Monday, May 02, 2016

रविवार संध्याकाळ ते सोमवार

           रविवार संध्याकाळ म्हणजे कातरवेळेची कातरवेळ. जाम बोर होतं. मला वाटतं त्याचं बीज माझ्या शालेय वर्षांत आहे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की जे टीव्ही किंवा भटकणे चालू व्हायचे ते रविवारी रात्री दूरदर्शन चा एकमेव चित्रपट संपला की संपून जायचे. सर्व न्यूज पेपर इ वाचून झालेले असायचे त्यामुळे रविवारी रात्रीच सर्व साक्षात्कार व्हायचे. 'अरे, गृहपाठ पूर्ण नाहीये.' 'उद्या चाचणी परीक्षा आहे'. किंवा महत्वाच्या रिपोर्टकार्डवर सही घ्यायची आहे त्यामुळे जे काही बोलून घ्यायचंय ते आत्त्ताच होणार आहे. किंवा कॉलेज सुरु झाल्यावर, उद्या सकाळी उठून पुन्हा ट्रेनला बसायचे आहे. त्यामुळे आयुष्यातील सर्व निराशा रविवारी संध्याकाळी दाटून यायची. ती अजूनही येतेच. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा लढाईला चालल्यासारखे आवरून सर्व सामान घेऊन धावपळ करत ऑफिसला पोहोचायचे. शुक्रवारी दांडी मारलेले काम आठवते. किंवा दोन दिवस घरी मुलांना पहायची सवय झाली की सोमवारी त्यांना सोडणं अवघड झालेलं असतं. एकूणच काय अतिशय डिप्रेसिंग संध्याकाळ. 
             नाऊ कम्स सोमवार सकाळ. सोमवार सकाळी उठायला नको नकोसे वाटते, पण काम तर असतंच. स्वनिकच्या शाळेतल्या बाई म्हणाल्या होत्या, साधारण सोमवारी दुपारी बहुतेक मुलं झोपतातच दुपारी. तोही झोपतो. मलाही असं झोपायला मिळालं तर किती बरं होईल सोमवारी दुपारी? ऑफिस, शाळा, कॉलेज जिथे कुठे जायचे आहे तिथे पोचलो की मात्र कंटाळा जरा कमी होतो. बाकी लोकांना बघून समदु:खी भेटल्याचा आनंद होतो. दुपारपर्यंत माणूस जरा सरावला जातो. आणि संध्याकाळी घरी येईपर्यंत अख्खा आठवडा काय काय करायचं या विचारात रविवारची हुरहूर हरवून जाते. मला कधी कधी वाटतं की आपण केवळ विकेंड साठीच जगत असतो की काय किंवा विकेंडलाच. कारण, कित्येक महत्वाच्या गोष्टी जसं मुलांचे वाढदिवस किंवा एखाद्याला भेटणे हे सर्व त्या दोन दिवसांसाठी राखून ठेवतो. म्हणजे एखाद्याला बाळ झालेय, त्याचा आनंद आज न साजरा करता रविवारसाठी राखून ठेवायचा. किंवा कुठेतरी जाऊन आवडीचे काही खायचे आहे, तेही शुक्रवार वर जाते. मग मधले पाच दिवस आपण काय करतोय? असो. त्याबद्दल बोलून सोमवार अजून डिप्रेसिंग होईल.
          पण काही काही रविवार असेही येऊन गेलेत जिथे सोमवार ही एक नवीन सुरुवात असते. आणि असे रविवार कधी एकदा संपतील असे वाटते. उदा. : शाळेचा पहिला दिवस. जूनच्या पहिल्या आठवड्यात आणून वह्या पुस्तकांना लावलेली नवीन कोरी कवर, त्यावर लिहिलेलं नाव, नवीन गणवेश, नवीन वर्ग, सर्व कसं असणार याची उत्सुकता त्या रविवारी रात्री ताणली जायची. झोप लागली तर नशीबच. कॉलेजला जाण्याचा पहिला दिवस. प्रत्येक वेळी नवीन नोकरीचा पहिला दिवस. त्यातलं नवेपण कधीही जुनं झालं नाही. अजूनही ती उत्सुकता, कसं असणार सर्व याचे विचार, कसं बोलायचं, काय घालायचं हे सर्व कितीतरी वेळा उजळणी केलेलं असतं. ते रविवार कधीच बोचले नाहीत. तयारी तर जाम. दप्तर भरून ठेवणे किंवा ड्रेसला इस्त्री करून ठेवणे. आता अगदी मुलांच्या शाळा सुरु झाल्यावरही हे सर्व पुन्हा नव्याने अनुभवत आहे. :) 
         अशा खास दिवसांच्या सोमवार सकाळी एकदम खासच असतात. शाळेला खास नवीन डब्यातून नवीन जेवण मिळतं. कोलेजच्या नवीन वर्गात नवीन मैत्रीण मिळते, जिच्या बहिणीचं नावही विद्याच असतं. :) नवीन नोकरीत आयुष्यभरासाठी मिळणारा नवरा भेटतो आणि मुलांच्या पहिल्या शाळेच्या दिवशी, ते हसत बाय करताना, आपण किती हळवे आहोत हेही कळतं. अशा सोमवारी दिवसभर मन बागडत असतं आतल्या आत किंवा झुरतही असतं जे मागे सोडून आलोय त्याबद्दल. तर कधी ती एक सुरुवात असते रडून घालवलेल्या रविवारी रात्रीला निग्रहाने मागे टाकून पुढे जाण्याच्या निर्णयाची. कधी व्यायाम करण्याच्या कंटाळ्याला पुन्हा आव्हान देण्याची संधी तर कधी अर्धे राहिलेल्या कामाला निर्धाराने पूर्ण करण्याची शक्ती. पण एक नक्की असतं, कितीही कंटाळवाणा असला तरी सोमवार तुम्हाला एक सुरुवात देतो. एक नवीन संधी पुन्हा नव्याने काहीतरी सुरु करण्याची. :) होय ना? 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: