कधी एकट्याने प्रवास केल्याचा आनंद घेतलाय? मी स्वत:हून फिरायला म्हणून एकटी गेले नाही पण कामानिमित्त, कॉलेजसाठी प्रवास झाला आहे एकटीचा. आजकाल ऑफिसला जायला मला साधारण एक- दीड तास प्रवास करावा लागतो आणि मग माझी विचारधारा सुरु होते. बारावी पर्यंत एकदम छोटं जग होतं माझं. कधी कुठे जायचं तरी आई-दादांसोबत गेले होते. सांगलीला कॉलेजसाठी एकटं प्रवास करणं म्हणजे माझ्यासाठी मोठ्या हिमतीच काम होतं. कोरेगाव ते सांगली ट्रेन जायचे दर १५-२० दिवसांनी. त्यात मग कधी पहाटेच्या ट्रेन जायचं तर जरा भीती वाटायची कारण मला झोप अनावर व्हायची आणि चुकून माझे स्टेशन चुकले तर? कोरेगांव-सांगलीच्या दरम्यान पहाण्यासारख असं खास नव्हतं पण ती ४ वर्षं माझ्यासाठी खास होती. प्रत्येक स्टेशन पाठ झालं होतं अगदी पायवाट असल्या सारखं.
सर्वात सुंदर प्रवास म्हणजे पुणे ते सातारा तेही पावसाळ्यात बसने करायचा. हिरव्यागार धुक्याने भरलेल्या घाटातून जाणारी बस, डोंगरावरून पडणारे धबधबे, थंड हवा आणि मनात ओलावा. कविमनाला चालना देणारा प्रवास. मुंबई-कोरेगाव प्रवास मात्र शक्यतो रात्री केलेत. का तर ८ तासाचा तो वेळ जागे राहून घालवण्यात काहीच अर्थ नव्हता. पुढे विमानप्रवासही केला. त्याबददल पुन्हा कधीतरी.
काय असतं बरं एकट्याने प्रवास करण्यात? एकतर बाजूला बडबड करायला कोणी नसल्याने तो वेळ फक्त विचार करण्यात जातो. आपल्याला स्वत:साठी हा वेळ मिळतो. असेही घर येईपर्यंत कुठे जायची घाई नसते. धावपळीच्या दिवसात तेव्हढाच विश्रांतीचा क्षण. जसे मी पुण्यात ऑफिसला जाण्याचा वेळ पुस्तक वाचण्यात किंवा मैत्रिणीशी गप्पा मारण्यात घालवायचे. तेव्हा त्यांना बरोबर माहीत असायचं की ही आता घरी निघाली आहे. मग मी कधी जेवायला काय करायचं याचा विचार करायचे. भूक लागलेली असली ना की मग खूप काही बनवायला सुचतं. त्यात आजकाल फोन असतोच सोबतीला. लगेच रेसिपी बघायची, रस्त्यात रिक्षा थांबवून हव्या त्या भाज्या, वस्तू घ्यायच्या आणि घरी जायचं. अजूनही ट्रेनमधून घरी येताना माझ्या डोक्यात विचार चालू असतात की घरात काय काय भाज्या शिल्लक आहेत, जेवायला काय बनवता येईल इ.
कधी मनात खूप गोंधळ चाललेला असतो आणि एक कोपरा हवा असतो कुणीही नसलेला. आयुष्यात पुढे काय करायचं आहे? जे करतोय ते योग्य आहे का? मला नक्की काय करायचं आहे? असे अनेक प्रश्न असतात एकेका प्रवासात. पण असा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. आपलं आपल्यालाच सावरावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात. तर कधी कुणाला भेटायची ओढही. तेव्हा तो प्रवास कितीतरी दूरचा वाटू लागतो. कितीही वेळा घड्याळ पाहिलं तरी एक मिनिट झालेला असतो. मग अनेक गोड आठवणी येत राहतात आणि मन त्यात बुडून जातं.
एकटी प्रवास करताना कधी तोच वेळ लोकांना पहाण्यात घालवता येतो. शेजारच्या मुलीने काय कपडे घातले आहेत यावरून आपल्याकडे काय नाहीये आणि तसा ड्रेस घ्यायचं किती दिवस झाले राहिलंय, किंवा असे बूट घ्यायचेच असे विचार येतात. कधी एखादं प्रेमात बुडालेलं जोडपं असतं तरी कधी छोट्या बाळाला घेतलेली आई. त्याच्याकडे बघून घरी जायची अजून ओढ लागते. कधी शेजारच्या दोघांचं बोलणं ऐकायची मजा येते तर कधी शेजारच्याच्या पुस्तकात किंवा kindle मध्ये डोकावायचं. आजूबाजूला कशाच्या जाहिराती दिल्यात आणि त्यात दिसणारे लोक कसे आहेत किंवा मराठी व्याकरण कसं चुकलंय किंवा स्पेलिंग चुकलं याच्याकडे बघायचं.
फोनमुळे अनेक गोष्टी चांगल्या झाल्या त्यातली एक म्हणजे मनसोक्त गाणी ऐकता येतात. एका पाठोपाठ आवडती गाणी ऐकत बसायचं. कुणाचाही त्रास नाही, कुणी मध्ये थांबवायला नाही. पण त्याचसोबत अनेक तोटेही झाले आहेत. ट्रेन/बसमध्ये २० पैकी १८ लोक तरी मान खाली घालून फोन मध्ये बघत बसलेले दिसतात. बरेचवेळा मीही त्यातली एका असते. कधी वाटतं, या फोनमुळे एखादं पुस्तक वाचता वाचता राहिलं असेल, एखादं गोड बाळ आपल्याकडे पाहत असेल तर त्याच्याकडे बघायचं राहिलं असेल. शेजारी बसलेल्या सुंदर मुलीला मदत करून तिच्याशी गप्पा मारायचं राहिलं असेल. आणि उद्या बनणारी एखादी प्रेमकहाणी फोनमुळे सुरूच झाली नसेल. त्यामुळे सध्या रोजचा प्रवास करताना काहीतरी वाचायचा विचार करतेय, काहीतरी लिहायचा विचार करतेय आणि फोन सोडून लोकांकडे पाहायचं म्हणतेय. असेही माझ्याकडे वर करून कुणी बघणार नाही. :)
विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
1 comment:
Tumacha lekh khup aawadala...ashach ,azya anubhawanwarcha mi lekh lihila aahe..pudhe tyachi link aahe aawadala tar nakki sanga...
http://yogitapshinde.blogspot.in/2015/12/blog-post_93.html
Tumche sarvch lekh aawadel
Post a Comment