आपण कुणाला तरी आवडत नाही हा विचार माणसाला किती टोचू शकतो? खूप ! आयुष्यात अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या लोकांचा संपर्क येतो. त्यात दिवसभराचं ऑफिस असो किंवा एखादा जवळचा नातेवाईक वगैरे असो. त्या समोरच्या व्यक्तीला आपण आवडत नाही असं दिसल्यावर काय वाटतं? त्रास होतोच.
पण मुळात प्रश्न असा आहे की समोरच्या माणसाला आपण आवडलंच पाहिजे असा आग्रह का? आपल्यालाही येतो ना एखाद्याचा राग. कधी कारण असतं तर कधी नसतं. तसा राग मनात घेऊन जगणं जितकं त्रासदायक तितकाच त्रास होतो समोरच्या माणसाला आपण आवडण्याचा आग्रह धरला की. मला वाटतं, खरं तर अशावेळी उत्तर हवं असतं,'का त्याला माझा इतका राग येतो? मी काय वाकडं केलंय, वगैरे वगैरे'. मग समोरच्या माणसाला खूष करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी थोड्या फार प्रमाणात तर कधी अतोनात. अशात सर्वस्वही गमावून जातं.
कालच स्वनिक सांगत होता, "माझा एक मित्र आहे. माझं कधी चुकलं आणि मी सॉरी म्हणलं तरी तो मान्य करत नाही, सोडून देत नाही."
मग म्हटलं,"अरे तू तुझं काम केलंस ना? मग बास. त्याच्यापुढे त्याने काय करायचं हे तू ठरवू शकत नाहीस."
सोपंय ना सांगायला? पण प्रत्यक्षात आणणं जमत नाही. शिकागोमध्ये असताना आजूबाजूला असंच वातावरण आहे असं वाटायचं. शेजारी पाजारी बोलायची इच्छाही मरुन गेली होती. पण मग त्यातून चांगलं काहीतरी बाहेर आलं. बाकी गोष्टीत पडायचंच नाही असं ठरवलं आणि तेव्हा रनिंगला सुरुवात झाली. पण प्रत्येक वेळी हे असं काहीतरी चांगलं होतंच असं नाही.
अशाच एका झगड्यातून जातेय सध्या. चांगलं काहीतरी मिळवता यायला हवं अशातुन. समोरच्याला मी आवडलंच पाहिजे हा आग्रह सोडून द्यायला हवा. आपण आपले प्रयत्न केलेत ना? मग दुर्लक्ष करता यायला हवं. आणि मुख्य म्हणजे त्याच्या खुशीसाठी म्हणून स्वत्व सोडून द्यायला नको. बाय द वे, हे बाकीच्यांना नाही, स्वतःला समजावतेय. :)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment