Sunday, November 27, 2016

वांगेपुराण

       मागच्या आठवड्यात वांग्याची भाजी केली. आता म्हणाल, ही काय सांगायची गोष्ट आहे का? वांग्याची भाजी सर्वानाच आवडते असं नाहीये पण मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने ती करते ती साधारण बऱ्याच लोकांना आवडते. अर्थात ती काही खास माझी रेसिपी नाहीये. आईची त्याच्याहून छान होते आणि मी जी करते त्यातही तिनेच केलेला मसाला असतो म्हणून ती तशी होते. त्यात गेले काही दिवस बरं नसल्याने नीट जेवण बनवणं झालंच नव्हतं. म्हणून आज शेवटी मस्त वांगे, चपाती, वरण, भात हे सर्व बनवलं. असो.
          हे वांगेपुराण सांगायचं कारण म्हणजे, दर वेळी वांगी केली की ती केवळ मी आणि संदीप आनंदाने खातो.पण ही अशी एक डिश आहे की ती केल्यावर शेजारी जाऊन एक वाटी देऊन यायची इच्छा होतेच. अनेकवेळा नवीन ठिकाणी असताना वांगी केल्यावर ती देण्यासाठी कुणी शेजारी नाहीत याचंही वाईट वाटलं आहे. कधी ऑफिसमध्ये मैत्रिणींसाठी नेली आहे परंतु ताजी भाजी बनवल्यानंतर, आई आम्हाला जशी सांगायची 'जरा जाऊन देऊन या रे ' तसं करण्यात मजा औरच असते. नवीन घराशेजारी सख्खी महाराष्ट्रातील शेजारीण मिळाली आणि माझा एक प्रश्न सुटला. :) आजही तिच्याकडे ताट देऊन आले.
         आता यात ती भाजी खूप ग्रेट असते असे नाही पण कुणालातरी आपल्या हातचे खायला देण्यात मजा येते. आम्ही लहान असताना, वेगवेगळ्या काकूंचे वेगवेगळे पदार्थ आवडायचे. ते कधी घरी आले की अगदी थोडं थोडं वाटून खायला लागायचं. रोजच्या जेवणापेक्षा एकदम वेगळं काहीतरी अचानक मिळायचं. त्यात आमच्या एका काकूंची अळूवडीही होती. आजही कधी त्यांना कळले आम्ही येणार आहे तर त्या नक्की घेऊन येतात. त्या छोट्याशा गोष्टीने काहीतरी स्पेशल मिळाल्याचा आनंद असायचा. अर्थात हे असे देणे-घेणे आईकडूनही असायचे. आम्ही सायकल वरून जाऊन द्यायचे. कुणालातरी आठवणीने डबा पाठवून देणे किती छान आहे ना? एकाच बिल्डिंगमध्ये असताना तर दूरही जावे लागत नाही. 
       बरं एखाद्याचा काही पदार्थ आवडतो म्हणून आईने आमच्यासाठी रेसिपी विचारून ते तसे प्रयोग करूनही पाहिले आहेत. कधी कधी तर आम्हाला शंकाही यायची की त्या रेसिपीमधला एखादा महत्वाचा घटक मुद्दाम तर सांगायचा विसरला नसेल ना? :) कारण कितीही प्रयत्न केले तरी त्या काकूंसारखा तो पदार्थ व्हायचाच नाही. मग आम्हीही नाद सोडून द्यायचो. प्रत्येकाच्या हातची चव वेगळीच असते हे कळायला बराच वेळ गेला. आता मुलांसाठी काही बनवताना लक्षात येते आपणही आईला असेच म्हणायचो,'त्यांच्यासारखे नाही झाले'. :) कळतं की कितीही काहीही केले तरी ती अगदी सेम चव येत नाहीच. आणि ज्याच्या त्याच्या हाताची चव आणि त्यांचा तो पदार्थ आवडीने खाण्यातच खरी मजा असते. पण त्यासाठी ते तसे शेजारीही पाहिजेत आणि आवडीने करून घालणारे लोकही. :) आजच्या त्या वांग्याने पुन्हा या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली.

विद्या भुतकर. 


No comments: