नुकतंच एका मित्राला सांगत होते, एका विषयावर एक सलग लिही, अजिबात वाहवत न जाता, निबंध लिहितात ना तसं, प्रत्येक मुद्दा मांडत, ओळीने. त्याला वाहवत जाण्याची सवय आहे. पण त्या वाहण्यात बरंच काही बाहेर येतं. विसंगत वाटलं तरी जसं आहे तसंच बाहेर पडतंय असं वाचताना तरी वाटतं. तसं लिहायला यायला हवं. मनात येईल तो प्रत्येक शब्द कागदावर येऊ द्यायचा. पण माझं तसं होतं नाही. शाळेत असताना एका बाईंनी आम्हांला सलग १० विसंगत वाक्यं एका पाठोपाठ बोलायला लावली होती. तिसऱ्या वाक्यापर्यंत माझी विसंगती संपली होती. भरकटत जाणं मला जमलं नाही तेव्हाही आणि आताही बरेच वेळा जमत नाही.
आजही लिहायला सुरुवात केली तेव्हा डोक्यात येईल ते सलग लिहीत जायचं असं ठरवलं होतं. लिहीत राहायचं मनात येईल तसं. कुठेही फिल्टर नको शब्दांचा, अट्टाहास नको शुद्धलेखनाचा. पूर्वी लिहिताना मनात येईल तसं लिहीत राहायचे. पण आता तसं होत नाही. आता डोक्यात विचार आला की तो साठवला जातो. सगळं एकत्र साचलं की बाहेर पडतं. लिहिताना त्याचं विच्छेदन होतं. एकेक करत मुद्दे लिहिले जातात. कुठे काही राहिलं तर नाही ना हे पाहिलं जातं. बरं, माझाच मुद्दा मांडून चालत नाही. त्याच्यावर बाकी काही मतं असू शकतात, तीही लिहायची. नाहीतर उगाच कुणी खुसपट काढलं तर? कुणाला वाईटही वाटायला नको ना? तर हे असं लिहिणं म्हणजे त्या वाहवत जाण्याच्या एकदम विरुद्ध. कितीही ठरवलं तरी नाही जमत मनात येईल ते तसंच मांडणं.
हे फिल्टर लिहिण्यातच कशाला वागण्यातही येतातच. ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये वावरताना प्रत्येकवेळी वेगळा फिल्टर. जो तिथे नाही त्याचा तर असतोच. नुसत्या बोलण्यातले जाऊ देत, चेहऱ्यावरच्या हावभावातलेही फिल्टर. एखाद्याने काहीतरी सांगावं आणि आपण आपल्या खऱ्या भावना मनातून चेहऱ्यावर येईपर्यंत बरंच काही गाळून घेतलेलं असतं. सोशल मीडियावर दिसण्यासाठी फोटोला लावलेले असतात ते फिल्टरही वेगळेच. घरातही कुणी येणार असलेलं तर तेही सजलेलं असतं, सगळा पसारा बंद कपाटात ठेवून.
पोरांकडे पाहून हेवा वाटतो, एखादी गोष्ट नाही आवडली लगेच बोलून टाकतात. अगदी त्याचा जवळचा मित्र असला तरी, 'तो माझ्याशी चांगला वागला नाही, माझा मित्र नाहीये तो' असं तिथल्या तिथे बोलून टाकायचं. उद्या चांगला बोलला की आपणही चांगलं व्हायचं. किती सोपं, सरळ आहे. नाही जमणार आता तसं करायला. खूप साऱ्या भूतकाळ, भविष्यकाळातल्या गोष्टी विचार करुन बोलायचं. एखाद्यानं दिलेली वस्तू नाही आवडली स्वनिक लगेच बोलून टाकतो नाही आवडत मला म्हणून. तसं करता यायला हवं, लिहिताना, वागताना, बोलताना. मला नाही जमत आता ते आणि जमणारही नाही. किती पुढे गेलो आहोत आपण या वागण्यात याचा पत्ता लागण्यासाठीही दूरवर शोधत जावं लागेल स्वतःला. आपण कसे होतो ते बघायला. असो.
मनात येईल ते लिहायचं असं ठरवूनही वाहवत जाता आलं नाही याचं दुःखं आहेच पण निदान उगाच जास्त विचार करुन लिहीत बसण्यापेक्षा इथेच थांबते. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment