Thursday, October 11, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ८

       बन्या हे एक अजब रसायन होतं.शाळा, कॉलेज कसं गरजेपुरतं आणि गरजेपुरते मार्क मिळवून केलं. तिथून गावांत, शहरांत नोकरी शोधून झाली. सुट्टीला आलेला असताना पाटलांनी त्याला एकदा कामासाठी बोलावलं होतं, तेव्हांपासून जो त्यांच्याकडे लागला ते गेले १२ वर्षं. त्याची ग्रामपंचायतीतली नोकरीही पाटलांनीच मिळवून दिलेली. नोकरी लागली म्हटल्यावर लग्नंही ठरलं, लग्नं झालं,मुलगी झाली. सगळं कसं साच्यातून काढल्यासारखं. रोज सकाळी उठून पोरीचं आवरायला मदत करायची, बायकोनं डबा दिला की पोरीला शाळेत सोडून कामावर जायचं, संध्याकाळी घरी आल्यावर चहा घेऊन पहिलं पाटलांकडे. घरी आल्यावर पोरीला जेवायला घालायचं, तिला झोपवायचं काम सगळं यांच्याकडेच. बायकोलाही पाटलांनी सुनेसारखा मान दिला. प्रत्येक कार्यक्रमांत, सत्यनारायणाच्या पूजेला, हळदी-कुंकवाला आवर्जून काकी निरोप धाडायची. दिवाळीचं ताट पण गच्चं भरुन यायचं बन्याकडं. पाटील आणि काकी हे त्याच्यासाठी आई-वडिलांपेक्षा पण जास्त मानाचे होते. 

        संत्याला त्यांनी धाकट्या भावासारखा मानला तरी त्याला मात्र बन्याचा वावर जास्त आवडायचा नाही. पप्पांना दाखवायला तो उगाच नको इतका चांगला वागतो असं त्याला वाटायचं. अशा लाळघोटेपणा करणाऱ्या माणसाशी पप्पांनी आपली तुलना करावी हे त्याला पटायचं नाही. अनेकदा तो आपल्या पाळतीवर आहे असं संत्याला वाटायचं. तो काय करतो याची सगळी माहिती तो पप्पांना देत आहे असं संत्याला वाटत राहायचं. त्यामुळे बन्या दिसला की संत्याला उगाचच अपराधी असल्यासारखं वाटत राहायचं. आता तर पाटलांनी त्याचा पूर्णच ताबा बन्याच्या हातात दिला होता. संत्याचं कल्याण ही बन्याची वैयक्तिक जबाबदारी बनली होती.संत्याचे फोटो काढून आल्यावर त्याच्यासोबत दिवसरात्र काम करुन ते बोर्डावर लावले होते. सकाळी कामावर जायच्या आधी लोकं गोळा करुन सगळं काम पार पाडून मगच तो कामावर गेला होता. इतकंच नाही तर परत आल्यावर संध्याकाळी पाटलांकडे घरी जाऊन त्यांच्याशी पूर्ण झालेल्या कामाची चर्चाही केली होती. 

         पार्टीचा बोर्ड लागला आणि कामाची लगबग अजूनच वाढली. पाटलांनी एका गाळ्यात ऑफिस थाटून दिलं. त्याचं उदघाटन अगदी रिबीन कापून संत्याच्याच हस्ते झालं. आयुष्यात इतक्या अचानक इतक्या हालचाली होती असं कधी संत्याला वाटलं नव्हतं. संत्याच्या नावाचं ऑफिस सुरु झालं तेव्हा पाटलांनाही जरा भरुन आलं. 'आपलं पोरगं खरंच कामाला लागलं' असं त्यांना वाटू लागलं. त्याच्या ऑफिसात एक बारकी वेगळी केबिन ठेवली. बाहेर बसायला दोन आडवे बेंच टाकले, एक चप्पल स्टॅन्ड, एक पाण्याचा पिंप आणि एक फॅन लावला होता. त्याच्या केबिनमध्ये टेबलावर एक कॉम्प्युटर, प्रिंटरसुद्धा मागवून घेतला होता. ज्या दिवशी ऑफिस थाटलं त्याच दिवशी पाटलांनी एक धमकी देऊन ठेवली होती,"रोज सकाळी उठून, अंघोळ करुन पहिलं ऑफिस खोलायचं. काय? कळलं का?". त्याने मान हलवली होती. 

      संत्यानं, किश्याच्या नेटकॅफेमध्ये आयुष्यातले अनेक तास घालवल्याने त्याला तो वापरायचा कसा याची जरा जास्तच अक्कल होती. रोजचा मित्रांचा अड्डा आता तिथेच जमू लागला होता. आजही सकाळी नऊ वाजता ऑफिस उघडून संत्या बसला होता. आता नुसतं बसून तरी काय करायचं हे त्याला कळत नव्हतं. उगाच मग फोन कर, मेसेज कर, असले उद्योग करायचा. अम्याला त्याने उठवून बोलावून घेतला होता. 

"अम्या, सातारला जायची इच्छा व्हायलीय कवापासनं. काय करायचं हिथं बसून?", संत्यानं त्याला विचारलं. 
"एक काम कर पार्टीचं फेसबुकवर पेज सुरु करुया का?", अम्यानं विचारलं. 
"म्हंजी?", संत्याला काडीभर काय कळलं नाही. त्यानं फेसबुक वापरलं होतं तसं. नवीन फोटो मिळाल्यावर एक-दोन प्रोफाईलला पण लावले होते. 
त्यावर, "ज-ब-री", "ख-त-रा","होऊंदे खर्च", "छावा", "क-ड-क" असले मित्रांचे एकेक कमेंट आले होते. 
पण त्याच्या पलीकडे त्यानं काही केलं नव्हतं. 
आता एक पेज सुरु करायचं म्हणजे काय यावर अम्यानं लेक्चर द्यायला सुरुवात केली. त्यानं पहिले एक-दोन लोकांचे पेज त्याला दाखवले. 

"हे बघ, असं फक्त आपलं, आपल्या पार्टीचं पान. हिथं आपण सगळी म्हायती द्यायची. पार्टीच्या कामांची, सभासदांची, अशी. ", अम्या दाखवाय लागला तसा मधेच संत्याला एका पोरीचा फोटो तिथं दिसला. 
"आरं थांब, थांब, मागं जा. ही कोने? भारी दिसतीय ना?", म्हणत संत्यानं तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलं. 
तिचे एकेक फोटो बघत बराच वेळ गेला. तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मेसेंजरवरुन,'शुभसकाळ'चे दोन मेसेज पण पाठवले त्यानं. इतक्यात बन्या आला. 
या सगळ्या गोंधळात त्यातल्या त्यात जबाबदार माणूस होता, तो म्हणजे बन्या. पाटलांनी त्याला १५ वर्षाचा होता तेव्हापासून आपल्या हाताखाली घेतलेला. गेली १०-१२ वर्षं त्यांच्यासोबत काम केल्यानं त्यांचा त्यावर एकदम विश्वास बसलेला. बन्या आला तसा संत्या घाबरला. 
"काय करताय संतोषराव?", त्यानं विचारलं. 
"काय म्हंजे ते आपल्या पार्टीचं पान बनवतोय, ते फेसबुकवर. तिकडं लोकांना म्हायती मिळत्ये ना आपल्या कामाची. ", संत्यानं अम्याचे शब्द बरोबर पाठ केल्यासारखे बन्याला ऐकवले होते. 
बन्याला ते पटलं. 
"आज अजून काही काम?", त्याने विचारलं. 
"नाही असं काय पप्पांनी सांगितलं न्हाई. त्यांनी सांगितलं तर करतो कॉल तुला. ", संत्यानं त्याला कटवलं. 
बन्या चौकशी करायचं काम पार पाडून, गाडी घेऊन कामावर निघून गेला. 

"लैच त्रास हाय बेण्याचा. सौता जगायचं नाही, दुसऱ्याला पर जगू द्यायचं न्हाई. ",विक्या नुकताच टपकला होता. त्यानं बन्याला जाताना पाहून आपलं मत मांडलं. 
"जाऊंदे, ते पान उघडायचं बग बरं", म्हणत संत्यानं मूळ मुद्द्याला हात घातला. 
"मी काय म्हंतो त्याला नाव काय द्यायचं? कायतरी भारी पाहिजे एकदम झकास.", अम्या बोलला. 
"एकंबे नवयुवक सेना, कसं वाटतंय? एकदम सोपं. ", विक्या. 
"हां चालंल. अम्या ते मराठीत ल्ही आन शुद्धलेखनात चुका करु नकोस.", संत्यानं त्याला समजावलं. 
अम्या फेसबुक उघडून काहीतरी लिहायला लागला. इकडं संत्यानं फोन काढला आणि एक सेल्फी घेतला. आज सकाळी शुभ्र धुतलेला, इस्त्री केलेला शर्ट घालून आलेला. त्यात येताना मारुतीच्या देवळातून येताना गंध पण लावलेला कपाळाला. सेल्फी बघून खूष होत त्यानं तो विक्याला दाखवला. 
"हा कसा वाटतोय? हाच लावूया प्रोफाईलला. अम्या हे घे, बघ कसा लावायचा. ", संत्यानं फोटो अम्याला दाखवला. अम्यानं मान हलवली आणि पुन्हा कामाला लागला. 

     त्यांचं चालू असतानाच एकदम लाईट गेली आणि तिघांनी एकदम जोरात शिवी घातली. गुरुवारी सकाळी याच दरम्यान लाईट जायचीच. पण या पोरांना त्यानं काहीही फरक पडायचा नाहीच. मग तिघेही उठले. 

संत्या म्हणाला,"अम्या पिक्चरला जायचं का?". 

विक्या तयार होताच. संत्यानं नवीन कुठला पिक्चर लागलाय हे पाहिलं. जवळचं थिएटरसुद्धा दुसऱ्या गावात, कोरेगोवला १० किलोमीटरवर होतं. पण दुसरं काम नसल्याने तोच उत्तम उपाय आहे हे त्यांना माहित होतं. तिघेही संत्याच्या गाडीवर बसले आणि सुटले. आता दुपारचं जेवण उरकूनच गावात परत येणार होते ते. 

- क्रमशः 

विद्या भुतकर. 


No comments: