लग्नाच्या आधी एक दोनदा संदीपकडे त्याच्या एका मित्राचा डबा राहिला होता आणि त्याच्या बायकोने वारंवार त्याची आठवण करून दिली होती. तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय? पुढे लग्नानंतरही आईने काही स्टीलच्या वाट्या वगैरे दिले होते आणि त्यावर आवर्जून माझं नाव टाकलं होतं, तर काही ठिकाणी फक्त नवऱ्याचंच. त्या नावात किती शुद्धलेखनाच्या चुका होत्या ते सांगायला नकोच. पण मी आईला म्हटलं होतं, अगं नाव कशाला टाकायला पाहिजे भांड्यांवर? मी तर त्यावर चारोळी पण केली होती:
"आयुष्यभर संसाराचं गाडं
दोघांनी मिळून रेटलेलं
तरी मुलांपासून भांड्यांपर्यत
सगळीकडे, त्याचंच नाव टाकलेलं." :)
भारी आहे ना? :) असो.
जशी संसारात रुळले, या सर्व गोष्टींचा अनुभव येत राहिला आणि भांडी हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे हे कळलं. शिकागो सोडून पुण्याला येताना अनेक भांडी सोडून द्यावी लागली किंवा मित्र-मैत्रिणींना दिली. तेव्हा अगदी वाईट वाटत होतं, आपलं म्हणून असलेलं एखादं भांडं किती जीव लावतं वगैरे वाटून. कितीही सामान जास्त झालं तरी मुलांची आवडीची वाटी, किंवा ताट हे मात्र आवर्जून घेतलं होतं. पुण्यात राहिल्यावर अनेकदा अनेक लोकांकडे पदार्थांची देवाण घेवाण झाल्यावर त्यावर टाकलेली नावंच उपयोगी पडली. आजही अनेक भांडी मी जपून ठेवली आहेत. त्यात एखादं माहेरहून आलेलं असेल तर बासच ! माझं जाऊ दे, मी लहानपणी ज्या छोट्या ताटलीत जेवायचे ती ताटलीही आईकडे अजून आहे. म्हणजे बघा.
भांडी कितीही जवळची असली तरी ती घासणे हा मात्र राष्ट्रीय पातळीवरचा विषय होऊ शकतो. भांड्याला मावशी ३ दिवस आल्या नाहीत तर ...... ?? ऐन पाहुणे यायच्या दिवशीच तिने कलटी दिली तर? असे गहन प्रश्न मी इथे काढणार नाही. माझे प्रश्न साधे आहेत? पाहुणे म्हणून एखाद्याकडे गेलेले असताना तुम्हाला भांडी घासायला लागली तर? सुनबाई घरात असताना सासूने भांडी घासली तर? बायको घरात असताना नवऱ्याला भांडी घासायला लागली तर? एकूण काय तर भांडी घासणे हे कमीपणाचे काम आहे. अगदी हिंदी पिक्चर मधेही निरुपा रायला गरीबीची पराकाष्ठा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायला लागणे. आजकाल इतका त्यावेळी मावशींना भाव नसल्याने तसे सीन्स घेतले असावेत.
जोक्स अपार्ट, बायकांनीच भांडी घासली पाहिजेत असा अलिखित नियम कधी बनला? पूर्वी त्या घराबाहेर पडत नसत, किंवा कामाची विभागणी घरची स्त्रीनं आणि बाहेरची पुरुषांनी अशी केल्यामुळे त्या करत असतील. पण आज, नोकरी करून घरी आल्यावरही मावशी आल्या नसतील तर भांडी कोण घासतं? बाई आली नाहीये याचा त्रास स्त्रीला होतो का पुरुषाला? पुरुषांसाठी हा मानाचा विषय का आहे?
आमच्या घरी डिशवॉशर आहे, ज्यात भांडी खरकटं काढून, विसळून लावावी लागतात. जेवणं झाली की मुलं पुस्तकं वाचत बसतात. मी भांडी विसळून देते आणि तो मशीनमध्ये व्यवस्थित रचून ठेवतो. त्याने विसळलेली मला आवडत नाही तर मी रचलेली भांडी त्याला आवडत नाहीत. एकूण काय, तर आम्ही आमच्या रोलमध्ये खूष आहोत. तरीही नवरा भांडी घासतो, किंवा मदत करतो यात ग्रेट काय आहे? अनेकदा, तीन तास उभे राहून केलेल्या स्वयंपाकासाठी मला मिळणाऱ्या कौतुकापेक्षा तो भांडी आवरतो किंवा मदत करतो याचंच कौतुक लोकांना जास्त असतं? एकदा तर एका ठिकाणी, 'मी मदत करते म्हटलं' तर 'राहू दे, तुला सवय नाहीये' असंही ऐकायला लागलं आहे. नवरा म्हणतो,'सोडून दे'. मी म्हणते, का सोडून द्यायचं? असं काय आहे भांडी घासण्यात की जे मी केलं नाही म्हणून मला ऐकून घ्यावं लागतं आणि तू करतोस म्हणून तुझं कौतुक होतं?
घरात कुठली भांडी कुठे आहेत, हे नवऱ्याला माहित आहे यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे? म्हटलं, १० बाय १२ च्या किचनमध्ये मोजून ८-१० कपाटं, त्यात कुठलं भांडं कुठे आहे हे घरात राहून माहित नसावं एखाद्याला? असं असेल तर घरात राहता की हॉटेलात असा प्रश्न विचारला पाहिजे. मी म्हणतच नाही की भांडी घासणे हे काही महान कार्य आहे. जेवण करतो तर मग भांडीही घासावीच लागणार? नाईलाज म्हणून का होईना ते करावंच लागतं. उलट जेवण झाल्यावर तितकीच हालचालही होते म्हणून अनेकदा आम्ही कितीही कंटाळा आला तर उरकून घेतो. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. नाईलाजाने का होईना करावं तर लागतंच. पण ते बायकांनीच करावं असं कुठे म्हटलंय?
आजही आपल्याकडे हे कमीपणाचं काम म्हणून घरच्या बाईला करावं लागतं. अनेकदा पुरुष स्वतःचं ताट उचलूनही सिंकमध्ये टाकत नाहीत. भारतात ही असमानता तर मी पाहिलीच आहे. पण अमेरिकेत राहूनही अनेक लोकांनी जे प्रश्न विचारलेत किंवा आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यावरून वाटतं की कितीही शिका, बाहेर पडा, नोकरी करा नाहीतर अजून काही, लोकांचे विचार मात्र बदलत नाहीत. ही असमानता मात्र कधी कमी होणार नाही. ती अशा छोट्या छोट्या गोष्टींतून दिसतंच राहते. गेल्या काही दिवसांपासून यावर जास्तच अनुभव आले म्हणून शेवटी लिहिलंच.
विद्या भुतकर.
3 comments:
Chhan
mast...
True
Post a Comment