Sunday, October 21, 2018

दोन 'S' आणि तिरका बाण -१२

दोन दिवस सरले तरी सपनाच्या मनातून संत्याचा तो किस्सा जात नव्हता. इतकं सगळं सहन करुन घेतलं आजवर पण प्रत्यक्षात कधी बोलायची वेळ आली नव्हती. तो कसा आहे याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे हे कुणालाही सांगितलं तर गावात त्याच्याबद्दल मोठा बोभाटा झाल्याशिवाय राहणार नव्हता. वैशूला सांगावं तर ती घाबरुन घरी बोलली असती. सरांना सांगितलं तर ते सरळ संत्याच्या घरी जाऊन त्याला थोबाडीत मारुन आले असते. तिचा जीव कासावीस होत होता. संत्याने पिरगाळलेला हात, दोन्ही हातांनी रागाने धरलेले खांदे, त्याच्या तोंडाचा तो दारुचा वास, त्याच्या डोळ्यांतला राग, सगळं तिला आठवत होतं आणि आपण अजून दोन चार कानाखाली का दिल्या नाहीत असं राहून राहून वाटत होतं. अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं म्हणून थोडा वेळ ती वैशूकडेही जाऊन आली होती. नाईलाजाने काहीतरी वाचावं लागणार म्हणून शेवटी ती पुस्तक समोर धरुन बसली होती. कितीतरी वेळ सर तिच्या बाजूला येऊन उभे राहिले तरी तिला त्याची जाणीवही झाली नव्हती.

शेवटी सरांनी जरा जोरात आवाजात विचारलं,"काय म्हणतोय अभ्यास सपनाबाई?".
त्या आवाजाने सपनाची तंद्री भंग पावली.
"हां चालूय. ",सपना काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
"दिसतंय किती अभ्यास चालूय ते. दोन दिवस झाले तुझं लक्ष नाही कशात? म्हटलं विचारावं काय झालं म्हणून.", सर बोलले.
आपला चेहरा वाचण्याइतके आपण त्रस्त दिसतोय या विचारांनी सपना अजून बेचैन झाली. आता विषय एकदमच टाळता येणार नव्हता, काहीतरी सांगावंच लागणार होतं.
"या गावात मुलीला स्वप्नं बघण्याची काहीच मोकळीक नाहीये का?", सपना बोलली.
"का बरं? गावाचं जाऊ दे, आपल्या घरात तरी आहे आमच्या मुलीला. आणि मुळात ती मोकळीक देणारे आम्ही कोण? तो तिचा हक्कच आहे. आजतागायत आम्ही तो कधी नाकारला नाही आणि या पुढेही कधी हिरावून घेणार नाही. बरं, पण स्वप्नं तरी काय आहे, आम्हालापण कळू दे की?', सरांनी मोकळेपणाने तिला विचारलं.
"मला पुढं शिकायचं आहे, एमेस्सी नंतर पीएचडी करायची आहे, एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर बनून मुलांना शिकवायचं आहे. ",सपना बोलली.
"इतकंच ना? मग कोण अडवतंय तुम्हाला?",सरांनी विचारलं.
"इतकंच नाही. मी नोकरी करायला लागले की तुम्हांलाही या गावातून बाहेर घेऊन जायचं आहे.",सपना.
"गावातून बाहेर का बरं? आमचं चांगलं चाललंय की इथे?", सर हसून बोलले.
"काय आहे काय या गावात? अशिक्षित, अडाणी लोक, तसलीच त्यांची मुलं, नुसती बोंबलत गावभर फिरत असतात. कुणाला आयुष्यात पुढे जायचंच नसतं. आहे त्याच डबक्यात राहतात, त्यातच आनंद मानतात. एखादीनं पुढे जायचं म्हटलं तरी यांच्या डोळ्यांत खुपतं. त्यांचं जाऊ दे, शिकलेले लोक तरी काय शहाणे आहेत का?", सपना बोलली.
तिच्या मनातलं सर्व ऐकून सरांना तिची काळजी वाटू लागली होती. ते ऐकत राहिले.
"आता त्या शिंदे सरांच्या मुलाने मोठ्या तोंडाने सांगितलं की मला या जुन्या चाली रीती नाही पसंत आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. म्हटलं चला चांगला वाटतोय मुलगा. त्याच्याशी दोनदा भेटले, बोलले. तेव्हा अगदी मोकळेपणाने बोलला. परवा त्याला सहज म्हणलं मला पुण्याला जायचं आहे पीएचडी साठी तर याचा चेहरा पडला लगेच. ",सपना बोलली.
"अगं पण ठरलंय का आपलं अजून काही पुण्याला जायचं, मग कशाला विषय काढलास?", सरांनी विचारलं.
"नसेल ठरलं पुण्याचं, मुंबईला जाईन, अजून काहीतरी करेन, पण तो विषय काढल्यावर त्याचा चेहरा पाहून कळलं की जेव्हा हे सर्व ठरवायची वेळ येईल तेव्हा हा ऐकणार नाही. त्यानंतर दोन दिवस झाले त्याचा फोन नाही, मेसेज नाही. इतके दिवस तर गॉड बोलत होता एकदम. आणि आता बोलणंच बंद?", सपना रागाने बोलली.
"हे बघ, तू इतका विचार नको करु. तू आता फक्त अभ्यास कर, नीट पेपर दे. आता काळजी करुन मार्क कमी मिळाले तर इतकं बोलून काहीच उपयोग नाही. आपल्या मार्कांनी लोकांना दाखव तुझी हुशारी, मग बघू तुला कोण अडवतो ते.", सर विश्वासाने, आपुलकीने बोलले.
सपनाला थोडं बरं वाटलं. तेही तिची पाठ थोपटून निघून गेले आणि सपनाला थोडा झाल्या गोष्टींचा विसर पडला.
--------

संत्याला मात्र दोन दिवस झाले तरी मनाची उभारी येत नव्हती. आतल्या खोलीतून बाहेर यायची इच्छाच मेली होती. विचार करुन डोकं सुन्न झालं होतं. आजवर अपमान, दुःख याची जाणीव झालीच नव्हती त्याला. एखाद्याचा आपल्याला इतका राग यावा आणि तरीही त्याच्यावरच प्रेम असावं यांच्यासारखी दुःखाची गोष्ट ती काय?  संत्या झालेला प्रसंग पुन्हा पुन्हा चाळवत बसला होता. संध्याकाळी बातम्या सुरु झाल्यावर काकीने त्याला बाहेर हाक मारली. काकी बातम्या बघत भाजी निवडत बसली. इतक्यात बन्या, त्याची बायको आणि पोरगी घरी आले. तिघेही चांगले कपडे घालून आलेले.
"येऊ का काकी आत?", वर्षानं विचारलं तशी काकी झटपट उठली. तिघांना असं आवरुन आलेलं बघून 'आपण काय विसरलो' याचा विचार करु लागली.
बन्या सोफ्यावर बसून बातम्या बघू लागला. वर्षानं काकीच्या हातातून भाजीची टोपली घेतली आणि निवडायला लागली.
"आज पोरीचा वाढदिवस हाय, म्हनलं तुमचा आशीर्वाद घ्यावा.", बन्या बोलला.
"हां तरीच म्हनलं काय विसरलं?", काकी बोलली. काकीने संत्याला बाहेर हाक मारली.
बाहेर कुणाचा तरी आवाज येतोय म्हटल्यावर संत्या नाईलाजाने शर्ट घालून बाहेर आला.
त्याला बघून बन्या सोफ्यावर बाजूला सरकला आणि शेजारी बसायला हात दाखवत म्हणाला,"काय म्हणताय संतोषराव?".
संत्या शेजारी बसला. बन्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायची त्याला गरज वाटली नाही.
"चहा ठेवते", म्हणून काकी स्वयंपाकघरात गेली होती. वर्षाही निवडलेली भाजी घेऊन काकीच्या मागे गेली. बन्याच्या मांडीवर असलेली ती सहा वर्षाची पोर. तिला मात्र काय करायचं कळत नव्हतं.
"काय कितवीला गेली जानवी?", संत्याने तिच्याकडे बघत विचारलं.
"पयलीला जानार", पोर लाजून बोलली.
"आर व्वा ! भारीच की.", म्हणत संत्यानं तिची पाठ थोपटली.
"बालवाडीला जातीय सध्या. जानू ते ट्विंकल ट्विंकल म्हनून दाखव की.", बन्याच्या डोळ्यांत पोरीचं कौतुक होतं.
पोरगी ट्विंकल ट्विंकल म्हणायला लागली. संत्यानेही टाळ्या वाजवत तिच्यासोबत मान डोलावली.
वर्षा चहाचे कप बाहेर घेऊन आली तीही पोरीचं गाणं ऐकू लागली. काकींनी आरतीचं ताट करायला सांगितलं वर्षाला. ती आत गेल्यावर चहा घेताना बन्या संतोषकडे बघून बोलला.
"अजून नाराज हाय का?", संत्याने त्याच्याकडे पाहिलं फक्त.
"संतोषराव, तुमचं वडील हायत ते. त्यांनी चिडायचं न्हाय तर मग कोन चीडनार? बापानं हात उचलला म्हनून इतकं मनाला न्हाई लावून घायचं. चला, जरा भायेर पडा आता घरातनं. उगा सुतक आणायचं न्हाय तोंडावर.", बन्या त्याला समजावत होता. थोड्या वेळाच्या अबोल्यानंतर संतोष बोलला,"संपलं सगळं बन्या. आता मी काय करनार? काय सुचत न्हायी.".
"आता इतक्यात संपलं? आता तर सुरुवात झालीय संतोषराव. मी कशाला हाय हितं. काय लागल ते काम करतो. तुम्ही फक्त सांगा. आबांचं चिरंजीव हाय तुमी. ", बन्याच्या आवाजातला उत्साह पाहून संत्याला बरं वाटलं.
"दोन दिवस झालं इचार करतूय. चुकलंय, पटलं. पन ते दुरुस्त कसं करायचं? आजवर काय केलं न्हायीए मी.", संत्या बोलला.
"बास इतकंच ना? एक काम करा, उद्या पार्टी हॉपिसला या. मी सांगतो काय करायचं त्ये." बन्याने त्याला समजावलं.
संत्याने मान हलवली.
काकींनं पोरीला हाक मारली.
जानवीला पाटावर बसवलं, तिला ओवाळलं आणि शंभरची नोट हातांवर टेकवली तशी वर्षा आणि बन्या दोघं ही एकदम पुढे झाली.
"काय काकी, याच्यासाठी आणलीय व्हय पोरीला हिथं? तुमचा आशीर्वाद द्या फकस्त. बाकी काय नको. पैसे दे परत आजीला." बन्या पोरीकडं बघत बोलला. तिनेही नोट काकींकडे धरली. पण काकीने पोरीला जवळ ओढलं आणि "आयुष्यवंत हो" म्हणून आशीर्वाद दिला.
"चॉकलेट घे काय?", काकीने हळूच पोरीला सांगितलं. तीही हसली. तिघे आले तसे गाडीवर बसून परत फिरलेही.
'गोड पोर हाय", म्हणत काकी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला गेली.

संत्याच्या चेहऱ्यावर थोडी हुशारी आली होती. त्याने जेवण उरकलं आणि बाहेर अंगणात येऊन बसला. उन्हानं घर कसं खायला उठायचं. रात्री बाहेर बसून वारं खायला बरं वाटायचं. मागच्या दारातल्या खाटेवर तो बसून राहिला, आकाशाकडं बघत एकटक. एकप्रकारची शांतता मनाला मिळाली होती. डोक्यातलं एक वादळ शांत झालं होतं.

- क्रमशः

विद्या भुतकर. 

No comments: