Wednesday, February 03, 2016

रेडिओ

             परवा संदीप ला म्हणाले, 'आपण ना मुलांना संगीताने उठवत नाही'. 'म्हणजे काय?' त्याचा प्रश्न. तर मला असं म्हणायचं होतं की आम्ही लहान असताना सकाळी ६.३० ला रेडिओ सुरु होत असे. पुढचे ३ तास मग सकाळचे आवरताना  शास्त्रीय संगीत, हिंदी/मराठी बातम्या, मराठी सुगम संगीत, भावगीते आणि नवीन हिंदी गाणी अशा कार्यक्रमात जायची. त्याच्या मध्ये आईची स्वयंपाकाची गडबड, आम्हाला,'आवर, आवर' म्हणणे आणि आजोबांच्या शिकवण्या या सर्व गोष्टी चालू असत. एका तेलगु मित्राकडे एम एस सुब्बुलक्ष्मी चे सुप्रभातम ऐकले आणि एकदम कोरेगावची सकाळ आठवली. तेव्हा येताना मी संदीप ला मी सांगत होते की घरी जसे आम्ही संगीताने उठायचो तसे आपण मुलांना उठवत नाही.
           आमची सकाळ त्यांना उठवून वेळेत शाळेत पोहोचवण्यात जाते. शनिवार-रविवारी सान्वी आमच्या आधीच उठून टी व्ही लावून बसलेली असते.  आणि असेही आज कालचे रेडीओ स्टेशन असे नाहीत की जे लावून दिवसाची सुरुवात करावी. एकदा दोनदा मी सकाळी गाणी लावण्याचा प्रयत्न केला होता. पण एकूणच मला सर्व गोंधळ वाटायला लागला आणि मी गाणी बंद केली. मला कळत नाही की आधी का असं व्हायचं नाही. आमच्या घरात कितीही गोंधळ असला तरी त्या गाण्यांचा, बातम्यांचा कधी त्रास झाला नाही. उलट अंथरुणातून न उठता किती वाजलेत हे कळण्याचा सर्वात सोपा उपाय होता तो. पुणे-सांगली रेडीओ स्टेशनवरचं, 'या बरोबरच पुणे केंद्रावरील बातम्या संपल्या.' हे वाक्य एकदम डोक्यात बसलेलं. त्यानंतर ऐकायला मिळणारी गाणी म्हणजे सकाळची 'ट्रिट' असायची. 
             नुसती सकाळच नाही तर रात्रही याच गाण्यांनी संपायची. विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ, मोहमद रफी, हेमंत कुमार आणि मुकेश यांच्या सोबत होमवर्क पूर्ण व्हायचं. कित्येक वेळा अभ्यास सोडून फक्त गाणं ऐकत बसायचं. 'आजा सनम मधुर चांदनी में हम….' 
          शाळेनंतर परत असा रेडिओ रोजचा राहिला नाही. पुण्यात आल्यावर एफ एम रेडिओ सुरु झाला होता नुकताच, पण त्याच्यामध्ये ती मजा राहिली नव्हती. त्यात मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि फालतू जोकमुळे तर अजूनच वैताग येऊ लागला. तरीही मुंबईत माझ्या रुममेट सोबत रात्रीची गाणी ऐकत गप्पा मारण्याची एक छान आठवण अजूनही मनात आहे. मुंबईच्या उकाड्याच्या रात्रीमध्ये मध्ये जाहीराती नसलेला जुन्या गाण्यांचा तेव्हढाच काय तो शांत वेळ. असो.
             शिकागोमध्ये मी रेडिओला खूप मिस केलं. त्याचं कारण म्हणजे एखादं आवडतं गाणं अचानक लागावं आणि अख्खा दिवस छान जावा यासारखी मजा गाणी डाउनलोड करण्यात नाही. गेल्या दोन-तीन वर्षात ऑनलाईन रेडिओ ऐकत आहे आणि कधीकधी काम सोडून आवडतं गाणं ऐकायचा आनंद त्यात मिळतो. बोस्टनला आल्यापासून गाडीतही हा रेडिओ लावतो आणि आपल्यासोबत मुलानाही ऐकवतो. एक-दोनदा 'गाणं संपेपर्यंत गाडी बंद करू नका बाबा' असं स्वनिकने सांगितले याचाही खूप आनंद झाला होता मला. कदाचित आमच्या सोबत ही गाणी ऐकण्याची त्यांची स्वत:ची आठवण बनेल जी थोड्या वर्षांनी तेही माझ्यासारखीच आठवतील आणि लिहीतीलही….

विद्या भुतकर. 
माझे फेसबुक पेज- https://www.facebook.com/VidyaBhutkar1/



No comments: