं.
       खरंच आपण इतके व्यस्त झालेलो असतो की या अशा आठवणी क्वचितच मनाला थांबवून ठेवतात. अर्थात अजून जवळच्या व्यक्तीही असतात ज्यांची पदोपदीही आठवण येत राहते. पण तरीही आपण मनाला कुठेही काहीही जाणवू देत नाही. आणि जाणवलं तरी ते तसंच धरून बसायला तितकी उसंत नसते. पण असे कधीतरी एखादं गाणं, प्रसंग, खायचा पदार्थ, सवयी, सणवार... यातले काहीतरी घडते आणि त्या व्यक्तीची आठवण करून देते. जगजीत सिंगचं गाणं खूप दिवसांनी ऐकल्यावर तसंच वाटलं. त्याच्यासोबत आणि बाकीही आठवणी...
       त्यात आणि आजकाल 'तुम बिन-२' मधलं 'कोई फरियाद' सध्या येत राहतं रेडियोवर आणि त्यात तोच जगजीतचा आवाज...'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे....' कधी कधी त्याला गाऊ देते, आठवणीत जाऊन येते. पण कधी धीरच होत नाही आणि पुढचं गाणं सुरु करून टाकते. दिवस तसेच जात राहतात.... पण शब्द सोडत नाहीत... 'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे.... जागते जागते एक उम्र कटी हो जैसे.......'   

ही पोस्ट अशाच मनात असलेल्या अनेक फिर्यादींसाठी ....... 
 
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: