Tuesday, October 02, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण - ४

सकाळी घरात कसला तरी आरडा ओरडा चालला होता , त्याच्या आवाजानं संत्याला जाग आली. बाहेर पप्पा त्यांचं जॅकेट सापडत नाही म्हणून काकीला बोलत होते.
"मला काम हुतं म्हत्वाचं. बगा जरा कुटं ठेवलंय?", पाटील विचारत होते. काकीला काही आठवत नव्हतंच. घरातले सगळे कोनाडे, कपाटं, सूटकेस सर्व शोधून झालं होतं आणि तरीही मिळालं नाही म्हणून काकी जास्तच काळजीत होती. बाहेरचा आवाज ऐकून संत्याला आठवलं आज त्याला जायचं होतं पप्पांसोबत कामाला. त्यानं पटकन तोंड धुतलं, सकाळचा फोन तपासण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आणि अंगावर चार थांबे पाणी घेतलं. समोरचा खुंटीवरुन त्यातल्या त्यात कमी घातलेला शर्ट घातला, जीन्स, स्पोर्ट शूज आणि माजघरात आला. काकीची हालत बघून चहासाठी विचारायची त्याची हिम्मत झाली नाही.
त्याने तिची मदत करायला म्हणून विचारलं,"इस्त्रीला दिलेला का जॅकेट?".
काकीने क्षणभर विचार केला आणि म्हणाली,"हां तिथंच असंल. नायतर घरातून कुटं जानार? एक काम कर जा  पटकन त्याच्याकडं बगून ये.".

आपला प्रश्न आपल्यावरच उलटलेला बघून संत्याला वैताग आला. पण पप्पा खवळलेलं होते. त्यानं मुकाट्यानं गाडी काढली. तितक्यात काकी आरडली,"अजून उगडला नसला तर घरी जावून इचार". मग तर संत्या अजून चिडला. तावातच निघाला, त्याचं नशीब बरं म्हणून परटाचं दुकान उघडलेलं होतं. त्यानं त्याला शोधायला लावलं जॅकेट. रंग, पॅटर्न काहीच न विचारता आलेला तो. त्यामुळं पुन्हा घरी फोन लावला, विचारुन, ते जॅकेट शोधून घरी घेऊन आला. जॅकेट बघून पाटील जरा शांत झाले. संत्यानं काकीला चहा मागितला. चहा-बटर खाऊन तो बाहेर पडवीत येऊन बसला. पाटीलही तयार होऊन बाहेर आले. त्यांनी संत्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळला.

"हे असं येणार कामाला?", त्यांनी विचारलं.
"हां, अंघोळ केलीय मगाशीच", संत्या बोलला.
"जरा तोंड बगा आरशात, दाढी न्हाई, कपड्याला इस्त्री न्हाई. ", ते वैतागले होते.
"चला आता, उशीर झालाय, पुढल्या येळेला नीट आवरुन यायचं, कळलं का?", त्यांनी मान वाकवून विचारलं. त्यानेही मान हलवली.
        पाटलांनी गाडी बोलावून घेतली होती. गाडी आली म्हणजे गावाबाहेर कुठं तरी जायचं आहे इतकं संत्याला कळलं. त्याची काळजी मग अजूनच वाढली. आता एकदा गावाबाहेर पडलं की पप्पांचा यायचा ठिकाणा नसायचा. त्यांच्या रागाकडं बघून पुढे बोलायची त्याची हिम्मत झाली नाही. तो गाडीत पुढे ड्रायवर शेजारी बसला. पाटील हातात कसल्या तरी फायली घेऊन मागे बसले होते. गाडी सुरु झाल्यावर संत्यानं गाणी लावली तसं पाटलांनी वर पाहिलं. त्यानं मग बंदच केली आणि बाहेर बघत बसला. कोरेगाव, जांब, त्रिपुटी सगळी गावं पार करुन गाडी सातारला आली. इतका वेळ गप्प बसणं म्हणजे संत्याला शिक्षाच होती. पण एक चांगलं होतं, सातारलाच असल्याने मधेच कल्टी दिऊन जाता आलं असतं सपनीकड.

        गाडी पार्टी ऑफिसच्या रस्त्याला लागली आणि संत्याची ट्यूब पेटली. पार्टी ऑफिसमध्ये काम असलं की पप्पा एकदम प्रॉम्प्ट असायचं. त्यात हलगर्जीपणा त्यांना चालायचा नाही. पार्टीची छोटी मोठी कामं संत्या अधून मधून करायचा. पण प्रत्यक्षात ऑफिसला जायचा कधी प्रसंग आला नव्हता त्याच्यावर. जे काही काम असेल ते बाहेरुनच. पाटील तीन वेळेला गावाचं सरपंच म्हणून निवडून आलेले. त्यामुळे त्यांचं गावात वजन होतं. पार्टी ऑफिसमध्ये जायचं असेल तर मात्र त्यांची हालत, संत्याची त्यांच्यासमोर असे, तशी व्हायची. गाडी ऑफिससमोर लावली तसं पाटील उतरले. संत्यानं लगबगीनं त्यांच्या हातातून फायली घेतल्या. आता आपल्याला पुढं जे काय आहे ते लक्ष देऊन केलं पाहिजे हे त्याला कळलं होतं. पाटलांच्या मागे त्यांच्या फाईल घेऊन तो ऑफिसमध्ये गेला.

       पार्टी ऑफिस म्हणजे एक मोठी संस्थाच. मोठं फाटक होतं. त्याच्या बाहेर पार्टीचं ब्रीदवाक्य लिहिलं होतं मोठ्या अक्षरांत. फाटकात काही लोक दोन चार घोळके जमलेले होते. काही लोकांनी रस्त्याच्या पलीकडे कसलेतरी पार्टीविरोधी घोषणांचे बोर्ड हातात घरुन 'मूकमोर्चा' सुरु केला होता. सकाळचीच वेळ असल्याने अजून गर्दी कमीच होती. फाटकातून आत गेल्यावर चार-पाच भारी गाड्या लागलेल्या होत्या. ठिकठिकाणी पार्टीचं चिन्हं छापलेलं दिसत होतं. भारताचा आणि पार्टीचा झेंडा शेजारी शेजारी मानाने झळकत होता. राष्ट्रीय नेत्यांची मोठी होर्डिंग लागलेली, एक हात वर करुन त्तर काही हात जोडलेली. जवळच पोलिसांच्या दोन जीपही त्याला दिसल्या होत्या. काही लोक फोनवर बोलत होते, कुणाचे ड्रायव्हर गप्पा मारत होते. संत्या आज पहिल्यांदाच हे सर्व जवळून बघत होता.

       आत गेले तर समोर एका टेबलावर कसलीतरी गर्दी जमली होती.टेबलाच्या पलीकडे बसलेल्या माणसाशी जोरजोरात लोक वाद घालत होते. दुसऱ्या टेबलावर एक कंप्यूटर ठेवलेला होता, प्रिंटर, जवळ झेरॉक्स काढायचं मशीन, सगळं सेटअप होता. तिथे बसलेला पोरगाही अगदी फॉर्मल शर्ट घालून बसलेला. संत्याला जरा लाजच वाटली. दारातून आत गेल्या गेल्या पाण्याचे माठ ठेवले होते आणि शेजारी दोन बेंच. पाटलांनी संत्याला सांगितलं,"इथंच बस. मी सांगेपर्यंत हालू नगोस.". त्याने मान हलवली.

      पाटील लगबगीनं वरच्या मजल्यावर गेले. संत्या तोवर आजूबाजूला बघत बसला. मध्येच त्याला आठवण झाली, सकाळपासून फोन पाहिलाच नव्हता. त्याने मेसेज पाहिले तर, अम्या-विक्याचे मेसेज, मिस्ड कॉल येऊन गेले होते. 'आपलाकट्टा' व्हाट्सएप्प ग्रुपवर अचानक २०-२५ मेसेज आलेले होते. तिकडं कोण इतका पेटलाय म्हणून संत्यानं फोनवर स्क्रॉल करायला सुरुवात केली. इतक्यात वरुन एक शिपाई आला, 'संतोषराव?' त्याने संत्याकडे बघत प्रश्न केला. आता त्याच्या मित्राने त्याला अशी हाक मारली तर त्याने, आजूबाजूलाच पाहिलं असतं, कुणाला हाक मारताय म्हणून. पण इथे जरा गंभीर मामला होता. त्याने शर्ट परत जीन्समध्ये नीट खोचला आणि शिपायामागे निघाला. शिपायाचा ड्रेसही कडक इस्त्री केलेला होता.

      वरच्या मजल्यावर जाताना संत्याची धडधड वाढली जरा. वर दादासाहेबांचं ऑफिस होतं. दादासाहेब म्हणजे साक्षात देवच पप्पांसाठी. एक वेळ पूजेला वेळेवर यायचे नाहीत पण दादासाहेब म्हटलं की पाटील उठलेच म्हणायचं. ते एकदा घरी आलेले असताना पप्पांना बघून त्याला वाटलं होतं, जणू पांडुरंगच भक्ताच्या दारी आला आहे. काय करु, कुठे ठेऊ त्यांना असं झालं होतं पाटलांना. तो दिवस आणि आजचा दिवस. मध्ये कधी दादासाहेबांचं दर्शन संत्याला झालं नव्हतं. त्याची लक्षणं बघून त्याला लांबच ठेवला होता पाटलांनी. ऑफिसमध्ये वरच्या मजल्यावर एकदम शेवटच्या टोकाला त्यांचं केबिन होतं. शिपाई त्याला घेऊन तिथवर गेला आणि परतला. संत्या आत गेला तर पप्पा खुर्चीच्या एकदम टोकाला बसलेले. अजून पुढे आले तर पडलेच असते. चेहराही गरीब गाईसारखा झालेला.

संत्या आत आला तसे ते उठले, "दादासाहेब हा आपला पोरगा, संतोष. अजून शिकतोय. कपडे बिपडे घालायचं अजून इतकं नाय समजत त्याला. आपला आशीर्वाद असू द्या त्याच्या पाठीशी. ". 
संत्याने हात जोडले तसं पाटलांनी पाय पडायची खूण केली. संत्या पुढे झाला, दादासाहेबांच्या खुर्चीकडे जाऊन वाकला, तसे इतका वेळ खुर्चीत रेलून बसलेले दादासाहेब उठले. 
"असू दे हो, यशस्वी भव", असं म्हणत दादासाहेब पुन्हा खाली बसले. संत्या टेबलाच्या बाजूला उभा राहिला. 
त्याच्याकडे नजर फिरवत दादासाहेब बोलले,"हे बघा हे असंच होतंय. आपली पार्टी म्हणूनच नवीन लोकांच्या, तरुणांच्या जवळ जाऊ शकत नाहीये. चांगले सफेद इस्त्री केलेले खादीचे कपडे, पाय पडायचं, हे सगळे सोपस्कार आहेत हो! खरं काम हात मातीत मळल्यावरच होतं. इथं असं खुर्चीत बसून नाही. "
संत्या दोन्ही हात मागे घेऊन विश्राम मध्ये उभा होता. 
"मग काय संतोषराव काय शिकताय?", दादासाहेबांनी विचारलं. 
"इथं सातारलाच बी. ए. करतोय.", संत्या बोलला. 
"बरं. अभ्यास करताय ना? ",दादासाहेब. 
संत्याने मान हलवली. 
"चांगलंय. काय करतात आणि बाकी अभ्यास सोडून?", दादासाहेब. 
"जातो की जिमला रोज. पुस्तकं पण आवडतात वाचायला, मराठी.", संत्या बोलला. 
"तसा याचा मित्रपरिवारबी मोठा हाय बरं का. म्हटलं तर शेकडा पोरं गोळा करल झटक्यात. ", पाटील काहीतरी बोलायचं म्हणून बोलले. 
"अहो तुमचाच पोरगा तो, असणारच गोतावळा मोठा. शंकाच नाही त्यात.", दादासाहेब बोलत हसले.  
पाटलांनाही जरा बरं वाटलं. त्यांनी संत्याला,"जा बाहेर बस, मी आलोच म्हणून सांगितलं.".

संत्या पुन्हा एकदा दादासाहेबांच्या पाया पडला आणि निघाला. केबिनच्या एसी रुममधे सुद्धा त्याला घाम फुटला होता. दादासाहेबांच्या अस्तित्वाचा प्रभावच तसा होता, त्यात पप्पा. संत्या खाली जाऊन बसला. केबिनमध्ये असतानाच फोन थरथरला होता. त्याने पाहिलं तर दुपार झाली होती. अम्याला, विक्याला मेसेज टाकला होता,"कॉलेजला गेलायंस का?". 
अम्याचं उत्तर आलं होतं,"पाय लै दुखताय".

      संत्यानं मनात त्याला चार शिव्या घालून घेतल्या. विक्याला फोन केला तर तो पण 'न्हाई' म्हणाला. आता एकच आशा होती त्याला, पप्पांचं काम झालं की आपणच एकटं सपनीच्या कॉलेजवर जायचं. तासाभरात पप्पा बाहेर आले, तोवर संत्या चुळबुळ करत बेंचवर बसून राहिला होता. तो चुकून बाहेर जरी गेला तरी शिव्या खायला लागल्या असत्या हे नक्की माहित होतं. खाली आल्यावर पाटील तडक गाडीकडे निघाले. संत्या मागे मागे गेला.

गाडीत बसल्यावर त्यानं पप्पाना विचारलं, "झालं काम? मला कॉलेजला सोडता का?". 
"काय गरज नाहीये आज कॉलेजला जायची. आता काम आहे जास्त. घरी चला मुकाट्याने." पाटील कावले. 
संत्या मुकाट गाडीत बसून घरी परतला. येताना गाडीत पाटील एकदाच बोलले फक्त,"हे बघा संतोषराव उद्या सकाळी अजून लौकर जायचंय. सगळं आवरून तयार राहा, दाढी बिडी करुन. कळलं का?". 
संत्यानं मान हलवली.

गावात आल्यावर पाटलांनी संत्याला बन्याकडं पाठवला. 
"काल ती पोस्टर दिली होती ना? ती गावात लावायची हायेत. तो सांगल सगळं. जा आता.", पाटील बोलले.

संत्या बन्या सोबत जाऊन सगळी कामं करुन कट्ट्यावर पोचला. सगळ्या पोरांनी त्याला असा घेरलं की आताच जेलमधून परतलाय. त्यांच्याशी बोलल्यावर त्याला जरा बरं वाटलं. पण, त्याचं सगळं लक्ष स्टँडकडून येणाऱ्या रस्त्यावर होतं. नऊ वाजल्यावर मात्र 'वाट पाहण्यात अर्थ नाही' हे त्याला कळलं आणि तो गाडीवर टांग टाकून घरी परतला. आज बऱ्याच दिवसांनी सपनीचं दिवसभरात एकदाही दर्शन झालं नव्हतं. 

- क्रमशः

विद्या भुतकर. 

No comments: