पक्या गाडीत बसला आन त्याला जरा आराम झाला. सकाळपास्नं नुसता जीव काकुळतीला आलेला. खायला चार घास पन मिळालं नव्हतं. मंग्याच्या खांद्यावर डोकं ठिवून त्याला गाढ झोप लागली. तिकिटं मंग्यानंच काढली. गाडी थांबली तसं खिडकीतनं येनारं वारं थांबलं. पक्याची झोप हळूहळू उडाली. बाहेर पाह्यलं तर लोकांची गर्दी उडालेली. गाडीतनं लोकं घाईनं बाहेर पडत होती. पक्या उठला, टपावर चडून त्यानं एकेक करून पोती खाली उतरवली. इतक्या गर्दीत कुटं जायचं त्याला काय उमगत नव्हतं. एका कोपऱ्याला मंग्याला हुभा करून तो स्टँडच्या बाहेर चौकशी कराय गेला. रिक्षावाले, ट्रॅक्सवाले काय काय इचरत होतं त्याला काय पन सुधरत नव्हतं. कुटून तरी 'मार्केट यार्ड' 'मार्केट यार्ड' ऐकलं आन तिकडं धावला.
"मार्केट यार्ड?" त्यानं रिक्षावाल्याला विचारलं.
"हां, २५ रूपे होतील."
पक्यानं मान हलवली.
"मी आलोच" म्हनून मंग्याला घ्यायला धावला. दोघांनी परत एकेक करून पोती आनली. तंवर कुटं तो रिक्षावाला थांबतोय? तिसऱ्या पोत्यापातूर रिक्षावाला गेलेला. आता परत 'मार्केट यार्ड' मार्केट यार्ड' ची आरोळी यिस्तवर ते दोघं थांबलं. रिक्षावाल्यानं 'हां' म्हनताच त्यांनी पोती रिक्षात टाकली. पन आजून तो थांबून राह्यला. दुपार टळून गेलेली. तरी अजून काम काय हुईना. अजून तीन गिऱ्हाईक आल्यावर रिक्षा सुरु झाली. लोकांना बसायसाठी पक्या, मंग्या पोत्यांवरच बसलं. एकेक करत सवारी उतरवत गाडी मार्केटयार्डाला आली.
रिक्षावाला म्हनला, "१०० रूपे झाले."
आता इतकं गणीत तर पक्याला येत हुतं.
"आवं असं काय करताय? २५ म्हनला ना?", पक्यानं विचारलं.
"मानसी २५.", रिक्षावाला बोलला.
"तरी ५० झालं."
"त्या पोत्यांचं कोण देणार?"
"पोत्याला काय जीव हाय का?", पक्या लै गरमला हुता.
"होय पण त्यांना उचलेपर्यंत तुमचा जीव गेला असता ना? सामानाचे ५० रुपये झाले."
पक्या तावातावानं काय बोलनार तंवर मंग्यानं १०० काढून दिलं. रिक्षावाला खुन्नस दिऊन निगाला.
"तू कशाला दिलंस पैसं? मी चांगला बरोबर केला असता त्याला.", पक्या.
"जीव हाय का अंगात? आदी खाऊ कायतरी? चल.", म्हनून मंग्या त्याला घेऊन चालाय लागला.
आता परत त्या खायच्या गाडीपातर पोती न्यायची हिम्मत त्यांच्यांत नव्हती. मग पळत पळत मंग्या गेला दोन वडापाव घेऊन परत आला.
"च्या मारी, लै महाग हाय रं हिकडं सगळं." मंग्या वैतागला हुता.
"का? काय झालं?"
"२५ रूपे म्हनं वडापाव. काय पन उगा लुटत्यात लोकास्नी."
"आपला गावंच बरा बाबा. चांगली तिखट चटनी वरून देतो आपला बजरंग वाला." , पक्या बोलला.
वडा पाव खाऊन जरा बरं वाटलं त्याला.आता नव्या जोमानं त्यांनी काम सुरु केलं. मार्केटयार्डात आपली ज्वारी विकायची, फोन घ्यायचा, पहिल्या गाडीनं घरी जायचं. बास! यार्डात भली गर्दी हुती. रस्त्याव सगळीकडं घान पसरलेली. कुटं चिखल, सडलेल्या भाज्या, कुटं ढीग लावलेली पोती, तीच जड पोती भराभर खांद्याव घेऊन जाणारी लोकं. कुनी जोरात वरडुन दर सांगत हुता कुनी बोली लावत हुता. कदी असल्या जागी पक्यानं पाय ठिवला नवता.
पहिलं काम होतं पोती न्यायची कुटं? त्यानं एका मानसाला विचारलं. त्यानं त्याला 'एजंट मिळतो का बघ' सांगितलं. एका ठिकानी ढिगानं पोती यिऊन पडत होती. गाड्यांच्या मधनं जात त्यानं एक बारकं हॉपिस गाठलं. दोन लोकं फोनवर बोलत हुती, बाकी सगळी नुसती पाठीव एकेक पोतं घेऊन ढीग लावत हुती. त्यांच्या खांद्यावरचं वज्ज पाहून पक्याला आपल्याला काय पन झेपत नाय याची लाज वाटली. तरी एकाला धरला त्यानं आणि इचारलं,"हे आपलं ज्वारी विकायची हुती."
"ते शेटला विचरा" सांगून तो मानुस परत पोती लादायला लागला.
फोनवरच्या शेटनं हातानंच इचारलं,"काय?"
"ते अडीच पोती ज्वारी हाय? काय दरानं घेनार?"
"२०" शेट बोलला.
"वीस?? अवो हिथं तर जास्त दर पायजे. गावातच २५ नं हुती."
शेटनं फोन ठिवला आन म्हनला, "मग गावालाच जा. इतक्या दुपारी माल खपत नाय. सकाळी चारला येतात गिर्हाईक माझ्याकडं. आता रात्रभर माझ्याकडं ठेवायला लागल तुझी पोती मला. पाऊस, उंदरं लागली तर कोण बघणार?" शेट गुश्श्यानं बोलला.
त्याला दोन पोत्यांची काय बी पडली नव्हती. पक्याचा लै हिरमोड झाला. त्यानं मंग्याला गाठला. तिकडं मंग्यानं गप्पा मारून मायती गोळा केली व्हती.
त्याला दोन पोत्यांची काय बी पडली नव्हती. पक्याचा लै हिरमोड झाला. त्यानं मंग्याला गाठला. तिकडं मंग्यानं गप्पा मारून मायती गोळा केली व्हती.
"हे बघ पक्या तो शेट जावं दे, आपन हिथंच सुट्टी विकू ज्वारी. चांगला चाळीस चा दर मिळल."
पक्याचा शेटवर संताप होत हुता. उगा हाव केली आन हिकडं आलो असं त्याला झालं हुतं.
मंग्या म्हनला म्हनून त्यानं जागा शोधाय सुरवात केली. पन सकाळपास्नं आपली जागा धरून बसलेलं लोक कशाला त्याला फुकट जागा देतील. शेवटी एका बाईला त्यानं विचारलं,"मावशे हिथं ठिऊ का माजी ज्वारी? लगी विकून जानार मी.शंभर रूपे देतो तुला. "
ती 'व्हय' म्हनली.
त्यानं आपली पोती तिच्याजवळ ठिवली. त्याच्याकडं ना तराजू होता ना वजनं. कुनी विचारलं तर करायला हिशोब बी येत नव्हता. त्यात आपली वस्तू विकायसाठी वर्डायला तर लईच लाज वाटत हुती. तरी हिम्मत करून मावशीलाच त्यानं उधार देनार का तराजू इचारलं. ती 'व्हय' म्हनली. मावशीच्या काकड्या, कोथिंबीर सुकत चाल्लेली. तिनं त्यातलीच एक कापून खाल्ली अन त्यान्ला एक दिली. काकडी खाऊन जीव जरा थंडावला. पन आजून गिऱ्हाईक काय त्याला मिळालं नव्हतं. त्याच्याकडं आयतं कोन येनार हुतं?
"कधी पास्न बसलीयस?" पक्यानं मावशीला इचारलं.
"पाहट पाचपास्न निगालोय घरंनं. चांगली ५० किलो काकडी इकली आसंल. "
"मग चांगलं हाय की. "
"व्हय आजून १० किलो गेली की सुटलो. नायतर परत टोपल्या गाडीत टाकून न्यायला लागतील.आन उद्या खराब बी हुईल. " मावशी.
पक्याला पोती आठवली.
"व्हय बस बस.", पक्या बोलला.
"तुमी का इतक्या लेट आला पन?" मावशीनं इचारलं.
"हां जरा उशीर झाला." पक्याला काय सुधरत नव्हतं बोलाय. कधी आठच्या आत उठून तोंड बी धुतलं नव्हतं त्यानं. माय बिचारी वाफ्यातल्या भाज्या काढून विकून परत लोकांच्या शेताव कामाला जायची. त्याला मायची लै आठवन जाली.
"मी काय म्हनतो तुमी एक काम करा, गावात बारक्या दुकानांत विका. ह्ये एजंट लोक लै वाईट. तुमी दोगंच एखाद्या दुकानात विकून टाका. त्ये घेत्याल एकदम ज्वारी. " मावशीनं भारी आयडिया दिली.
मंग्याला जरा मस्का लावाय लागला पर त्याचा जीवाचा दोस्त त्यो. लगीच मनला.
पक्यानं चार लोकास्नी इचारून पत्ता घेतला. जरा गावाच्या बाहेरच्या आडरस्त्याचा पत्ता हुता. पन नवी वस्ती हुती म्हनं तिकडं. गावाच्या दुप्पट दर मिळाला असता. पक्यानं परत रिक्षां मिळवली. यावेळी रिक्षाचा, पोत्यांचा दर आदीच ठरवून घेतला. एव्हडं मोठठं शहर त्ये, नुसत्या एका कोपऱ्याव उतरून चालतंय व्हय? पक्याला काय पन ठावू नव्हतं. रिक्षावाल्यानं त्यान्ला एका बिल्डिंगसमोर उतरवला. त्यात एका वळीनं बारीक बारीक किराणाची दुकानं तिथं हुती. पक्याला आता जरा समज आली हुती. त्यानं समद्या दुकानांत जावून दर इचारला. मंग्या आपला टपरीवर च्या घित बसला.
मागं फुडं करत शेवटी एका दुकानदारानं त्याला '३८ नं घेतो नायतर राहू दे ' म्हनून सांगितलं.
त्यानं इचारलं,"ज्वारी बघू तरी दे?"
आतापर्यंत पक्यानं ज्वारीच्या दान्याला हात बी लावला नव्हता. नुसताच आपला उड्या मारत व्हता.
"आमच्या शेतातली ज्वारी हाय, एक नंबर !", पक्या बोलला.
दाभण घालून दुकानदारानं पोत्याची सुतळी उसवली. मूठभर ज्वारी हातात घेतली आन एकदम भर्रकन फेकून दिली. ज्वारीत ही कीड लागलेली. पक्या वैतागला.
"आसं कसं?" इचरत त्यानं दुसरं पोतं खोलाय लावलं. मग तिसरं. तिन्ही पोत्यातल्या ज्वारीत कीड लागलेली.
"बरं मी पाह्यलं, नाहीतर लुटलाच असतं तू मला." दुकानदार चिडला.
पक्याला काय पन सुधरत नव्हतं. त्यानं कदी शेतात ना कधी घरी, ज्वारीला हात लावलाच नव्हता. वर्ष झालं मायनी ती पोती जपली व्हती एव्हडं त्याला ठावं होतं.
"घोड्याला तरी द्यायच्या लायकीची आहे का तुझी ज्वारी?" म्हणून दुकानदारानं पक्याला भाईर हाकलला.
पक्या जाम वैतागला. मंग्या आपला बेफिकीर बसला हुता. पक्याला एकदम राग आला मायचा आन मंग्याचा पन. समदं हुईस्तवर अंधार पडलेला. इतकं करून हातात काय पन घावलं नव्हतं. त्यानं परत रिक्षा धरली आन स्टॅंडचा रस्ता पकडला. आता परत पोती रिक्षातनं काडून स्टँडला उतरवली. धावत जाऊन बसची चौकशी केली. ताटकळत बसची वाट बघून, बस आल्याव पोती टपावर टाकली. गाडीत बसल्यावर त्याच्या जीवाला जरा आराम मिळाला. 'फोन मरू दे पन ज्वारीची पोती नको' असं झालेलं त्याला. गाडीत उभ्या उभ्याच त्याला झोप लागली. भूक तर पार मेलेली. कदीतरी गाव आल्याव मंग्यानं त्याला उठवला. किती काळ आपन झोपलो हुतो असं पक्याला वाटलं. दिवसभर मरमर करून हातात कायबी नव्हतं. गाडीतनं पोती उतरून तिथंच टाकून द्यावी असं त्याला वाटलं. पन त्यात त्याच्या मायेची म्हेनत त्याला दिसत हुती. त्यानं अमल्याला बोलवून पोती घरी घेऊन गेला. अमल्यानं फोनचं इचारलं तर त्याला तोंड उगडायची बी विच्छा झाली नव्हती. पोती दारात टाकून अमल्या परत गेला. रात्र उलटून गेलेली.
पोराला दारात बघून मायच्या जीवात जीव आला. तिनं त्याला "हात धु, ताट करतो" सांगितलं.
ती खाली बसून ताटं घेतंच हुती आन पक्या तिच्या मांडीव आडवा झाला. तिनं त्याला मायेनं कुरवाळला.
"लै कीड हुती का?" तिनं इचारलं तसा पक्या उठून बसला.
"म्हंजी तुला ठावं हुतं."
"मग काय? कदी रेशनचा नाय परवडला तर त्योच खायचा हुता. मागच्या महिन्यांतच पायलं हुतं. पन सुकवून पावडर लावायला जीव नव्हता अंगात. म्हनलं करू जरा सावकाश. तुला सांगून पटलं नसतं.म्हनलं खरंच चार पैसं मिळालं तर चांगलंच हाय. "
"माय तू कसं कर्तीस गं समद काम?", पक्यानं इचारलं.
तिनं पदराला डोळं पुसलं. म्हनली,"तू कदीतरी सुधारशील या भरोशावर."
"तुला शप्पत सांगतो मी करंन तुला मदत. "त्यानं गळ्याव बोटं ठिवून सांगितलं.
ती हसली गालातच. तिनं त्याला मायेनं गोंजारला आन कडाकडा समदी बोटं मोडली. ज्वारीला कीड असली तरी तिच्या घरातली कीड गेली हुती.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment