Monday, May 08, 2017

तुझा माझा खेळ रंगला(अंतिम भाग)

     त्याच्या त्या अदबीने बोलण्यांत, धावपळ करण्यात तिला उगाचच एक लाचारी दिसत होती. तो सतत मान खाली घालूनच बोलत असल्याने त्याचा चेहरा तसा पाहिलाच नव्हता. पण त्याला ते असं झोपलेलं पाहून तिला पहिल्यांदाच त्याचा चेहरा कसा आहे ते दिसलं. त्याच्या चेहऱ्यावर ती लाचारी नव्हती, उलट एक तजेला होता. कष्टाच्या खुणा चेहऱ्यावर, हातांच्या कोपऱयांवर, सुकलेल्या ओठांवर, भेगा पडलेल्या पायांवर दिसत होत्या. ती त्याला तिथेच सोडून स्वयंपाकघरात गेली आणि एक पेला घेण्यासाठी फडताळाला हात लावला आणि शेजारचा पेलाही खाली आला. त्याच्या आवाजाने दचकून उठत धावत पळत तो तिच्यामागे आला आणि पलटणाऱ्या तिला धडकला. ती कावरीबावरी झाली आणि 'पाणी' इतकंच बोलून दूर उभी राहिली. त्याने घाईने तिला पाणी दिलं आणि 'उठवायचं की बाईसा' असं तिला म्हणाला. ती पाणी पिऊन तिथून आवरायला निघाली आणि तोही त्याच्या खोलीत गेला. 

       ती अनेक वर्षांनी आपल्या खोलीत गेली होती. तिथे तिच्या भल्या मोठ्या संदुकींतून तिने आपले लहानपणीचे कपडे चाळले. ते घालताना आईसोबत केलेल्या गप्पा तिला आठवल्या आणि अचानक काहीतरी आठवून ती शेजारच्या खोलीत गेली. तिथे अशाच अजून दोन संदुकी होत्या. तिने त्यातली लुगडी काढली. एकेका शालूवरील कशिदाकारी, नक्षी, एकेक रेशमी धागा पाहिला. त्यांना हात फिरवून, कधी गालांना लावून तर कधी त्यांचा सुगंध घेऊन त्या न्याहाळत बसली. त्यातीलच एक रेशमी शालू उचलून ती आंघोळ करायला गेली. ती तयार होऊन आली तेव्हा तो तयार होऊन दिवाणखान्यातील पसारा आवरत होता. मोठ्या आईसाहेबांची लुगडी नेसलेल्या तिला पाहून तो थोडासा बावरला पण तिच्या मोहक चेहऱ्याकडे पाहून हलकेसे हसलाही. 

ती दिवाणावर बसली आणि तिने त्याला विचारलं,"कंटाळा नाही येत तुला एकटं राहायचा इथे?"
तो थबकला आणि मालकीण बाईंना खरं सांगायचं की नाही याचा विचार करत क्षणभर थांबला. पुढे बोलला,"हां कधी कधी येतो कटाळा. पण काय करणार? आयुष्यभराचं कामच हाय माझ्यासाटी. "

"म्हणजे?", तिने विचारलं. 

"मोठा किस्सा हाय तो सांगीन कधीतरी " असं म्हणून तो तिथून निघून गेला. 

ती त्याचाच विचार करत बसली होती. आपल्या  कामासाठी तिने पुन्हा वह्या काढल्या, कागदपत्रं चाळायला सुरुवात केली. दोन दिवस सतत हाच कार्यक्रम चालला. 

एक दिवस असेच बागेत फिरताना तिला तो गवत खुरप्याने काढताना दिसला. फुलांना न्याहाळत आपलं काम करत होता. ती तिथे थांबली आणि म्हणाली,"मला ऐकायचा आहे तुमचा किस्सा. माझं कामच आहे ते. मला सगळा इतिहास लिहायचा आहे आमच्या घराण्याचा". 
तिने त्याचा हात धरून त्याला "सांग ना आत्ताच" असा हट्ट धरला. आयुष्यात ज्यांच्या चेहऱ्याकडे वर मानेने पाहिलं नाही त्या मालकांनी असा हात धरावा? त्याला एकदम घाबरल्यासारखं झालं. पण तिच्या हातातून आपला हात सोडवणं त्याला जमणार नव्हतं. तिने त्याला आपल्या शेजारी खुर्चीत बसवलं आणि विचारलं,"हां सांगा आता."
त्याचा नाईलाज झाला. 

"लई वर्षाआधीची गोष्ट हाय. म्हंजे २०० वर्षांपूर्वी आसल. माझ्या खापरपंज्याचं राज्य आणी तात्यासायबांच्या पंज्याचं राज्य शेजारी शेजारी हुती. आमचा खापरपंज्याचं वय झालं हुतं. एका लढाईत त्यांची हार झाली. आमच्या खापरपंज्याला पकडून तुमच्या पंज्यासमोर हजर केलं आन माझ्या पंज्याला पन. म्हाताऱ्याचं वय झालंच हुतं पन आपल्या पोराचा जीव लई प्यारा त्यास्नी. म्हाताऱ्याने आपला मृत्यूदंड सिवकारला पन पोराला माफी द्यायला सांगितली. तुमच्या पंज्यानं बी मोट्या मनानं माफ केला पन एका अटीवर. आमचं आख्खा खानदान या खानदानाचा गुलाम राहील. तवापासुन त्या घरान्याचं रूप पालटलं, ती इंग्रज बी गेलं पन माजी गुलामी काय संपली नाही. चार पिढ्या गेल्या. आमच्या घरातल्या पुरुषांनी लग्नं केली पन मला माज्या पोराला गुलाम नाय करायचं. मजा जनम जाईल तो पत्करला पन पोराचा नको. " 

त्याच्या डोळ्यातलं दुःखं तिला दिसत राहिलं. आपण हे सर्व त्याच मालकासमोर बोलत आहे तो विसरून गेला. तिने पुन्हा एकदा त्याचा हात धरला आणि आपण बोलून मोठी चूक केली असं त्याला वाटलं. 

ती निर्धाराने बोलली,"मी आज या घराण्याची वारस म्हणून तुझी या गुलामीतून मुक्तता करते. यापुढे तू माझी चाकरी नाही करायची."
तो गडबडला. "मग मी सोडून जाउ? असं कसं? मालकांना नाय चालायचं हे सगळं."
"तू त्यांची चिंता नको करुस. मी आजच त्यांना पत्र लिहिते याबद्दल. "
तिच्या आश्वासक स्वरात त्याला एक नवी उमेद दिसली. तरीही इतक्या वर्षाची गुलामी सोडून अचानक काय करणार हा प्रश्न त्याला होताच. 
तो म्हणाला,"एक काम करतो मालकांचं उत्तर येस्तोवर थांबतो."
ती 'चालेल' म्हणाली. तो उठून मेजावर ठेवलेला तिचा पेला उचलून नेऊ लागला आणि तिने त्याला थांबवलं. 
"मी समर्थ आहे माझी कामं करायला. आमच्या घराण्याच्या इतिहासातलं एक पान मिळालं आज मला. धन्यवाद."

तिच्या या बोलण्यावर त्याला काही उत्तर सुचेना. इतक्या वर्षाची गुलामी कशी काय सुटणार? खरंच असं होणार? यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत अनेक वर्षं या महालाची देखरेख करत एकटाच राहिलेला तो आयुष्याची उमेद हरवून बसला होता. ती पुन्हा नव्याने जागवण इतकं सोपं नव्हतं. 

संध्याकाळी स्वयंपाक करताना तिने त्याला विचारलं,"ब्रेड कुठे आहे?"

त्याने तर ते काय असतं हे कधीच पाहिलं नव्हतं. 

"डबल रोटी?" तिने त्यातल्या त्यात समजेल असा प्रश्न विचारला पण तेही त्याला माहित नव्हतं. मग त्याने केलेली भाकरी भाजी खाऊन तिने दिवस काढला. 
"मला उद्या बाजारात घेऊन चल, मी बघते मिळते का."
त्याने मान हलवली. 

        दुसऱ्या दिवशी मोठ्या बाईसाहेबांची अजून एक रेशमी शालू नेसून ती तयार होती, त्याच्यासोबत बाजारात जायला. आज स्वतःचं सर्व काम अगदी पाणी तापवायचंही तिनेच केलं होतं. पण त्यासाठी लागणारी लाकडं मात्र त्यालाच आणावी लागली होती. बंब पेटवण्यासाठी तिने केलेली धडपड पाहून त्याला तिचं कौतुक वाटलं आणि काळजीही. त्यानेही जरा साफ असलेला पायजमा, सदरा आणि टोपी घातली होती. तिच्या उत्साहाचं त्याला खूप कौतुक वाटत होतं. एव्हढ्या घरंदाज स्त्रीसोबत जाण्याची त्याची पहिलीच वेळ होती, मुख्य म्हणजे यावेळी तो नोकर म्हणून जात नव्हता. बाजारात तिने अनेक गोष्टी पाहिल्या, त्या काय काय आहेत याचं वर्णन केलं. रस्त्यात दिसणाऱ्या एका गजरेवालीकडून एक सुंदर गजरा घ्यायचा हट्टही तिने केला. पण उगाच बाईसाहेबांच्या भोवती गर्दी जमू नये म्हणून तो तिला घेऊन लवकरच घरी परतला. प्रत्येक ठिकाणी तिची काळजी घेताना पाहून तिला मनातून खूप आनंदही होत होता. 

      पुढचे काही दिवस ते दोघे एकमेकांना समजून घेत राहिले. त्याने तिच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा अंथरावा तर तिने रोज नवीन शालू नेसून त्याला छान नटून दाखवावं. गेल्या काही पिढ्यांमध्ये घडलेली अनेक राजकारणं, किस्से, गावातील गप्पा तो तिला रंगवून सांगत असे. तर लंडनमध्ये आपल्या राहणीमानाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, खाण्यापिण्याबद्दल,  तिच्या शिक्षणाबद्दल ती त्याला सांगत होती. तिच्या मनातलं प्रेम आता जास्तच व्यक्त होऊ लागलं होतं. त्याने कितीही संयम ठेवला तरी तिच्या प्रेमाला त्याच्याकडूनही नकळत उत्तर दिलं जात होतं. आपण आपल्या मनाला उगाच असं वाहू देतोय याची त्याला भीती वाटत होती. तर दुसऱ्या कुणाशी लग्न करावं लागलं तर काय याची तिला. 

     एक दिवस सकाळी तिचा चेहरा खूप रडवेला झाला होता आणि तिच्या हातात एक कागद होता. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो घाबरला. त्याने तिला खुणेनेच विचारलं,"काय झालं?".
ती रडत सांगू लागली,"तात्यासाहेबांचं पत्र आलंय. मी तुझ्याबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर दिलंय. मुलगी म्हणून इतकंही करण्याचा हक्क नाही मला? योग्य-अयोग्य काय ते कळतं आता मला. लंडनमध्ये किती पुढारलेला आहे समाज. हे असं मागासलेली वृत्ती किती काळ जपणार आपण?". 

तिच्या आवाजात कळवळा होता. तो तिला म्हणाला,"असू द्या. माझंच नशीब म्हणायचं. तुमी चिंता करू नका. मी राहीन आयुष्यभर हितच. "

त्यावर तिने त्याचा हात धरला आणि त्याच्या खांदयावर डोके ठेवून ओक्सबोकसी रडू लागली. 

"मी नाही तुला हे असं गुलामीचं आयुष्य देऊ शकत." ती बोलली. 

त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरत राहिला. दिवसभर ते दोघेही मनात तेच विचार घेऊन होते. शेवटी तिने निर्णय घेतला आणि त्याच्याकडे आली आणि निग्रहाने म्हणाली,"मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्य तुझ्यासोबत काढायचं आहे." 

तो तिच्या इतक्या तडकाफडकी निर्णयाने बावरला होता. तिचा हात पहिल्यांदाच त्याने स्वतःहून हातात घेतला 
आणि पुढे बोलणार इतक्यात दरवाज्याचा आवाज झाला. तिला त्याच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं होतं. 'तू बोल पुढे' असं ओरडून सांगायचं होतं. पण...... 

...... तो आवाज त्या दोघांच्याही ओळखीचा होता. दोघेही काळजी सोडून थोडंसं हसले आणि उडत जाऊन दिवाणखान्यातल्या दोन फुलदाण्यांमध्ये बसले. दोघेही समोर होणारी गंमत पाहू लागले. 

 ....... दादासाहेब एका हातात एक डबा आणि दुसऱ्या हातात पाणी घेऊन आले होते. त्यांनी प्रत्येक खोलीच्या उंबऱ्यावर दहीभात ठेवला आणि पाणी शिंपडलं. त्यांनी तिच्या फोटोचा हार बदलला. तिथे समोर अगरबत्ती लावली. घरात वेगवेगळ्या ठिकाणी पेले, ताटं पसरली होती, ती त्यांनी आवरून ठेवली. तिच्या खोलीतील दोन्ही संदूक बंद करून ठेवल्या. आईसाहेबांच्या लुगड्यांच्या घड्या करून ती पुन्हा संदुकीत ठेवली. कितीतरी वेळ आवरलेल्या खोल्यांमधून फिरत राहिला. 

      आज चाळीस वर्षं झाली. त्या रात्री तात्यासाहेब स्वतः आले होते. त्यांच्या समोर त्यांनी दोघांना हातात हात धरून बसलेलं पाहिलं होतं. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांनी दिवाणखान्यातल्या बंदुकीने दोघांनाही गोळ्या घातल्या. दोघेही बागेत पुरले गेले. त्याचं उत्तर ऐकण्यासाठी आसुसलेली ती आणि त्याच्या हातातून सुटणाऱ्या तिच्या हातांचा स्वर्श दोन्हीही तसेच अपूर्ण राहिले होते. गेली चाळीस वर्षं दोघेही नव्याने सुरु करून पुन्हा तोच खेळ खेळत आहेत. मोजून महिन्याभराचा खेळ तो. दादासाहेब आले की बंद पडायचा. त्यांच्या हताश चेहऱ्याकडे पाहून दोघांनाही हसू फुटत असे. ते निघून गेले की खेळ पुन्हा सुरु होई. गेटच्या बाहेर मात्र चाळीस वर्ष झाली एक पाटी तशीच अडकून होती,"प्रॉपर्टी विकणे आहे."

समाप्त. 


विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: