रोज सकाळी सर्वांना घरातून बाहेर पडायची घाई असते. शाळा, ऑफिस, कॉल्स, डबे या सगळ्यांत रात्री आवरलेलं घर एकदम पसरून जातं. आम्ही संध्याकाळी परत येईपर्यंत तसंच पडून असतं.घरी आल्यावर सकाळी सोडून गेलेला पसारा दिसायला लागतो आणि सकाळपासून निवांत असलेलं घर पुन्हा जागं होतं. अनेकदा तर सकाळी खिडक्या बंद केलेल्या तशाच असतात आणि संध्याकाळी अंधार पडलेला असतो त्यामुळे त्या खिडक्याही उघडल्या जात नाहीत. रात्री मुलं झोपलं की पुन्हा स्वयंपाकघर, हॉल सर्व आवरून ठेवावं लागतं कारण नाहीतर ते दुसऱ्या दिवशी पर्यंत ते तसंच पडून राहतं.
या शनिवारी मात्र सकाळी उठले तेव्हा घरातलं अजून कुणीच उठलेलं नव्हतं. खाली आले, बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं. सगळ्या खिडक्या उघडल्या. ऊन घरात आलं. रात्री आवरून ठेवलेल्या किचनच्या ओट्याकडे पाहिलं. रात्री सर्व साफ करून ठेवल्याबद्दल स्वतःचंच कौतुक करून घेतलं. कुठेही जायची घाई नव्हती. मग दरवाजा उघडून बाहेर आले. नुकतीच लावलेली काही रोपं पुन्हा एकदा न्याहाळली. दोन कुंड्यामध्ये लावलेली मेथी मस्त बाहेर आली आहे. बेसिल नावाच्या रोपाच्या बिया पेरल्या होत्या त्याची बारीक फुट जमिनीच्या वर दिसू लागली. छोट्या गुलाबाच्या, एका शेवंतीच्या रोपाच्या कळ्या मोजल्या. दोनेक आठवड्यापूर्वी लावलेली बरीचशी रोपं नीट आलेली पाहून छान वाटलं.
घरात परत आले. अजूनही बाकी सर्व झोपलेलेच. पुन्हा एकदा सगळीकडे नजर टाकली. माझ्या आवडत्या खिडकीत बसले आणि मनात विचार आला, "हे आपलं घर आहे". आपण राहात असलेलं, सजवलेलं, नीट मांडलेलं. कित्येकदा त्याला किती गृहीत धरतो आपण. असंच पसरून, दिवसभर सोडून जातो. असं अधूनमधून त्याला निरखलं पाहिजे. खिडक्या उघडून ते उन्हानं भरून घेतलं पाहिजे. घर मनात भरून घेतलं पाहिजे. त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा इतका मोठा भाग आहे ते. त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे, असा एकांतात. त्या दिवशीची ती सकाळ मन एकदम प्रसन्न करून केली.
विद्या भुतकर.
2 comments:
nice
Thank you Dipali. :)
Post a Comment