Wednesday, February 24, 2016

जाहीर नोटीस

        "जाहीर नोटीस" असं वाचलं की वळतेच मान, नाही का? पण सगळेच वाचतात असं नाही. मला वाटतं जगात तीन प्रकारचे लोक असतात. एक, अशा बोर्डावर लावलेल्या नोटीसा नियमितपणे वाचणारे. दोन, अजिबात न वाचता, 'हे आपल्यासाठी नाहीच' म्हणून निघून जाणारे. आणि तिसरे, जे फक्त बाकी लोकांनी 'मेजर काहीतरी बोर्डवर आहे' असं सांगितल्यामुळे पाहणारे. मला वाटतं मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारात मोडते. 
       आज ऑफिसच्या नोटीस बोर्डावर एका कोपऱ्यात ४ वेगवेगळे कानातले लटकलेले दिसले. हो, म्हणजे 'आपण यांना पाहिलंत का नंतर हेच पाहिलं असेल मी? नोटीस बोर्डावर एकएकटे ते कानातले एकेका टाचणीला टोचून ठेवलेले होते. खरं सांगू का ते कानातले सोडले तर त्या बोर्डकडे मी कधीही पाहिलं नसेल. तोच काय गेल्या कित्येक महिन्यात मी कुठलाच बोर्ड पाहिल्याचं आठवत नाहीये. आम्ही कॉलेजमध्ये असताना डिपार्टमेन्टच्या बाहेर दर थोड्या दिवसांनी नोटीस लागायची काही ना काही. आणि मी कधीच लक्ष द्यायचे नाही त्याकडे का काय माहीत. केवळ चांगल्या मैत्रिणीमुळे मी वाचले आहे, ज्या नियमितपणे सर्व चेक करून मला पण सांगत असायच्या. नाहीतर एखाद्या तोंडी परीक्षेला मी नक्की कुठेतरी बाहेर फिरताना दिसले असते आणि सबमिशन नक्की बुडाले असते. 
        तर मला काय वाटतं हे असे नोटीस बोर्ड वाचण्यासाठी एक नैसर्गिक चौकस बुद्धी लागते. म्हणजे तिथे "आपल्यासाठी काही आहे का आणि समजा माझ्यासाठी नसेल, बाकी कुणासाठी काही लिहिले आहे का? हे पहायची मनातून इच्छा झाली पाहिजे ना? " या अशा नसलेल्या चौकस बुद्धीमुळे मी बऱ्याच गॉसिपला मी नक्कीच मुकले आहे. आणि हो बाकी पण तोटे झाले आहेत. पुण्यात असताना, 'आज पाणी १२ वाजता बंद होणार आहे' किंवा 'दिवसभर लाईट नसतील' अशा महत्वाच्या नोटीसाना पण मुकले आहे. आणि जेवण बनवताना मिक्सर वापरता आला नाहीये. गणपतीच्या वेळी वेळेत मुलांचे नाव दिल्यामुळे करमकर काकूंचे ऐकूनही घेतले आहे. तर या आणि अशा बऱ्याच गोष्टी. 
         काही असतात पण अगदी वेळेत, नियमितपणे वाचणारे. खरंच वाचायला लागलं पाहिजे नोटीस बोर्ड आता प्रत्येकवेळी. निदान आजूबाजूला काय चालू आहे किंवा होणार आहे याची माहिती तरी राहील. 
असो, तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता या नोटीस बोर्डाच्या?

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: