Tuesday, May 03, 2016

घरची बाई

           गेले दोन दिवस जरा बरं नव्हतं. विशेष काही नाही, हेच थंडी ताप पिरियड्स वगैरे. पण त्यामुळे घरात काय चाललं आहे यात माझं लक्ष अजिबात नव्हतं. मुलं मध्ये कधीतरी येऊन kiss देऊन जात होती. कधी पांघरूण घालत होती किंवा 'तुला आता बरं वाटतंय का' असं कधीतरी विचारलंही. पण बाकी, संदीप त्यांना बाहेर घेऊन गेला, घरी आले, त्याने जेवण काहीतरी दिलं त्यांना. मी झोपले तेंव्हा त्यांनी काय केलं माहित नाही. पण काही ना काही चालू होतं. सांगायचं कारण म्हणजे, कधीतरी एकदा मुलं लहान असताना असाच विषय चालू होता की कसे मुलं रात्री रडत उठली की मला जाग येत नाही त्यामुळे ते आपोआप बाबाकडे जातात. आमचा मित्र तेंव्हा म्हणाला,'अगं तो घरची बाई आहे.' आता खरंतर आधीही घरात कर्ती असलेली स्त्री आणि तिचं घरातलं वास्तव्य यावर विचार आला असेल मनात पण ते वाक्य माझ्या डोक्यात चांगलं बसलं. कदाचित तेंव्हा मी आमच्या घरातील कर्ती बाई होत होते म्हणून असेल. पण मला कन्सेप्ट आवडला.
          प्रत्येक घरात त्या घराचं घरपण टिकविणारी व्यक्ती. मग ते घरात येणाऱ्या जाण्याऱ्या व्यक्तींचं काही करायचं असू दे किंवा प्रत्येकाच्या वेळा पाळून सर्वांच्या आवडी निवडी जपणे असू दे. त्यात मग छोट्या छोट्या गोष्टी येतात, रोजच्या जसे कपडे धुतले जाणे, भांडी, रोज जेवायला काय करायचं ठरवणे किंवा मुलांचं हवं ते नको बघणे. आणि बाकी असतातच, जसे आठवड्याचं सामान आहे ना हे पाहणे, फ्रीजमधल्या सर्व वस्तू लावून ठेवणे, महिन्याची बिलं भरणे, मुलांच्या शाळेतून काही नोटीसा आल्या तर ते तपासणे, बाकी पाहुणे किंवा कुणाकडे कधी जायचे हे ठरवणे. खरेदीला गेल्यावर काय घ्यावे काय नाही, अगदी कुणाला काय गिफ्ट द्यावे हे ठरविणे, अशा अनेक भानगडी. कधी एखाद्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे, तर मुलं फायनल शब्द कुणाचा ऐकतील हे ज्या त्या घरात ठरलेले असते. आणि पुढे जाऊन महत्वाच्या काही निर्णयातही या व्यक्तीचा सहभाग हवाच, जसे नोकरी सोडणे, बदलणे किंवा घर घेणे, सोडणे, इ.
          वर म्हणाले त्या सर्व गोष्टी हे ढोबळ मानाने केलेले वर्णन. सर्वांनाच माहित आहे की घरची कर्ती बाई हे खास व्यक्तिमत्व असतं प्रत्येकाच्या घरात आणि माझ्या पिढीपर्यंत तरी ते आईनेच पार पाडलं आहे. पण माझ्या घरात मात्र ही व्याख्या सध्यातरी कुणाला लागू होते हे कळत नाही. अर्थात स्त्रीच म्हणायचं तर मलाच व्हायला पाहिजे. पण आजकाल अर्थार्जन हे नवरा बायको दोघांकडे असल्याने बाकीची कामेही वाटून घेतली जात आहेत. एकावेळी मी मुलाचं करते तर दुसऱ्या वेळी तो. कधी मी शाळेच्या नोटीसा पाहते तर कधी तो. कधी मी नसेन तर जेवायलाही अगदीच अडत नाही. मी कामासाठी परगावी मुक्कामी गेल्यावर, त्याने मुलांना सांभाळलेही आहे. उलट ते अवघड काम माझ्यावर आलं नाहीये अजून तरी. :) त्यामुळे मला कळत नाही की खरंच 'घरची बाई' असा कन्सेप्ट आमच्या घराला कसा लागू होईल? अशा वेळी, 'घरातील बाई' ही एक स्त्री न राहता, केवळ व्यक्ती होते, मग ती स्त्री असो की पुरुष. आणि दोघांच्या मधल्या लिंगसापेक्ष रेषा हळूहळू पुसट होऊ लागतात. जशा आमच्या घरी होत आहेत. 
          आता त्या व्यक्तीचे गुण पाहू. त्या व्यक्तीकडे तत्परता, मनकवडेपणा तर असतोच शिवाय एकेकाळी, त्या व्यक्तीकडून घरासाठी एखाद्या वस्तूचा किंवा आवडत्या कामाचा त्यागही गृहीत धरला होता किंवा अजूनही केला जातो. उदा: मुलं आजारी आहेत, रजा कुणी घ्यावी?  घरात पाहुणे आलेत, रजा कुणी घ्यावी? दोन लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागलीय, कुठे राहायला जावं? मुलांसोबत घरी काही वर्षं राहायचे आहे, कुणी राहायचे? या सर्व बाबतीत आजही स्त्रीकडेच पाहिले जाते. 
           मुलगा लग्न करताना, मला नोकरी करणारी मुलगीच हवी असा हट्ट करतो. तिला शिक्षण, जेवण वगैरे सर्व कला तर यायलाच हव्या. पण जेव्हा घरात मुल येतं आणि बरेच निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा मात्र तिला नोकरी सोडली तरी काय होतंय असं विचारलं जातं किंवा बरेचदा तीच स्वत: नोकरी सोडायला तयार होते. आणि तिथेच त्या धुसर झालेल्या रेषा पुन्हा ठळक होऊ लागतात. मला वाटतं की, बरेचदा दोघेही नोकरी करत असताना असा भास नक्कीच होतो की दोघेही समान आहेतच. पण अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून ही असमानता दिसत राहते. असमानता कमी व्हायची असेल तर ती घरापासूनच सुरु व्हायला हवी.  आणि ती दोघांनी मिळून केली पाहीजे. त्यासाठी मंदिराच्या पायऱ्या चढल्याच पाहीजे असे नाही.
          घराचं घरपण हे दोघांमुळेच असलं पाहीजे, नाही का? जसं घरी आल्यावर आपण विचारतो, 'आई कुठे आहे?', तसं, मुलांनी, 'बाबा कुठे आहेत? ' हे विचारलंच पाहीजे ना? त्यामुळे ते सर्व बाबाही नक्कीच सहमत असतील याला. आणि हो, आपल्यालाही खरंतर, आपल्या घराचा हक्क हवा असतो, एक स्त्री म्हणून. मीही म्हणते बरेचदा,' मी केलं नाही तर या घरात्त काही होत नाही.' म्हणायला काय? पण तो हक्क घेणाच्या नादात आपण बाकीही बरंच काही गमवत नाहीये ना हे पाहायला हवं ना ! 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: