Monday, November 12, 2012

भाग पहिला: राहुल

या गोष्टीला नाव नाही. फक्त प्रत्येक भागाला नाव दिलं आहे. जमेल तसे एकेक भाग पोस्ट करेन. आवडेल अशी अपेक्षा. 

           पाठीला बॅकपॅक लावून राहुल रिक्षातून खाली उतरला. आकाशी रंगाचा कडक इस्त्रीचा शर्ट, काळी पॅट, एकदम चकचकीत पॉलिश केलेले काळे शूज. गव्हाळ रंग, मध्यम बांधा, काळे नीट वळवलेले केस, साधारण ५' ८'' उंची. सुरुवातीला पाहिलं तर सामान्य वाटणारं, पण एकदा बोलायला लागलं की राहुलचं व्यक्तिमत्व छाप पाडणारं होतं. अनेकवेळा पेपर मधे छापून आलेल्या फोटोत असेही उंची थोडीच कळते? नेहमीचा कॉन्फिडन्स चेहऱ्यावर घेऊन तो कंपनीच्या गेटजवळ पोचला. 
           त्याने तिथल्या सिक्युरिटीला आपले ऑफर लेटर अभिमानाने दाखवलं आणि विझिटर पास घेऊन तो आता शिरला. पूर्वतयारी म्हणून कंपनीच्या सर्व कॅंपसचे फोटो त्याने कितीतरी वेळा पाहीले होते. तरीही आत गेल्यावर समोर दिसणारी हिरवीगार गवताची सुंदर शाल, छान आकार दिलेली खुरटी झाडी, त्यात मध्यभागी उंचच उंच कारंजे आणि या सर्वांच्या मध्ये विखुरलेल्या पाच मोठ्या इमारती हे सर्व दिसलं आणि आपलं या कंपनीत सेलेक्शन झालेय याचा त्याला खूप अभिमान वाटला. तसे प्रत्येक उत्कृष्ठ गोष्टं त्याने स्वत:च्या कष्टाने, हक्काने मिळवली होती आतापर्यंत. मग ते त्याचे बोर्डात आल्याने मिळालेले उत्तम कॉलेज असो, मार्कांच्याच जोरावर झालेले त्याचे सिलेक्शन असो किंवा ट्रेनिंग नंतरही पुणेच हवं असे भरलेला त्याचा फॉर्म असो. त्याची शैक्षणिक कारकीर्द त्याला आतापर्यंत नुसतेच हवे ते नाही तर त्यासोबत एक स्टेटसही देत होती. त्यामुळे प्रत्यके ठिकाणी मिळणारी 'रेड कार्पेट' वागणूक जणू त्याला ओळखीचीच.
             आज इतक्या मोठ्या कंपनीच्या एव्हढ्या मोठ्या कॅंपसमध्ये मात्र त्याला थोडं हरवल्यासारखं वाटलं होतं. पण तेही होईल कमी असे स्वत:ला समजावून तो रिसेप्शनपाशी गेला. 
तिथे त्याने त्याच्या मेनेजरचे नाव सांगितले, 'मनोज शर्मा'.
'कुठला मनोज शर्मा?' मान वर न करता तिथल्या रिसेप्शनिस्टने विचारलं. तो अडखळला. 
तिने वर पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून तिला कळलं की हा नवखा मुलगा आहे. 
"इथे चार आहेत", ती म्हणाली. 
त्याने मग त्याला मिळालेल्या प्रोजेक्टचे नावही सांगितले. रीसेप्शनीस्टने दोन चार फोन लावून योग्य मनोज शर्माला शोधून त्याला खाली यायला सांगितलं.
        पंचेचाळीस-पन्नाशीचा, पोट सुटलेला, थोडंसं टक्कल पडलेला, पोटाची बटणं जरा जेवण जास्त झालं तर कधीही तुटतील असा शर्ट घातलेला मनोज शर्मा खाली आला. त्याने राहुलला हात मिळवून ओळख करून घेतली. त्याला सांगितले की मी इथल्या प्रोजेक्टचा लीड आहे. 'मी राहुल घोरपडे',थोडे जोराने बोलला राहुल. पण त्याच्या नावावरून मनोज शर्माला काही क्लिक झाले असे वाटले नाही. मग जास्त अपेक्षा न करता राहुल त्याच्यासोबत लिफ्टमधून आठव्या मजल्यावर गेला. तिथे ते दोघे थेट एका कॉन्फरन्स रुममध्ये गेले. 
        कॉन्फरेन्स रूममध्ये अजून ३ लोक खुर्च्यात बसले होते. एका खुर्चीत तो बसला. थोड्या वेळात एकेक करून मनोज शर्मा अजून ४ पोरांना घेऊन वर आला होता. एकूण त्याच्यासारखी ८ मुलं, दोन वयस्कर (२८- ३२ वर्षे?) वाटणारे लोक आणि पुन्हा एकदा मनोज शर्मा अशी मिटिंग झाली. मनोज शर्मा ने त्याची ओळख करून दिली. तो कंपनीत गेले २० वर्षं काम करत होता आणि त्याच्या वयाच्या मानाने बराच मोठा हुद्दाही होता त्याचा. प्रोग्रॅम लीडचा. त्याने बाकी मुलांची आणि मोठ्या (?) लोकांची ओळख करून दिली. आजवर इतक्या पोरांसमोर हे
अनेकदा बोलून झालेलं होतं. अगदी त्यातले जोक्सही ठरलेले. त्यानं सांगितलं की कॉलेजमधलं आयुष्यं कसं सोपं होतं आणि इथलं किती वेगळं ते. इथे बाहेरच्या जगातले नवीन अनुभव त्यांना मिळतील. त्यातही कितीतरी वेगवेगळ्या गोष्टीवर काम करायला मिळेल त्यांना या मोठ्या कंपनीत. प्रोजेक्ट होता अमेरिकेतला, तो क्लाएंट किती महत्वाचा आहे हे सर्व झालंच. 
             राहुल मन लावून ऐकत  होता. त्याने पाठ केलेले SDLC (Software Development Life Cycle) चे सर्व धडे आठवले आणि त्यातले सर्व शब्द इथे जोडण्याचा प्रयत्न केला. त्याला खूप आनंद झाला होता. आपल्याला मनोज शर्मा जे बोलतोय हे कळतंय याचा. आनंद होणारच ना. सरकारी इंजिनीयरींग कोलेज मध्ये त्याला मेकॅनिकल ब्रांच मिळाली होती. तिथेही सर्व नेहमी सारखच मग. अभ्यास, नंबर , कॅंपस. पण जेव्हा कंपन्या यायला लागल्या तेव्हा त्याला कळलं की डिग्री कुठलीही असली तरी पैसा IT मध्येच आहे. मग एकदा निर्णय घेतल्यावर त्याने परत एकदा मनापासून अभ्यास केला वेगवेगळ्या कम्प्युटर मधल्या भाषांचा, कन्सेप्टचा. त्यामुळे आज तो सर्व अभ्यास उपयोगी पडणार असे त्याला वाटले. बाकी लोक जे लेक्चर म्हणून ऐकत होते, तो ते मन लावून ऐकत होता आणि मध्ये काहीतरी लिहूनही घेत होता. त्याने विचारलेल्या प्रश्नांची मनोज शर्माने नीट उत्तरं दिली होती. सर्व बोलून झाल्यावर मनोज शर्माने त्यांना सांगितले की आता या पुढचे सर्व तुमचे टीम लीड सांगतील. 'ऑल द बेस्ट' म्हणून तो निघून गेला. 
          आता दोन पैकी एका टीममध्ये सर्व मुलांची विभागणी होणार होती. दोन टीममध्ये कुठली बेस्ट असेल याच्या विचारात राहुल गुंगला होता. टीमलीड एकमेकांशी बोलत होते. तेव्हा मधेच त्याला शेजारी बसलेल्या एकाने विचारलं, "तुझी ब्रँच कुठली?". राहुलने उत्तर दिलं.
मग त्याकडे बघत तो मुलगा म्हणाला, "मग तर तुला टेस्टिंगला घेतील."
राहुलला कळेना तो काय म्हणतोय. 
त्या मुलाने समजावून सांगितलं,"इथे कंप्यूटर ब्रँचच्या लोकांना डेव्हलपर म्हणून घेतात तर बाकीचे टेस्टिंगला नाहीतर सपोर्टला. माझा भाऊ होता या कंपनीत आधी." 
राहुलला फार राग आला होता की आपल्या ब्रांच मुळे कुणाला तरी आपण नको आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला असं वागवलं होतं कुणीतरी. 'मी काय कमी हुशार आहे का?' असं त्याला वाटलं. शाळेत कमी मार्क आहेत म्हणून मागे बसायला लागणाऱ्या मुलाला मिळावी तशी वागणूक आपल्याला मिळतेय असे वाटले राहुलला. त्याला याची सवय नव्हती. पण समोर जाऊन त्यांना काही बोलणं शक्य नव्हतं. त्याने ऐकलं होतं की सुरुवातीचे थोडे दिवस त्याला जसे काम मिळेल तसे करायला लागणार होते आणि मग तो थोडा सिनियर झाला की प्रोजेक्ट बदलून घेता येईल त्याला. तो थोडा अस्वस्थ झाला. 
           त्यादिवशी ८ लोकांची समान गटांत वाटणी झाली. त्याच्या प्रोजेक्टमध्ये तो टेस्टर म्हणून काम करणार हे फायनल झाले होते. नेहा म्हणून एक डेव्हलपर आणि अजून दोघांची सपोर्ट साठी नेमणूक झाली होती. सपोर्टसाठी ठेवलेल्या दोघांनाही तसा राग आलाच होता की आता त्याना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते. पण सपोर्टला असले की रात्रीच्या शिफ्टमध्ये पैसे मिळतात जास्त, शिफ्ट अलाउन्सचे, हा फायदा होताच. सिद्धार्थ, त्यांचा टीम लीड, त्यांना त्यांचे डेस्क दाखवायला घेऊन गेला. 
          एका मोठ्या फ्लोअरवर वरून पहिले तर ग्रीड आहे असे वाटणारे क्यूब. त्यात मन लावून काम करणारे काही, लोक बाजूने जात आहेत म्हणून मन लावून काम करण्याचे नाटक करणारे काही, तर महत्वाचे बोलत आहोत असे भासवून नवीन आलेल्या लोकांमध्ये कुणी चांगली पोरगी आहे का बघणारे काही. ते चौघे मग सिद्धार्थच्या मागे गेले. आपल्याला कसा डेस्क मिळणार याची उत्सुकता होतीच. फ्लोअरच्या शेवटच्या रांगेत ओळीने चार डेस्क त्यांना मिळाले होते. आता कुणी म्हणेल मुद्दाम कोपऱ्यातले डेस्क दिले नवीन पोरांना. पण मला विचाराल तर कोपर्यातला डेस्क म्हणजे सुख !! आपल्या जागेवर स्वत:चे नाव आधीच लावलेलं पाहून चौघेही खुश झाले होते. सिद्धार्थ त्यांना सेटल व्हायला सांगून निघून गेला.
               आता ते चौघे सेटल झाले. राहुलने आपल्या बॅकपॅकमधून नोटबुक, पेन काढून ड्रावरा मध्ये ठेवले. बॅकपॅक कोपऱ्यात टेकवला आणि फॉर्म भरलेत ना नीट हे चेक करून घेतले तोवर बाकीचे तिघे खायला जाण्यासाठी तयार झाले होते. सगळ्यांशी नीट ओळख करून घेतली त्याने. आणि तासभर जेवताना थोडंफार बोलणही झालं प्रत्येकाबद्दल. पण नेहमीसारखी मजा नव्हती त्यात. कॉलेजमध्ये वगैरे कसं नावं सांगितलं की बाकीचे लोक स्वत:हून विचारायचे त्याच्याबद्दल. इथे तो मान नव्हता त्याला. जेवणानंतर आता काय काम करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मग स्वत:च पुढाकार घेऊन राहुलने कुठल्या गोष्टीला एक्सेस लागतो, तो कसा मिळवायचा हे सर्व माहिती काढली. सर्वांना मदत करून ते फॉर्म त्याने देऊनही टाकले सिद्धार्थकडे. 
            तेही काम झाल्यावर आता पुढे काय प्रश्न होताच. पुन्हा एकदा कामात व्यस्त असलेल्या सिद्धार्थ कडे गेला राहुल. 'सर, व्हॉट इज नेक्स्ट?'. 
सिद्धार्थने त्याला सांगितले,"यहा सर-वर कुछ नही चलेगा. सिड भी बुला सकते हो. थोडे डॉक्युमेंट है पढना है तो".
त्याने मग थोडे पेपर दिले वाचायला. 
तो गेल्यावर शेजारचा सिद्धार्थला लगेच म्हणालाच,"बंदा बडा काम करनेवाला लगता है."
"आज पहेला दिन है ना? इसलिये. थोडे दिन यहा रहेगा तो तुम्हारे जैसा हो जायेगा". हसत हसत सिद्धार्थ म्हणाला.
जाता जाता हे ऐकून राहुल अजूनच नाराज झाला. आपल्या कामाबद्दल कुणी शंका घेतंय हे त्याला अजिबात आवडलं नाही. मिळालेले पेपर वाचण्यात ६ संध्याकाळचे सहा वाजून गेले. सगळे निघाल्यावर राहुलही रूमवर जायला निघाला. त्याच्यासोबत ट्रेनिंगला असलेल्या एका मुलासोबत त्याने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तासभर प्रवास करून तो रूमवर पोचला. रात्री जेवण करून घरी फोन लावला त्याने. पलीकडून आई विचारात होती,'कसा गेला रे दिवस?' त्याच्या बोलण्यात तो नेहमीचा उत्साह नव्हता. त्याच्या करियरचा पहिला दिवसा होता तो....

क्रमश:

विद्या भुतकर.

4 comments:

Anonymous said...

Few things are no clear -

1) "पण अनेकवेळा पेपर मधे छापून आलेल्या फोटोत असेही उंची थोडीच कळते?" What is the relevance of this sentense while explaining about an appearance of a person?

2) On the very 1st day of his job, he hears 2 negative comments about his newness in the software industry. This is unlikely in the software industry enviornment. That too, in a company which appears to be reputed one as descripted. In companies, seniors are always advised to take care while talking about new joinees/juniors. So why the seniors (especially Manoj who is with the company for 10 years) would be making comments in a way so that Rahul would listen it? Or are they doing it intentionally?

Panchtarankit said...

वाचत आहे

Vidya Bhutkar said...

@Anonymous, you are right. I could have written the two incidents differently. But used this method to convey my thoughts through the other people's comments. But it seems logically incorrect.Will keep that in mind for the next piece. :)

Thank you for reading it closely.

@Ninad,Thank you. Planning to have at least 5 chapters total for this one. Lets see if that turns out good.

-Vidya.

भानस said...

वाचतेय गं...