संत्या रात्री त्याच्या ऑफिसमध्येच झोपला. घरी जायची इच्छाच राहिली नव्हती. सकाळी जाग आली तर पाटील समोरच बसलेले होते.
"हे हिथं यीवून झोपल्यावर वाईट वाटायला मी काय तुमची आई न्हायी. ", पाटील.
"हे
बगा पप्पा, तुम्हाला मी फायनल सांगतोय, मी अर्ज माघारी घेनार न्हाई.
सरकारनं न्हाई केलं तर मीच कमी दरात बस सोडीन गावातनं. ", संत्या निकराने
बोलला.
"हे असले निर्णय घ्यायला पॅड दिलं न्हाई मी तुम्हाला.", पाटील बोलले.
"तुमी
दिलं तवा मला नको हुतं. आता मी घेतलंय तर असंच काम करनार. तुम्हाला काढून
घ्यायचं तर घ्या, मी काम करायचं सोडनार न्हाई. ", संत्याने निक्षून
सांगितलं होतं. पोरगं आता आपलं ऐकणार नाही हे त्यांना कळलं होतं. बन्या आत
आला तसे ते बोलायचे थांबले. रोजचा रिपोर्ट घेऊन बन्या आणि पाटील निघून
गेले.
कालचं
भांडण आठवून संत्याचं डोकं ठणकत होतं. इतका मोठा आरोप तिनं केलाच कसा या
विचारानं त्याचा राग वाढतंच होता. खरंच तिच्यासाठी जीव दिला तरी थेंब पण
गळायचा नाही डोळ्यांतून तिच्या, असं त्याला वाटून गेलं. आजवर जे करत होतो
त्याला खरंच काही अर्थ आहे का? या विचारानं तो अस्वस्थ झाला.
दुपारी विक्याशी बोलताना त्यानं आपली खंत बोलू दाखवली, "लैच जोराचं भांडन झालं रं?".
"व्हय, तुला इतका चिडलेला काल पयल्यांदा पाह्यला. कसला आवाज चढलेला.", विक्या अजूनही तो प्रसंग आठवत होता.
"तुमी तरी अडवायचं मला? काय अक्कल हाय का न्हाई?", संत्या बोलला.
"तुजं तुला तरी भान हुतं का? कुनी मधी आला तर मेलाच असता. ", विक्या.
"हम्म काय करावं सुचंना रं. कासावीस व्हुयला लागलंय.", संत्याचा जीव तळमळत होता.
"मरु दीना, तुला काय इतकी पडलीय पन? तू किती जीवतोड काम करतूय म्हायीत न्हाई का तिला?", विक्याला रागच येत होता तिचा.
"चल पिक्चरला जाऊया, बास आता इचार करायचं.", विक्यानं बोलतच अम्याला फोन लावला.
------------------------------
रविवारचा
दिवस होता. उद्याच्या लेक्चरचं पुस्तक हातात धरुन सपना काहीतरी विचार करत
बसली होती. संत्याशी भांडण झाल्यापासुन तिचं हे असंच चालू होतं. काही ना
काही विचार डोक्यात होतेच. नक्की काय झालं, तो काय बोलला, ती काय बोलली,
याची उजळणी चालू होती. पण त्यातून तिला काय हवंय हे मात्र कळत
नव्हतं. दारावरची बेल वाजली आणि ती भानावर आली. बाईंनी दार उघडलं आणि
सपनाचे कान टवकारले.
"अहो, शिंदे सर आलेत", बाईंनी सरांना हाक मारली.
सर मागून बागेतून तातडीनं घरात आले. हात धुवून त्यांनी सरांना हात जोडून नमस्कार केला.
"काय
म्हणताय सर? आज सकाळ सकाळी कसं काय येणं केलं?", सरांनी पाहुण्यांना
विचारलं. सोबत मनोजही होता. त्यानं सरांच्या पायाला हात लावला.
सरांनीही,"आयुष्यमान भव" असा आशीर्वाद दिला आणि खुर्चीत बसले.
"ए
जरा चहा पाण्याचं बघ गं", म्हणून त्यांनी बाईंना सांगितलं. त्या आधीच
तयारीला लागल्या होत्या. आज काहीतरी होणार हे त्यांना नक्की वाटलं होतं.
सोफयावर
बसल्यावर शिंदे सर बोलू लागले,"काय करनार? या पोरांच्यावर सोपवून
निर्धास्त होतो. पण शेवटी आपल्यालाच कायतरी करायला लागनार असं दिसतंय.
म्हणून आलो.".
"का बरं? मी तुम्हाला फोन करुन कळवलं होतं की आमचं उत्तर.", सर बोलले.
"होय की, मी सांगितलं तसं याला, पन तरून रक्त हाय. असं जुमानतय का?", शिंदे सर बोलले.
"पण अशा बाबतीत जबरदस्ती करुन चालतीय का?", सरांनी विचारलं.
"म्हनून तर स्वतः बोलाय आलो. म्हनलं, काय अडचण हाय बघावं स्वतःच.", शिंदे सर.
"अडचण
म्हणाल तर सपनाला शिकायला जायचंय पुण्याला. ती तिथं, मनोजराव इथं, कसं
चालेल? अजून दोन तीन वर्ष तरी ती तिथं राहील. पुढं तिकडंच नोकरी लागली
तर?", सरांनी विचारलं.
"इतकंच ना? मग मनोजला पन बगु की आपन तिकडंच नोकरी. काय लागले पैसे तर जमवू आपन.", शिंदे सर बोलले.
"पैसे? कसले पैसे?", सरांना काही कळलं नाही. इतक्यात सपनाही ओढणी घेऊन आहे त्या ड्रेसमध्ये तशीच बाहेर आली होती.
"सर,
तुम्ही सांगा आजकाल नोकरी सहज लागतीय का? कायतर करावंच लागल ना? करु की
आपन. थोडे तुमी द्या, थोडं आमी करतो बंदोबस्त. ", शिंदे सर बोलले.
सपनाला
आता राहवेना. ती रागाने पुढे येऊन मनोजला बघत म्हणाली,"काय हो मनोज,
तुम्ही विचारलं म्हणून भेटले, बोलले. तिथून तुम्ही प्रकरण पैशांपर्यंत
नेलंत?".
"मी कुटं काय म्हंतोय? तुम्ही सातारला असाल तर प्रश्नच मिटला ना?", मनोजने विचारलं.
"पण मुळात तुमची जबरदस्ती का म्हणते मी? मला तर काही कारणं द्यायचीच नाहीयेत तुम्हाला.", सपना तावातावाने बोलली.
मनोज ताड्कन उठला आणि म्हणाला,"म्हंजे इतके दिवस भेटलो, बोललो ते व्यर्थच?".
शिंदे सर बोलले,"सर परत सांगतोय, या असल्या गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. विचार करा.".
"धमकी कुणाला देताय?", सपनाने सरांना विचारलं. तिची हिम्मत बघून मनोजही घाबरला होता.
पुढे
मनोजकडे बघत ती बोलली," आन काय रे? चार वेळा मोजून तू मला भेटला, बोलला,
त्यात किती कष्ट पडले ते तुला? प्रयत्न व्यर्थच म्हणे. मी काय लगेच हो
म्हणाले होते का लग्नाला? का तुझ्या गळ्यात हात घालून फिरलेले? "
"सपना !!", बाईंनी जोरात ओरडून तिला आतून हाक मारली.
"हे बघा पप्पा मी स्पष्टच सांगते, मला या घरात लग्न नाही करायचंय.", आणि तिथून निघून गेली.
"सर, तिच्याकडून मी माफी मागतो. पण ती म्हणाली तसं तिचा जो निर्णय तोच आमचा. आम्ही काही जबरदस्ती नाही करणार तिच्यावर.", सरांनी हात जोडून शिंदे सरांना विनंती केली.
"आता काय बोलनार आमी? आमच्या पोरालाच अक्कल न्हाई. उत्तर म्हाईत असून इथंवर यायला लावलं.", शिंदे सर बोलले.
"झालं का समाधान? चला आता अजून अपमान करून घ्यायचा बाकी हाय का? ", शिंदे सरांनी मनोजकडे बघून विचारलं. आतून सपना ऐकत होतीच. तिचा राग अजून कमी होत नव्हता.
मनोज वडलांचा चेहरा बघून गप्प झाला. शिंदे सरांनी पायात चपला चढवल्या आणि निघाले.
"सपना !!", बाईंनी जोरात ओरडून तिला आतून हाक मारली.
"हे बघा पप्पा मी स्पष्टच सांगते, मला या घरात लग्न नाही करायचंय.", आणि तिथून निघून गेली.
"सर, तिच्याकडून मी माफी मागतो. पण ती म्हणाली तसं तिचा जो निर्णय तोच आमचा. आम्ही काही जबरदस्ती नाही करणार तिच्यावर.", सरांनी हात जोडून शिंदे सरांना विनंती केली.
"आता काय बोलनार आमी? आमच्या पोरालाच अक्कल न्हाई. उत्तर म्हाईत असून इथंवर यायला लावलं.", शिंदे सर बोलले.
"झालं का समाधान? चला आता अजून अपमान करून घ्यायचा बाकी हाय का? ", शिंदे सरांनी मनोजकडे बघून विचारलं. आतून सपना ऐकत होतीच. तिचा राग अजून कमी होत नव्हता.
मनोज वडलांचा चेहरा बघून गप्प झाला. शिंदे सरांनी पायात चपला चढवल्या आणि निघाले.
"बघा यांच्यासाठी इतकं केलं आनी तरी हे असं ऐकून घ्याय लागतंय.", मनोज जोरात ओरडला.
तशी सपना पळत पळतच बाहेर आली आणि मनोजला म्हणाली, "करायचंय ना लग्न? चला ना मग?". तिने मनोजचा हात धरला. पायांत चपला घातल्या आणि निघालीच. सर, बाईही तिला थांबवत होते पण ती ऐकत नव्हती. तिने मनोजचा हात ओढतच निघाली. त्याला हे असं लोकांसमोर जायला लाज वाटत होती पण तिला मात्र काही सुचत नव्हतं , दिसत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं. तिच्या आवाजात, डोळ्यांत जरब होती. ताड ताड चालत सपना संत्याच्या ऑफिससमोर येऊन थांबली. तिला असं आलेलं पाहून बाहेर उभी असलेली पोरं बिथरली. त्यातलं एक पोरगं आत पळतच गेलं. संत्या केबिनमध्ये बसलेला.
ते पोरगं ओरडलं,"संत्या वहिनी आल्यात रं.". त्याचा अवतार बघून संत्या धावतच बाहेर आला.
समोर सपना मनोजचा हात धरून उभी. त्याला समोर पाहिलं आणि सपनाचं अवसान गळल्यासारखं झालं. तिच्या डोळ्यांत पाणी साठलं. तिने मनोजचा हात सोडला आणि संत्याचा धरला आणि म्हणाली,"हा संत्या शाळेत असल्यापासून माझ्या मागावर. सकाळ संध्याकाळी सावलीसारखा माझ्यामागे फिरायचा. मी घरी नीट पोहोचते का नाही ते बघायचा. पण कधी कशाची अपेक्षा केली नाही, काही मागितलं नाही. मी कानाखाली मारली तरी उलट मारली नाही मला. उलट चांगल्या कामाला लागला. मी विश्वास ठेवला नाही तरी आपलं काम करत ऱ्हायला. मी कचाकचा रस्त्यात भांडले त्याच्याशी. तरी वाटेत सोडून नाही गेला. प्रयत्न म्हंजे काय, प्रेम म्हंजे काय ते त्याला विचारा.
तिच्या आवाजानं अजून चार माणसं जमा झालेली. त्यांच्याकडे पाहून ती म्हणाली,"ही बदनामीची धमकी कुनाला देताय? सगळ्या गावापुढं त्याचा हात धरतीय आज. त्यो जसं माज्यासाठी काय पण कराय तयार आहे, मी पन त्याच्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. पन हे सगळं मी तुमच्यासाठी का सोडायचं? आन मी म्हनलं तर जन्मभर माझी वाट बगल तो. काय रे बघशील ना?", सपनाने संत्याच्या डोळ्यांत पाहात विचारलं.
तो गप्पच होता. तिला अजून रडू येऊ लागलं. ती पुढे बोलू लागली,"पर्वा बोल्लास ना ते पटलं मला. मला फक्त माझीच फिकीर होती, बाकी कुणाचीच न्हाई. तुजितर कणभर पन न्हाई. पण तवापासुन चैन न्हाई जीवाला, तुज्याशी बोलता येनार न्हाई या विचारानं झोप न्हाई. तू नसलेलं आयुष्य कसं हा विचारच करवेना. मला माझं स्वप्न पायजे आन तू पन. जमल का? आजवर होतास ना
सावलीसारखा? तसाच. कधी माझ्या मनात तुझं रुप बदलत गेलं कळलंच नाही. अन ते
झालं तरी मी मान्य केलं नाही. पण आता मलाही तुझी सावली व्हायचंय. हा
एकट्यानं प्रवास कुठंवर करशील? कधीतरी थांबवला अस्तास का नाही? चुकलं माझं
त्यादिवशी. ". ती बोलतच राहिली.
"सपने मला काय बोलू देशील का न्हाई?",संत्यानं जोरात ओरडून विचारलं तेव्हा कुठं ती शांत झाली.
"सगळ्यांत पयलें ते डोळ्यातलं पानी पूस", म्हणत त्याने तिच्या गालावरचं पाणी टिपलं आणि पुढे बोलू लागला,"हे बघ एकतर मी तुला लै घाबरतो. जी काय हिम्मत केली ती पर्वा तुज्याशी भांडायला केली. पन तुज्याशी भांडून करमत न्हाई. लै वाईट वाटलं तवापासनं. तुज्याशी भांडून कुटं जानार हाये मी? तू म्हनशील ते सगळं जमल. तू 'हो' म्हनायची वाट बघत होतो. तुज्या कॉलेजचं म्हनशील तर इतकी वर्षं आलो तुज्यामागं. अजून पन बसनं मागं यायची तयारी हाय, जिथं म्हनशील तिथं. आता बाकी या लोकांचं काय? तू हो म्हंनलीस ना? मग बास! मला यांचं काय करायचंय मग?", संत्या मनोजकडं बघत बोलला. त्याच्याकडे पाहात त्याने हात जोडले आणि म्हणाला,"साहेब या आता.".
बोलण्या-ऐकण्यासारखं काही नव्हतंच. मनोजला फारच शरमल्यासारखं झालं होतं आधीच. तो तिथून निघाला. तो निघाल्यावर बाकीचीही गर्दी तिथून पांगली. संत्या आणि सपनाच, रस्त्याच्या मधोमध, एकमेकांकडे बघत. आणि त्या क्षणाला पहिल्यांदा दोघांना जाणवलं की,"पुढे काय?".
तीही थोडी लाजली. संत्यानं ऑफिसकडे हात केला. ती त्याच्या मागोमाग आत गेली आणि संत्यानं तिला पहिला प्रश्न विचारला,"अख्ख्या गावासमोर विचरायची वाट बघत होतीस व्हय? आन म्या न्हाई म्हनलं असतं तर?".
त्याने असं विचारलं आणि ती थोडी हसली. तिला जाणवलं आपण दोघेच आहोत त्या छोट्या खोलीत.
तिने त्याच्या खांद्यावर जोरात बुक्का मारला आणि म्हणाली,"तर तर, न्हाई म्हनून तर बगायचं मग कळलं असतं सपना काय हाय ते."
त्या दिवशी रागाने थरथरत तिचे खांदे धरणारे हात आता तिच्या हातांवर अलगद विसावले होते. तिच्या डोळ्यांतून अलगद पाणी पाझरू लागलं. आज पहिल्यांदा तिला त्याच्या प्रेमाचा स्पर्श झाला आणि ती सुखावली होती. त्यानं पुढं होऊन तिच्या कोरड्या ओठांवर आपले ओठ टेकले आणि ती हुंकारली. दोघे मग बराच वेळ बसून राहिले. आज संत्याला जाणवलं, ती असताना मला बोलायची गरजच नाहीये. हे असं तासनतास न बोलता बसून र्हायलं तरी चालणार आहे. आणि संत्याचं आयुष्यभराचं स्वप्नं आज पूर्ण झालं होतं.
तिने त्याच्या खांद्यावर जोरात बुक्का मारला आणि म्हणाली,"तर तर, न्हाई म्हनून तर बगायचं मग कळलं असतं सपना काय हाय ते."
त्या दिवशी रागाने थरथरत तिचे खांदे धरणारे हात आता तिच्या हातांवर अलगद विसावले होते. तिच्या डोळ्यांतून अलगद पाणी पाझरू लागलं. आज पहिल्यांदा तिला त्याच्या प्रेमाचा स्पर्श झाला आणि ती सुखावली होती. त्यानं पुढं होऊन तिच्या कोरड्या ओठांवर आपले ओठ टेकले आणि ती हुंकारली. दोघे मग बराच वेळ बसून राहिले. आज संत्याला जाणवलं, ती असताना मला बोलायची गरजच नाहीये. हे असं तासनतास न बोलता बसून र्हायलं तरी चालणार आहे. आणि संत्याचं आयुष्यभराचं स्वप्नं आज पूर्ण झालं होतं.
समाप्त.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/