आनंद खरंच आपल्यासमोर आहे आणि सोबत आहे यावर कितीतरी वेळ रितूचा विश्वास बसत नव्हता. कितीतरी वेळ हरखलीच होती ती. नुसती हसत होती वेडयासारखी छोट्या-मोठ्या कारणाने. दिवसभराच्या उत्साहात काम करण्यात लक्ष कुठे होतं तिचं? कसंबसं काम संपवून ती त्याच्यासोबत ऑफिसमधून बाहेर पडली. तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व सामान हॉटेलवर ठेवूनच तो ऑफिसला आला होता. त्याला ती आपल्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यावर समोरच तिने सकाळी घाईत टाकलेला ड्रेस पडला होता, सिंक मध्ये भांडी तशीच. असाही एकटा जीव, कोण येणार आणि कुणासाठी आवरायचं? तिला ओशाळल्यासारखं झालं. तिने घरात येऊन पटापट कपडे गुंडाळून रूममध्ये टाकले. त्याला बसायला सांगून किचनकट्ट्यावरील भांडी सिंकमध्ये ठेवली आणि चहा करायला ठेवला आणि त्याच्यासमोर जाऊन बसली.
त्याच्या डोळ्यांत झोप दाटून आली होती. प्रवासाचा थकवा जाणवत होता. तिने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. त्याने हलकेच हाताने 'शेजारी बैस ना' अशी खूण केली. ती समोरून उठून त्याच्याशेजारी बसली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि ती शहारली. त्याचा हाताचा स्पर्श, त्याचं डोळ्यांत रोखून बघणं तिला आरपार कापत होतं. 'I missed you' म्हणत त्याने तिच्या खांदयावर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू गळत राहिले. दोन क्षणांतच ते जणू सर्व जग विसरून गेले होते. आणि इतक्या दिवसांत आपण कशाची वाट बघत होतो हेच त्यांना कळत नव्हतं. ती दचकली ती उतू जाणाऱ्या चहाच्या आवाजाने. पट्कन जाऊन तिने चहा शेगडीवरून उचलला आणि शेगडी बंद केली. चहा गाळून ती घेऊन आली तोवर त्याची झोप लागली होती. जेटलॅगचा परिणाम किती असतो हे तिला चांगलंच माहित होतं. त्याला उठवणं अशक्य होतं. तिने रात्रीच्या जेवणासाठीही त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ होता. त्याला सोफयावर झोपू देऊन ती झोपून गेली. आज तो आपल्यासोबत एका घरात आहे यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता.
संध्याकाळ पासून झोपल्याने आनंदला पहाटेच जाग आली. थोडा वेळ लागला आपण कुठे आहोत हे समजायला. पण त्याने उठून घरात एक चक्कर मारली. भूक लागल्याने किचनमध्ये पाहिलं तर त्याच्यासाठी तिने थोडे फार खायचे सामान कट्ट्यावर काढून ठेवले होते. त्याने हसून थोडंसं खाऊनही घेतलं आणि रितूच्या उठण्याची वाट बघू लागला. सकाळी रितू उठली आणि तिची थोडी धावपळ झालीच. एक तर आवर्जून तयार व्हायचं होतं त्यानंतर त्याच्या हॉटेलवर जाऊन त्याला तयार होऊन ऑफिसला पोहोचायचं होतं. तिला सर्व सराईतपणे करताना पाहून त्याला किती छान वाटत होतं. गाडी शिकतानाची तिची भीति, नविन गाडी घेताना असलेल्या शंका, या सगळ्यांत तो तिला धीर देत असायचा. आणि आता पहिल्या दोन-चार दिवसातंच आनंदला तिने सर्व गाव फिरवून दाखवलं. कधी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन गेली. आजूबाजूच्या लोकांचे, ऑफिसचे कशाचेच भान दोघांना नव्हते. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असावं.
आता या आठवड्यातच त्याला हॉटेलमधून बाहेर पडावं लागणार होतं. त्याने दोन तीन ठिकाणी चौकशी केलीही होतीच. पण सगळीकडे वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट होतेच. एखाद्याच्या रूमवरच राहावे असाही विचार करून झाला होता. पण रितूसोबत घालवायच्या वेळात ही असली कामे करण्यात त्याला अजिबातच इंटरेस्ट नव्हता. शनिवारी रितूनेच विषय काढला, "तू माझ्यासोबत राहशील का? ". तिच्या या प्रश्नाने तो तर उडालाच. ती पुढे बोलत होती,"माझे ट्रान्झिशन ३-४ महिन्यात होईल. नवीन माणसाचा व्हिसा हे सर्व होऊन येईपर्यंत इतका वेळ तर जाणारंच आहे. मीही एकटीच राहते. उगाच कशाला दोघांनी वेगळे घरभाडे भरायचे? शिवाय इथेही २ रूम आहेतच. माझे आहे ते कॉन्ट्रॅक्ट संपवून परत जाऊ आपण." तिचं म्हणणं बरोबर होतं. दिवसभर आणि रात्रीही बराच वेळ ते सोबतच असायचे. खरंतर त्याला कुणा रूममेटसोबत राहून तिच्यासोबत घालवायचा वेळ कमी करायचा नव्हता. त्यामुळे कितीही दचकला असला तरी त्यालाही हे चालणार होतं. फक्त प्रश्न एकच होता, "लोक काय म्हणतील?".
"लोक काय म्हणतील?" कितीतरी वेळ ते दोघे विचार करत होते. कितीही घरापासून दूर असले तरी शेवटी आसपासचे सर्कल तेच असते. तेच कंपनीतील लोक, त्यांच्याशी बोलणारे भारतातील ओळखीचे लोक. अशा बातम्या पसरायला वेळ लागत नाही आणि तुम्ही कुठेही असला तरी ते टाळू शकत नाही. शिवाय दोघांचे घरचेही होतेच. त्यांना काय सांगणार होते? एक भारतीय म्हणून कितीही भारतातून दूर राहिले तरी हे असले प्रश्न आपल्या भारतीय असल्याची आठवण करून देतात. असो. प्रेमात वेडेपणा करणारे ते एकटेच नव्हते आणि पहिलेही. त्यामुळे लवकरच सर्व सामान घेऊन आनंद रितूसोबत शिफ्ट झाला होता. रितूने घरी काही विषय काढलाच नाही आणि आनंदनेही खोटेच कारण सांगितले होते. पण तिच्यासोबत राहण्याच्या एकसाईटमेन्ट समोर असे छोटे विषय जास्त वेळ डोक्यात राहिलेही नाहीत. त्याची रूम सेट करण्यात पुढचा अख्खा आठवडा गेला होता.
कुठल्याही गोष्टीच्या नवेपणात ज्या आठवणी गोळा होतात ना त्या कशातही नसतात. नवं प्रेम असो किंवा नवं लग्न किंवा नुकतंच जन्मलेलं बाळ. सुरुवातीच्या दिवसांतल्या काही गोष्टींतच आयुष्यभराच्या आठवणी आपण जमवतो. आणि पुढे आयुष्यात काहीही झाले तरी त्या आठवणी कधीही विसरल्या जात नाहीत. असेच चालू होते त्यांचे ते नव्याचे नऊ दिवस. आनंदही अनेक वर्षं अमेरिकेत राहिल्याने तिथल्या आयुष्याची त्याला चांगलीच कल्पना होती. त्यामुळं रोज सकाळी आवरून घाईत नाष्टा करून जाण्यात, संध्याकाळी एकत्र जेवण बनवण्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र फिरायला जाण्यात सर्व वेळ जायचा. जणू लग्नानंतरच्या आयुष्याची एक झलकच होती ती.
हे सर्व असले तरी दोघांनाही संध्याकाळी झाली की थोडे अस्वस्थ वाटायचेच. दोघांनाही संध्याकाळी एकमेकांशी बोलण्यासाठी ऑनलाईन राहायची सवय लागली होती. सुरुवातीचे काही दिवस दोघेही अगदी नियमाने सर्व वेळेत करायचे. पण नव्याचे नऊ दिवस संपले आणि हळूहळू ते दोघेही संध्याकाळी आपले लॅपटॉप घेऊन बसू लागले. एकमेकांसोबत बोलताना ते बाकी मित्र-मैत्रिणींशी बोलायचे, त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलू लागले. दोघे एकमेकांशेजारी असूनही संध्याकाळचा तासभर तरी त्यात जायचाच. कधी दोघेही टीव्ही बघत बसायचे आणि रात्री उशिरा जेवण बनवायचे. त्यात अजून एक त्रास होता तो म्हणजे रितूला वेळी अवेळी येणाऱ्या ऑफिसच्या कॉल्सचा. अर्थात ते असणार हे दोघांनाही माहित होतंच. तिला जाण्याआधी बरीच कामे पूर्ण करायची होती. त्यामुळे भारतातून येणारे कॉल्स शक्यतो रात्रीच असायचे.
असेच एक दिवस संध्याकाळी सुरु झालेले तिचे कॉल्स रात्री उशिरा पर्यंत चालले आणि बाहेर येऊन पाहिले तर आनंदही मित्राशी चॅट करत बसला आहे. जेवायलाही काही शिल्लक नव्हते. तिची फार चिडचिड झाली. .तिने त्याला थोडे रागानेच विचारले,"आनंद जेवण कधी बनवायचे आहे?". तिचा टोन पाहून त्यानेही लगेच गप्पा थांबवून किचनमध्ये धाव घेतली. आता रात्रीचे अकरा वाजले होते आणि आता यापुढे 'काय बनवायचे?' हा त्याचा प्रश्न ऐकून तर तिचा बांधच फुटला. "मला भूक लागली आहे अरे ! आता कधी बनवणार आणि कधी खाणार? बाहेर पण सर्व बंद असेल आता. " असे म्हणत तिने रडायला सुरुवात केली. त्याला अचानक तिचे रडू पाहून काय करावे ते कळेना. त्याने तिला सोफयावर बसवले आणि समजवायला सुरुवात केली, "अगं विवेक होता. किती दिवसांनी बोलत होतो. वेळ कसा गेला कळेलच नाही. सॉरी ! थांब मी मॅगी करतो ५-१० मिनिटांत होईल." तो घाईने कामाला लागला. पटापट मॅगी बनवून तिला आणून दिली. पहिले दोन-चार घास तर तिने घाईनेच खाल्ले. पॉट थोडं शांत झाल्यावर तिने वर पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं अजून त्यानेही काही खाल्लं नाहीये.
ती मग हळूच बोलली," तूही घे ना."
"नाही नको. तुला अजून लागलं तर संपलंय म्हणून अजून रडशील.", त्याने गमतीने तिला चिडवलं.
"एव्हढी काही खादाड नाहीये हां मी."तिच्या आवाजावरून ती शांत झाल्याचं कळत होतंच.
"अरे एकतर ते कॉल्स संपत नाहीत. इतके फालतू प्रश्न विचारत राहतात. अभ्यास करून या म्हटलं तर काहीही न वाचता येतात आणि सर्व मी आयतं सांगावं अशी अपेक्षा करतात." तिच्या डोक्यातलं सर्व बाहेर पडत होतं आणि तो बसून ऐकत होता.
"बसून बसून पाठ दुखायला लागली. उद्या सकाळी पण लवकर जायचंय. त्यात ही पोटदुखी. मला त्रास होतो फार पिरियड्स चा. आज संध्याकाळी जाऊन पॅड्स आणायचे होते. ते करायलाही जमलं नाही. आता कधी जाणार?" तिच्या आवाजात आता पुन्हा रडू दाटून येत होतं. मुख्य म्हणजे दोन महिन्यात तिने कितीही झालं तरी तिच्या या गोष्टी त्याच्यापासून राखूनच ठेवल्या होत्या. आपल्या पिरियड्स बद्दल त्याला उगाच का सांगावं म्हणून. कितीही जवळचा म्हटलं तरी ती अजून मोकळेपणाने त्याच्याशी यावर कधी बोलली नव्हती आणि असेही एकत्र राहीपर्यंत या सर्व गोष्टी सांगायचा प्रश्न येतोच कुठे? तिने खाऊन डिश सिंकमध्ये ठेवली. तो लगेच तिच्यामागे आलाच.
"हे बघ तू झोप आता मी जाऊन येतो फार्मसी मध्ये. तुला काय हवं आहे ते सांग मला.", आनंद बोलला.
'बाप रे आता याला पॅड्स पण आणायला सांगायचे? ' तिचं मन कचरत होतं.
ती म्हणालीही, "नाही अरे असू दे. तू सोबत ये पाहिजे तर. २४ तास फार्मसी मध्ये मिळतील. तू फक्त सोबत चल."
त्याने तिला गप्प केलं. "हे बघ एकतर तुला काही झेपत नाहीये. त्यात कुठे अजून इतक्या लांब येतेस. शांतपणे घरी बस मी जाऊन येतो. तो आपले ऐकणार नाही हे कळल्यावर ती गप्प बसली. त्याला पॅड्स चे नाव सांगितले आणि कुठे ठेवलेले असतील हेही आणि सोफयावर पडून राहिली.
बाहेर पडल्यापासून पंधरा मिनिटांतच त्याचा फोन तिला आला,"अगं हे किती काय प्रकार आहेत, मला काही कळत नाहीये. तू सांगितलेल्या कव्हरच्या रंगाचेही २-४ दिसत आहेत." तिला हसू आलं. तिने त्याला अजून डिटेल्स सांगून त्याने काहीतरी घेतले आणि तो तिथून निघाला. 'आपण घेतले ते बरोबर असू दे रे बाबा' अशी एकच प्रार्थना तो मनात करत होता. तो घरी आल्यावर त्याने तिला ते पॅड्स दिले आणि किचन आवरायला घेतले. रात्रीचा एक वाजत आला होता. त्या ते सर्व आवरताना पाहून तिला भरून आलं आणि त्याच्यावर प्रेमही. त्याने येताना एक आईस्क्रीमचा डब्बाही आणला होता. आवरून दोन वाट्यांमध्ये आईस्क्रीम घेऊन तो तिच्यासोबत बसला.
खाता खाता मधेच बोलला, "रितू, आपण दोघे चांगले मित्र म्हणून राहतो आणि रूममेट म्हणूनही. उद्या माझ्याजागी मुलगी असती तर तिला तू सांगितलं असतंच ना तुला काय होतंय? तिने मान डोलावली.
"मग मला सांगायला काय हरकत आहे? " त्याने विचारलं. "यापुढे हे असले काही लपवून ठेवायचे नाही. प्रत्येकाच्या शारीरिक गरजा असतात. तुला मी रोज केस विस्कटलेल्या अवतारात पाहतो आणि आवरलेल्याही. प्रत्येकवेळी तू चांगलीच दिसावीस अशी काही माझी अपेक्षा नसते. तसेच तुला काही बरं नसताना किंवा अजून काही असेल तर मला तू सांगितलंच पाहिजे. उद्या मला ताप आला तर तू नाही करणार का माझं? बरोबर ना? ", तिला त्याचं म्हणणं पटलं होतं. "आईस्क्रीम छान आहे रे" म्हणत तिने अजून एक चमचा मागितलं. आज जेवणापेक्षा त्याच्या बोलण्यानेच तिचं पोट भरलं होतं.
क्रमश:
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment