Wednesday, November 28, 2012

भाग अकरावा : घर दोघांचं (तिघांचं ?)

        घर दोघांचं म्हटलं की जितकं नीट नेटकं, टापटीप तितकंच बेशिस्त. पाच दिवस ऑफिस मध्ये असल्यावर ते पसरवणार तरी कोण? सर्व कसं जिथल्या तिथे. पण तेच शनिवार-रविवार मनात आलं तेव्हा उठायचं, जेवायचं आणि परत झोपायचं, कधी मनात आलं सिनेमाला जायचं.  रात्री उतरवलेले कपडे परत घातले काय किंवा तिथेच पडले काय? काय फरक पडतो? बाथरूमचा दरवाजा बंद केला काय उघडा ठेवला काय? कोण विचारतंय? सगळाच निवांत कारभार. ऑफिसमध्ये काम आलं म्हणून रात्री उशिरा तिथेच थांबलं तरी कोणी विचारणार नव्हतं. अर्थात आपलं माणूस म्हणून काळजी असतेच, पण फोन करून खात्री करून घेतली की संपलं. त्याच्या आठवणीनं रडू आलंय असं तर होत नाही ना? कसं ना, लग्न कसल्याही प्रकारचं असू दे, अरेंज किंवा लव, पण संसार दोघांचा सारखाच. कंपॅटीबिलीटी असली म्हणजे झालं. आणि ती असणं म्हणजे तरी काय? तर प्रेडीक्टीबिलीटीच ना? समोरचा माणूस तुम्ही केलेल्या कुठल्याही गोष्टीवर जोपर्यंत तुमच्या वर्तुळातील अपेक्षेप्रमाणे उत्तर देतोय/ वागतोय म्हणजेच दोघांचं खूप छान जमतं म्हणायचं ना? समोरचा जेव्हा आपल्याला अनपेक्षित वागतो तेव्हा मात्र ते भांडायला कारण होऊन जातं. तर अशी कंपॅटीबिलीटी आणि प्रेडीक्टीबिलीटी असली की झालं, मग 'लव' काय आणि 'अरेंज' काय, ते मॅरेज सारखंच. बाकी सर्व फक्त, लोकांना 'आपण कसे भेटलो हे सांगायची गोष्ट' इतकाच काय तो त्याचा उपयोग.
        गेले दोन तीन वर्षं असंच रुटीन चालू होतं नेहा आणि राहुलचं. ते मोडलं एका सकाळच्या प्रेग्नंसी टेस्ट ने. कितीही प्लान करा पण त्या क्षणाला रिझल्ट पाहिल्यावर एक ठोका चुकतोच. 'आता काय?' हा विचार येतोच. अगदी म्हटलं सिनेमातल्यासारख बायकोला उचलून धरायचं, पण तो चुकलेला ठोका अजून चुकलेलाच असतो. एक धाकधूक असतेच. पुढे काय? याची. त्यांनी मग डॉक्टर ची भेट घेतली, सर्व चेक करून घेतलं, मनात हजारो प्रश्न होते. त्यांची उत्तरं ते शोधतच होते इंटरनेटवर. दिवसभर मग ते घरीच राहिले, विचार करत, मध्येच काहीतरी बोलत, परत विचार करत. घरी फोनही केले. एक दिवसाची ती एक्साईटमेंट हळूहळू कमी होत जातेच. पण त्या दोघांना जोडणारा एक धागा जन्माला येणार असतो. तोच त्यांना अजून जवळ आणत राहतो. मग बायकोचे हट्ट, डोहाळे, त्याचं ते असं काळजीतून प्रेम दाखवणं सगळ्यालाच नवीन अर्थ येतो.
       आपल्याला नेहमीच का आपल्या साथीदार सारखं बाळ हवं असतं? असं कुणी कधी म्हणत नाही मला अगदी माझ्यासारखं हुशार, देखणं बाळ हवं आहे? का आपल्यातले वाईट गुण फक्त आपल्यालाच माहित असतात आणि  नवऱ्याचे चांगले गुण जास्त प्रिय असतात म्हणून? सर्व काही ठीक होतं. पण ऑफिसला जाणं, येणं, कधी जास्त वेळ लागला तर दमायला होणं, हे स्वाभाविकच होतं. तिला मदतीला राहुल होताच. मध्ये मध्ये आई-सासू भेटायला येऊन गेले होते, कधी तिची हौस पुरवायला जास्त दिवस राहूनही गेले होते. सर्व सुविधा इथेच आहेत तर तिने बेंगलोर मधेच राहायचं ठरवलं होतं. आणि कितीही नाही म्हटलं ना, तरी दोघंच असं राहिलं न की दोघे इतके एकमेकांवर अवलंबून जातो की दोघांनाही कळत नाही. त्यामुळे राहुलच्या सोबत राहणं हे कारणही होतंच.
          नऊ महिने म्हणता म्हणता तो दिवसा उजाडलाही होता. मुलगा की मुलगी, त्याच्या सारखे की तिच्यासारखे, नाव काय ठेवायचं, ते आलं की कसं सांभाळायचं, कुठल्या गोष्टी शिकावयाच्या, कसं वळण लावायचं, कुणी दटावायच, कुणी लाड करायचे, सगळे सगळे प्रश्न विसरायला लावणारा दिवस. पहाटे हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते ते. सकाळी ८.१४ ला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांचे आई-बाबाही होतेच मदतीला. पण त्या इतकुशा जीवाने सर्वांची धावपळ करून सोडली होती. बाळ-बाळंतीण घरी आले. त्याची आई परत जाऊन थोड्या दिवसांनी येणार होती. पहिले तीन महिने तिच्या आईनेच पाहिलं सर्व. एकदा आई झालं की असं असतं, मूल एक दिवसाचं असो नाहीतर २८ वर्षांचं, त्याचं सर्व करणं आलंच.
         नेहालाही ऑफिसला ६ महिने तरी सुट्टी होती. बारसंही झालं, तिचं नाव त्यांनी 'राधा' ठेवलं होतं. राधाचं करण्यात दिवसा कधी संपून जायचा कळायचंच नाही. रात्री दमलेल्या नेहाकडे पाहून राहुलला तिच्यावर अजूनच प्रेम यायचं. प्रेयसी, बायको या सर्वांपेक्षा आपल्या 'मुलांची आई' वर जास्त प्रेम येत असावं पुरुषांना. त्यांचं कुणीतरी इतका जीव ओतून करत आहे हे पाहायलाच किती सुंदर आहे. तोही मग रात्री उठून राधा रडायला लागली की तिला बघायचा, तिला  हातात घेऊन झोपवायचा. रात्री खुर्चीत दमून झोपलेल्या नवऱ्याला किंवा बायकोला, 'तू झोप मी बघतो तिला'  असं म्हणण्यात जो प्रेमभाव आहे तो त्यांच्या दुसऱ्या कुठल्याच नात्यात नसावा. नेहाची आई घरी परत गेली आणि राहुलची आई मदतीला आली होती. नातवाचं सुख त्यांनाही अनुभवायचं होतं .
          राधा आता सहा महिन्यांची झाली होती. रांगत, हसत,खेळत तिने सर्व घरात चैतन्यआणलं होतं. पण जसजसे नेहाचे नोकरीवर परत जाण्याचे दिवसा जवळ येऊ लागले तिला काळजीने झोप येईनाशी झाली. तिला वेळेवर दुध देणं , डायपर बदलणं, तिला झोपावंणं दुसऱ्या कुणाला कसं जमणार आहे हा विचारच तिला सहन होईनासा झाला. राहुलच्या आई अजून थोडे दिवस राहिल्याही असत्या. पण स्वत:चा संसार,नवरा, घर सोडून परप्रांतात किती दिवस राहणार होत्या त्या तरी? तिला हळूहळू राधाला वरचं दूध,भाज्या,डाळ-तांदूळाची पेज द्यायला लागणार होती. हे सर्व मायेने करून तिला कोण भरवणार होतं? कधी वाटायचं नोकरी सोडून घरी बसावं. पण मागे अशीच ती घरी राहिली आणि त्या एकटेपणाच्या आठवणी अजूनही अस्वस्थ करून टाकत तिला. आणि थोडे राहिली घरी तरी परत नोकरी मिळणंही सोपं नव्हतं. तिला आपल्यावरच्या या निर्णय घेण्याच्या ओझ्याने फार अस्वस्थ करून सोडलं होतं. पण तिने आणि राहुलने काहीच निर्णय घेतला नव्हता याबद्दल. किंवा त्यात निर्णय घेण्यासारखं काही नाहीच वाटलं बहुतेक राहुल ला.
         शेवटी सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर नेहा ऑफिसला जात होती. बऱ्याच दिवसांनी ती बाहेर पडणार होती. आता बाळाला घेऊन बाहेर जाणं तसंही कमीच व्हायचं. तिने दोन-चार ड्रेस घालून पहिले, सर्वच घट्ट झाले होते. 'शी,किती जाड झाले आहे मी',नेहा वैतागून बोलली. राधासाठी सर्व काही आवरून, हाताशी ठेवलं होतं तिने राहुलच्या आईसाठी. एक मदतीला मुलगीही ठेवून घेतली होती. कसातरी एक ड्रेस अंगात बसवून नेहा ऑफिसला निघाली. सकाळच्या ट्राफिकमध्ये दिडेक तास तरी गेला तिचा. बाप रे, किती लांब आहे हे ऑफिस  ! गेल्या ३-४ वर्षांत पहिल्यांदाच तिला आपण रोज इतके दूर कसे जायचो हा प्रश्न पडला होता. ऑफिसमध्ये पोचल्यावर सर्वात आधी तिने घरी फोन लावला, 'सर्व ठीक आहे ना आई?' तिने विचारले. त्यांनीही सांगितले,'ठीक आहे गं ,आताच दुध पिलं तिने,खेलतीय ती.' नेहाला जरा बरं वाटलं. मग ती आपल्या ऑफिसच्या मित्र-मैत्रिणीना राधाचे फोटो दाखवण्यात गुंग झाली. चारेक तासांनी मध्येच तिला राधाची इतकी आठवण आली की डोळे आधी भरून आले की छाती हे सांगता येणार नाही. दूध येऊन तिला आता दुखायला लागलं होतं. 'कसे काढणार मी असे दिवस तिच्याशिवाय?' नेहाला विचार आला मनात. कसातरी अर्धा दिवस थांबून नेहा घरी परत गेली होती. राधाला पाहिल्यावर रडू थांबेनाच तिचे.
         महिनाभर कसातरी संपून गेला. संध्याकाळी ५ ला निघाली नेहा तरी घरी सात वाजल्याशिवाय पोहचू शकायची नाही. मग २-३ तास कसेतरी मिळायचे राधा सोबत. राहुल तर फक्त रात्री झोपतानाच दिसायचा तिला. ती कधीतरी वैतागून जायची. मग राहुल तिला समजावयाचा,'होईल गं सगळं ठीक. नको काळजी करुस. आताशी लहान आहे ती. म्हणून काळजी वाटत आहे. अजून २-३ वर्षांत तीही मोठी होऊन जाईल. ती शाळेत गेल्यावर मग परत तू काय करणार घरी राहून? मी आहे ना मदतीला?' त्याचा फार आधार वाटायचा तिला.आता ऑफिसमध्ये कामही सुरु झालं नियमित तिचं. त्याची आईही समजून घेत होती तिला तसं. पण त्यादिवशी राधाची जरा जास्तच कुरकूर चालू होती. दिवस तसा पटकन जायचा निघून.पण संध्याकाळी दोघीच घरात म्हटलं की नको वाटायचं. राहुल येऊन गेला तरी अजून नेहाचा पत्ता नव्हता. तिने घरी फोन करून सांगितलं की उशीर होईल. पण रात्रीचे दहा? सकाळपासून मुलीला सोडून गेलेली ती. रात्री घरी आली तेव्हा सगळं आवरून झालेलं होतं. नेहाने अपराधी मनानेच पाय ठेवला घरात. त्याची आईही आज चिडलेली होती. 
आल्यावर नेहाच बोलली,"अरे, आज क्लाएंट चा कॉल होता. एक इश्श्यू आला होता."
राहुल म्हणाला,"ठीक आहे गं. मी आलो होतो सहा पर्यंत. मस्त खेळलो आम्ही. खाली पार्कमध्ये जाऊन आलो. नुकतीच झोपलीय ती."
        झोपलेल्या राधाला पाहून नेहाला गहिवरून आलं होतं. 
"सॉरी राधू. आई उद्या लवकर येईल हं?", तिच्या मऊशार गालांना हात लावत नेहा म्हणाली. 
       कसंतरी जेवण केलं नेहाने.पण आज वातावरण तंग आहे हे तिला कळतच होतं. 
शेवटी हात धुवून सोफ्यावर ती बसत असतानाच त्याची आई बोलली,"केलीच पाहिजे का नोकरी? म्हणजे आम्ही तरी किती दिवस बघणार ना राधाला?  आईचं प्रेमही पाहिजेच ना तिला?"

        त्यांचं हे बोलणं थोडं अनपेक्षित होतं तिला.त्यामुळे पटकन काय बोलावं नेहाला कळेना. तिने राहुलकडे पाहिलं.
तो तिला म्हणाला,"नेहा तू झोप जा. दमली आहेस. आपण बोलू याबद्दल उद्या. उगाच आता जागू नकोस."
राहुलच्या थोड्या चढलेल्या आवाजाने तिला 'नाही' म्हणायला जागा ठेवलीच नव्हती. ती उठून झोपायला निघून गेली. आणि राहुल आपल्या आईजवळ बोलायला बसला. नेहाला मात्र आज झोप लागणार नव्हती. आयुष्यात ज्या वळणावर ती आधी एकदा येऊन गेली होती. पुन्हा त्याच ठिकाणी ती उभी होती. घर की नोकरी. स्वत:साठी  की लोकांसाठी तेही आपल्याच ? पुन्हा तेच प्रश्न सुरु झाले होते.

-क्रमश:
विद्या भुतकर.

3 comments:

Anonymous said...

like

Manasi said...

Awesome..you decided to continue the story :)

Unknown said...

Mast