सॉक्स, सिरीयसली? तुम्ही म्हणाल ही सिरीयसली सॉक्सवर लिहितेय? मी म्हणते का नको लिहू? इतकं पिडलाय त्या सॉक्सनी मला सध्या. आज सकाळीच लोण्ड्री झाल्यावर कपडे घडी घालत बसले होते. एकेक करत सर्व घड्या झाल्यावर, पोपकॉर्न खाल्ल्यावर खाली कसे फक्त न उडालेले कॉर्न राहतात तसे सॉक्स बाकी राहिले होते. एक-दोन नाही २५-३० तुकडे होते. तीन लोकांचे मिळून. त्यातून मग जोड्या जुळवा चे काम केले. त्यानंतरही पाचेक सॉक्स बाकी होते ज्यांना जोडी सापडली नाही. मग एका ठिकाणी आम्ही मागच्या वेळी एकटे राहिलेल्या सॉक्सना जमा करून ठेवलेलं असतं. तिथे जाऊन ते घेऊन आले. त्यातूने मला अजून तीन जोड्या मिळाल्या. तरीही अजून मागचे आणि यावेळचे मिळून ५-६ एकेकटे ते सॉक्स तसेच पडून आहेत.
गेल्या १०-१२ धुतलेल्या कपड्यांच्याकडे पाहता मला एक कळलंय की आमच्याकडे निदान असे दोनेक तरी सॉक्स आहेत जे धुताना टाकलेले असतात पण त्यांची जोडी कधीच जुळत नाहीये. पण ते शूजच्या कपाटात अजूनही असतातच. मग सगळे धुवायचे टाकताना तेही उचलून आणतो आणि पुन्हा एकदा एकटे आहेत म्हणून तसेच ठेवतो. मुलांच्या शाळेत अक्खा दिवस शूज घालून बसायचे म्हणजे निदान दिवसाला एक तरी जोडी हवीच. अगदी ६ जोड्या आणल्या तरीही वेळेत सापडत नव्हते म्हणून मी अजून ४ आणले. तेही पुरवून पुरवून वापरले म्हणजे अगदीच नाईलाज असेल तरच नवीन काढले. असे असूनही प्रत्येक वेळी सकाळी घाईत मला एक जोडी सापडत नाही.
कोणे एके काळी माझ्या एका मैत्रिणीने मला सॉक्सची गुंडाळी करायला शिकवले होते. म्हणजे काय तर, दोन्ही सॉक्स एकत्र करून गोल गुंडाळायचे आणि सर्वात शेवटी एका सॉक्सच्या आत सगळी गुंडाळी टाकून द्यायची. त्यामुळे जोडी एकत्र राहते. तर मी अजूनही मनोभावे या सर्व सॉक्सच्या जोड्या गुंडाळ्या करून ठेवते. म्हणजे ऐनवेळी पटकन सापडतात. आता इतके पद्धतशीर ठेवूनही, माझी ही अशी अवस्था का? तर आठवड्याच्या शेवटी शेवटी खराब झालेले सॉक्स एकेकच मिळतात, जे दिसेल ते धुवायला टाकायचे या नियमाने संदीप ते सर्व धुवायला टाकून देतो आणि मग बरेचदा, सोफ्याच्या मागे, कपड्यांच्या कपाटात असे एकेक तुकडा असतो आणि दुसरा लोण्ड्री मध्ये. घरातून कुठलीही गोष्ट बाहेर जात नाही, मुले घरात येऊनच सॉक्स काढतात. तरीही नेहमी या जोडीतील दुसरा सॉक्स कसा आणि कुठे जात असेल याचा मला जर डिटेल मध्ये शोध लावावा लागेल असं दिसतंय.
सगळ्यात वाईट काम म्हणजे सकाळी सकाळी ड्रायर मध्ये असलेल्या किंवा घडी न केलेल्या कपड्यांच्या ढिगातून एक जोडी शोधणे. पटकन सापडले नाहीत म्हटल्यावर नाईलाज म्हणून मी गोल ड्रायर मध्ये हात घालते. कुठेतरी एक सॉक्स मला दिसतो. अजून थोडा ढीग उकरल्यावर तसाच दिसणारा सॉक्स मिळाला म्हणून पाहते तर आधीच दिसलेला तो सॉक्स असतो. मग मी दुसरी जोडी मिळते का बघायला लागते. यात २-४ मिनिट गेलेले असतात. मग मी फ़्रस्ट्रेशन मध्ये दिसला सॉक्स की जमिनीवर टाक असे करत १०-१२ तुकडे जमिनीवर पडतात. आणि त्या १०-१२ मध्ये एकतरी जोडी मिळेल अशी माझी अपेक्षा असते. कधी कधी काय होतं की सान्वीच्या दोन सारखे वाटतील असे तुकडे मिळाल्यावर कळतं की एकावर मध्येच थोडी पिंक डिझाईन आहे जी दुसर्यावर नाहीये. आणि बरोबर तेव्हढाच भाग शूज मधून बाहेर दिसू शकतो. मग परत मी अजून दोन-चार तुकडे जमिनीवर टाकते. त्यातून कधी सान्वीचे मिळाले तर स्वनिकचे मिळत नाहीत. तर कधी मी संदीपच्या एखाद्या सॉक्सला स्वनिकच्या सोबत जोडते.
कुणाला वाटेल की मी किती बेशिस्त बाई आहे. पण खरंच त्यावेळेस खूप चिडचिड होते. कसेतरी एक जोडी मिळाली की मी स्वनिकला देते आणि सांगते अरे घाल मी डबे, पाण्याच्या बाटल्या भरत असते. हा आपला असाच बसून राहतो जिन्यात. आधीचे दोन वेळा ओरडून झाल्यावर त्याची काहीच हालचाल नसते. मग मी अजून जोरात ओरडते. त्यावर त्याचं उत्तर येतं,'Why do you always have to yell at me?'. झक मारत मी त्याच्या पायात ते सॉक्स आणि शूज चढवते आणि एक लढाई संपवून दुसरी लढायला घरातून बाहेर पडते. :) आणि हो या तिघांच्या सॉक्सचाच इतका गोंधळ असतो की मी बापडी ज्यात सॉक्स लागणार नाही असेच शूज घालते. ते आणि कोण बघणार? :)
त. टी. : विकी हाऊ वर एक लिंक सापडली सॉक्स कसे घडी करायचे यावर मला. त्यावरून घेतलेले एक चित्र. मी अशी गुंडाळी करते. :)
No comments:
Post a Comment