"खरं सांगू का राहुल, मला ना प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यायचा आता कंटाळा आला होता. आणि त्यात मुलीचा डिव्होर्स म्हणजे नक्की काय झालं असेल असा प्रश्न पडतोच ओळखीच्या लोकांना. त्यांना वाटतं, अरे ती तर इतकी चांगली मुलगी, तिचं असं का झालं? मुलात काही दोष होता का? नपुंसक वगैरे. की दारुडा होता, की मारहाण करायचा बायकोला? तर यातलं माझ्यासोबत काहीही झालं नाहीये. आणि बिलीव्ह मी, मी काही इथे विक्टिम वगेरे नाहीये. आमचा डिव्होर्स मिचुवल होता. 'irreconcilable differences' असं कारण टाकलं आहे पेपरवर. झालं काय की सुरुवातीला मीही ठीकच होते अमेरिकेत राहायला. खूप धडपड करून सिडने दुसरी नोकरी मिळवली. मग थोडे दिवस वेगळ्या ठिकाणीही राहिलो. बरीच स्वतंत्र झाले होते मी तेव्हा. अनेक गोष्टी एकटीने करायला शिकले होते. सिड्ची आठवण यायची पण त्यालाही तिथे राहायचं होतं. थोड्या दिवसांनी मीही त्याच्याकडे गेले नोकरी सोडून. नवराच तो माझा, त्याच्यासाठी ग्रेट बलिदान दिलं वैगेरे काही नाही. पण कुणीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे होते न एकत्र राहायचे. मी केले.
सुरुवातीला फार कमीपणा वाटायचा लोकांना सांगायचा की मी 'house wife' आहे म्हणायचा. पण नंतर त्याचीही सवय झाली. आळस अंगात भिनून गेला. स्वत:चं आवरायचं, छान दिसायचं, कशासाठी, कुणासाठी? घरीच तर राहायचं आहे असं वाटायचं. सिड ओढून न्यायचा त्याच्या पार्टीजना. पण तिथे ना मी नोकरी करणाऱ्या बायकांमध्ये सूट व्हायचे न गृहिणींमध्ये. आपण कुठे फिट होतो हे मला काही कळत नव्हतं. सुरुवातीला मग उत्साहाने एक-दोन सर्टिफिकेट साठी अभ्यास पण केला. पण तो तरी करून काय करणार? नंतर तेही बंद झालं. ग्रीन कार्ड कधी मिळणार, नोकरी कधी करणार? काहीच भरवसा नाही. बरं सिड साठी हे सर्व करतेय म्हणावं तर तोही कामात गर्क. त्याला फोन केल्यावर तो मिटिंग मध्ये आहे म्हटल्यावर मी तरी किती बोलणार. मला माहीतच होतं की ऑफिसमध्ये,मिटिंग मध्ये कसं असतं ते.
उन्हाळ्यात थोडे फार छंद तरी पुरवायचे, पण थंडींत कुठे जाणार? घरी राहायचं, खायचं, प्यायचं, टी व्ही तरी किती बघणार. लहानपणापासून अभ्यास तर केला होता फक्त त्यामुळे एखादी कला येते त्यात मन गुंतवावं असंही नाही. हळूहळू मला तिथे नकोसं वाटू लागलं. त्यात भर म्हणून सिडचा प्रोजेक्ट बदलला. त्याला दुसऱ्या गावी जावं लागायला लागलं. म्हणजे त्याच्यासाठी सर्व सोडून मी घरी राहिले आणि तो घरं सोडून बाहेर. चार दिवस हॉटेलवर राहायचा आणि तीन दिवस घरी. मग प्रवासाचा कंटाळा येतो म्हणून सुट्टीच्या दिवशीही घरीच. मी दिवसेंदिवस एकलकोंडी होत चालले होते. माझं डिप्रेशन वाढतच होतं. सिड आणि माझी परत जाण्यावरून भांडणं वाढली. नंतर तर मी भांडत सुध्दा नव्हते. माझा सर्वच गोष्टीतला रस निघून गेला. वाटलं आईकडे जाऊन यावं बरं वाटेल, म्हणून दोन महिने घरी आले. पण तरी ठीक वाटेना. आणि लोकांना काय सांगणार रे? मला तिकडे सर्व सुखसोयी मिळत आहेत आणि ते सुख टोचत आहे मला? इथे लोक किती हालाखीचे दिवस काढत कागत असतात आणि मला आत्महत्या करायचे विचार मनात येऊ लागले होते.
दोन महिने मी आईकडे राहिले तेव्हा आईने माझी ही स्थिती पहिली. आई म्हणाली 'मी येते तुझ्यासोबत. बोलू आपण सिद्धार्थशी होईल सर्व ठीक. ' आईसोबत मी परत गेले तेव्हा परत आम्ही प्रयत्न करून पहिला सिड ला समजवायचा. पण त्याचं म्हणणं हेच की त्याला नोकरी कराविच लागणार आहे तर इथे का नको? तिकडे जाऊन दिवस रात्र मेहनत करून हलाखीत का जगायचं? इथे पैसा,आराम सर्व आहे.मला एकटं वाटतंय तर बाळ होऊदे एखादं. पण मी इतकी डिप्रेस्ड होते की मला बाळ झालं तरी ते सांभाळण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तेही शक्य नव्हतं. खूप विचार करून सिद्धार्थ आणि माझ्या आई-बाबांनीच निर्णय घेतला मला परत भारतात ठेवायचा. आईकडे राहिल्यावर सहा महिन्यात मला माणसांत आल्यासारखं वाटू लागलं होतं. थोडी थोडी मी लोकांमध्ये मिसळू लागले होते.
सुरुवातीचे कित्येक दिवस तर मला सिडची आठवण पण यायची नाही. एकटेपणाने माझ्यावर पूर्णपणे कब्जा केला होता. हळूहळू मी आईला विचारू लागले की कुठे आहे तो? कधी येणार? मग मला कळले की तो परत येणार नाहीये, हां, मला न्यायला आला असता. पण इतकं सगळं झाल्यावर पुन्हा त्या घरात जायची माझी हिम्मतच नव्हती. २-४ वेळा फोनवर बोलले मी सिड शी. पण मग पुन्हा तीच भांडणं. शेवटी आम्ही निर्णय घेतला की वेगळं व्हायचं. तो थोडे दिवस इकडे येऊन सर्व कोर्टाची कामं पूर्ण करून गेला. मी अजूनही घरीच होते. बाबांनीच मग आपल्या प्रोजेक्टचे 'मनोज शर्मा होते ना त्यांना फोन लावला आणि माझा रिझ्युम पाठवून दिला. ते एकदा घरी येऊन माझ्याशी बोलताना मला आठवलं अरे आपण कित्येक दिवसात टेक्नॉलॉजी कशाशी खातात हेही पाहिलं नाहीये. त्यांनीच मला अभ्यास करायला प्रोत्साहन दिलं. आधीचा अनुभव होताच त्यामुळे नोकरीही मिळून गेली. पण मला पुण्याचं ऑफिस नको होतं म्हणून इथे आले. आणि बघ, तुझी गाठ पडली.
मला ना हे सर्व सांगायला काही वाटत नाही पण लोकांचे त्यावरून निघणारे तर्क कोण थांबवणार? डिप्रेस्ड म्हणजे वेडी का? की मुल होत नव्हतं? की अजून काही? म्हणजे आजच्या काळातली ही नवीन दुख:च आहेत. ती लोकांना समजतीलच असं नाही. त्यात डिव्होर्स हे अजूनही नाजूक प्रकरणच आहे आपल्याकडे. त्यामुळे मी जुन्या सर्वच लोकांशी संपर्क तोडले होते.आता इथे येऊन हि सहा महिने होऊन गेलेत. आई बाबा मध्ये मध्ये काळजीने येऊन जातात. पण मी आता ठीक आहे. पुन्हा एकदा आयुष्य जगावंस वाटत आहे. रोज सकाळी उठल्यावर आरश्यात स्वत:कडे बघावसं वाटत आहे. या सर्व अनुभवातून मला एक नक्की कळलंय, आपल्या इंडस्ट्रीत न लोकांना सर्वच हवं असतं, पैसा, प्रमोशन, चांगलं काम, मग घराचं सुख, पोरांना द्यायला वेळ. सर्वच. आणि मग ओढाताण सुरु होते. एकतर स्वत:ची, घरच्यांची नाहीतर मग कामाची. मी आता ठरवलंय जास्त सर्वच गोष्टींच्या मागे लागायचं नाही. काम करून आनंद मिळतोय न तो घ्यायचा, मित्र जोडायचे, एखादी कला शिकायची, आणि स्वत:ला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. लोकांशी बोलणं, न बोलणं, काम करणं, न करणं कुणाला इतकं प्रभावित का करत?". नेहा कितीतरी वेळ बोलत होती.
हे सगळं होत असताना आपण काय करत होतो याचा विचार राहुल करत होता.नेहाच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आणि आपण यात कुठेच नव्हतो? एव्हढा कसला राग होता तिच्यावर? निदान तिच्याशी बोलत असतो तर हे सर्व कळलं तरी असतं. जमेल तशी मदत तरी केली असती. आपण आपल्याच दु:खात आणि आयुष्यात किती बुडून गेलो होतो. राहुलला खूप राग आला होता स्वत:चा. ती बोलत असताना ते सहन न होऊन डोळ्यातून घळाघळा आसवं बाहेर पडत होती. नेहा त्या सर्वातून बाहेर पडत होती पण ते सर्व तो आज अनुभवत होता. ऐकत होता. त्याला शेवटी राहवेना म्हणून त्याने तिला आपल्या छातीशी धरलं. जणू ती खरंच सोडून गेली असतं तर आपलं काय झालं असतं हा विचारच सहन होत नव्हता त्याला. एकदा निदान एकदा तिच्या घरी तरी विचारायला हवं होतं मी. इतका कसा स्वार्थी आहे मी? तिला काही झालं असतं तर...? कितीतरी वेळ तिला सोडून द्यायला तयार होत नव्हतं त्याचं मन.
बोलता बोलता पहाट झाली. जणू सगळं दु:खं रात्रीच्या अंधारात पुरून गेलं होतं आणि नवीन एक पहाट त्यांच्यासमोर नवा दिवस घेऊन येणार होती. नेहाने मग कॉफी बनवली दोघांसाठी आणि पुन्हा एकदा ते गप्पा मारत बसले. कित्येक वर्षांनी भेटले होते, मळभ सर्व दूर झालं होतं.
तिने मग त्याला विचारले,"तू नाही केलंस लग्न अजून?"
तो म्हणाला,"आई-बाबा मागे लागले आहेत आता. पण आताशी तर MBA झालं. अजून त्याचं लोनही फिटलं नाहीये. लगेच कुठे नवीन घेऊ? बाय द वे, कॉफी छान झालीय हं."
नेहाने विचारलं, "रोहनचं काय झालं रे? काहीही म्हण त्याला सर्वच गोष्टींची घाई होती. रेटिंग नाही मिळाले, लगेच कंपनी बदलली त्याने. कुठे असतो आज काल?"
राहुल,"आता चौथ्या कंपनीत आहे. त्याचंहि काहीतरी चालूच असतं. कुठे नोकरी बदल, कुठे घर बदल, कधी गाडी तर कधी मोबाईल. नवीन नंबर आला की स्वत:च कॉल करतो. मग मी जुना नंबर रिप्लेस करून टाकतो. अजिंत मात्र मोठा मेनेजर झालाय आता. माझ्या आधीच त्याचं MBA पूर्ण झालं होतं. मागच्या वर्षी लग्नही झालं. लग्नाला गेलो होतो त्याच्या. तुझी आठवण काढली होती तेव्हा."
याचं काय, त्याचं काय करत त्यांना कधी झोप लागून गेली कळलच नाही. राहुलने नेहाला तिच्या घरी सोडलं. आणि अजूनही तिच्याच विचारात तो कामावर गेला. त्याला सारखं वाटत होतं की मी का नाही तिची चौकशी केली? मी का लक्ष दिले नाही तिच्या फोन न करण्यावर? त्याला खूपच अपराधी वाटत होतं. पुढचे चार दिवस मग तो सारखा नेहाला फोन करून विचारायचा काय 'करते आहेस? जेवलीस? घरी फोन केलास?' जणू हरवलेल्या काळाची भरपाई करू पाहत होता तो.
नेहा त्याला एकदा म्हणालीही,"अरे राहुल, मी ठीक आहे आता. तुला हे आता कळतंय म्हणून जास्त काळजी वाटतेय तुला. मी ठीक आहे आता.नको करुस माझी काळजी."
तिला भेटल्यावरही तिचे सर्व हावभाव तो बारकाईने टिपत राहायचा. कशी बदलली आहे ती, कशी मध्येच इंग्रजी शब्द बोलत राहते, जेवण किती छान बनवते. पूर्वीची नेहा मिळतेय ना हे शोधत राहायचा. नेहालाही बरं वाटत होतं त्याच्यासोबत. कधीतरी पुन्हा एकदा राहुलच्या मनात जुने विचार यायचे. विचारवं का नेहाला लग्नाबद्दल? काय म्हणेल ती? रागावेल का? माझ्याशी बोलायचं बंद करून टाकेल का? म्हणेल बहुतेक हो यावेळी. मागच्या वेळी 'नाही' म्हणायला विचारलं कुठे होतं आपण तिला. तेव्हा एकदा चूक केली तिला जाऊ देऊन पुन्हा नाही असं कुणाकडे जाऊन देणार पुन्हा त्रास होण्यासाठी. बरं, ती म्हणाली 'हो' तर आई-बाबा हो म्हणतील? तसे ते अगदीच जुन्या विचाराचे नाहीत. पण डिव्होर्स झाला हे सांगायचं? आणि नाही म्हणाले मग तर? त्यांच्या परवानगी शिवाय लग्न करायचं? असे एक न अनेक विचार यायचे त्याच्या मनात. नेहाने विचारलं कधी की असा काय बघतोस म्हणून तर नुसती मान झटकून सोडून द्यायचा.
बरोबरच होतं म्हणा त्याचंही. त्याला आधी गेल्या कित्येक वर्षांची मैत्री निभावायची होती. ते कर्ज तरी आधी उतरावयाच होतं डोक्यावरून मग पुन्हा एकदा प्रेमाला नवीन सुरुवात करायची होती.
क्रमश:
विद्या भुतकर.
6 comments:
Mast hoti goshta!
Pan shevat asa thoda incomplete vatala..maybe u can write 'Part 2' later :)
Mast chan !
Pan shevat rahul ne nehala lagnache vicharle nahi ka?
Thank you all who were patient enough to read this long story and thank you for the comments.
About the end, I feel that a person would need time to recover out of a life changing event and having a end where Neha and Rahul get married would be too hasty. Thats why I preferred to have an Hopeful end but not the 'Happy end'.
-Vidya.
Happy end chalel 2-3 ajun bhag tayar kar aani happily married asa end yevu :)
Vidya tujha email address mala pathavshil ka?
@Tulip, vbhutkar@gmail.com
Post a Comment