Monday, November 28, 2016

हॅलो किट्टी

           बॉस्टनला आल्यावर नवीन नोकरी लागल्यावर एक मोठ्ठा प्रश्न होता तो म्हणजे 'डबा कसा न्यायचा?'. एक तर पर्समध्ये आधीच वॉलेट, लॅपटॉप, चार्जर, फोन आणि बराच कचरा असायचा. त्यात थंडी असताना स्वेटर, जॅकेट असणारच. शिवाय हे सगळं जाता येताना २-२ ट्रेन मधून ना हरवता घेऊन जायचं-यायचं. त्यामुळे यात अजून एक वेगळी पिशवी डब्यासाठी कशी न्यायची असा गहन प्रश्न होता. :)  पण पातळ भाज्या, तेल यातलं काहीही पर्समधल्या सामानावर पडण्याची रिस्क घेऊ शकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने, मळखाऊ असणारा आणि त्यामुळे मुळातच मळकट दिसणारा असा एक लंचबॉक्स घेऊन आले होते.
        पहिल्याच दिवशी तो घेऊन गेले तेंव्हा सारखी भीती वाटत होती की तो कुठेतरी राहील की काय. एका ऑफिसातल्या मुलीला म्हटलंही की माझा लंच बॉक्स विसरायची दाट शंका आहे मला. त्यावर ती म्हणाली,"Eventually its going to happen, you know that right?". म्हणजे कधी ना कधी हे घडणारंच आहे याची मनाने तयारी करून ठेवायलाच लागणार होती. तरीही वर्षभर अनेक ट्रेनचे डब्बे, बस यातून तो मी सुखरूप घरी परत आणला होता. पण एक दिवस स्टेशनवरून मुलांसाठी खाऊ घेतला आणि बसमधून उतरताना हातात दोन पिशव्या मोजल्या आणि उतरले. :) ती दुसरी पिशवी खाऊची होती आणि डब्बा कुठेतरी विसरला होताच. :( असो. गाडीत बसल्यावर नवऱ्याला सांगत होते तर मुलांना गोंधळ घातला. "तू डबा हरवलास? कसा काय? कुठे? आता मिळणार नाही? " असे अनेक प्रश्नाला तोंड द्यायला लागलं.
         दुसऱ्या दिवसापासून प्रश्न होताच, डबा कसा नेणार? काही दिवस एक जाडजूड पेपर बॅगही नेली. मध्ये जोरात येणाऱ्या पावसात तिचा चुरा होऊन काचेचा एक डबा स्टेशनवर आपटल्यावर लोकांच्या नजरेपासून कुठं लपावं असं झालं होतं. त्यामुळे आता पुन्हा प्रश्न सुरु. बरं, असं नाही की मी बाहेर कुठे जात नाही. अनेकवेळा अनेक ठिकाणी खरेदीला गेलेय पण या लंचबॉक्सचं काही लक्षात राहत नाही. अगदी सोमवारी सकाळी डबे समोर दिसले की चिडचिड होते स्वतःवर दोन दिवसात बॅग विकत घेतली नाही म्हणून. या विकेंडलाही भरपूर खरेदी झाली पण तरीही लंचबॉक्स राहीलाच.
        आज सकाळी सानुला म्हटले तुझी नवीन बॅग घेऊन जाते तू तुझा जुना बॉक्स ने, पण ऐकतील ती पोरं कसली? तिची एक पिशवी जरा कमी डिसाईनची आहे आणि जुनी 'हॅलो किट्टी' ची. आता ती हॅलो किट्टी ची बॅग कुठे नेणार? पण नाईलाज होता. मी डबे त्यात भरल्यावर पोरांचे प्रश्न सुरु झाले,'तू खरंच हा लंचबॉक्स नेणार आहेस?". म्हटलं ,"हो". त्यावर, स्वनिकने माझ्या हरवलेल्या लंचबॉक्सचा उल्लेख करायचा चान्स सोडला नाही. मग म्हणाला,"लोक हसले तर?".  म्हटलं, "मीही त्यांच्यासोबत हसणार.". सानू म्हणाली,"कदाचित ऑफिसमध्ये मोठे लोक आहेत त्यामुळे ते काही बोलणार नाहीत." म्हटलं,"इट्स ओके." आणि तो हॅलो किट्टी चा लंचबॉक्स घेऊन निघाले.
       ट्रेनमध्ये आणि चालतानाही अगदी ते हॅलो किट्टी चं चित्र आतल्या बाजूला ठेवूनच गेले. तरीही शेजारी बसणाऱ्या आणि दिवसातून एखादं वाक्य बोलणाऱ्या मुलाने विचारलेच,"Hello Kitty?". म्हटलं, "हो, मुलीचा आहे." पुढे जेवायला मैत्रिणींसोबत गेले तेंव्हा त्यावर बोलणं झालंच. हसून म्हटलंही,"बाकी सर्व शॉपिंग केली पण या लंचबॉक्सचं काही लक्षात राहात नाही". घरी आले आणि त्यातून सुटले. आता उद्या काय करायचं हा प्रश्न आहेच. पण त्याहून मोठा एक प्रश्न पडलाय.
         आपण इतके मोठे, शिकलेले आणि बरेच कॉन्फिडन्टही. तरीही अशी एखादी वस्तू घेऊन फिरताना,'लोक काय म्हणतील' हा विचार थोडा का होईना येतोच. तर मग शाळेत जाताना या मुलांचं काय होत असेल? इथे तर राहणं, वागणं, बोलणं, खाणं, संस्कृती या सर्व वेगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मित्र-मैत्रिणी बनवणे यासारखं अवघड काम नाही. "fitting in' आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे तर त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. चुकून तोच हॅलो किट्टीचा डबा स्वनिकला दिला तर त्याला कसं वाटेल? आजकाल मुलांना योग्य-अयोग्य सांगणे, समजावणे आणि त्यातून त्यांना ते पटले तरीही तितकी हिम्मत ठेऊन योग्य ते करणे, बोलणे यासाठी पुढे किती मोठ्ठ काम आहे काय माहित? आज त्यांच्या प्रश्नातून त्यांच्या मनात असणारे विचार समोर येत होते. त्यांनाही पुढे कधी असा डबा घेऊन जात येईल का? आणि तेही जास्त अवघडल्यासारखे न वाटून घेता?


विद्या भुतकर.

No comments: