सकाळ सकाळी रितू मस्त आवरून ऑफिसला निघाली होती. आज तिच्या आवरण्यात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.खूप दिवसांपासून अडकलेलं एक काम होईल असं वाटत होतं. या सध्याच्या कंपनीत नोकरीला लागून पाच वर्षं झाली होती. मन लावून काम करणारीच ती, पहिल्यापासूनच. कितीही साधं काम दिलं तरी ते जमेल तितकं उत्तमपणे पार पाडायचं, अगदी मन लावून काम करायचं. त्यामुळे आहे तिथे चांगले प्रमोशन मिळतही गेले तिला. पण आपण कशात चांगले असलो ना की मग लोक दुसरा पर्याय शोधत बसत नाहीत. चालू आहे ना काम? मग राहू दे तिला तिथेच असे म्हणून प्रमोशन देत एकाच प्रोजेक्टमध्ये ठेवून घेतले. इतके दिवस कंपनीत नोकरीला असूनही तिला अजून 'ऑनसाईट' कुठेही परदेशात जायला मिळालं नव्हतं. सुरुवातीची काही वर्षं तिने दुर्लक्ष केलं पण तिला आता राग येऊ लागला होता आणि कितीही मन लावून काम केले तरी घरी गेल्यावर स्वतःवर चिडचिड होत होती एकाच ठिकाणी अडकून पडल्याबद्दल.
गेले दोन वर्षे मात्र तिने हा हट्ट सोडला नाही. प्रत्येकवेळी ती एखाद्या ऑनसाईट प्रोजेक्टबद्दल बोलायला गेली की मॅनेजरचा एकच प्रश्न, "तुझी रिप्लेसमेंट आणून दे, मग करतो". तिने तसे सुरूही केले लोकांचे इंटरव्हूय घ्यायला. पण एखादे काम चांगले करत असू ना तर त्यासाठी कितीही मारामारी करावी लागली तरी ते करत राहतो, दुसऱ्या कुणी केलेलंही आवडत नाही तसेच तिलाही ज्या कुणाचे इंटरव्हू घेतले त्यांचे आधीचे काम पसंत पडले नाही तर कुणाचा 'अटीट्युड'. आता असेल एखादा कमी जास्त, तर चालवून घ्यायचे ना? पण तसे करेल तर रितू कुठली? गेल्या दोन दिवसांत एका कॅन्डीडेटचे २ राऊंड झाले होते. आता जवळजवळ फायनलच होणार होतं. त्याला एकदा का आपल्या जागी बसवला की तिचा प्रोजेक्ट, व्हिसा सर्व लवकरच पूर्ण करायचं होतं. तिकडे अमेरीकेत, इंग्लंड, जर्मनी सर्व ठिकाणी तिचे मित्र-मैत्रिणी होतेच. कुठेही गेली तरी तिला काही प्रॉब्लेम नव्हता. फिरायला मिळेल याचाच तिला जास्त आनंद होत होता.
आनंद वरून आठवलं, आज येणाऱ्या त्या मुलाचं नावंही आंनदच होतं. मुलगा कुठला? झाले की आता २८ वर्षाचा तरी असेल? ७-८ वर्षाचा अनुभव म्हणजे निदान तितका तरी असेलच. पण तो इथे का म्हणून राहायचं म्हणत असेल? त्याच्या जुन्या कंपनीत तर तो बाहेर गेलाही होता. परत इकडे का आला काय माहित? मी तर त्याच्या जागी असते तर नसते आले. त्याचा व्हिसाही आहे म्हणे. मग तर काय राहिला असता तरी चाललं असतं. लग्नासाठी आला असेल, आता घरचे मागे लागले असतील. इथे लोक तिथून परत यायला नको म्हणतात आणि याला परत तिकडे जायचं नाहीये म्हणून नोकरी सोडतोय? कुणाचं काय तर कुणाचं काय......... एका पाठोपाठ एक असे अनेक प्रश्न आणि विचार रितूच्या डोक्यात येतंच होते. त्या 'आनंद' ला नवीन नोकरीचाही इतका 'आनंद' होणार नाही इतका तिला होत होता. कॅबमधून ऑफिसला पोचेपर्यंत तिला दम धरवत नव्हता. पोचल्या पोचल्या रितुने सामान जागेवर ठेवून मॅनेजर च्या ऑफिसकडे धाव घेतली.
"काय झाले सर? ", रितू.
"कशाचे?", मॅनेजर.
"कशाचे काय? त्या कॅन्डीडेटचे? आनंद?", रितू.
"हां हां, झाला सकाळी त्याचा इंटरव्ह्यू. "
"कसा वाटला तुम्हाला?", जणू तिला स्वतःलाच नवीन नोकरी मिळत होती.
" हां चांगला आहे. एच आर शी बोलणं झालं की येईल परत. उद्या ऑफर देऊन टाकू. त्यालाही जॉईन व्हायला महिना लागेल पण. "
"हो ते तर आहेच सर. महिन्यानेच जॉईन करता येईल त्याला. पण बाकी चांगला आहे. ", रितू थोडा संयम ठेवत बोलली आणि बाहेर निघूनही आली.
दिवसभर तो आनंद एच आर कडे जाताना किंवा परत सरांकडे जाताना तिचं लक्ष होतंच. दुपारी जेवताना मैत्रिणीलाही तिने सांगितलं त्याच्याबद्दल. आता पुढचा महिनाभर कशी वाट बघायची असा मोठा प्रश्न तिला पडला होता. पण इतके वर्षं वाट पाहिली आता अजून १ महिना तो काय?
तर महिन्याभराने आनंद आला, तो येणार होताच. त्या महिन्याभरात तिचाही अमेरिकेतली एक प्रोजेक्ट फायनल झाला होता. आता आनंद आला की काम त्याच्या ताब्यात द्यायला महिना दोन महिने लागणार होते आणि तिकडे व्हिसालाही. त्यामुळे एकूण सगळं कसं जुळून आलं होतं. त्याला सर्व टीमची ओळख करून द्यायची, आपले काम समजावयाचे, थोडे दिवस त्याला पुढे होऊन एकट्याला काम करता आले की मग लगेच हिची रवानगी अमेरिकेला. कध्धी होणार सगळं ????? तिला आता फिरायची, परदेशात जायची मोठी उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे त्याच्या येण्याची हिलाच जास्त उत्सुकता होती. एरवी १०-११ वाजता येणारी रितू आज सकाळीच येऊन बसली होती. पहिलाच दिवस असल्याने आनंदही वेळेत आला, तोही एकदम फॉर्मल मध्ये.
आनंद येणार म्हणून तिने आधीच सर्व पेपरवर्क तयार ठेवले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने त्याला ऑफिसातल्या सर्व लोकांची ओळख करून दिली, कॅन्टीन मध्ये त्याला सोबत म्हणून जेवायला गेली, कुठे राहतो, कसा येतो, ऑफिसच्या नियमित वेळा, मिटींगच्या वेळा हे सर्व समजावून झालं. एरवीचे ९च तास आज खूप वेळ झाल्यासारखे वाटत होते. दोघेही दमून गेले होते. इतका वेळ बोलणे आणि इतका वेळ ऐकणे दोनीही बोअरिंग कामे होती. संध्याकाळच्या फोन कॉल मध्ये ऑनसाईटच्या टीमशी ओळख करून देऊन निघायचे असे त्यांनी ठरवले. कॉल तसा उशिरा असल्याने तो संपेपर्यंत कुणीही जास्त कुणी ऑफिसमध्ये नसेही. निघताना त्याला 'बाय' करून तिने कॅब बोलावून घेतली आणि तोही निघाला. पहिला दिवस संपल्याचे समाधान दोघांनाही वाटत होतेच.
दुसऱ्या दिवसापासून मात्र रितुने त्याला आल्या आल्या कामाला लावले. काय काय करायचे याचा प्लॅन त्याला दिला. वाचण्यासाठीचे सर्व डॉक्युमेंट, रोज शिकवण्यासाठी भेटायचं एक तास, मीटिंग आणि संध्याकाळचा कॉल. आख्ख वेळापत्रक देऊन टाकलं. तोही बिचारा नवीनच असल्याने 'हो' म्हणून कामाला लागला. पहिल्या दोन आठवड्यात त्यालाही तिच्या जबरदस्त कामाचा अंदाज आला होता. एक व्यक्ती म्हणूनच नव्हे तर एक ग्रेट टीम लीड म्हणूनही ती योग्यप्रकारे सर्व काम करते हे तो पहात होता. अर्थात तिचा स्वभावच तो, जे असेल ते काम मनापासून करायचे, त्यामुळे त्याला सर्व काम समजणे इतकेच नव्हे तर त्याला दुपारी जेवायला सोबत देणे इ. सुद्धा आपलीच जबाबदारी असल्यासारखे ती ते बरोबर पार पाडत होती. हळूहळू दोघांची एकमेकांची ओळखही होत होतीच. पण तीही केवळ या दोनेक महिन्यांपुरतीच आहे हे दोघांनाही माहित होते. त्यामुळे समोरच्याचे नाही पटले तरी पुढे कुठे आपल्याला भेटायचे आहे? असा विचार करून दोघेही गप्प बसत. काम योग्य चालू असणे दोघांसाठीही महत्वाचे होते.
आता रोजचे रुटीनच झाले होते. रोज सकाळी ऑफिसला पोचायचे, चहा सोबत करायचा, मग काम, जेवण सोबत, संध्याकाळचे कॉल्स. कधी उशीर झाला तर तो विचारायचा, "कशी जाणार?". आता दोघेही 'तुम्ही' वरून 'तू' वर आले होतेच. तीही 'कॅब' म्हणून निघून जायची. तिला आनंदचा स्वभाव आवडला होता. एकदम मनमोकळा, गमतीदार पण तरीही मर्यादेत वागणारा, बोलणारा, कामात तितकाच सिन्सियर. चेष्टा मस्करीही करायचा पण कधी उगाच त्याने तिला पर्सनल प्रश्न विचारले नव्हते ना त्याने. त्यांना कुठे सोबत राहायचं होतं म्हणा. पण तरी रितू रूममेटशी बोलताना त्याचा उल्लेख वाढला होता.
तिच्या रूममेटने तिला गंमत म्हणून विचारलंही होतं,"काय गं? काय विचार आहे?".
तिनेही अगदी सिरियसली सांगितलं होतं,"हे बघ आता इतक्या वर्षांनी मला कुठे फिरायला जायला मिळतंय त्यामुळे मी असला काही वेडेपणा करणार नाहीये. आणि आनंदचं काय? ठीक आहे? पण मला कुठे त्याच्यासोबत राहायचे आहे?".
महिना होत आला, आनंद तसा रुळलाही. थोडा निवांत झाला. आता नवेपणाचं ओझं घेऊन फिरत नव्हता. कपड्यांमध्येही थोडा सुटसुटीतपणा आला आणि वागण्यातही. नवीन टीममध्ये सराईतपणे वावरू लागला, कधी बाकी लोकांसोबत रितूची चेष्टाही करू लागला. रितूची व्हिसाची गडबड सुरु झाली. अनेकवेळा तर स्वतः आनंदने तिला डॉक्युमेंट भरायला मदतही केली. तिच्या व्हिसा इंटरव्ह्यूसाठी त्याने तिला थोडी तयारीही करून घेतली. ठरल्याप्रमाणे व्हिसाच्या दिवशी मुंबईला जाऊन यायचे होतेच. सर्वांना माहित होते तिला किती ओढ लागली आहे परदेशात जायची. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती परत आली तेव्हा सगळेच उत्सुक होते विचारायला. पण रितू आली आणि तिच्या चेहऱ्यावरूनच कळले की काय झालं होतं. तिचा व्हिसा रिजेकट झाला होता. का? कसा? यापेक्षा पुढे काय हा प्रश्न तिला पडला होता. इकडे जुन्या प्रोजेकट मध्ये तिची रिप्लेसमेंट आली होतीच आणि नविनही हातात नाही. सर्वच तिचे सांत्वन करायला लागले होते.
आनंद मात्र दिवसभरात जास्त काही बोलला नव्हता. संध्याकाळपर्यंत कसंबसं काम करून घरी जाताना तो म्हणाला,"कशी जाणार आहेस?". तिने नेहमीचं उत्तर दिलं,'कॅब ने".
पुढे तो म्हणाला,"मी सोडतो चालत असेल तर?".
तिने मान डोलावली. उशीर झालेला होताच, त्याने विचारलं,"जेवण करून जायचं? कॅन्टीन मधे जाऊ".
तिने पुन्हा मान डोलावली. आज तिला एकटं राहावंसं वाटत नव्हतं आणि जास्त काही बोलायची शक्तीही नव्हती.
त्यानेच नेहमीचं जेवण मागवलं आणि टेबलवर घेऊन आला. आता दोघांना एकमेकांचे जेवण, नाश्त्याच्या आवडी निवडीची माहित झाल्या होत्या.
जेवताना त्याने विचारलं,"इतका का मूड ऑफ करून घेतेस? एकदाच रिजेकट झालाय ना व्हिसा परत मिळेल की?".
ती,"ह्म्म्म".
तो,"मी दिवसभर काही बोललो नाही, पण आपल्याकडे लोकांना खूप क्रेझ असते अमेरिकेची. मी कितीतरी लोकांना अगदी जीव तोडून त्या व्हिसाच्या मागे लागलेले पाहिलंय. तिकडे राहण्यासाठी काय काय करतात हेही पाहिलंय आणि त्यात घरच्या सर्वांची, कधी बायका पोरांची होणार ओढाताण हेही पाहिलंय. तुला का इतकी क्रेझ आहे जायची?" .
आज पहिल्यांदाच तो कमेंट करत होता काहीतरी अशा महत्वाच्या विषयावर. तिला थोडं आश्चर्य वाटलं आणि एरवी फक्त कामापुरती मर्यादा राखणारा, आज स्वतःहून थांबवून बोलणारा आनंद वेगळाच वाटत होता.
ती बोलू लागली," आजपर्यंत लहानपणापासून खूप अभ्यास केला, नोकरीतही मन लावून काम केलं. पण हे सर्व एका छोट्या गावात, या पुढे छोट्या शहरात राहून. एक मुलगी म्हणून कधी आई वडिलांनी काही नाही म्हटलं नाही, तरीही मर्यादा होत्याच. कधीतरी त्यातुन बाहेर पडून बघायचं आहे. परदेशात नोकरी करायची, एकटीला फिरायचं आहे.
"पण मी तर वेगळंच ऐकलं होतं?", तो बोलला.
त्याला काय म्हणायचं आहे हे लक्षात आल्यावर मात्र ती थोडी चिडली. ऑफिसमध्ये असणारा तिचा जुना मॅनेजर आता अमेरिकेत असतो आणि तिला त्याच्याकडे जायचे आहे असं सर्वांचं म्हणणं होतं, अर्थात ते कुणी बोलून कधीच दाखवलं नाही. पण ते बोलतात हे तिलाही माहित होतं. आज त्याने हे असं विचारावं हे तिला पटलं नाही. पण आता विचारलं आहेच तर सांगणं भाग होतं.
"संदीप तसा मला आवडायचा आणि तो इथे असताना आम्ही बरेच वेळा सोबत असायचो. तो ऑनसाईट गेल्यावर मात्र थोड्याच दिवसांत त्याच्या वागण्यात बदल जाणवला मला. त्याला जणू माझ्या मैत्रीचं आणि कदाचित पुढे येणाऱ्या नात्याचं ओझं वाटत होतं. त्यामुळे मी वेळीच त्याच्याशी बोलणं कमी केलं होतं. आता अशा गोष्टी एकदा पसरल्या की थांबणं अवघड असतं. एक मुलगी लीड वगैरे झाली की अजून बंधनं येतात. नुसतं कामात चांगलं असून चालत नाही, वागण्यातही परफेक्ट असावं लागतं. मुलगा मॅनेजर झाला तरी तो टीमसोबत जाऊन दारू पिऊ शकतो. मुलगी ते करू शकत नाही. त्यामुळे मी वेळीच माझे संबंध कमी केले होते. पण अफवा पसरल्या की त्या क्लिअर करायला कुणी समोर येत नाही. तू विचारलंस म्हणून सांगते. तो भाग आता माझ्या व्हिसाचं कारण नाहीयेच. मला एकटीला स्वच्छन्दपणे राहून बघायचं आहे, माझे इतके मित्र-मैत्रिणी गेलेत, त्यांच्यासारखाच मलाही तो अनुभव घ्यायचा आहे.", ती बोलत होती आणि तो ऐकत होता. तिच्या डोळ्यांत नकळत पाणी येत होतं.
तो विचार करून बोलला,"अगं काही विशेष नसतं. नुसता बाऊ करून ठेवलाय लोकांनी. उलट मला तर बोअर झालं तिकडे."
ती,"बरोबर तू जाऊन आला आहेस ना? म्हणून तुला काही वाटत नाही त्याचं कौतुक. बाय द वे, तू का परत आलास? "
तो,"माझंही तुझ्यासारखंच झालं होतं, फिरायची इच्छा होतीच. पण नोकरी लागल्यावर घरी बोललो होतो, काही वर्षं फिरून घेतो मग परत येईन आणि मग तुम्ही लग्नाचं काय ते बघा. "
ती,"तुम्ही बघा म्हणजे? अच्छा म्हणजे कुणी गर्लफ्रेंड नाहीये होय अजून? कसं शक्य आहे?"
खरंतर गाडी तिच्यावरून त्याच्याकडे वळत होती. पण तिला आज चिडवण्यात मजा नव्हती. त्यामुळे त्यानेही तिला बोलू दिलं.
तो,"मला उगाच प्रेमात वगैरे पडायचं नाहीये हे आधीच ठरवलं होतं मी. एकतर खूप मित्रांचे हाल पाहिलेत. उगाच बिचारे पोरींच्या नादात दुःखी होऊन फिरतात. एक तर पोरी मिळाल्या की त्यांना जुन्या मित्रांची आठवणही राहत नाही. आणि मग प्रेमभंग झाला की मित्र सोडून दुसरं कुणी बघत नाही. मुलंच कशाला, माझी एक मैत्रीणही होती, माझ्यावरच प्रेम झालं तिला. 'नाही' म्हणालो तर आता मैत्रीणही नाही आणि गर्लफ्रेंडही. शिवाय घरून विरोध असला तर मग घरच्यांचेही हाल, भांडणं, रुसवे फुगवे, नकोच ते. आणि मला असं स्वतःला दुःखापासून मोकळं ठेवायला आवडतं, नावाप्रमाणे आनंदी राहायचं. I am happy as I am. No complaints with life. "
ती," तुझ्याकडे बघून वाटलं नव्हतं असा विचार करत असशील ते."
तो,"म्हणजे काय? मी काय २-४ गर्लफ्रेंड वाला माणूस वाटतो की काय? आपला पगार नाही बाबा इतका."
ती हसली. सकाळपासून उदास असलेले डोळे थोडे चकाकले.
तो पुढे बोलला,"आता आई बाबा म्हणत आहेत मुली बघायचं. चालू आहे एकेक प्रोग्रॅम. बघू कधी जमतं. "
महिनाभरातुन पहिल्यांदाच तो आपल्याबद्दल इतके बोलला होता. जेवण झालं होतं. त्याने आग्रह करून तिला तिच्या रूमवर सोडलं होतं. तिनेही त्याला 'थँक्स' म्हणून हसून 'बाय' केलं.
अश्रू दोन लोकांना किती पटकन जवळ आणतात ना? गेल्या महिन्याभरातील थोडीफार जी काही फॉर्मॅलिटी होती ती किती पटकन नाहीशी झाली. जेवायला जाताना, चहाला जाताना थांबलं जाऊ लागलं, जेवताना ऑर्डर देताना दुसऱ्याच्याही दिली जाऊ लागली. कॉल चालू असताना 'mute' करून गप्पा चालू झाल्या. सुट्टीच्या दिवशीच्या कामाला विनातक्रार येऊ लागले. सकाळी पोचायला उशीर झाला तर कॉल करणं सुरु झाले होते. त्यांच्या नकळत हे सर्व बदल होत होते. त्याचे तिच्या प्रोजेक्टवरचे ट्रेनिंग जवळ जवळ संपत आले होते. आता पुढे काय हा प्रश्न दोघांनाही होताच.
एक दिवशी संध्याकाळी कॉल च्या आधी रितू गाणे ऐकत बसली होती. त्याने येऊन एक हेडफोन स्वतःच्या कानाला लावला. अरिजित सिंगचं गाणं चालू होतं.
गाणं संपवून तिने हेडफोन बाजूला करत विचारलं, "तुला आवडतो का रे अरिजित?".
त्याने खांदे उडवले.
"म्हणजे काय? हो की नाही?" तिने खोदून विचारलं.
"म्हणजे मी जास्त लक्ष देत नाही गाण्यांकडे. मला सिनेमा पाहायला आवडतो. दोन तीन तासाची करमणूक होते. पण जास्त त्याचा विचार करत बसत नाही. गाणं चांगलं वाटलं तर ऐकतो, पण म्हणून रिपीट वर लावून बसत नाही. ", त्याने स्पष्ट उत्तर दिले.
"मला तर त्याची सर्वच गाणी आवडतात. कसला आतपर्यंत पोचतो त्याचा आवाज.", ती स्वप्नाळू डोळ्यांनी बोलली.
त्यांचं बोलणं चालूच होतं इतक्यात मॅनेजरने रितूला केबिनमध्ये बोलावले.
ती आत गेल्यावर त्यांनी सांगितले,"रितू दुसऱ्या एका प्रोजेक्टसाठी तुला ऑनसाईट पाठवायचा विचार आहे. अमेरिकेतच आहे, आपण यावेळी दुसरा व्हिसा अप्लाय करू. अजून ६ आठवड्यात काम होऊन जाईल. लोकेशन मागच्यापेक्षा वेगळे आहे. तुला चालेल ना? "
तिला हे असं अचानक विचारल्यामुळे काही कळेना. इतकी तीव्र इच्छा असणारी रितू आज दुसरी ऑफर आल्यावर एक सेकंद का होईना विचार करत होती.
तिने विचारले,"मी उद्या सांगते सर, चालेल ना?".
सरांनी 'हो' म्हणून मान हलवली.
रितू बाहेर आली आणि शेजारी असणाऱ्या आनंदने मानेनेच 'काय?' ची खूण केली. तिने त्याला हातानेच 'नंतर बोलू' असं खुणावलं. एकतर मोजून महिना-दीड महिन्याची त्यांची ओळख. त्यातही त्याचे हे असे प्रेमाबद्दलचे विचार. आणि आपणच कुठे काय बोलणार आणि त्यासाठी इतक्या वर्षांची इच्छा सोडून देणार? तिला कळत नव्हतं काय करायचं? त्याला सांगावं की नको करत तिने कॉल नंतर त्याला सांगितलं तिचं सरांशी झालेलं बोलणं.
त्याने एका सेकंदाचाही विचार न करता सांगितलं,"अरे उद्या कशाला म्हणालीस? हो म्हणायचं ना? इतक्या वर्षांची इच्छा आहे ना तुझी? मग विचार कसला करतेस?".
त्यानेच असे म्हटल्यावर मग प्रश्नच मिटला. तिला वाटलं,"बरं झालं त्याला सांगितलं ते. "
आता मोजून ६ आठवडे होते तिच्या तयारीला. यावेळी व्हिसाचे डॉक्युमेंट दोघांनी मिळून भरले. व्हिसाची तारीखही आली, त्याने तिची तयारी करून घेतली होतीच. व्हिसासाठी जाताना अगदी निघण्यापासून, पोहोचेपर्यंत त्यांचे कॉल चालू होतेच. इंटरव्ह्यू झाल्यावर पहिला कॉल तिने त्यालाच केला होता. तिला व्हिसा मिळाला होता आणि अजून दोन तीन आठवड्यात जायचं ठरलं होतं.
सगळं कसं पटापट होत होतं. कुणाला काही विचार करायला वेळच नव्हता. दिवसा ऑफिसचं काम असायचं आणि संध्याकाळी तिची काही खरेदी, गप्पा, एकत्र जेवण हेच चालू होतं. त्याने तिला पार्टी मागितलीच होती. तीही मग सर्वाना घेऊन पार्टीला गेली होती. पुढे काही होणार नाही हे माहित असूनही पार्टीच्या तिच्या ड्रेसवर त्याच्या कौतुकाची तिला अपेक्षा होती आणि त्याने कौतुक केल्यावर एक समाधानही. आपल्याला एक वेगळं आयुष्य जगायची इतक्या वर्षाची जी इच्छा होती ती पूर्ण होत आहे आणि त्यात हे असे छोटे छोटे प्रसंग उगाच अडकवून ठेवत आहेत असं तिला वाटत होतं. त्यामुळे त्याच्यासोबत राहण्याचं जे आकर्षण होतं त्याचा तिला वेळोवेळी रागही येत होता. तरीही त्याची सोबत ती टाळतही नव्हती. उलट खरेदीला, प्रत्यके निर्णयात तो तिच्यासोबत होताच. बॅग खरेदी केल्या, वेस्टर्न कपडे घेतले, थंडीचे कपडे घेतले, बाकी गोष्टींचीही यादी होतीच. वेळ मिळेल तेव्हा तिचाही फोन यायचा आणि मग जमेल तशी ते दोघे मिळून तिची कामे पूर्ण करत होते. 'अजून १०-१५ दिवस तर आहेत' असे म्हणून ती मनाचे समाधान करत होती.
आता १-२ दिवसच बाकी होते. ती जायच्या आधी भेटायला म्हणून तिचे आई बाबाही तिच्याकडे आले होते. ती कितीही व्यस्त असली तरी त्याच्यासोबत जमेल तो वेळ ती घालवतंच होती. त्यांच्यासोबत बसून त्यानेही तिची पॅकिंग करून दिली. तिच्यासोबत एअरपोर्टवरही तो गेला. जाताना एक छोटंसं गिफ्ट त्याने खिशातून काढलं. छोटा डिजिटल कॅमेरा होता तो.
तो बोलला,"मला माहितेय तिकडे अजून भारी कॅमेरा मिळेल तुला. पण तोवर हा माझ्याकडून. काही लागलं तर सांगच, माझे मित्र मैत्रिणी आहेत तिकडे, मदत करतील तुला ते नक्की. ही कॅश सुद्धा सोबत ठेव लागली तर. मला माहितेय पहिल्यांदा जाताना टेन्शन येतं. "
तिने 'थँक्यू' म्हणून त्याला एक अलगद मिठी मारली. तो पुन्हा कधी भेटला तरी आधी तोडलेल्या 'संदीप' सारखाच भेटेल का असं सारखं तिला वाटत होतं. न बोललेल्या अनेक गोष्टी डोळ्यातून वाहत होत्या. त्याला 'take care' म्हणून तिने बाकी सगळ्यांचाही निरोप घेतला.
ती आत गेल्यावर बाहेर तिचे आई बाबा आणि तो थांबलेही, काही लागलं तर म्हणून. ते बिचारे दमलेले आणि तोही औपचारिक गप्पांमध्ये अडकलेला.
"पुढचा एक दिवस प्रवासात जाईल तिचा, तेव्हा काही संपर्क करता नाही येणार. पण तिकडे असतात कंपनीचे लोक, त्यांच्या फोनवरून करेल फोन पोचली की. तुम्ही काही काळजी करू नका. " तो बोलतच होता.
'सर्व ठीक झाले, आता फोन बंद करावा लागेल" असे म्हणून फोन आल्यावर तिघेही एरपोर्टवरून आपापल्या मार्गाने निघाले. पुढच्या पाच मिनिटांत त्याला मेसेज आला होता,"I'll miss you.".
त्याने मेसेज पाहिल्यावर त्याच्यावर उत्तर द्यायला कॉल लावला पण फोन बंद झाला होता. प्लेन उडाले होते......
आनंद रितूला सोडून घरी पोचला तेंव्हा पहाटेचे तीनेक वाजले असतील. रविवार सुरु झाला होता. दमल्यामुळे अंग गादीवर टाकून क्षणात त्याला झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी कधीतरी सकाळी उशिरा त्याला जाग आली. डोळे उघडतानाच त्याच्या मनात पहिला विचार आला,"आज रितू या शहरात नाहीये."
त्याने 'उगाच रोमियो टाईप विचार करतोय' म्हणत तो झटकला आणि ब्रश करायला लागला. तो ब्रश करतानाच त्याला दोघेही रूममेट तयार होताना दिसले. त्याने खुणेनेच विचारलं,"कुठे?". दोघेही नाश्ता करायला निघाले होते. त्याने त्यांना थांबायला सांगून पटकन आवरून त्यांच्यासोबत बाहेर निघाला. टपरीवर गेल्यावर त्याला जाणवलं गेल्या दोनेक महिन्यात तो त्यांच्यासोबत नाश्ता करायलाही आला नव्हता. ते दोघे जे बोलत होते त्याचा संदर्भ लागायलाही थोडा वेळ लागलाच. आता दिवसभर काय करायचं हा प्रश्न होताच.
रूमवर परत येऊन त्याने अजून दोघा मित्रांना फोन लावला आणि सिनेमाला जायचा प्लॅन केला. उगाच पिक्चर पाहताना सेंटी गाणी ऐकून रितूला आठवण्याचा वेडेपणा करणाऱ्यातले
आपण नाही हे त्याने आधीच ठरवून ठेवले होते. त्यामुळे तीन तास तरी ठीक
गेले. त्याचं मित्रमंडळ तसं मोठं होतं. त्यामुळे गेल्या दोनेक महिन्यांनी त्याला असा काही फरक पडणार नव्हता. नेहमीप्रमाणे टाईमपास सिनेमा बघून जेवण करून तो संध्याकाळी रूमवर परत आला. पण दिवसभर टाळलेला एकांत पुन्हा जवळ येतोय असं त्याला जाणवलं. पण त्याने स्वतःला सकाळीच समजावलं होतं, हे असले प्रेम वगैरे, तेही दोनेक महिन्यात? अगदीच फिल्मी वाटतं. इतक्या वर्षात झालं नाही ते दोन महिन्यात होणार आहे का? काय करावं विचार करत त्याने घरी फोन लावला.
आईने त्याला विचारलंही,"काय रे कुठे होतास? दोन आठवडे तुझा फोन नाही? आम्ही लावला तर उचलला नाहीस? सगळं ठीक आहे ना?".
त्याने नेहमीच्या सुरात,"अगं हो काम होतं. ती रितू जाणार होती ऑनसाईट त्यामुळे सर्व काम माझ्याकडेच होतं." असं काहीसं कारण सांगितलं.
'कितीही झालं तरी आपण परत आपल्या आई बाबांना कॉल करू शकतो आणि ते नेहमीच आपली इतकी काळजी करतात' या विचाराने त्याला थोडं बरं वाटलं. आणि गेल्या काही दिवसांत त्यांना साधा फोनही केला नाही याचं त्याला वाईटही वाटलं. बराच वेळ घरी बोलून त्याने फोन ठेवला. रात्र झाली होती. त्याने पुन्हा एकदा फोन चाळवला. कुठल्याही क्षणी तिचा फोन येईल असं त्याला वाटत होतं. गेल्या काही दिवसांत तर तिच्या सतत येणाऱ्या फोनची त्याला सवयच झाली होती. तरीही उगाच आपण सेंटी होतोय असं त्याला राहून राहून वाटत होतं.
त्याने लॅपटॉप उघडला आणि काहीतरी काम करायला सुरुवात केली. पण लक्ष असेल तर ना? रितू दिवसभर प्रवासात होती त्यामुळे तिच्याशी संपर्क होणेही शक्य नव्हते. 'कदाचित तिच्याशी नुसतं बोलल्यावरसुद्धा बरं वाटेल असं त्याला वाटलं. फक्त आपण तिच्याशी बोलू शकत नाहीये म्हणून अस्वस्थ वाटत असेल' त्याने स्वतःला अजून समजावलं. ती नसताना रोज आपण काय करायचो हेही त्याला आता आठवावं लागत होतं. दोन महिन्यात इतका बदल कसा काय झाला हेच त्याला कळत नव्हतं. उगाच त्याने फेसबुक उघडलं, लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, फोटो लाईक केले. पण मन लागत नव्हतं. जितका तो टाळत होता तितका अजून तिला आठवत होता. उशीर झाला तरी चालेल पण तिच्याशी बोलूनच झोपायचं असं त्याने मनोमन ठरवलं. ती ठीक आहे कळल्यावर आपल्याला इतके काही वाटणार नाही असं त्याला वाटत होतं. त्याने ऑनसाईटच्या माणसाचा नंबर शोधून काढला आणि त्याला फोनही केला. त्याने सांगितले अजून दोन तासात ती पोहोचेल. पुढचे दोन तास कसेबसे त्याने काढले.
बरोबर दोन तासांनी त्याने पुन्हा इंटरनॅशनल कॉल लावला. यावेळी आवाज रितूचाच होता. तिचा आवाज ऐकून जणू त्याला 'धस्स' झालं. एका दिवसांत आपण तिला इतकं मिस केलं हे त्याला तिच्या एकदा कानावर पडलेल्या आवाजावरून कळलं होतं. दिवसभरात वेगवेगळ्या क्षणी ती कशी त्याला आठवली ते सारं झरझर डोळ्यांसमोरून गेलं. पुढे ती जे काही बोलली त्याकडे त्याचं लक्ष होतंच कुठे? आता तिच्याशिवाय आपण कसे जगणार हा विचार करून त्याला काहीच सुचत नव्हतं. निदान अजून एक वर्षभर तरी ती तिकडेच राहणार होती. आणि असेही नुकत्याच तिकडे पोचलेल्या रितूला 'परत ये' म्हणून तरी कसं सांगणारहोता तो? आपण एकटे असताना खरंच किती निवांत होतो हे त्याला आठवत होतं, पण आता उशीर झाला होता. तो प्रेमात अडकला होता आणि पडलेल्या पेचातून बाहेर पडणं सोपं जाणार नाही हेही त्याला कळलं होतं. तो तिला फक्त इतकंच बोलला, 'I miss you!' आणि त्याने फोन कट केला. त्याचे डोळे भरून आले होते. त्यात तिचा आवाज ऐकला याचा आनंद किती आणि ती नसण्याचं दुःख किती हे सांगणं अवघड होतं.
कधीही लक्ष न देणाऱ्या आनंदला आज गाणं ऐकू येत होते. मागे टीव्ही वर गाणं चालू होतं,"इष्क मुबारक, दर्द मुबारक".......
विद्या भुतकर.