Thursday, February 18, 2016

हाडाचा विद्यार्थी

           आमचे आबा म्हणजे आजोबा शिक्षक होते, अगदी हाडाचे शिक्षक. कोरेगावमध्ये ते इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. त्यांचे कितीतरी विद्यार्थी कदाचित अजूनही त्यांची आठवण काढत असतील. मी तरी काढते. मला समजायला लागले तसे मी त्यांना शिकवण्या घेताना पाहिले. कधी मुलांना रागवायचे, कधी छडी द्यायचे तर कधी शाबासाकीपण. मी कधी शंका विचारली की म्हणणार, 'वर चढ, ती डिक्शनरी काढ'. मला कंटाळा यायचा. कशाला ना डिक्शनरी? सरळ त्या शब्दाचा अर्थ सांगा म्हणजे झाले. तसे कसे. मग ते मला तो शब्द शोधायला लावत. तिथे पोचले की त्या शब्दाचा मूळ शब्द कोणता होता, त्याचा अर्थ काय आणि त्याचे बाकीचे अर्थ आणि उपयोगही सांगत. खरंतर मला कधी कधी कंटाळा यायचा या गोष्टीचा पण या जगात बाहेर पडल्यावर कळलं कि मला त्यांनी काय दिलं होतं. मला त्यांनी शिकायला शिकवलं होतं.
           त्यांची आठवण काढायचं कारण म्हणजे त्यांना स्वत:ला शिकायची खूप ओढ होती. रोजच्या पेपरमध्ये एखादा शब्द अडला तर स्वत: शोधून काढत की त्याचा अर्थ काय आहे. मला गम्मत म्हणून संस्कृत सुभाषितांचे अर्थ सांगत. एकदा नववीच्या इंग्रजीचा अभ्यासक्रम बदलला होता. तर बाजारातून ते पुस्तक आणून रात्रभर वाचत बसले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांना शिकण्याची किती ती ओढ. गेल्या कित्येक दिवसात मी नवीन काही वाचले नाहीये. शिकले नाहीये. मध्ये पळणं सुरु झालं तेव्हा तो नाद होता, कधी वेगवेगळे जेवण शिकण्याची हौस असते. पण एखादी भाषा शिकावी, माझ्या क्षेत्रातले काही नवीन वाचावे शिकावे हे करून खूप दिवस झालेत. अर्थात नोकरी बदलल्यावर जे काही शिकणे अपरिहार्य होते ते केले पण स्वत:हून काही करणे आणि गरज म्हणून यात फरक आहेच.
              पण  एखाद्या गणितासाठी डोकं खाल्याला, एखादी गोष्ट मला का येत नाही म्हणून रात्रभर जागल्याला खूप वर्षं झालीत. मला वाटतं मी अल्पसंतुष्ट झालेय. सध्या चालू आहे ना, मग कशाला शिकायचे? चालू आहे न काम, मग काय गरज आहे उगाच कष्ट घ्यायची? काहीतरी शिकायला हवं. एखादी नवीन गोष्ट दिसली की उत्सुकता चाळवली पाहिजे, 'अरे हे कसे केले असेल?' असा प्रश्न पडला पाहिजे. मी विचार करतेय मी किती वर्षांची होईपर्यंत माझ्यामध्ये थोडी तरी नवीन काही शिकायची इच्छा, कुतूहल राहील? मी ७५ वर्षांची असतानाही नवीन काहीतरी शिकण्यासाठी झटेन का? ज्या दिवशी नवीन काही शिकायची इच्छा संपली त्यादिवशी पुढे काय असा प्रश्न पडेल तेव्हा काय? ७५ चे माहित नाही पण लवकरच काहीतरी शिकायलाच हवं. हाडाचा विद्यार्थी व्हायला हवं. 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: