Tuesday, January 03, 2017

घर 'आपले'

        दहा दिवसांच्या सुट्टीनंतर घरी निघत असताना विमानातच स्वनिकची कुरबुर सुरु झाली. 'मला शाळेत नाही जायचंय, तिथे कुणी माझ्याशी नीट बोलत नाही', 'मला शाळा आवडत नाही', इ. इ. त्यावरून कळतंच होतं की त्याला आता घरी जायची इच्छा होत नाहीये. अर्थात सुट्टीनंतर कुणालाही ते वाटणारच. पण घरी पोचलो आणि सर्वात पहिली आश्चर्याची प्रतिक्रिया मुलांची होती. दोघेही, "homey I missed you !!" म्हणून ओरडत होते. थोडे दिवस झाले की सर्वांनाच घराची ओढ लागतेच, कुठेही असो. मोठे म्हणून आपल्याला जाणवते ते ठीकच पण मुलांनाही ते इतक्या तीव्रतेने वाटते हे पाहून आनंद वाटला. There is no place like home. :) आपलं घर कितीही लहान असो किंवा साधं असो, शेवटी ते 'आपलं' असतं. तर सुट्टीनंतर घरी आल्यावर आम्हीही जेवण करून दुपारी मस्त झोपून गेलो. अगदी दहा दिवस काहीही धावपळ ना करताही घरी आल्यावर एक झोप काढूनच काम करायला हुरूप आला. 
        कुठेही गेल्यावर घरी कुणी नसलं तरीही आपलं घर आपली वाट पहात आहे असं वाटतं. जिथे कुठे असू तिथे मन रमेनासं होतं. मलाच काय, आमच्या आईंनाही (म्हणजे सासूबाईंना) अनेकवेळा पुण्यात राहात असल्यावर घराचे वेध लागलेले पाहिले आहे. घरी आल्यावर, आपल्या ओळखीच्या भांड्यात, नेहमीच्या सवयीने पटकन खिचडी करून खाण्यातही मजा असते. कधी कधी भारतातून आल्यावर त्रास होतो. एकटेपणा किंवा सर्वाना सोडून आल्याचं दुःख असतं. मुख्य म्हणजे तिथलं घरही मागे सोडून आल्याचं जास्त वाईट वाटत असतं. आपण त्याला आता कधी बघणार हा विचार मनात येत राहतो. पण घरी येऊन रुटीन सुरु झालं की आपलं घर हळूहळू त्या एकटेपणाला भरून काढतंय असं वाटतं. त्याच्या आपलेपणाच्या उबेत सामावून घेत राहतं. 
        हे सर्व विचार करताना लक्षात आलं की अशा छोट्या सुट्ट्या संपल्यावर घरी परत तरी जाता येतं. पण अनेकवेळा असंही झालंय ज्या घरात अनेक वर्षं राहिलेय ते सोडून नवीन ठिकाणी जावं लागलंय. मग ते शिकागोतून पुणे असो किंवा पुण्यातून बॉस्टन. एखादं घर असं कायमचं सोडायचं म्हणजे किती अवघड आहे? तिथून पुढे नवीन ठिकाणी गेल्यावर महिन्याभरातच त्या जुन्या घराची अनेकवेळा आठवण यायची पण ते तिथं नसायचंच पुन्हा जाण्यासाठी. अशा परतता  न येणाऱ्या घराच्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागलाय प्रत्येकवेळा. पुढे जाऊन नवीन ठिकाणी घर बनवलंच तरीही जुने घर कधी विसरले गेले नाही. त्या त्या घरांमध्ये साजरे केलेले सण, मुले झाल्यावर त्यांची बारसे, साजरे केलेले वाढदिवस सर्व सर्व आठवत राहतं. 
        आता विचार करा हे सर्व आम्ही नवीन संसार मांडलेले, पुण्यातले किंवा नवीन नोकरीच्या ठिकाणी घेतलेले घर होते. आम्ही दोघांनी मिळून उभे केलेले, नवीन-जुन्या वस्तू मांडून सजवलेले, प्रत्येकवेळी तितक्याच उत्साहाने. आणि नवीन ठिकाणी गेल्यावरही आम्ही दोघेच होतो. लग्नानंतर अमेरिकेतच राहिल्याने कधी माहेर सोडून सासरी गेलीय असे झालेच नाही. त्यामुळे मी मागे काही सोडून जातेय असं वाटलं नाही. मला हे सासर-माहेर वेगळं असं वाटत नाही, वाटलं नाही माझ्यासाठी तरी. पण तेच एखादी मुलगी लग्नानंतर आई-वडिलांचे घर सोडून सासरी येते तेव्हा? निघताना तिला अनेकांनी सांगितलेलं असतं 'आता तू सासरचीच झालीस'. पुढे सासरच्या घरी आल्यावर नवीन सर्व लोकं तर असतातच शिवाय मागे सोडलेले माहेरचे लोकंही असतात. मी विचार करत होते, अशा मुलीला सासरचे घर हे 'माझे घर' आणि 'आईचे घर'असे कधी होत असेल? थोड्या दिवसांनी माहेरच्या लोकांसोबत घराची आठवण आल्यावर कसे वाटत असेल? किती काळ जात असेल नवीन घराला 'आपले' मानण्यात? आणि त्यातही त्या नवीन घरावर हक्क दाखवणारे लोक आधीच तिथे असताना? आजही मला सासरचे म्हणजे,'संदीपचे घर' आणि माहेरचे म्हणजे 'माझे घर' असे वाटते. पण अनेक मुली, मैत्रिणी मी पाहते त्या, सासरच्या घराला 'आमचे घर' म्हणतात आणि दुसरे 'आईच घर'. असे करणे किती अवघड आहे नाही? निदान माझ्यासाठी तरी. 
       त्या सर्व मुलींच्या धाडसाचे, हिंमतीचे आणि सामावून जाण्याच्या स्वभावाचे कौतुक वाटते मला. कदाचित स्त्रीच्या या स्वभावामुळेच पुढे जाऊनही त्या तितक्याच सहजतेने सामावून जातात आणि घेतातही. मी इथे अमेरिकेत अनेक आई-बाबांना आले असताना पाहिलं आहे. आई किंवा सासू जितक्या आपलेपणाने किंवा मुलाच्या-मुलीच्या घरात राहतात तितके बाबांना जमत नाही. अनेकवेळा तर यातले बाबा ठरलेल्या तारखेच्या आधीच भारतात परत जातात. त्याचं मुख्य कारण मला वाटतं की या बाबांना आपल्या घरातून बाहेर सामावून घेणं जमतच नाही. आपलं घर जिथे आपला हक्क आहे, आपलं राज्य आहे तिथून दुसऱ्याच्या (मग ते स्वतःच्या मुलाचे किंवा मुलीचे का असेना) तिथे राहणं जमत नाही. पण तेच मुलीकडून, सुनेकडून किंवा बायकोकडून किती सहजपणे अपेक्षित असते? 
     हा घराचा विषय कुठून कुठे गेला ना? पण खरंच आपलं घर सोडून थोड्या वेळासाठी बाहेर राहणेच किती अवघड असते, अशावेळी कुणी मुलगी आपले घर कायमचे सोडून आल्यावर तिला कसे वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. एक स्त्री म्हणून त्या सर्वांचे मला मनापासून कौतुक वाटते आणि अभिमानही. आता सासरी जाण्याची प्रथा बदलणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य वाटत नाही. पण निदान त्या मुलीबद्दल थोडा समजूतदारपणा, आपलेपणा नवीन घरच्या लोकांनी दाखवला तर ती ते 'घर' आपले मानायला वेळ लावणार नाही हे नक्की.
        
विद्या भुतकर.

No comments: