माणसाचं मन कशाकशात अडकलेलं असतं, नाही? आज एक नवीन वही घेतली नवीन वर्षात काहीतरी लिहायला. नव्या वहीच्या पहिल्या पानावर लिहायची अधीरता आणि चुकूनही एखादी चूक होऊ नये म्हणून घेतलेली खबरदारी दोन्हीही पुन्हा नव्याने जाणवत होतं. असो. शाळेत किती छोट्या छोट्या गोष्टीत मन अडकलेलं असायचं आठवूनही हसू येतं. चित्रकलेचे खडू, काळा स्केचपेन, कंपास, एखादं पेन, वहीच्या पानात जपलेल्या मिक्स शेड्स च्या गुलाबाच्या पाकळ्या आणि मैत्रिणीशी देवाणघेवाण करून मिळवलेलं मोराचं पीस, अशा अनेक छोट्या वस्तू, पण किती मौल्यवान!
सानूकडे एक छोटीशी पेटी आहे तिनेच रंगवलेली. त्यात तिनेही अशाच बारीक-सारीक गोष्टी ठेवलेल्या आहेत. स्वनिकने हात लावला की भांडण ठरलेलं. ती भांडते आणि तितक्याच आवेशाने काढून घेऊन जपून ठेवते. अशावेळी वाटतं तिला काय सांगणार? आपण तरी काय वेगळे आहोत? आता त्याच 'छोट्या' गोष्टी थोड्या 'मोठ्या' झाल्यात इतकंच. आणि त्यात एक स्त्री म्हणून आपलं मन जरा जास्तच गोष्टीत गुंततं असं मला वाटतं.
सगळ्यात जास्त जीव त्या कपड्यात असतो. साड्या, चुडीदार, लग्नाची साडी, लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेली साडी, अमुक-तमुक साडी, अशा अनेक. माझे बरेच ७-८ वर्षं जुने चुडीदार आहेत सांभाळून ठेवलेले. आता फारसे वापरले जात नाहीत, पण त्यांना कुणाच्या हातातही देववत नाही. बरं, नुसते माझे कपडे आहेत का? पोरांच्याही कपड्यात जीव अडकलेला असतो. ते जन्मले तेंव्हाचा, पहिल्या वाढदिवसाचा, कधी आजी दिलेला, कधी स्वतःला आवडतो म्हणून घेतलेला पण पोरांनी कधीच न घातलेला. ते कुणाला द्यायचे म्हणजे काळजाचा तुकडाच देतोय असं वाटतं. आजपर्यंत अनेक कपडे दिलेही असे कुणा-कुणाला, कधी बहिणीच्या मुलाला, मावशीच्या नातवांना, पुतण्याला. पण तरीही अजून काही खास आहेतच ते आजही जपून ठेवले आहेत. त्यांचं काय करायचं या विषयावर सध्यातरी विचार करत नाही. :) आमच्या आईने माझ्यासाठी बनवलेले टोपडे अजूनही जपून ठेवले आहे त्यामुळे या स्वभावात माझा दोष आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. (हा गुण कुठून आल्या कळलंच असेल. ;) )
कपड्यानंतर येतात दागिने, एखादे घड्याळ( माझी तर बंद पडलेली जुनीही आहेत अजून १२-१३ वर्षे जुनीही. ) एखादी पर्स अशा अनेक वस्तू. कधी म्हणून किंवा आवडली म्हणून ती वस्तू जवळची होते आणि कितीही खराब झाली किंवा जपून ठेवली तरी ती कुणाला द्यायची हिम्मत होत नाही. कधी बाबांची बॅग असते, आजीचा बटवा असतो तर कधी एखादी चप्पलही असते. या सर्व वस्तू तर ठीक आहेत, पण घरातल्या भांड्यांवरही जीव बायकांचा. :) २५ वर्षापूर्वीचे प्रोटीनएक्स चे पत्र्याचे डबे, बरण्या, एखादे आमटीचे भांडे, स्टीलचे एका आकाराचे डबे, अगदी बोर्नविटाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्याही जपून ठेवायची इच्छा होते एखाद्याला. आणि ते एकदा घरात राहिले आणि त्यावर जीव बसला की त्यांचं बाहेर पडणं मुश्किल. इथे कधी कधी हॉटेलातून जेवण मागवल्यावर जे प्लास्टिकचे डब्यात घालून ते देतात ना? ते डबेही सोडवत नाहीत. कधी एखादी छोटी डबी असेल कुणाला दिलेली असेल तर घरी येईपर्यंत चैन पडणार नाही. कुणाला वाटेल ती छोटीशी डबी तर आहे. पण त्यांतच आपला जीव असायचा. कुणी सांगावं? :)
जितका जीव अडकतो तितकेच सामान गोळा होत राहते. कुठलीही वस्तू घरातून टाकून देताना किंवा दुसऱ्याला देताना मन कचरते किंवा राहू दे म्हणून सर्व साचून तसेच राहते, वर्षानुवर्षे, असेच सानूच्या त्या छोट्या पेटीसारखे. आणि जितके दिवस ते सोबत राहिले तितका अजून त्यात जीव. बारीक सारीक वस्तू तर झाल्याच, मोठ्याही असतातच. एखाद्याचा जीव घरात असतो. ते घर मोठ्या मेहनतीने बनवलेलं असतं, त्यामुळे त्याला जीवापाड जपतात तर कुणाचा जमीनजुमल्यात. ती आपल्या ताब्यात आहे तोवर जीव तोडून त्याचं संरक्षण करतील. मला तर आमचे पुण्यातले घर इतके प्रिय आहे की मी संदीपला गमतीने म्हणतेही, मी गेल्यानंतरही तिथे राहीन. :)) तर एकूण काय की माणसांत तर जीव रमतोच पण या छोट्या मोठ्या गोष्टीत कधी अडकून पडतो कळतही नाही. एखादा म्हणेलही ही की ही सर्व मोह-माया आहे आणि यातून बाहेर पडणं म्हणजेच खरा मोक्ष आहे. ते सर्व मान्य आहे पण त्यात न अडकता जगण्यातही कुठे मजा आहे? लहानपणी छोट्या पेटीपासून सुरुवात होते आणि आपण मरेपर्यंत काही ना काही आपलं मन पकडून ठेवतंच. आणि ते असणंच आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं, नाही का?
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment