सकाळी गजर झाला तशी सपनी उठायची, अर्ध्या-पाऊण तासांत सर्व आवरुन तयार व्हायची. सकाळी घालायचा ड्रेस रात्रीच इस्त्री करुन खुर्चीवर ठेवलेला असायचा. आंघोळ करुन घातलेल्या ड्रेसची ओढणी अर्ध्यातून लांब घडी करायची, त्याचा मध्य बघून त्याच्या थोडं शेजारीचं टोक एका खांद्यावर पिनेने अडकवून टाकायची.मध्यभागी ओढणीचा 'V' होईल अशी दुसऱ्या खांदयावर घेऊन तिथेही पिन लावायची. ते तिला पाहिजे तसंच होईपर्यंत तिचा तो कार्यक्रम चालायचा. मग केस विंचरुन चार भाग करायचे, एक मध्ये भांग पाडून आणि त्या अर्ध्या भागातले पुढचे केस आणि मागचे केस निराळे असं. डाव्या बाजूच्या आधी वरच्या पहिल्या कोपऱ्यातले केस पीळ देऊन डावीकडून क्लीपने वर चापून बसवायची तसेच उजव्या बाजूचे पुढचे केसही क्लीपने बसवायचे आणि मग मागे आलेल्या सर्व केसांची छान लांब वेणी घालायची, त्याला खाली काळे बो लावायचे, कपाळावर बारीक काळी टिकली आणि पायात फ्लोटर्स असं सर्व आवरून डबा घेऊन पळत सुटायची, बससाठी. सकाळी बाई तिच्यासाठी, सरांसाठी डबा बनवत असायच्या. यात उशीर झाला की तिची अजून चिडचिड.
सरांचं ठरलेलं काम असायचं. ते ब्रश करुन चहा घेतच आहेत तोवर सकाळच्या शिकवणीची मुलं घरात आलेली असायची. त्यांच्या पाढ्यांच्या मधून ती सरांकडून कधी पैसे मागायला जायची तर कधी कशावर सही. सुट्टीच्या दिवशी मुलांच्या शिकवण्याची तीच घ्यायची. मुलांचं अक्षर, त्यांनी लिहिलेल्या गणिताच्या फोडी सर्व नीट आहे बघायची. तर कधी एखाद्याला बायलॉजी मध्ये शंका असेल तर तेही समजावून सांगायची. शिक्षक असणं तिच्या रक्तातंच होतं म्हणा ना? आता लहानपणापासून तेच घरी पाहिल्याने, अनुभवल्यानेही असेल म्हणा. पण सपनाला शिकवण्याची खूप आवड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच्या चुका काढण्याची. त्यामुळे कधी कधी कॉलेजमध्ये सरांच्या स्पेलिंगच्या चुका सांगून तिने त्यांचा रोष ओढवून घेतला आहे. असो.
सकाळी आवरुन चहा घेऊन निघणारच इतक्यात बाई तिला बोलल्या, " संपले ना पेपर? "
सपना,"हो आजचा शेवटचा, की झालं."
बाई,"बरं झालं, ते शिंदेसरांच्या मुलाला भेटायचं होतं ना? म्हटलं कधी भेटता येईल त्याला विचारावं?".
"ही काय वेळ आहे का आई? मला निघायचंय बसला उशीर होतोय." असं म्हणत सपनाने सरांकडे पाहिलं.
सर कुठल्यातरी पोराला त्रिकोणमिती शिकवत होते. त्यांना ते सोडून नाईलाजानं मध्ये पडावं लागलं.
"तिला जाऊ दे आता. आपण बोलू निवांत, तू निघ बेटा. मी सांगतो सरांना तसं. " सर शांतपणे बोलले.
तशी सपना पटकन देवासमोर हात जोडून, दोघांच्या पाय पडून घरातून बाहेर पळालीच. वैशूचं घर रस्त्यातच असायचं.
"वैशे, वैशे" म्हणून ओरडतच तिच्याकडे पोहोचायची सपना. वैशू बाहेर पडली की तिला जवळ जवळ पळतच चालावं लागायचं सपनाच्या स्पीडने.
एकदाची बस मिळाली की दिवसाचं काम झालं असं तिला वाटायचं. आज मात्र बसमध्ये चढल्यावर सपनीने पास बाहेर काढून दाखवताना नकळत मागे वळून पाहिलं.
ती खाली उतरताना वैशूनं विचारलंच,"काय बघत होतीस?".
सपना,"कुठं काय?".
वैशू,"गाडीत पास दाखवताना?"
सपना,"काय नाही, चल पेपरला."
-------------------------------------------------
दुपारच्या पेपरनंतर कॅंटीनमध्ये दोघी येऊन बसल्या आणि नेहमीप्रमाणे डबा खाताना नजर वळलीच तिची.
"सरळ बघ ना, उगाच कशाला चोरुन बघतीस?", वैशूनं रागानं विचारलं.
"मी काय बघत नाहीये. पेपर संपले ना त्यामुळं जरा बरं वाटतंय. तुला नाही वाटत का?", सपना बोलली.
"हो वाटतंय ना? पण आत्ताशी टेस्ट पेपर झालेत. अजून मेन बाकीच आहे ना?", वैशू या पेपरांना वैतागली होती.
"हो ते आहेच निदान तयारी तरी झाली ना त्या निमित्तानं?", सपना.
"सपने तुला सांगू? दोन चार स्थळं येऊन गेलीत. आता मला नकार देता नायी यायचा. यावेळचे पेपर संपले की संपलं सगळं. ", वैशू नाराजीने बोलली.
"असं काय करतीय वैशे, मी बोलू का घरी?", सपना काळजीने बोलली.
"तू कोण सरपंच लागून गेलीस का बोलायला?", वैशू वैतागली होती.
"तसं नायी पण जरा जोर पडला तर....",सपना.
"मरु दे तिकडं, मला आलाय कंटाळा या रोजच्या त्रासाचा. शेवटी आपले आईबापच त्ये, आपलं काय वाईट करणारेत का?", वैशू बोलली.
"तू त्या पेपरांना वैतागलीयस म्हणून असं बोलाय लागलीयस बाकी काय नाही. जरा दम धर. करु की आपण अभ्यास एकत्र. " सपनानं तिला समजावलं.
जेवण संपेपर्यंत मागून अचानक एक आवाज आला,"सपना मॅडम?".
तिने वळून पाहिलं तर एक फॉर्मल शर्ट पॅन्ट घातलेला अठठावीस-तिशीतला माणूस उभा होता. खाकी रंगाची पॅन्ट आणि लाईट क्रीम कलरचा शर्ट त्याने एकसारखा पॅंटमधे नीट खोचून घातला होता. केस डोक्याच्या वरच्या भागाला सोडून कणभरही कुठेही पसरले नव्हते. खिशाला दोन पेन लावलेले होते, एक निळ्या रंगाच्या टोपणाचं आणि एक लाल रंगाच्या टोपणाचं.
सपना पटकन उभी राहिली,"हो" म्हणून. तिला वाटले कुठले कॉलेजचे प्रोफेसरच आले का काय? पण त्यांना कधी बघितलं नव्हतं.
"अहो बसा बसा, मी मनोज शिंदे, शिंदे सरांचा मुलगा.", त्याने आपली ओळख करुन दिली अगदी व्यवस्थित दोन्ही हात जोडून. तो शेजारच्या टेबलाजवळची खुर्ची ओढून बसून गेला.
"ते सरांचं आणि पप्पांचं बोलणं झालं होतं.", तो बसून बोलू लागला.
"हो पण जरा पेपर चालू आहेत आमचे. निघायचं होतं.", सपना डबा बंद करुन निघायलाच लागली.
"हो का? सॉरी सॉरी हां. सर बोलले होते तसं पप्पांना. पण ते म्हणाले, तुमाला ते पुढच्या शिकण्याचं टेन्शन आलंय का काय?", मनोज बोलत होता.
"अहो मला खरंच जायचं आहे, पेपर आहे आता. तुम्ही घरी काय ते बोला, मला असं काही बोलता येणार नाही.", ती घड्याळाकडे बघत बोलली.
"तसं नाही, म्हटलं आपण नव्या पिढीची लोकं, आपण असं भेटूनच बोललं पाहिजे ना? जुन्या परंपरा किती दिवस चालू ठेवणार? म्हणून म्हटलं तुम्हांला प्रत्यक्षातच बोलून काय ते ठरवू ना? बरोबर का नाही?", मनोज शांतपणे बोलला.
"अहो कसलं काय ठरवायचं बोलताय तुम्ही? तुम्ही घरी सांगितलंय का भेटणार आहे म्हणून?", सपना आता वैतागली होती.
"आता हे त्यांना पटेल का? मी काय म्हणतो, तुम्ही जा पेपरला. तुमचा नंबर दिला म्हणजे आपण फोनवर भेटून निवांत भेटायची वेळ ठरवूया ना? म्हणजे कसं एकदम तुम्हाला पण असा त्रास नको आणि मला पण फुकट हेलपाटा. ", मनोज.
हा माणूस थांबतच नाहीये म्हटल्यावर सपना बोलली,"एक काम करा तुमचा नंबर द्या मी तुम्हाला मिस कॉल देते. आता निघते, उशीर होतोय ना पेपरला. तुम्हाला तर माहीतच असेल किती टेन्शन असतं पेपरचं?".
"बरं , असं म्हणता? हे घ्या" म्हणत मनोजनं मागच्या खिशातून पाकीट काढलं. पाकीट काढताना छोटा कंगवा खाली पडला, तो उचलून परत खिशात ठेवत त्यानं पाकिटातून आपल्या नावाचं एक कार्ड काढून तिच्या हातांवर टेकवलं. त्याच्या डिग्रीपासून, शिकवत असलेल्या शाळेच्या नावापर्यंत सर्व त्यावर लिहिलेलं होतं. फक्त, जन्मपत्रिकाच छापायची काय ती बाकी होती. तिने ते हातात घेतलं आणि पळाली.
तो तिथेच बसून राहिला. वैशूला तर काही कळतंच नव्हतं. दोघी लॅबमध्ये गेल्यावर तिच्यावर प्रश्नांचा मारा झाला.
"मला लग्न नको करु म्हणतीयस आणि तुझा डायरेक्ट नंबर लागला की गं.", वैशूनं टोमणा मारला.
"हे बघ वैशे पिडू नकोस, आधीच घरी आईनं पिडलंय. सकाळी म्हणतच होती भेटायचं कधी म्हणून.", सपनाला बाईंवर अतिशय राग येत होता. घरी जाऊन काय बोलू आणि काय नको असं झालं होतं.
"ही काय पध्द्त झाली का तडक भेटायला यायची? इथं बाकी लोकांचा त्रास कमी आहे म्हणून आता हे नवीन.", सपना बोलतच होती.
कसतरी प्रॅक्टिकल संपवून त्या घरी बसने निघाल्या. बसमध्ये आज बाजारची गर्दी होती. सकाळी सातारला गेलेली बरीच लोकं गावाकडं जायला निघालेली असायची. अशा गाडीत उभं राहायला पण जागा मिळायची नाही, बसायचं तर जाऊच द्या. सगळ्यांत जास्त त्रास असायचा तो त्यातला कुणी दारु पिऊन निघाला असला तर. कधी मग शेजाऱ्याशी भांडण, तर कधी कंडक्टरशी. आजही असंच एका माणसाची मोठी भाज्यांची बुट्टी त्यानं छतावर न टाकता ड्रायव्हर मागच्या सीटवर ठेवली होती आणि तिथंच बसला होता. आता लोकांना बसायला जागा नाही म्हटल्यावर कुणीतरी विचारलंच,"म्हातारबाबा, बुट्टी वर टाकायची, इथं हात दुखाय लागला वर लटकून.".
"म्हातारा कुणाला म्हंतून रं? मी जागा धरुन बसलूय, न्हाई उटणार.", म्हाताऱ्याच्या बोलण्यांत तोरा होताच.
"मग काय सोळावं लागलंय का? जरा मांडीव तर घ्याकी बुट्टी", त्या माणसानं बोलल्यावर अजून एक जण बोलला. पण म्हातारा काय ऐकत नव्हता.
"इतकं वज्ज मांडीव घिऊन दोन तास कोन बसनार?", म्हातारा बोलला. तिकडं मग बाचाबाची सुरु झाली. तिथंच असलेल्या सपनीला केव्हां एकदा घर येतंय वाटू लागलं. बसमध्ये घुसताना तिने मागे पाहिलंच होतं, तिला आपली सावली हरवल्यासारखं वाटलं होतं. तिने अनेकदा तो विचार धुडकावून लावला होता. उलट आज तर तो मनोज येऊन गेला तेव्हा संत्या कॅन्टीनमध्ये नव्हता ते तिला बरंच वाटलं होतं. नाहीतर अजून काय नाटक झालं असतं काय माहित. पहिले दोन-तीन दिवस तिने फारसा विचार केला नव्हता पण पंधरा दिवसांत एकदाही मागे दिसला नाही म्हणजे आश्चर्यच वाटलं होतं तिला. आता या असल्या विषयावर बोलायचं नाहीच ते तिने ठरवलं होतं त्यामुळे गप्प बसली होती.
स्टॉपवर उतरुन दोघी भराभर घरी पोचल्या. आत जाऊन दारातून घुसलीही नसेल आणि सपनीनं बाईंना हाक मारली,"आई, तुला माहित होतं ना तो माणूस मला भेटायला येणार आहे म्हणून?".
त्यांना तर काही कळेना. "कोण माणूस? काय झालं इतकं ओरडायला?", त्यांनी विचारलं. सरही आवाज ऐकून बातम्या बंद करुन बाहेर आले होते.
"काय झालं? कोण काय बोललं का बसमध्ये?", त्यांनीही विचारलं.
"तो त्या शिंदे सरांचा पोरगा भेटायला आला होता आज कॉलेजला. तू सकाळी बोललीस आणि हा लगेच आला भेटायला.", सपना रागाने बोलली.
"हे बघा पप्पा, सकाळी बोलले होता ना तुम्ही भेटायचं नंतर ठरवू म्हणून? मग तुम्ही पण काय बोलला नाही त्याला?", तिने सरांकडे बघत विचारलं.
"अगं उलट मी सरांना बोललो आपण थोडं परीक्षेनंतर बोलू म्हणून. ते म्हणत होते परत लग्नाचे मुहूर्त बघायला घाई होईल म्हणून. तरी मी त्यांना सांगितलं तिला अजून पुढं शिकायचं ठरवायचं आहे.", सर तिला समजावत होते.
"दुपारी पेपर झाल्यावर आला म्हणून नशीब नायतर काही सुचलं नसतं पेपरात.", तीन बोलली.
"पण असा कसा आला तो? बाई पण काय बोलल्या नाही मला?", बाईंना पण आश्चर्य वाटलेलं दिसलं.
त्या दोघांनाही हे माहित नव्हतं म्हटल्यावर तिचा राग जरा निवळला.
"अगं डायरेक्ट कँटीन मध्ये समोर उभाच राहिला. मी विचारलं त्याला 'घरी सांगितलंय का?' तर म्हणाला 'आपण नव्या पिढीची लोक, कशाला जुन्या रुढीत अडकायचं'. इतका राग येत होता त्याचा. म्हटलं जाते, तर म्हणाला नंबर द्या तुमचा निवांत भेटायचं कधी ते ठरवूया.", सपनाने सर्व सांगितलं.
"दिलास काय काय मग नंबर?", बाईंनी विचारलं. त्यानं हे असं परस्पर भेटणं त्यांना पटलं नव्हतं आणि 'मी नाही म्हटलं तरीही भेटला' म्हणून सरांनाही ते आवडलं नव्हतं.
"मी कुठली देतोय, म्हणलं मिस कॉल द्या, तुमचा नंबर लिहून घेते. ", तिने सांगितलं.
"हां बरं झालं, मी बोलतो शिंदे सरांशी. तू हात धू, जेवून घिवूया.", सरांनी सांगितलं.
सपनाला सकाळपासून आलेला राग जरा शांत झाला. ती कपडे बदलून जेवायला बसली. आठची वेळ झाली होती. परीक्षा असो किंवा नसो संध्याकाळी आठचा सिरियलची वेळ मात्र ती चुकवत नसे. एखाद्या दिवशी चुकून जमले नाही बघायला तर दुसऱ्या दिवशी त्याचा रिपीट टेलिकास्ट बघत असे. 'न कळले तुला, न कळले मला' ही तिच्यासाठी प्रेमाची परिभाषा होती. ती सिरीयल बघून तिला जरा निवांत वाटायचं. प्रेम कसं अलवार फुलावं, कुणाच्या डोळ्यांत आपल्यासाठी ओढ असावी, कुणाची वाट पाहण्यात आपल्या मनाला हुरहूर वाटावी असं नेहमी वाटायचं तिला. त्या सिरियलमधला हिरो आणि हिरॉईन म्हणजे तिच्यासाठी जीव की प्राण होते. त्यांच्या खोट्या दुनियेत गुंतून सकाळचा किस्सा सपना क्षणभर का होऊन विसरुन गेली होती.
- क्रमशः
विद्या भुतकर.

No comments:
Post a Comment