रितू हादरली होती, मुळापासून की काय म्हणतात ना तसं ! आयुष्यात जास्तीत जास्त एखाद्या प्रॉजेक्ट मध्ये त्रास झाला म्हणून रडली असेल किंवा चांगले मार्क मिळाले नाही म्हणून. काही वेळा आनंद सोबत नव्हता तेंव्हाही. पण हे असं काही जग उलथवून टाकणारं घडलं नव्हतं. कितीतरी वेळ ती त्या 'टेस्ट' कडे बघत होती आणि मधेच रडत होती.
आनंदही बराच घाबरला होता. मुळात हे असं काही होऊ शकतं याचा विचारच त्याने केला नव्हता. त्यामुळे त्याच्यापुढे काय करायला हवं हेही कळत नव्हतं त्याला. त्याने रितूला समजावण्याचा प्रयत्न केला.
"अगं यात लिहिलं आहे की ती टेस्ट इतकी ऍक्युरेट असतेच असं नाही. आणि असं होण्याची शक्यता नाहीयेच ना. तुला तर माहितेय आपण योग्य ती काळजी घेत होतोच. हे बघ तुला हवी तर मी अजून एक टेस्ट आणलीय. ती चेक करून बघ. "
तिला थोडी आशा मिळाली. तिने दुसरीही टेस्ट करून पाहिली पण जे व्हायचं ते झालंच होतं. यात आता बदल काही होणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. दिवसभरात कितीतरी वेळा तिने मनात उजळणी केली होती असे कसे चुकलो आपण, का नाही थांबवलं स्वतःला आणि त्यालाही, इतकं काय बिघडणार होतं अजून दोन महिन्यांनी, या आणि अशाच अनेक विचारांची. पण ते फक्त प्रश्न होते आणि त्यांना उत्तर काहीच नव्हतं. फक्त प्रश्न होता मोठा, "लोक काय म्हणतील?". आता लोकांमध्ये घरचेही आलेच. त्यांना काय सांगणार? बरं अजून घरी जाऊन लग्नाचाही विषय काढला नाहीये. त्याच्यावर किती रामायण होईल माहित नाही आणि ते सर्व सोडून थेट मूलच? डोक्यात विचारांची नुसती गर्दी झाली होती. तिकडे आनंद तिला थोडं शांत करत होता, मधेच जेवण बनवत होता. तिला सर्व दिसत होती त्याची धडपड तिला जपण्याची. पण पुढे काय करायचं यावर दोघांनाही काही बोलता येत नव्हतं.
कसेतरी दोन घास घेऊन तिने झोपण्याचा प्रयत्न केला. पण झोप लागणं अशक्य होतं. कितीही सपोर्ट हवा असला तरी आज तिला आनंदचा स्पर्शही नको होता. ती तिच्या रूममध्ये जाऊन पडून राहिली. त्यालाही तिला विचार करायला वेळ देणं आवश्यक होतं. त्याच्या मनातही काही कमी गणिते चाललेली नव्हती. आपण ही प्रेग्नन्सी कंटिन्यू केली तर अंदाजे कधी बाळ होऊ शकत याची माहिती नेटवर पाहिली. साधारण जायला दीड महिना बाकी होता. तो जमा करून घरी जाऊन लगेच लग्न केले तरी मूल पुढच्या सहा-सात महिन्यांत झाले असते. तोवर तिलाही बाकी लोकांपासून हे लपवून ठेवता आलं नसतं. घरी जाऊन लग्न करण्यासाठी निदान दोन महिने तरी गेले असते एकूण. बरं आता अचानक जायला विचारावं तर मॅनेजर असे थोडक्यासाठी लवकर परतही पाठवणार नव्हता. काम पूर्ण केल्याशिवाय निघणे अशक्य होते. बरं घरी काही इमर्जन्सी नसताना का सोडतील तेही? मोठा पेचच पडला होता. त्याने अनेक शक्यता पडताळून पाहिल्या आणि मनाशी काहीतरी निश्चित करून तो झोपून गेला.
सकाळी दोघांनाही ऑफिसला जायची इच्छा नव्हती. तिला या सर्वातून मार्ग काढायचा होता. पण घरी बसून तरी नुसते विचार मनात येत राहतील म्हणून ते दोघेही ऑफिसमध्ये जाऊन बसले. तिने अनेक गोष्टी नेटवर सर्च केल्या. बाळ कधी होऊ शकते, इथे राहिले तर डॉक्टरकडे जाऊन काय काय चेक केले पाहिजे, लोकांना दिसण्याइतपत तिचे पोट कधी मोठे होते. पुढचे काही दिवस उलट्या वगैरे झाल्या तर कुणाला काय उत्तर द्यावं असंही एक टेन्शन होतं तिला. त्याच्यासारखेच घरी काय सांगायचे, लग्न करायचे तर कधी हे सर्व विचार ती करत राहिली. प्रत्येकवेळी विचार करताना तिला हेच डोक्यात येत होते की जे झाले ते झाले पण यातून मला बाहेर पडायचे आहे. ते निभावून न्यायचे नाहीये. आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार तिने करायला सुरुवात केली. आनंद दुपारीच घरी निघून गेला होता. तिला मैत्रिणीने घरी सोडले.
घरी गेली तर आनंद सर्व आवरून, जेवण बनवून खुशीत बसला होता. त्याने तिला चहा करून दिला. ती जरा बावरली. आपलं काय चाललंय आणि हा काय करतोय असा विचारही मनात येऊन गेला. त्याने तिला चहा घेऊन दिला आणि सोफ्यावर बसवून बोलायला सुरुवात केली,"हे बघ, आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं आहे यात मला तरी शंका नाहीये. तुला आहे का?", त्याने विचारलं.
तिचं लक्ष नव्हतं. ती त्याच्या प्रश्नाने भानावर आली. "आं!". तिने नकारार्थी मान हलवली.
तो मग समजावू लागला,"आपल्याला जर सोबत राहायचंच आहे तर मग इतका का विचार करायचा? का टेन्शन घेतेस?".
ती," अरे पण घरचे नाही म्हणाले तर?"
तो,"तू गप्प बसणार आहेस का?"
ती,"तसं नाही रे पण त्यांना हे सगळं कसं सांगणार आपण स्वतःहून?".
तो,"हे बघ आपल्याला लग्न करायचंच आहे तर इथेच करू ना? मी विचार केला तिकडे जाऊन लग्न होईपर्यंत तुझे अडीच तीन महिने होतील. आपण ते इतके दिवस कुणाला न सांगता राहू शकत नाही. मग इथेच लग्न करू आणि घरच्यांना फोनवर सांगू किंवा तिकडे गेल्यावर समजावू. मी सर्व माहिती काढलीय. आपल्याला इथे १५ दिवसाच्या आत लग्न करता येईल अगदी हिंदू भटजींकडून." आपण सर्व माहिती कशी सविस्तर दिली यावर तो खूष झाला होता. इथेच लग्न करायचे म्हणजे मग तिकडे गेल्यावर सांगितले तरी काही प्रॉब्लेम नाही. "
तिच्या विचारांपलीकडचे होते सर्व. या अशा मोठ्या गोष्टीत निर्णय घ्यायची वेळ कधी आलीच नव्हती तिच्यावर. त्यामुळे अशावेळी काय करावं याचा ती हजारवेळा विचार करत होती. एक चूक झाली होती आणि त्यापुढे दुसरी नको इतकेच तिचे म्हणणे होते.
त्याला बोलताना ऐकल्यावर तिला जाणवलं 'मला हे नकोय', लग्न, लगेच ७-८ महिन्यांत मूल, का कशासाठी? लग्नाची, पुढच्या संसाराची कितीतरी स्वप्नं तिने पाहिली होती, अर्थात त्या स्वप्नांत एक बाळ होतंच पण सुरवात त्याने होत नव्हती. आणि सर्व गोष्टी त्या बाळाच्या भोवती फिरत नव्हत्या. त्यात दोघांच्या करियरमध्येही बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि हे सर्व तिला करायचं होतं कुठलेही लादलेले निर्णय न घेता.
तिने आनंदला सांगितले," खरं सांगू का मला यातलं आता काहीच नकोय. मला मान्य आहे जे झालं त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा पण लग्न असं घाईत करणे हा त्यातला एक नक्कीच नाही. मला आपल्या घरच्यांसोबत रीतीने लग्न करायचं होतं आणि आहे. माझे सर्व लाड करवून घ्यायचे आहेत आणि बरंच काही. आपलं करियर आहे, दोघांना अजून आपला असा वेळ हवा आहे. ते सर्व सोडून आपण असं घाईत लग्न करून लोकांना त्याचं स्पष्टीकरण का द्यायचं? मला वाटतंय की मला ही प्रेग्नेंसी नकोय."
तिच्या या निर्णयावर काय बोलावे त्याला कळेना. ती असेही बोलू शकते असा विचार त्याने केलाच नव्हता. पण आता तिने स्वतःच सांगितलं आहे तर तिच्या मताला पूर्णपणे मान्य करायचं त्याने ठरवलं.
"ओह! मला वाटत होतं मी एक मुलगा म्हणून शारीरिक फरक पडत नाही पण तुला स्वतःसाठी असा काही निर्णय घ्यायचा असेल की नाही काय माहित म्हणून मी बोललो नव्हतो. पण तुलाच नको असेल तर मला काहीही हरकत नाहीये. शेवटी हे सर्व तुला पार पाडावे लागणार आहे. मी सोबत असलो तरी त्यातून तू स्वतःच जाणार आहेस."
तिलाही ते पटलं होतं. त्या दोघांनीही अबॉर्शन बद्दल माहिती काढायला सुरुवात केली.
तिला जसे माहिती काढेल तशी अजून चीड येत होती अनेक लोकांच्या अनेक मतांचा. एक स्त्री म्हणून तिने कसा बाळाचा जन्म पवित्र मानला पाहिजे किंवा अनेक देशातले अनेक कायदे जे स्त्रियांना अबॉर्शन करायला बंदी आणत आहे. अगदी भारतातला कायदाही वाचला तिने. आपण सध्या अमेरिकेत आहे याबद्दल तिने एक मोकळा श्वास घेतला. पण तोही काही काळापुरताच होता. तिथेही अनेक लोक आहेतच जे 'प्लॅन्ड पेरेंटहूड' सारख्या संस्थांच्या विरोधात आहेत. राग याचा येत होता की सेक्स मध्ये दोघांचाही तितकाच हिस्सा होता पण केवळ आपण तो भ्रूण पोटात वाढवू शकतो म्हणून त्यात अडकून पडलो आहे आणि पुरुष मात्र नामनिराळा राहतो. उद्या त्यालाच जर हे मूळ स्वतःच्या पोटात वाढवावे लागले तर एखादा करेल का मान्य? मूळ वाढवणे किंवा नाही हा दोघांचा निणर्य असला तरी ते दोघांच्या पोटात वाढत नाही. मग त्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार तिच्यापासून कायद्याने का काढून घ्यावा? तिने एका संस्थेत कॉल करून माहिती घेतली काय केले पाहिजे याची. पुढचे दोन दिवस कसेतरी पुढे ढकलले आणि शनिवारी सकाळी ती आनंदसोबत आपल्या अपॉईंटमेन्ट साठी गेली.
बाहेरच अबॉर्शन विरोधात असणारे लोक मोठ्याने घोषणा देत होते. आत जाऊन सिक्युरिटी गार्डकडून चेकिंग झाल्यावर दोघेही आत गेले .ती नर्सशी बोलली. तिने सांगितले ६ आठवडे होऊन गेले आहेत बाळाला. सोनोग्राफी मध्ये बघायचे आहे का तेही विचारले. पण रितूला ज्यात मन नाहीयेच ते बघायचेही नव्हते. तिने नकार दिला. वाट बघायला सांगून नर्स निघून गेली. थोड्या वेळात डॉक्टर आली आणि तिने सर्व माहिती तपासून घेतली. तिला ऍबॉर्शन साठी लागणाऱ्या गोळीची माहिती दिली. काय काय होईल, काय करायचे हे सर्व सांगितले. तिने सर्व नीट ऐकून घेतले. बाहेर आनंद वाट बघत होता. ती त्याच्यासोबत सर्व गोळ्या घेऊन निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोळी घेतली की सर्व संपले. पुन्हा मग त्यांचे आयुष्य पूर्ववत होणार. रात्रभर ती विचार करत राहिली. त्याला विचारलंही,"तुला खरंच नकोय ना हे सर्व? नक्की सांग." त्याने तिला नकार दिला. सध्या तुझ्यासाठी जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊयात आपण. मी तुझ्यासोबत आहेच. तिचा निर्णय पक्का होताच.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिने औषधे घेतली. तिला चक्कर येत होती, रक्तप्रवाह जास्त होत होता पाळीच्या वेळी. पण हे सर्व अपेक्षित होते म्हणून डॉक्टरने सांगितले होतेच. पाली सुरु झाल्यावर रितुने सुटकेचा श्वास घेतला. पुढचा आठवडा मग आनंदने तिची पूर्ण काळजी घेतली. त्याच्यासोबत असल्यानेच ती हे सर्व निभावून नेऊ शकली होती. कुणाशीही बोलायची इच्छा होत नव्हती तिची. आठवड्यात ठीक होऊन तिने ऑफिसला जायला सुरुवात केली. आनंदलाही सर्व ठीक झाल्याचे समाधान होतेच. "आता आपण परत गेलो की सर्वात आधी लग्न पार पाडायचं आणि मगच बाकीचं" असे त्याने स्वतःला आणि तिलाही समजावून सांगितले होते. त्यांनी जायची तयारी सुरूही केली होती.
वरून सर्व ठीक वाटत असलं तरी रितू थोडीशी शांत झाली होती. या इतक्या मोठया धक्क्यातून सावरायला वेळ लागणारच ना? असा विचार करून आनंदही जास्त काही बोलत नव्हता. ती मधेच काहीतरी विचार करत शांत बसायची. अर्थात आता त्यांचे शारीरिक संबंधही नव्हतेच. त्याच्यासोबत हात धरून बसणे किंवा त्याच्या आधाराने सोफयावर पडून राहणे हेही आता होत नव्हतं. कितीही मिस केलं हे सर्व तरी तो तिला आता स्वतःहून विचारणार नव्हताच. तिला सावरायला हवा तितका वेळ घेऊ द्यायचा असे त्याने ठरवून टाकले होते. घरी जाऊन थोडे दिवस राहिली, सर्व लोकांना भेटली की बॅरो होईल अशी खात्री होती त्याला. निघायला आता फक्त एक आठवडा राहिला होता.
एका रात्री कॉल संपल्यावर रितू कॉफी घेत बाहेर बसली होती, पुन्हा एकदा विचार करत. इतका वेळ ती काय करत आहे हे बघायला आनंदही बाहेर आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याने विचारलं," काय झालं रितू? कसला विचार करत आहेस? जातोय ना आता ४ दिवसांत घरी? होईल सर्व ठीक." त्याच्या आवाजातल्या काळजीने तिला वाईट वाटलं. किती काळजी करतो हा आपली? पण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं.
ती बोलू लागली," आनंद मला तू सहा महिन्यापूर्वी आला होतास तेव्हा जे वाटलं होतं ना? तसं वाटत नाहीये गेल्या काही दिवसांत. किती खूष होतो आपण ! गेल्या काही दिवसांत सर्व हरवलंय असं वाटत आहे. आपण गेल्यावर लगेच लग्न करूही पण आज जे वाटत आहे ना ते तसंच वाटत राहिलं तर? पुढे जाऊन फक्त हे सर्व झालंय म्हणून लग्न केलंय असं वाटलं तर? तेंव्हा काय करणार? आज हे सहा आठवड्यांचं फीटस होतं म्हणून काढू शकलो. लग्न, आपलं नातं कसं ऍबॉर्ट करणार? मला वाटतं आपण एक ब्रेक घ्यावा. मला या सर्व गोष्टींवर विचार करायला वेळ हवा आहे."
गेल्या दोन महिन्यांत जे काही झालं त्यानेही इतका हादरला नव्हता तितका तिच्या या बोलण्याने हादरला होता. आज पर्यंत तिच्या प्रत्येक पायरीवर तो तिच्या सोबत होता. जिच्या प्रेमामुळे आपले ठरवलेले मत बदलून तो अमेरिकेत आला, जिच्या सोबत इतक्या मोठ्या घटनेतून पार पडला, परत जाताना तीच त्याच्या सोबत राहणार नव्हती. इथे येऊन आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली की काय असे वाटून तो स्तब्धपणे बसून राहिला.
क्रमश:
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment