तो तिच्या जवळ होता. इतका की बोलताना ही ओठ एकमेकांना चिकटत होते. इतका की श्वास घेताना थोडासाही फरक एकमेकांना जाणवत होता. तिच्या डोळ्यांत त्याला दिसत होती भीती, 'हाच तो क्षण' हे जाणवलेली आणि तिलाही कळत होती त्याच्या स्पर्शातली आतुरता. तिच्या चेहऱ्याकडे पाहात एकदम तो बाजूला झाला. ती गोंधळली. त्याने बाथरूममधून एक रुमाल ओला करुन आणला. ती विचारणार इतक्यात तिला गप्प करुन, तिच्या चेहऱ्यावरुन तो रुमाल फिरवला. चेहऱ्याला लावलेलं क्रीम, फौंडेशन सर्व उतरत गेलं. तितक्याच जोराने त्याने तो रुमाल तिच्या ओठांवरुन फिरवला. तिच्या ओठांना आकार देणारी, बोलताना तिच्या बारीक हालचालीही स्पष्टपणे दाखवणारी ती लिपस्टिक पुसली गेली. मागे राहिले ते फक्त फिकट ओठ. तिच्या कानातले झुमके, तिच्या चेहऱ्याला शोभा देणारे. ती हसत बोलताना तिच्या चेहऱ्यासोबत हलणारे. तेही काढून टाकले त्याने. तिच्या गळ्यातलं मॅचिंग नेकलेस त्याने धडपडत मागे हात घालून मोकळं केलं आणि त्याचसोबत केसांनाही. तिचा शर्ट घाईने काढून टाकला आणि तिची पॅडेड ब्रा ही. ओघळले तिचे वक्ष मग त्यांच्या नेहमीच्या जागेवरुन. बटण काढल्यावर पोटाला करकचून बांधलेली पँट निसटली आणि पँटचे पोटावर पडलेले वण त्याला दिसले. लवकरच मग ती उभी राहिली त्याच्यासमोर, निर्वस्त्र.
गेल्या वर्षभराची त्यांची ओळख. मैत्री, आकर्षण, प्रेम यातून पुढे सरकत जाणारी. तासनतास झालेल्या गप्पा, हसणं, रडणं, चोरटे स्पर्श, नजरानजर यातून मनात प्रत्येक कोपरा जणू दिसला होता. एक शब्दही न बोलता समोरच्याला सर्व कळेल इतकी पारदर्शकता. आणि तरीही.... आज प्रथमच तो तिला बघत होता. ती जशी आहे तशी. निर्वस्त्र, थोडी घाबरलेली, थोडी अवघडलेली, त्याच्या उत्तराची, होकाराची, संमतीची वाट बघत उभी असलेली ती. जशी आहे तशी.
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment