संत्या कितीतरी वेळ तिथेच उभा होता, झाल्या प्रसंगातून सावरणं त्याला अजूनही जमत नव्हतं. तो चालत चालत पार्टी ऑफिसला परतला. पोरांचा गोंधळ चालूच होता. त्याचं कशातही लक्ष नव्हतं. विक्या त्याला काहीतरी विचारणार इतक्यात बाहेरचा दंगा एकदम बंद झाला. पाटील आले होते.
"संत्या!!", पाटील एकदम जोरात ओरडले आणि ताडकन त्यांनी त्याच्या कानाखाली मारली.
"एकदा ताकीद दिऊन पन हे नाटक वाढतंच चाललंय तुमचं. जरा बघा की आजूबाजूला काय चाललंय.", पाटील बोलले.
सगळी पोरं शांतपणे उभी होती.
"काय रे, तुम्हांला काय हे हाटेल वाटलं का? यायचं, खाऊन पिऊन जायचं. खर्च जातोयच पार्टीच्या खात्यात. हे बगा की किती कचरा केलाय. सांगितलं हुतं ना मी हे असलं सगळं चालणार न्हाई म्हून? तरीपण सुधारना न्हाई. परत हे असले टवाळक्या करताना पोरं दिसली तर सरळ पोलिसांना बुलवून आत टाकायला लावीन एकेकाला. चला हे सगळं साफ करा आन चालते व्हा हितनं.", पाटलांच्या आज्ञेनुसार सगळे एकेक वस्तू, पसारा उचलून निघून गेले.
संत्या अजून तिथेच उभा होता, काहीही न बोलता. सगळे गेल्यावर पाटील आत केबिनमध्ये येऊन खुर्चीत बसले.
"तुम्हाला म्हायतेय का किती कष्टानं नाव कमावलंय तुमच्या आज्या-आबानं? हे सगळं दिसतंय ते काय आभाळातंन आलेलं न्हाई. आजवर म्हेनत केलीय आमी. सगळं आयतं मिळालं म्हनून आसलं धंदे सुचायलेत तुम्हाला. हे नाच, गाणं याच्यासाठी हॉपिस काढून दिलं का तुम्हाला? उद्या तुम्हाला हाकलला तर हजार पोरं हुबी र्हातील ही जागा घ्यायला तुमची. आन तुम्हाला त्याची काडीची किंमत न्हाई. हे असले थेरं चाल्लेत. हे सगळं साफ करुन घरला यायचं आन उद्यापासनं हिकडं न्हाई आलं तरी चालंल. लायकी न्हाई तुमची हे सगळं द्यायची. ", पाटील तावातावाने बोलले.
संत्याने मान हलवली. ते निघून गेल्यावर त्याने कचऱ्याचा एकेक तुकडा उचलून एका पिशवीत टाकला. झाडूने केबिन, बाहेरची खोली सगळीकडचा केर काढला. कंम्प्यूटर नीट बंद करुन त्याच्यावर कव्हर घालून ठेवला. सगळं झाल्यावर बेंचवर कितीतरी वेळ बसून होता. आज त्याला कुठेही जायची इच्छाच होत नव्हती, घरी तर नाहीच नाही. त्याने काकीला फोन करुन सांगितलं,"काके मी हॉपिसातच झोपतोय आज. सकाळी येतो.".
इतक्यात काकींकडे सगळा निरोप गेला होता. पाटलांना संतापात जेवणही जात नव्हतं. त्यांचा राग बघून 'पोरगं आज घरी न आलेलाच बरा' असं काकीलाही वाटलं.
तिने 'बरं' म्हणून संत्याचा फोन ठेवून टाकला आणि पाटलांना टिव्हीवर बातम्या लावून दिल्या.
"किती वर्श अशी काढायची? ल्हान हाय, ल्हान हाय म्हनून इतकं दिवस गप बसलो. तो बन्या रोज सकाळी जाऊन इचारतो यांना काय काम हाय का. रोज यांची मस्ती चाललेली असती तिथं. बाकी पोरं होती म्हणून वाचला, न्हायतर लै मार खाल्ला असता त्यानं माजा.", पाटील टिव्ही बघता बघता बोलत होते. काकीला माहित होतं आज बोलण्यात काही अर्थ नव्हता. ती आपली कामं उरकायला निघून गेली.
संत्या ऑफिसचं दार बंद करुन बेंचवर तिथेच पडून राहिला. विचार करता करता कधी झोप लागली त्यालाही कळलं नव्हतं.
---------
---------
डोक्यावरचा पंखा जोरजोरात फिरत होता. अंग आखडून बाकडयावरच झोपलेल्या संत्याला थंडीनं जाग आली. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि आपण कुठे आहोत ते त्याच्या लक्षात आलं. तसंच झोपून राहण्याचा प्रयत्न केला त्याने पण खूप थंडी वाजत होती आणि भूकही जोरात लागली होती. भुकेच्या जाणिवेने त्याला स्वतःवर राग आला, इतक्या अपमानानंतर सुद्धा आपल्याला भूक लागली आहे या विचारानं. शेवटी तो उठला आणि चालतच घरी निघाला. पहाटेचा गाव वेगळाच दिसत होता. धुरकट उजाडलेली पहाट, अंगाला लागणारा थंड वारा, गल्ल्यातून अधेमध्ये असलेले खाचखळगे, हातात तांबे घेऊन चाललेली काही मंडळी, तर काही परतणारी. हातात पाट्या घेऊन कपडे घेऊन ओढ्याला निघालेल्या बायका, भुंकणारी कुत्री, आरवणारी कोंबडी. कुणाच्या दारात नळाला पहाटेचं पाणी यायचं म्हणून सकाळी लागलेली लोकांची रांग. बायका काखेत घागरी, एका हातात भरलेली, हेळकांडणारी पाण्याची बादली घेऊन घाईघाईत घरापर्यंत पोचत होत्या. एकदा तर त्याला वाटलं पटकन ती बादली हातात घ्यावी आणि त्या बाईच्या घरी नेऊन द्यावी. किती छोटा होता त्याचा गाव आणि आपण अजूनही छोटे. एक प्रकारचं खुजेपण त्याला जाणवू लागलं.
संत्या घरी पोचला तर पाटील तयार होऊन बसलेले. काकीनं त्यांना चहा दिला. संत्याला बघून दोघेही गप्प झाले. तो निमूट आतल्या खोलीत जाऊन खाटेवर पडला.
काकीने पाटलांकडे पाहून विचारलं,"परत कधी?".
पाटील,"दोनतीन दिवस तरी लागतील. दादासाहेबांचं कामहाय, त्यांना कसं इचारनार किती दिवस लागतील म्हून. यावेळी याला घेऊन जावं म्हनून विचार केलेला. पार याची काय लक्षन बरी न्हाईत. ".
"जाऊंद्या वो, रात्री जेवला पन न्हाई पोरगा. ", काकीने त्याची बाजू घेतली.
"एका दिवसात काय मरत न्हाई. चांगली खाऊन पिऊन मस्ती चाल्लेली काळ तिकडं. ", पाटलांचा संताप वाढला.
"बरं जाताना चिडू नका तुमी. मी बोलतो त्याच्याशी. ",काकीने समजावलं.
"बगा जमलं तर. बरं यिऊ का?", पाटील.
"हां पोचल्याव फोन करा.", काकीने पाटलांची बॅग उचलत सांगितलं.
"हां कर्तो.", म्हणत पाटील घरातनं बाहेर पडले.
संत्याला खाटेवर पडल्यावर पुन्हा जरा डोळा लागला. परत जाग आली ती फोनच्या आवाजानं. संत्यानं नाईलाजानं फोन बघितला, अम्याचा मेसेज होता,"उठलास का?".
त्याने फोन परत ठेऊन दिला आणि तसाच पडून राहिला तर फोनच आला अम्याचा.
"काय रे, कालपासन पत्ता कुठाय? लैच मनावर घेतलेलं दिस्तया. ", अम्याने विचारलं.
".... ", संत्या गप्पच होता. त्याला तोंड उघडायचीही इच्छा होत नव्हती.
"काल काय झालं तिकडं तू घाईघाईत गेला हुतास ते?", अम्याने विचारलं.
"काय नाय, जाऊंदे.", संत्या बोलला.
"आस कसं? सांग की. ", अम्याने विचारलं.
"म्हनलं ना, काय न्हाई तर गप पड की.", संत्या चिडला. तसे अम्या शांत झाला.
"बरं ठिवतो, फोन करतो पन परत.", अम्याने असं बोलून फोन ठेवला.
काकीने हाक मारली,"पाणी तापलंय तवर अंघोळ कर बरं. परत बंब पेटवाय लागतोय न्हायतर.".
संत्या नाईलाजाने उठला आणि आवरायला लागला. अंघोळ करुन माजघरात आल्यावर काकीने चहा ठेवला समोर. संत्या त्याच्याकडे बघत तसाच बसलेला.
"च्या घेकी रं. भांडी द्यायचीत काढून चल पटापट उरक.",काकी परत बोलली.
संत्याने मुकाट्याने चहा घ्यायला सुरवात केली. रात्रीपासून उपाशी असलेल्या त्याच्या पोटाला चहानं बरं वाटलं.
काकी त्याच्याकडे बघतच होती.
"काल काय झालं संत्या? तुझं पप्पा किती चिडल्यालं रात्रीला. किती वेळा सांगितलं त्यांनी कामात लक्ष दे म्हनून.", काकी बोलली.
संत्या गप्पच होता. त्याने चहाचा कप बाहेर भांड्याच्या टोपलीत ठेवला आणि परत खाटेवर जाऊन बसला. शेजारीच एक पुस्तक पडलं होतं ते हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचतानाही त्याला सपनीचे शब्द आठवत होते,"तुझी लायकी आहे का माझ्यासमोर उभं रहायची?". त्याने विचार मोडून पुन्हा वाचायला सुरुवात केली.
दुपार झाली तरी त्याची जेवायची इच्छा नव्हती ना कुणाशी बोलायची. तो एकदा वाचायला लागला की लवकर उठत नाही हे काकीला चांगलंच माहित होतं. तिनेही मग त्याला उठवलं नाही.
संध्याकाळ झाली तरी संत्या काही बोलला नाही. पोरगं घरात असूनही इतकं शांत आहे पाहून काकीला काही सुचेना. ती आतल्या खोलीत गेली आणि खाटेवर त्याच्या शेजारी बसली. संत्याला नाईलाजानं पुस्तक बाजूला ठेवावं लागलं. काकीने त्याच्या केसांतून हात फिरवला. तिच्या मायेच्या स्पर्शानं त्याला भरुन आलं. तोही मग तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला.
"तुला म्हायतेय का तुज्या पप्पांनी तुला का हे सगळं दिलं? पार्टीचं इतकं मोठं काम हाये ते. गावाच्या नवीन पोरांना एकजूट करायचं. ", काकी हळूहळू बोलू लागली.
"तू ल्हान होतास ना? ८-१० वर्षाचा असशील, तुजं पप्पा पहिल्यांदा सरपंच झालेलं गावाचं. रोज लोकं त्यांच्याकड ह्ये ना ते काम घिऊन यायची. त्यांच्याबरबर तू पन बसायचास. त्या लोकांच्या पोरानबर्बर खेळायचास. कुनी म्हातारबाबा दिसला तर पटकन पानी आनुन द्यायचास. त्या लोकांच्या दुःखात तू जमल तशी मदत करायचास. तू ल्हान असताना तुजं पप्पा हजारवेळा म्हणायचं, आमच्यानंतर या गावचा सरपंच हाच. ",काकीचं बोलणं ऐकत संत्या पडून राहिला.
"तू शाळत मार्क कमी पडल्यावर तुला सगळ्या शिकवन्या लावल्या मी. पर तुजं पप्पा म्हनायचं , मार्कांवर जाऊ नका तुम्ही. मार्क मिळवून सगळं मिळत न्हाई. त्याला मानुसकी यायला पायजे. आपल्या घराची रीत हाय ती, लोकांनी आपलं दुख आपल्याकडं यावं आन आपण जीव तोडून त्यांना जमल ती मदत करावी. तुजं पप्पा या वयातबी लोकांच्या कामासाठी मरमर करत फिरत असत्यात. अन तुमी असं कामं सोडून दंगा मस्ती करताय. काल लै वाईट वाटलं त्यास्नी. म्हटलं असतील या आधी तुला नालायक, पन कालच्यासारखं त्यांना कदी पायलं न्हाई आधी. तुज्याव जीव हाय त्येंचा. आता बघ, काल म्हनलं पाच पन्नास पोरं घिऊन बसला हुता हापिसात. तू समद्यांला दोस्त म्हनून मजा करतोस. त्याच्यापरास त्यान्ला कामाला लाव. त्यांच्या पोटापान्याचं बघ. तुज्यात धमक हाय इतक्या पोरान्ला समजून सांगायची. तू फकस्त काय सांगायचं ते तू ठरवलं पायजेस. चल जाऊंदे. जिऊन घे. असा किती दीस उपाशी राहशील? अन तुजं पप्पा बी न्हाईत तर मी काय एकटीच जिऊ?", काकीने त्याला जबरदस्ती हाताला धरून उठवलं. संत्याही मग उठला. काकीबरोबर त्यानं चार घास खाल्ले.
काकीचं बोलणं ऐकून संत्याला बरं वाटत होतं. काहीतरी कळल्यासारखं. आईच्या बोलण्याने एक नवा विचार मनात आला होता. आत्मनिरीक्षण करण्याची गरज वाटू लागली होती. रात्री मग त्याने पुस्तक वाचून पूर्ण केलं. संत्याला जश्या प्रेमकथा आवडायच्या तितक्याच रहस्यकथाही. आजवर मिळतील तितक्या सर्व मराठी रहस्यकथा त्याने वाचल्या होत्या. खिळवून ठेवणार शेवट संपला आणि संत्याला पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात परत जावं लागलं.
अम्या, विक्याचे मेसेज, फोन येऊन गेले होते. पण कुणाशीच तो काहीच बोलला नव्हता. रात्र वाढली तशी त्याला सपनीची आठवण येऊ लागली. आजवर आठवण आली तरी त्यात कटुता नव्हती. तिला दुरुनच पाहणं, तिचा विचार करणं इतकंच होतं. आज त्याला तिचं त्याच्याबद्दलचं मत माहित होतं. ती आपला किती तिरस्कार करते हे कळलं होतं. आणि इतकं असूनही तिच्यावर त्याला राग येत नव्हता. कालचा त्याचा राग आज निवळला होता. आपण तिच्याशी किती उद्धटपणे बोललं हे आठवत होतं. तिचा हात रागाने आवळला,तिच्यावर जोरात ओरडलो, हे सर्व डोक्यात येत होतं. तिच्याशी प्रेमाचे चार शब्द न बोलता अशी सुरुवात झाली याचं त्याला अजूनच वाईट वाटत होतं. विचार करत संत्या तसाच पडून राहिला होता. आयुष्याची पाटी पुसून नव्याने सुरवात कशी करावी हे त्याला कळत नव्हतं.
- क्रमशः
विद्या भुतकर.
- क्रमशः
विद्या भुतकर.
1 comment:
हाय विद्या. छान चालू आहे मालिका पु भा प्र
Post a Comment