Sunday, May 01, 2016

आशा... ओSS ....आशा...

           अनेक वेळा माझ्या भारतातील मैत्रिणींकडून ऐकते की तुमचे बरे आहे गं, डिश वॉशर आहे किंवा कपडे धुवायला मशिन आहे. तर कधी हे ही ऐकले की,' भारतात बरे असते लोकांना घरी काम करायला मदत असते. तुम्ही पैसे देऊन हे काम करून घेऊ शकता. एकूण काय, 'ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन अदर साईड'. माझ्या सुदैवाने मला दोन्ही अनुभव मिळाले. आणि एक नक्की आहे, कुठेही रहा, घरी रहा किंवा नोकरी करा, एकूण घर, मुलं, पाहुणे सर्व करणे हे सोप्पं काम नाही. अर्थात त्यासाठी म्हणून पुन्हा एकटे रहायची माझी इच्छा नाही. :)
             मध्ये एक लेख वाचला होता की कसे जेवण बनवण्यासाठी कुणी तरी मदतनीस ठेवली आणि उरलेल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो यावर. मला अजूनही कळत नाही की जेवण बनविणे, इ अचानक मोठे काम का झाले आहे? खरं सांगू का, कुणीतरी  अचानक भेटायला यावं आणि त्यांच्यासाठी घाईने का होईना चार चपाती आणि भाजी करावी आणि चांगली व्हावी यासारखी मजा नाही. आणि तो आनंद मला अनेक दिवसात मिळाला नाहीये कारण कुणाला यायचे असेल तर त्यांना वाटते अरे अचानक जाऊन उगाच का त्रास द्यावा. किंवा मलाही असे कुणाकडे जायची हिम्मत झाली नाहीये. असो. 
           शिकागोमधून परत भारतात जायचं ठरलं तेव्हा मुलं लहान होती. वाटलं, चला बरं आहे आता तिकडे गेल्यावर घरकामाला कुणी बाई मिळेल तर तेव्हढीच मदत होईल. त्यामुळे आम्ही गेल्यावर महिन्याच्या आतच केर, फरशी, भांडी यासाठी एक मावशी मिळाल्या कामाला. दुसरी गरज होती पोळ्या करण्यासाठी आणि जेवण बनवायला मदत करायला. मी आणि संदीप दोघे मिळून जेवणाची तयारी करायचो. इतक्या वर्षात सोबत काम केल्याने आम्हाला आता सवय झाली होती ठराविक प्रकारे करण्याची. भाजी किंवा कांदा, लसूण जरी कापायचा असेल तर तो एकदम मस्त कापून देतो. माझ्या पोळ्या करून होईपर्यंत मुलांचे तो आवरून घेतो. अशी अनेक कामे चालायची. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हाच काय तो आमचा सर्वांचा मिळून एकत्र वेळ असायचा. पुण्यात आल्यावर संदीप रात्री ८-९ वाजता यायचा कारण त्याचे ऑफिस उशिरा सुरु व्हायचे.
            आता एकतर या सर्व बदलांची सवय करून घ्यायची आणि त्यात मदतीला जे कुणी मिळेल त्याच्याशी जुळवून घ्यायचे. खूप कठीण होते. अनेक लोकांना वाटते की,'अरे तुम्हाला काय सर्व काम करायला बाई मिळते भारतात असताना. ' पण तो बदल माझ्यासाठी अवघड गेला. कारण पहिले दोन दिवस एक जण स्वैपाकाला आली तिने घाई घाईत एक भाजी केली, त्यात तेल जास्त, तिखटाचा अंदाज नाही. पोळ्या माझ्यापेक्षा चांगल्या होत्या. पण मला लवकरच कळले की मला हे जमणार नाही. म्हणून अशा कुणाला शोधू लागले की जे फक्त मला पोळ्या करून देईल आणि भाज्या चिरून, सर्व तयारी करून देईल. माझे काम फक्त फोडणी टाकायचे. नशिबाने लवकरच मला अशी एक व्यक्ती मिळालीही, आशा तिचे नाव.
           सुरुवातीला जरा त्रास झाला दोघीनाही, पण दोन वर्षात ती शेवटपर्यंत आमच्याकडे कामाला येत राहिली आणि जाताना सांगून गेली पुन्हा भारतात याल तेंव्हा मला सांगा मी नक्की येईन. आमच्याकडे भांड्यासाठी येणाऱ्या मावशीही मला हेच सांगून गेल्या. एकूण काय मी एक चांगली एम्प्लोयर आहे असे सांगायला मला वाव मिळाला. :) असो. आता आशाबद्दल, ती सर्व तयारी करून द्यायची त्यामुळे कधी मला उशीर झाला तरी निदान कुकर लावलेला असे, पोळ्या तयार असत, पटकन नुसते वरण केले तरी मुलांचे जेवण सुरु व्हायचे. मी कधी आजारी असेन तर ती सर्व करून जायची. एकूण चांगली गेली ती दोन वर्षं.
          इतके लिहूनही मी माझ्या मूळ मुद्द्याला आले नाहीये. (प्लीज डोक्याला हात लावू नका. :) ) माझं नशीब चांगलं म्हणून मला असे मदत करणारे लोक मिळाले. पण त्यामध्ये एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे कुटुंबाचा एकत्र वेळ. जेवण बनवण्याच्या निर्णयात अनेक विचार असतात, सर्वाना काय आवडतं, काही खास कधीतरी करावं किंवा कधीतरी नुसता उपमाच करावा. पण आशा असल्यामुळे, तिचे काम करून ती जाईपर्यंत सर्वांचे काही ना काही वेगळे चालू असायचे. त्यामुळे मुलांना कधीही शेंगा सोलाव्या किंवा लसुन सोलावा अशा छोट्या कामात मदत करायची वेळ आली नाही. शिवाय मुलाला(वय ३ वर्षं) असा भ्रम झाला की जेवण बनवणे हे केवळ आईचेच काम आहे.
          आता सध्या अमेरिकेत आल्यापासून पुन्हा जुने रुटीन चालू आहे आणि मला फरक जाणवतो. संध्याकाळी मुलं विचारतात आई आज काय करणार आहेस? मग कधी मी त्यांना मदत करायला सांगते. संदीप भाज्या चिरून देतो. कधी पोळ्या खायचा कंटाळा आला की पिझ्झा बनवायला मुलं मदत करतात. आशाची मदत कितीही चांगली असली तरी स्वत:च्या घरात सर्वांनी मिळून काम करण्याचा आनंद वेगळाच. मुलांना आता कळते की आपण चिरलेली भाजी केलीय किंवा आपण केलेला पिझ्झा कसा बनलाय किंवा पोळ्यांना तूप लावलंय. अशा छोट्या गोष्टी. पण त्यातून ते खूप शिकत आहेत. मुख्य म्हणजे आम्हाला त्यांच्या सोबत थोडा वेळ घालवता येतो. हे सर्व खूप दिवस मिस करत होते.
          मला पुण्यात असताना असेही अनुभव आले की ज्या घरात बाई जेवण बनवून गेली आहे, त्यामुळे पाहुणे आले की आता काय करायचे असा लोकांना प्रश्न पडलाय. किंवा स्वत: सुगरण असूनही जे मावशींनी बनवले आहे ते जेवण लोकांना वाढले आहे. त्यात आपलेपणा किंवा प्रेम दिसलं नाही. घरी जेवण बनवण्यासाठी कुणीतरी असणं ही अनेक लोकांची गरज बनली आहे. अर्थात त्यात काही गैर नाही, मदत लागतेच. पण त्यामुळे आपल्या हातचे बनवून खायला घालण्यातली मजा मात्र मिळत नाहीये. अनेक वेळा चार लोक येणार म्हणून बाहेरून मागवून घेतले जाते, त्यात घरच्या लोकांचे कष्ट वाचतात नक्कीच, पण एकत्र गप्पा मारत सर्वांनी मिळून जेवण बनवणे किंवा काही चुकलं तर 'आहे ते छान आहे' म्हणून आवडीने खाणे ही मजा येत नाही. किंवा, 'अगं तुझ्या त्या वडीची रेसिपी दे ना, मस्त झाली होती' अशी खास आठवणही नाही. मला तर आजकाल वाटत आहे की मी इथे परदेशात राहून जास्त 'देशी' झाले आहे. असो. :) स्वत:  जेवण बनवून आग्रहाने खावू घालणे हा आपुलकी दाखवण्याचा एक खास प्रकार आहे, जे आपल्या आई वगैरे नेहमी दाखवतात. आपणही ती कला विसरायला नको इतकंच.
          आणि हो, आशाची आठवण येतेच मला अजूनही, प्रत्येक वेळी पोळ्या करताना. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: