Saturday, January 21, 2017

दिसतात बरं !

        हे सौम्य शब्दांत कसं बोलायचं म्हणून इतके दिवस विचारायचं राह्यलं होतं. शब्द सापडले नाहीत म्हणून शेवटी स्पष्टच बोलते जरा. 

         आम्हालाही दिसतात बरं, पुरूषांचे ते वरचे बटण उघडल्यामुळे छातीवरचे केस. घामेजल्या अंगाने आळस देताना काखेतले घामाचे डाग. येतो वास आम्हालाही दोन दिवस अंघोळ न करता शेजारी बसलेल्या माणसाचा. दिसतात पायावरचे भरभरून केस, शॉर्ट घातलेली असताना. कधी दिसते ढेरीही, तटतटून पोटावर बसवलेल्या शर्टातून. जानवं आणि पंचा नेसून रस्त्यावरून जातानाही पाहिलेत बरेच आणि कसलीही लाज न बाळगता स्विमिंग पुलात पोहणारेही. पण यात कुठेही त्यांची स्वतःच्या शरीराची लाज दिसली नाही. अजूनही दिसत नाही.
          आम्हाला मात्र अजूनही ब्रा ची पट्टी आत घालावी लागते चुकून दिसली तरी. पॅन्ट प्रत्येक वेळी उठताना वर ओढावी लागते. पाय प्रत्येकवेळी बसताना क्रॉस करावे लागतात आणि खाली वाकून वाढताना ओढणी नीट करावी लागते. पाच वर्षाच्या मुलीलाही सरळ बस म्हणून सांगावं लागतं आणि थोराड मुलीला पळू नकोस, हळू चाल म्हणून. घातला छोटा स्कर्ट तर ओढावा लागतो हजार वेळा. पूलचं तर बोलूच नका.     
         दिसतात कधी हृतिक आणि सलमान शर्ट काढूनही. असतात एकेक फॅनही. दिसतो एखादा, शर्ट मधून मजबूत दंड दिसणारा आणि कळतो एखाद्याचा वट केवळ नजरेतला. आवडतो एखाद्याचा रुबाब आणि मिजासही. कळते एखाद्याची रुखरुख आपल्यासाठीची आणि काळजीही. येतो राग एखाद्याचा प्रचंडही, इतका की जीव घ्यावा. येतं एखाद्यावर प्रेम खूप, तरी लाख प्रयत्न करून मिळत नाहीही. पण म्हणून त्याचं पुरुषत्व ओरबडायला जात नाही, कुठेही. ना घरात ना रस्त्यावर. ना हातांनी ना शब्दांनी ना नजरेनी. 

आम्ही मात्र सर्व झाकून किंवा दाखवून गुन्हेगारच !

विद्या भुतकर.

No comments: