Sunday, May 29, 2016

सल्ला फी आकारली जाईल !!

          सल्ला फी आकारली जाईल !! अनेक वकिलांच्या आणि मोठ्या लोकांच्या दारात ही पाटी नक्की पाहिली असेल. पण जगाच्या लोकसंखेच्या मानाने या अशा लोकांची संख्या नगण्यच म्हणावी लागेल.  कारण बाकी उरलेले आपण सर्व न विचारताच, फुकटचे  सल्ले देत असतो आयुष्यभर. बरोबर ना? :) पैसा, वेळ, दान वगैरे या सर्वांपेक्षा जास्त दिली जाणारी गोष्ट आणि तीही न मागता म्हणजे, सल्ले. सल्ला म्हणजे तरी काय? एखाद्या बाबतीत एखाद्याने कसं वागावं, काय करावं याबाबत दिलेलं आपलं मत. बरं हे मत नुसतं ऐकून सोडून द्यावं अशा पद्धतीचं मत नसतं. ते ऐकणाऱ्याने ऐकावं असं त्यांना मनापासून वाटत असतं आणि त्यांचं ऐकून कुणी यशस्वी झाला तर, 'मीच दिला होता त्याला सल्ला' असं कौतूकानं सांगतातही. हा सल्ला म्हणजे काय आपले आई बाबा ऐकवतात तसा फायनल निर्णयही नसतो. कधी कधी 'तुम्ही कोण मला सांगणारे' असं उलट ऐकून घ्यायची शक्यता असते. त्यामुळे तो अगदी जपूनच द्यावा लागतो. तर असा हा निर्णय आणि मत या दोन्हीच्या मध्ये येतो तो, 'सल्ला'.
          आयुष्याची प्रत्येक पायरी पार पडली की त्याबाबत आपल्याला सल्ला देण्याची पूर्ण सूट आहे असं आपल्याला वाटतं आणि बाकी लोकांनाही. त्यामुळेच बारावी झालेल्या मुलांकडे १०-११ वीच्या मुलांना त्यांचे आई बाबा पाठवतात. म्हणतात,"अरे याला पण जरा सांग थोडं. काय काय तयारी करायची? कधी, किती अभ्यास करायचा? कुठला क्लास लावायचा. सर्व नीट सांग." आपणही मग खूप तीर मारल्यासारखे सांगतो. त्यात मग आपण अभ्यास करताना झोपा काढल्या असल्या तरी चालतं. पुढे मग कॉलेज, नोकरी जसे पुढचे टप्पे तसे अजून सल्ले. :) कधी कधी आपल्या मुलांना कुणी योग्य सल्ले देणारे मिळालेच नाहीत याची खंतही असते पालकांना. तर कधी कुणाचा सल्ला न ऐकून चांगलंच केलं असा अभिमानही. म्हणजे जसं,"माझे काका तर म्हणतच होते की डॉक्टर हो म्हणून, मी मात्र त्यांचं अजिबात ऐकलं नाही. " यात आपण मोठा गड जिंकल्याचा आनंद असतो. 
           प्रेम, लग्न वगैरे मध्ये सल्ले देणारे तर बोलायलाच नको. परजातीय, परप्रांतीय, परदेशीय किंवा लॉंग डिस्टन्स नाती या सर्वात सर्व लोकांचे ऐकून घ्यावे लागते. किंवा एखादी मुलगी किंवा मुलगा योग्य आहे किंवा नाहीये हेही सुनावले जाते. कधी निराश झालेल्या देवादासाला तर कधी प्रेमात लई गमजा मारणाऱ्याला काय केलं पाहिजे, नोकरी, घर, आई बाप, समाज या अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे असे अनेक सल्ले मिळत असतातच. अर्थात या फेज मध्ये कुणी हे असले सल्ले ऐकून घेत नाहीत. पण मुलीला पटवण्यासाठी सांगाल तर नक्की ऐकतील. :) लग्न का केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुणाशी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे अशा अनेक विषयांवर तुम्हाला सल्ले मिळू शकतात, तेही  मो      फ      त !!  असो. 
           याच्या पुढच्या पायरीचे तर बोलायलाच नको. एकदा का लग्न झालं की मग, तुम्हाला सल्ले देणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट होते. आणि ते टाळणे तितकेच अवघड. लग्नानंतर कसे वागले पाहिजे, मुले कधी आणि किती असली पाहिजेत, घर कुठे, कधी घेतलं पाहिजे, भविष्यासाठी कशी गुंतवणूक केली पाहिजे हे सर्व आलेच. पण सर्वात जास्त सल्ले देण्याची फेज असते ती म्हणजे प्रेग्नंट असताना आणि मुले झाल्यावर. कसं वागावं, काय खावं-प्यावं पासून मुलांना कसं वाढवावं आणि कसं नको याचे हजारो-लाखो सल्ले तुम्हाला मिळतील. खरंतर ही पोस्ट लिहायला सुरुवात केली तेव्हा ती मला माझ्या सवयी विषयी लिहायची होती. कारण माझ्यासारखे आई-बाबा झालेले लोक खूप उत्साही असतात. आणि मग जरा कुणाचं पोर आजारी पडलं की मी डॉक्टर असल्यासारखीच सल्ले द्यायला लागते. आणि मला ते थांबवायचं आहे. पण जमतच नाही. जित्याची खोड ! असो. तर आपण बोलत होतो सल्ल्यांबद्दल. 
          मुलं झाल्यावर  आणि विशेषत: पहिल्या वेळी एकतर मोठ्ठ टेन्शन असतं. अगदी आपल्या आई-बाबानाही. कारण तेही पहिल्यांदाच आजी आजोबा होणार असतात. त्यामुळे समोरचा जे सांगतोय ते ऐकून मी मुलं आजारी वगैरे असताना अनेक उपाय करून पाहिलेत. आणि तसेच सल्ले मी देत राहते सर्वाना. प्रत्येकाचं मुल वेगळं, आई-बाप वेगळे, त्यामुळे प्रत्येक सांगितलेला उपाय सर्वाना चालेलच असं नाही. पण द्यायला काय? फुकट आहे, द्या सल्ला. आधी नवीन आई-बाप होणाऱ्यांना सल्ला द्यायचा. मग एकाची दोन मुले झाल्यावर आपलं आयुष्य कसं सुधारायचं याचा सल्ला द्यायचा. :) आणि हो, त्यातही दुसरं मुल हवं की नको आणि ते किती वर्षांनी करावं हाही एक मुद्दा असतोच. :) मला नेहमी वाटतं की सल्ले देणं कमी केलं पाहिजे. आणि ते करण्यसाठी आधी आपला तो प्रॉब्लेम आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि दुसरे म्हणजे सांगितलेच काही कुणाला तर त्याने ते ऐकलेच पाहिजे असा हट्टही धरला नाही पाहिजे. 
           आता ती सवय का मोडायची आहे मला ते सांगते. होतं काय की, जेव्हा समोरचा सांगत असतो तेव्हा त्याला कदाचित केवळ आपलं गाऱ्हाणं सांगायचं असतं. पण जरा कुणी तोंड उघडलं की सल्ले सुरु. त्यामुळे बरेचदा समोरची व्यक्ती मग काही सांगतच नाही. किंवा सांगितले तरी त्यात मन मोकळं केल्याचं समाधान मिळत नाही. त्यामुळे सल्ले देण्यापेक्षा, I want to try to be a good listener. आणि हो, कधी कधी असेही होते की अनेकदा सांगून आपणच आपली किंमत कमी करून घेत आहोत असेही वाटते. ही काय सांगतच राहणार किंवा हिला काय कळतंय असे उत्तर ऐकायला लागण्याची भीती असतेच. त्यामुळे वेळेतच थांबलेलं बरं, नाही का? अजून एक कारण म्हणजे, मी अनेकदा ब्लॉग लिहिताना ते 'सल्ल्यान्सारखे' वाटू शकतात. उदा: मध्ये मी मुलांच्या वाचण्यावर किंवा डब्यातील जेवणावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्या लिहिताना मला अनेक ठिकाणी, 'असं करा, असं करू नका' असं लिहिणं मुद्दाम टाळावं लागलं. त्यापेक्षा मी काय काय करते यावर लिहिण्याचा प्रयत्न केला. 
           आजकाल आजू बाजूचे लोक कमी होते म्हणून की काय, आपण कसे वागावे यावर सोशल मिडिया किंवा वृत्तपत्रे किंवा टीव्ही वरही ऐकायला मिळतेच. त्यात माझी भर नको, असा प्रयत्न करत आहे. :) त्यामुळे मी तर म्हणते उलट सल्ला फी आकारली पाहिजे. दिला सल्ला की घ्या फी. म्हणजे माझ्यासारखे फुकट सल्ले देणारे कमी होतील. पण, दुसऱ्या बाजूला मला असंही वाटत की आपल्याला एखादी गोष्ट माहित आहे तर ती लोकांना का नको सांगायला? उलट ज्याची काही काळजी असते त्यांनाच तर सल्ला द्यायचा प्रयत्न करतो. नाहीतर कोण कशाला सांगत बसेल? त्यामुळे कुणी दिलाच असा सल्ला तर नक्की ऐकून घ्या. बघा दिला ना मी सल्ला परत? :) I told you, I need to work on it. :D

विद्या भुतकर.

No comments: