Thursday, May 19, 2016

कसं हसायचं?

         आज आणि उद्या एक कॉन्फरन्स आहे ऑफिसची. आता या अशा ठिकाणी २०० च्या वर अनोळखी आणि दहा बारा ओळखीचे लोक येतात. आणि दिवसभर मग मला माझं ते नेहमीचं ठराविक स्टाईलचं हसू चेहऱ्यावर घेऊन फिरावं लागतं. ते हसू रिसेप्शनिस्ट इतकं खोटं नसतं आणि आपल्या बॉयफ्रेंडला बघून येतं तितकं मोठंही नसतं. तुम्हाला पण याचा अनुभव आला असेल. अनेक अनोळखी लोकांत वावरायचं आहे. उगाच उदास तोंड घेऊन फिरता येत नाही, जे काही चालू आहे त्यात खूप काही रस घेता येत नाही पण अगदीच निष्काळजी आहोत असंही वागता येत नाही. ओळख नसल्याने जास्त वेळ बोलताही येत नाही. मग मी माझं ते हसू धारण करते.
           काय करायचं? ओठ मिटलेलेच असतात, फक्त मिटलेल्या ओठांनी ती जी एक रेष बनते ती थोडीशी वक्र करायची दोन्ही बाजूनी. डोळे एकदम उत्सुक नाहीत पण नक्की एकाच गोष्टीवर टिकवूनही ठेवलेले नाहीत. नजर थोडी इकडे तिकडे फिरवत ठेवायची. त्यामुळे होतं काय की तुमच्याकडे कुणी अचानक पाहिलं तरी चेहऱ्यावर हसू असतंच, त्यामुळे 'बोअर होतंय का?', 'काही प्रश्न आहे का?', 'बरं वाटत नाहीये का?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत नाहीत. या माझ्या स्माईल मुळे मी अनेक कार्यक्रम पार पाडले आहे.
त्यातले काही:
१. तोंडओळख असलेल्या लोकांच्या घरी तीर्थ प्रसादाला गेलो आहोत आणि थोडा वेळ थांबावे लागले आहे.
२. मुलांच्या मित्रांच्या वाढदिवसाला गेलोय, आई- बाबा ओळखीचे नाहीत पण मुलांसाठी जावं लागतंय.
३. २५ तेलगु लोकांच्या पार्टीमध्ये एकटेच मराठी आहात. त्याचं बोलणं एका शब्दानेही कळत नाही आणि पार्टी संपेपर्यंत उठूनही जाता येत नाही.
४. सासरी कुणाच्या तरी घरी हळदी-कुंकू वगैरे कार्यक्रमाला गेलो आहोत जिथे तुम्ही कुणालाही ओळखत नाही पण ते सर्व तुम्हाला ओळखतात.
५. मुलं-बाळ असणाऱ्या अनेक बायकांमध्ये तुम्ही एकटेच लग्न झालेले किंवा मुलं नसलेले आहात .
६. अनेक स्टोक ब्रोकर्स च्या मध्ये एकटेच सोफ्टवेअर इंजिनियर आहात.
७. मी हे हसू एका अमेरिकन जोडप्याच्या चेहऱ्यावरही पाहिलं आहे, एका भारतीय डोहाळे जेवणात. त्यामुळे ते युनिव्हर्सल आहे असं म्हणायला हरकत नाही.
८. कुणाच्या तरी लग्न किंवा रिसेप्शनला गेल्यावर खूप जवळचं लग्न नसल्याने सहभाग घेता येत नाही पण कुणी दुसरे ओळखीचेही नाही.
असो. तर आज दिवसभर हे हसू घेऊन फिरत होते. आजचा दिवस पार पडला, आता अजून एक. :) तुमचेही असे अनुभव असतील तर नक्की सांगा. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: