Tuesday, November 27, 2012

भाग दहावा: हॅपि एंडिंग ???

          खरंतर गोष्ट मागच्या भागातच संपणार होती. बरोबर आहे ना? दोघेही पुन्हा भेटले, झालं ना? म्हटलं कशाला त्रास घ्यायचा डोक्याला? त्यांचं लग्न झालं नाही झालं का विचार करायचा पुढे? कारण 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'. पण आपल्याला नेहमीच हॅपि एंडिंग हवा असतो. बरोबर ना? का? कशासाठी? आयुष्यात प्रत्येक क्षणाला जेव्हा निर्णय घेतो, तो हॅपि असेलच असं नाहीये ना? म्हणजे अगदी सकाळी थोडा वेळ जास्त झोपून रिक्षा करून जाऊ म्हणायलाही मन करवत नाही मग झक मारत उठून आवरून बसमधून कडमडत जातोच की. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते टक्कल असलेल्या मुलापेक्षा सावळा बरा म्हणून त्याच्याशी लग्न करायला 'हो' म्हणायची अडजस्टमेंट कुणी करतोच की. म्हणून निदान 'गोष्ट' तरी हॅपि एन्डिंगची पाहिजे अशी अपेक्षा असते का आपली? आणि कदाचित म्हणूनच मीही ती अर्धवट सोडून खरे खुरे प्रश्न टाळून दिले. कशाला उगाच ते समोर आणून अजून डिप्रेस व्हायचं आणि लोकांना करायचं म्हणून.
          पण आता बोलतेच आहे तर सांगतेच सर्व. का करावं नेहाने लग्न राहुलशी? केवळ आई-बाबा दुसरं लग्न करच म्हणून मागे लागलेत आणि अनोळखी पेक्षा ओळखीचा बरा म्हणून? बरं, राहुलने तरी का भांडाव तिच्यासाठी? प्रेम आहे म्हणून तो भांडेलही. पण ती असेल त्याच्या पाठीशी? एकदा घरच्यांशी लढून केलं तिने लग्न. आणि हे सगळं असं होऊन बसलं. अशा वेळी ती तरी कुठून आणणार बळ त्याच्या पाठीशी उभं राहायला?  
'म्हणाला तो हो 'चल' करूच लग्न तर येईल त्याचा तो लढून जगाशी. आहेच की मग मी इथे, मी कुठे जातेय?' असाच तिचा अटीटयूड असेल, तर होईल त्याची हिम्मत लढायची? बरं लढलाच तो त्याच्या प्रेमाखातर, तर जिंकल्यावर त्याच्यावर जीव ओवाळेल का ती? की चला, मला काय? करू आता लग्न म्हणून ती उभी राहील मांडवात?
          समजा झालंच सर्व ठीक, राहिलीही ती उभी मांडवात. आपण मग तो हॅपि एंड समजायचा की नाही? मला तरी नाही वाटणार तो हॅपि.  मग हॅपि म्हणजे तरी काय? त्या 'हॅपि' ची डेफिनिशन मला मिळाली नाही. म्हणून संपवूनच टाकली गोष्ट. पण विचार होतेच मनात. ते कुठे जातात? त्यांनाही हवाच आहे की 'हैप्पी द एंड'. मग अजून पुढे गेले विचार. आणि केलं लग्न. पुढे काय? नव्याचं नवपण मिळेल का त्याला अनुभवायला? हनिमून, पहिली दिवाळी, सासुरवाडी सगळं नवं, पुन्हा उभं करायचं, जोडायचं जमेल तिला? ते सगळं जाऊ दे, सुखाच्या त्या अत्तुच्य क्षणी, असेल का ती त्याच्याच सोबत? आणि असलीही आणि त्याच्याच मनात आली शंका तर? तो क्षण संपल्यावर झोपतील का ते मुटकूळं करून शरीरांचं? की पाठ फिरवून काय होऊन बसलं हे असा विचार करतील? हे आणि असेच विचार करून सोडून दिले मीही होपफुल एंड म्हणून.
               अशीच होत असतील का दुसरी लग्नं आपल्याकडे? की असतात प्रेमातही बुडून गेलेले? काळ आणि प्रेम खरंच भरून काढत असतील का सर्व जखमा? की आधीच्या कमी कराव्यात म्हणून नवीन नाती जोडायला जात असतील आणि कुणी माझ्या 'पास्ट' बद्दल विचारलं तर काय उत्तर देऊ या विचाराने घाबरून बोलत असतील? का तेही प्रत्येकाच्या स्वभावावर असेल? मुळातच आनंदी असणारी व्यक्ती कदाचित राहूच नाही शकणार कायम दु:खी. मुळातच प्रेमळ व्यक्ती राहूच नाही शकणार प्रेम दिल्याशिवाय? कुणाचं तरी झाल्याशिवाय?
             माझ्या या सर्व प्रश्नांना मागे टाकून राहुलने नेहाशी लग्न केलं होतं. राहूलच तो ! ध्येय समोर आहे म्हटल्यावर ते अचीव्ह केल्याशिवाय कसा राहील तो? तिला पटवून, घरच्यांना मनवून, तिच्या घरी बोलून, राहुलने सर्वांना लग्नाला तयार केलं होतं. आता हे असं लग्न म्हटल्यावर ते छोटं घरगुतीच झालं. लग्नानंतर दोघेही बेंगलोरला परत आले होते. त्याच्या घरी. त्यांच्या घरी. तिने मग सामान ठेऊन लगेच आपलं घर म्हणून वागायचं की नवी नवरी म्हणून अवघडून बसायचं? पण ती शेवटी नेहा होती, त्याची इतक्या वर्षांची जुनी मैत्रीण. आता लग्न समारंभ, पुढचे सगळे सोहळे तिने एक औपचारिकता म्हणून पार पाडलेले. पण इथे ते दोघेच तर होते. तिने सोफ्यावर झेप टाकून दिली. 'कंटाळा आला रे, नाही? शी इतक्या उन्हाळ्यात प्रवास म्हणजे नको वाटतं बघ. ' तोही मग पटकन जाऊन दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन आला. दोघेही निवांत मग टी व्ही बघत बसले.
            रात्र होत आली तसे ते दोघेही जरा नर्व्हस होते. पण ज्या क्षणाला ते जवळ आले तो कसा आला हेही त्यांना कळले नाही. कित्येक महिने उन्हांत तापलेल्या, रखरखीत जमिनीवर जसे पाण्याचे थेंब पडल्यावर ती प्रत्येक थेंब शोषत राहते बाहेर एकही थेंब राहू न देता, तसे दोघेही इतक्या दिवसांच्या वणव्यानंतर स्वर्शाचा प्रत्येक थेंब शोषून घेत होते. पण जुने रेफरंस नव्याने कसे वापरायचे कळत नाही. त्याच्या स्पर्शाला आपण उत्तर कसं द्यायचं हे आधीच ठरलेलं असतं ती सवयच झालेली असते, पण तो मुळातला स्पर्शच बदलल्यावर जु ने प्रत्युत्तर चालणार का? की नव्याने आपल्यालाच पुन्हा शोधत राहायचं? मग हळूहळू त्या नवीन प्रत्त्युत्तराचीही सवय होऊन जाते. तिलाही झालीच, त्याच्या आसपास असण्याची, त्याच्या हसण्याची, तिच्या केसांत दहाही बोटं घालून ते मागे घेऊन फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याची, त्याच्या परफ्युमची, सगळ्याचीच.
             मध्ये मध्ये नेहा तिच्या जुन्या गृहिणीच्या भूमिकेत घुसायची, राहुलला छान जेवण करून घालावं, त्याचं सर्व सामान त्याला हातात आणून द्यावं, त्याच्या ऑफिसमधल्या पार्टीजना जावं. पण राहुल त्यातून तिला बाहेर काढायचा. ती स्वयंपाक करायला लागली की बाहेर आणून बसवायचा, मी बघतो तू बैस म्हणायचा. तर कधी तिला जवळ ओढून एखादं कोडं सोडवत बसायचा. त्यांच्या जुन्या डेव्हलपर-टेस्टरच्या नात्यात जायचा आणि त्रास द्यायचा. नवा गडी नवं राज्य चालू झालं होतं. नेहाच्या आईलाही तिला बघून बरं वाटायचं. मुलीची स्थिरता तिच्या सुधारलेल्या तब्येतीत दिसते आईला. त्याच्या घरच्यांनीही तिला स्वीकारलं होतं सून म्हणून. सगळं कसं सुरळीत चाललं होतं पुढचे दोन-तीन वर्षं.....

क्रमश:
विद्या भुतकर.

2 comments:

Unknown said...

Chan!

Anonymous said...

Good story! Looking forward to next parts!