Wednesday, August 31, 2016

Monday, August 29, 2016

बलात्कार असाही आणि तसाही

       गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.
         सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"
त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "
खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.
पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."
मी,"अरे वा ! काय झालं मग?"
त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."
मी,"बरं."
आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"
त्या,"१४ झाले की आता."
आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "
त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".
हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.
१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?
२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?
३.  गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?

खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?

मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."
त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."
मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"
त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."
मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"
मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.
मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."
त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."
मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "
          हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.
आईंना म्हटलं,"काय झालं हो?"
त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".
         मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.
         खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.

विद्या भुतकर.

Thursday, August 25, 2016

क्षुद्र

         खरंच, अनेकदा लोक ज्या परिस्थितीतून मार्ग काढत, धडपडत, शिकत आणि लढत मोठे होतात, काहीतरी करून दाखवतात, ते पाहून जे वाटतं ते लिहिण्याचा एक तोकडा प्रयत्न. त्यांचे ते अनुभव मग त्यांना मोठं करून जातात. त्यातून जे जिंकतात ते खरे विजयी वाटतात.  आपले लढेही सामान्य आणि धडेही. सामान्य माणूस म्हणून जे 'सामान्य' पण वाटत राहतं ना, ते व्यक्त करणंही अगदीच सामान्य वाटतं. त्यामुळे अनेक दिवस ही पोस्ट करायची इच्छा होत नव्हती. पण तरी ते 'वाटणं' कमी होत नव्हतं. शेवटी पोस्ट करत आहे. माझ्यासारखे कुणी कदाचित भेटेल हे वाचून किंवा निदान कळेल तरी की अजून असे वाटणारे लोक आहेत का? 

कधी कधी ना
फार क्षुद्र वाटतं
म्हणजे अगदीच गरीब नसल्यासारखं.
त्यामुळेच गरीब असल्यासारखं.

साधं सोप्पच आयुष्य,
लाखो नोकरदार असतात,
तसंच आपलंही.
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं
नोकरी, लग्न, मुलं-बाळ.

मग करोडो लोक दिसतात
माझ्या इतकेच सामान्य,
त्यांच्या तितक्याच छोट्या गोष्टी,
हेच, घर, गाडी, पैसा बचत.

मूठभर लोकांच्या लढाया मग
भारी वाटू लागतात.
वाटतं, आपल्या आई-बाबानं
इतकं सोप्प आयुष्य दिलं,
कुठे लढायला नाही गेलो
की गड चढायला गेलो नाही.

पण पर्याय नसतो,
लोकांच्या लढाया आपल्या म्हणून
लढता येत नाहीत.
आणि आपल्या छोट्या म्हणून
सोडता येत नाहीत.

दुसरा जिंकला तर त्याच्यासाठी
टाळी वाजवावीच लागते,
बाकी कितीही लहान असो,
प्रत्येकाला आपली लढाई
स्वतःच लढावी लागते.


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, August 23, 2016

खुसपट

        पुण्यात आहे तोवर सानूला मराठी बाराखडी आणि मुळाक्षरे शिकवायची असं डोक्यात होतं. त्याप्रमाणे आईंनी दोन-तीन वेळा तिचा सराव घेतलाही. पण तिला त्या ते सांगत असताना माझ्या डोक्यात विचार होते आपण इथंपर्यंत कसे आलो. अर्थात पाटीवर काढलेली मुळाक्षरे आणि बाराखडी आठवते मला. आई भाकरी करताना उलथन्याच्या दांड्याने काढून दिलेल्या सरळ रेषाही. पाचवीत असताना हजारो वेळा आबांनी  वहीत गिरवून घेतलेली ABCD ही आठवते. पण माझा प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टीसाठी त्यांनी किती प्रयत्न केले असतील. "अक्षर चांगलं काढ", असं हजारो वेळा आपल्या सर्वांच्या आयांनी सांगितलं असेल. आताही आई सानुला शिकवत आहेत तर त्यांचं एकंच वाक्य असतं, "नीट काढ.".
         एकूण काय अक्षर चांगले येण्यात आपल्या घरच्यांचा मोठा वाटा असतो. बरं नुसते अक्षर चांगले असून उपयोग नाही, शुद्धलेखनही हवेच. "हस्ताक्षर आणि शुद्धलेखन" अशा स्पर्धा असत शाळेत. शिक्षक तोंडी एखादा लेख किंवा छोटा भाग सांगत आणि आम्हाला ते लिहायचं असायचं. शाळेतल्या अनेक स्पर्धांपैकी याही. मला कधी बक्षीस मिळालं नाही त्यात, पण भाग घेतल्यामुळे अनेक वेळा अनेक गोष्टी जरूर शिकले. इंग्रजीतही आबांनी स्पेलिंग चुकलंय म्हणून कित्येक वेळा उठाबशा काढावल्या तर कधी कान पिळला. आता अक्षर पूर्वीसारखं राहिलं नाही आणि आता तितकं लिखाणही होत नाही. खरं सांगायचं तर तेंव्हा या गोष्टींचं इतकं महत्त्व वाटायचं नाही, पण आजकाल याच बारीक सारीक गोष्टींनी आपण एक व्यक्ती म्हणून कसे बनलो याचा विचार मात्र नक्की येतो.
          लेख लिहायचं कारण म्हणजे आजकाल अनेक ठिकाणी मराठी, इंग्रजी मध्ये लेख वाचते किंवा फेसबुक वगैरे छोट्या पोस्ट पाहते. त्यातील अशुद्धलेखन पाहून डोळ्याला त्रास होतो. अक्षरश: त्रास होतो. आमच्या घरी, वडील आणि आजोबा दोघेही शिक्षक, त्यामुळे 'चुका काढणे' हा गुण बहुदा साहजिकच माझ्यातही आला असावा. :) त्यामुळे शुद्धलेखनात, व्याकरणात चूक दिसली की ती सुधारायची इच्छा होतेच. बरं, त्या चुका तरी किती साध्या साध्या असतात. 'तू', 'मी', 'की,'ही', 'नाही', 'पण', 'आणि' असे नियमित वापरलेले शब्द, तेही का चुकतात? बरं, नसेल लक्षात एखादा नियम, निदान एकदा तपासून तरी पहावं? 'पन','आणी','मि', 'नाहि' असे शब्द पाहिले की काय बोलावं असं वाटतं. का या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाही? बहुदा त्याचसाठी लहानपणीच या गोष्टी बरोबर शिकण्यावर भर दिला जातो, म्हणजे मोठीपणी ते अंगवळणीच पडते. इथे लोकांचे, दिवसाला अनेक पोस्ट पाहते, 'मराठी माणूस' म्हणून अभिमान असल्याचे. मग त्या भाषेचाही आदर करायला हवा ना?
       बरं, मराठीचे तसे हाल, तर इंग्रजीचेही कमी नाहीत. एकतर मराठीवजा इंग्रजी लिहिण्यात त्याचा खून होतोच. पुन्हा, SMS, tweets मध्ये शॉर्ट मध्ये लिहिण्यात बरेच स्पेलिंग मध्ये काटछाट केली जाते. हे सर्व स्वीकारले तरीही, अनेकवेळा साध्या साध्या शब्दांमध्ये चुका असतात, वाक्यरचनेमध्ये चुका असतात. व्याकरण, काळ वगैरे तर जाऊच देत. तरी बरं, प्रत्येक फोन मध्ये ऑटो करेक्शन आहे आजकाल. इतके असूनही, महिना, आठवड्याचे वार यांचेही स्पेलिंग चुकलेलं असतंच. मी म्हणते, आपण स्वतःच जर अशा चुका करतोय तर आपण मुलांना काय सांगणार? आणि त्यांच्याकडून जर आपण बरोबर शिकायची अपेक्षा ठेवत असू, तर आपण चुकून कसे चालेल?
        आपण अनेकवेळा घरातील एखादी वस्तू अशीच ठेवली पाहिजे किंवा असेच वागले पाहिजे याबद्दल नियम करतो आणि ते सर्वांनी पाळावेत असा आग्रह करतो. मग भाषेच्या बाबतीत उदासीनता का? शिवाय, मला तरी अनेकवेळा चुका दुरुस्त केल्याबद्दल ऐकून घ्यावे लागले आहे ते वेगळेच. म्हणजे एकतर चांगले सांगायला जावं तर, उगाच खुसपट काढल्याचा रोष येऊ शकतो. 'नीट शिकल्याने, शिकवल्याने किंवा कुणी चुकत असल्यास दुरुस्त केल्याने नुकसान तर काहीच नाहीये , उलट फायदाच होईल', असा विचार खूप कमी ठिकाणी दिसलाय. असो. आता माझ्या स्पेलिंग दुरुस्तीच्या त्रासाला कंटाळून मला माझ्या मैत्रिणी एक दिवस मला Whats App ग्रुप वरून काढून टाकतील.  किंवा तुम्ही आपल्या बॉसच्या मेलमधील स्पेलिंग दुरुस्त करून सर्वाना रिप्लाय केल्यावर नोकरी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. किंवा अशा जाचाला कंटाळून मुलं मोठेपणी सांभाळणार नाहीत असे छोटे मोठे धोके आहेत. पण आपण कुणाला थोडीच घाबरतो. :)  त्यामुळे निदान माझ्यापुरते तरी मी हे काम चालूच ठेवणार. बाकी ज्याची त्याची मर्जी. 

विद्या भुतकर.

Monday, August 22, 2016

They care

पोस्ट तशी छोटीच आहे, पण गोष्ट मोठीय. काल जरा कणकण होती म्हणून सोफ्यावर पडून होते. थोड्या वेळाने डोक्यावर एक हात आला. पहिले तर, स्वनिक विक्सची बॉटल घेऊन, त्यातले थोडे माझ्या कपाळाला हलकेच लावत होता. म्हणले, "बाबांनी सांगितलं का तुला?" तर म्हणे,"नाही, तुला सर्दी झालीय म्हणून मीच घेऊन आलो." एकदम छान वाटलं तेव्हढेच दोन मिनिट. हि आजची गोष्ट नाही. अनेकदा, आम्ही कुणी सोफ्यावर पडलो असू तर तो पळत जाऊन स्वतः:ची लाडकी चादर घेऊन येतो आणि अंगावर घालून जातो. त्यांच्या खेळण्याच्या धावपळीत त्यांना तेव्हढे दोन क्षण सुचतात कसे याचं मला नवल वाटतं.
        अनेकवेळा, स्वनिकला खेळण्यांचा पसारा आवर म्हटलं की याचं तोंड वाकडं होतं. मीही हट्टाने त्यालाच आवरावं लागेल म्हणून सांगून ठेवते. तोही मग बराच वेळ रडारड करत बसतो. तर अनेकवेळा सान्वी त्याला मदत करायला जाते. कधी कधी मी तिला मदत करू नकोस म्हणूनही सांगते, तरीही ती करतेच. तोही मग ती रडत असेल कधी तर तिला समजावतो. 'दीदी' म्हणून तिचं ऐकतो. बरेचवेळा असंही झालंय, स्वनिक लहान असताना तो रडायला लागल्यावर आमच्याकडून शांत व्हायचा नाही. पण ती पट्कन त्याला हसवायची, अजूनही करते.
         हे सर्व सांगायचं कारण म्हणजे, आज काल अनेकवेळा वाटतं की मुलं लवकर मोठी होत आहेत. किंवा अनेकदा हेही ऐकलंय की, लवकर शाळेत गेल्याने बाहेरच्या जगाशी त्यांचा आलेला संबंध, टीव्ही, फोन यामुळे त्यांच्यातील निरागसता कमी होत आहे. तर कधी हेही की त्यांच्यातला हट्टीपणा पूर्वीच्या मुलांपेक्षा जास्त झालाय. आणि बरेच काही. आणि हो बरेचदा एक आई-वडील म्हणून आपण मुलांना योग्य ते शिकवतो आहे किंवा नाही अशा शंका येण्यासारख्याही अनेक गोष्टी घडतात. कधी शाळेतून तक्रार आली किंवा कधी मुलांचं भांडण झालं किंवा तेच कधी उलट आपल्याला बोलले तर लगेच मनात विचार येतो आपण योग्य करत आहोत का? मुलांना योग्य ते शिकवत आहोत का, इ. खरंतर मनात अनेक शंका असतात, आपण खूप सॉफ्ट आहे की खूप कडक. कधी कमी आहे की जास्त, असे अनेक प्रश्न पडतात. 
         पण घरी या अशा छोट्या गोष्टीकधी घडल्या की छान वाटते. वाटतं त्यांची निरागसता अजूनही आहे तशीच आहे. त्याचसोबत, त्यांच्या प्रेमळपणाही दिसतो. आई-बाबा, भाऊ बहीण यांच्यावर असलेलं प्रेम दिसतं. आणि मुख्य म्हणजे, आपण एक आई किंवा वडील म्हणून बाकी चुका करत असलो तरी, कुठेतरी काहीतरी बरोबरही करत आहोत याची खात्री होते आणि एक समाधानही मिळतं. वाटतं, they care, they really do! :)

विद्या. 

Wednesday, August 17, 2016

Gym Jam

          इथून परत गेल्यावर हाफ मॅरॅथॉन आहे त्यामुळे पुण्यात आल्या आल्या एका जिममध्ये जाण्यासाठी रजिस्टर केले. अर्थात जिम सुरु करण्यासाठी फक्त उत्साह लागतो. बाकी पुढे ते नियमित करणे हे केवळ एक स्वप्न आहे. जे लोक हे स्वप्न सत्यात उतरवतात ते खरंच महान आहेत आणि त्यांची नावे कुठेतरी ऑलंपिक मध्ये वगैरे येत असतीलच. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या नशिबात फक्त वर्षाचे पैसे देणे आणि तिथे का गेलो नाही याची मनातल्या मनात स्वतःलाच कारणे सांगणे. मी कितीतरी वेळा अशा फी भरून दांड्या मारल्या आहेत. काय केले म्हणजे ते नियमित होईल यावर कुणीतरी उपाय सुचवा. असो. आजचा मुद्दा असा की जेव्हा केंव्हा मी जिम मध्ये गेले आहे तिथे एक प्रकारचे वातावरण पाहिले आहे. सध्या पुण्यातही आलेले माझे काही अनुभव होतेच म्हटलं लिहावं याबद्दल.
          तर एकतर या जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये असेच खूप कमी पण नियमित जाणारे लोक असतात. त्यात एकदम बिल्डर, धिप्पाड असे लोक असतात. मी संदीपला अनेकवेळा म्हणालेले आहे, बघ जरा काहीतरी कर. असा हो. :) तिथेच काही जोरदार व्यायाम करणाऱ्या, एकदम सडसडीत बायकाही असतातच. अमेरिकेत तर अशा बायकांना बघून आपण किती जाड आहोत अशी भावना मनात येत राहायची. त्यात ट्रेडमिल वर एकदम वेगाने पळणाऱ्या कुणी होत्या तर कुणी २०-३० किलोचे वजन हातात घेऊन व्यायाम करणाऱ्या. योगा क्लासमध्ये अमेरिकन बाईने शिकवलेला योगा लोक किती मनापासून करायचे हे पाहून भारी वाटायचं. एकदा झुंबा क्लासही लावला होता मी. पण त्यात मेक्सिकन टीचर होती. तिच्या पुढच्या ४ स्टेप झाल्या तरी मी मागे काय सांगितले तेच करत असायचे. १० पैकी ४च क्लास केले आणि सोडून दिले. :) hardcore क्लासमध्ये, माझ्या हातातल्या ५ किलोच्या वजनाला कुत्सित पणे पाहणाऱ्या नजराही पाहिल्यात मी. असो.
          काही एकदम वजनाने भारदस्त आणि नुकतेच जिम लावलेले लोकही असतातच. हे अगदी आपला जीव तोडून, एकदम हळू गतीने व्यायाम करताना दिसताना. त्यांचं शरीर घामाने डबडबलेलं असतं. पण मला या लोकांचं कौतुक वाटतं. कारण बाकी अनेक आळशी लोकांपेक्षा ते स्वतःसाठी काहीतरी करत आहेत याचा आनंद होतोच. पण त्याच सोबत, त्यांची योग क्लासमध्ये वगैरे साध्या गोष्टींसाठी झालेली धडपड पाहून, शरीर किती आखडून येऊ शकतं याचा नमुनाही पाहिलाय. अर्थात मी काही खूप ग्रेट नाहीयेच. दर वेळी नव्याने जिम लावली की हालत खराब होतेच. अगदी आताही, कितीही पळायचा सराव असू दे, जरा वजन उचलले किंवा वेगळे व्यायाम केले की हातपाय दुखणारंच. बरं नुसते, हातपाय असतील तर ठीक आहे. आपल्या शरीरात असाही अवयव आहे आणि तो इतका दुखू शकतो असे नव०नवीन शोध मला नव्याने लागत राहतात. त्यामुळे मला मुन्नाभाई चा डायलॉग आठवतो, "अपनी बॉडी में इतनी हड्डीया है पता था क्या?" :) 
        काही गप्पीष्ट लोकही येत असतात. म्हणजे यांचे व्यायाम कमी आणि प्रत्येकाच्या चौकशा जास्त चालतात. त्यात मग तुम्ही काळ काय व्यायाम केला पासून, मी काळ काय खाल्ले आणि त्यामुळे मला कसा पोटाचा त्रास होत आहे यापर्यंत सर्व गप्पा सामील असतात. अशा लोकांशी ओळख असेल तर जिम मधल्या सर्व लोकांचा इतिहास भूगोल तुम्हाला थोड्या वेळात कळू शकतो. बाकी काही झाले नाही तरी निदान यांच्यामुळे कंटाळा तरी पळून जातो. एखादा मुलीला इम्प्रेस करणारा असतोच, मग तो भारतात असो की अमेरिकेत. एखादी जोडीही दिसते जिम मध्ये. जोडी म्हणजे, दोन पुरुष किंवा दोन बायका. नेहमी सोबतच व्यायाम करताना  दिसतात ते. ते चुकून एकटे दिसले तर, 'मेले में बिछडे हुए' वाटतात. तर हे असं बाकी लोकांचं झालं. 
        मी सांगत होते, मला लै भारी वाटते कितीही पळायला द्या, काय टेन्शन नाही म्हणून. पण सध्या जिममध्ये lower body आणि नंतर upper body असे वेगवेगळे वर्कआऊट झाले. आता जरा ठीक आहे पण, परवा स्वनिक दोन वेळा 'थांब' म्हणाले, तर पळत सुटला. इतकी चिडचिड झाली. त्याला धरायला जायला एक पायरीही उतरता येत नव्हती. आणि ही माझी अवस्था एकदम कमीत कमी वजनात झाली होती. ज्या बायका, "तुला काय जिमची गरज नाहीये" असे म्हणून कौतुक करत होत्या त्या एकदम ४० ते ८० Kg पर्यंत वजन घेऊन पायाचे व्यायाम करत होत्या. आणि माझ्याकडून २० किलो हलत देखील नव्हते. त्यावरून माझ्या लक्षात आले की मी कितीही पळाले तरी, पूर्ण शरीराचा व्यायाम किती महत्वाचा आहे. त्यामुळे यापुढेही हे सर्व व्यायाम नियमित करायचे असा सध्यातरी निश्चय केला आहे.
         काहीही असो, तुमचा स्वतःचा अनुभव कसाही असला, तरी एकदा जिममध्ये गेले की भारी वाटते.एकतर जोरदार गाणी चालू असतात. त्यामुळे व्यायामाला जोर येतोच. आणि तुमच्यापेक्षा हळू करणाऱ्यांना पाहून हिम्मत येते आणि भारी लोक पाहून अजून पुढे काही केले पाहिजे ही इच्छा. सध्याच्या जिममध्ये इंस्ट्रक्टरही भारी आहेत. त्यामुळे काहीतरी बरोबर करत आहोत असं तरी वाटत आहे. त्याचसोबत बरेच काही शिकायचे आहे हेही. तिथून बाहेर पडल्यावर काहीतरी चांगले काम केल्याचं समाधान वाटतं. खरं सांगायचं तर, घरापासून तिथे पोचणे हाच मोठा अडथळा असतो आपल्या सर्वांचा. एकदा पोचलं की निम्मं काम होतं. पळल्यामुळे कधी कधी माझे गुढघे दुखायचे, गेल्या काही दिवसांपासून ते सर्व कमी झालं आहे. असे अनेक लोकांना अनेक पॉसिटीव्ह बदल दिसत असतील. निदान त्यासाठी तरी जिमला जायलाच पाहिजे. :) जाऊ दे, आज हात दुखत आहेत. इथेच थांबते. :) 

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, August 16, 2016

तुला यावंच लागेल

सकाळी उठताना मनात 
पहिला तुझाच विचार येतो.
तुझा हसणारा गोड चेहरा
डोळ्यांसमोर उभा राहतो.
तुला आठवून रोज,
माझ्या ओठांवर हसू खुलविण्यासाठी
तुला यावंच लागेल........

पटकन आवरून जाण्याच्या घाईत
छान दिसणं होतंच नाही.
कारण मला पाहण्यासाठी
तू इथे नाही.
रोज तयार होऊन आल्यावर
मी कशी दिसते सांगण्यासाठी
तुला यावंच लागेल.

तू सोबत असताना
जेवणाची मजा औरच असते.
तुला पाहिल्यावर कशी
जाम भूक लागते.
माझा प्रत्येक हट्ट
पूर्ण करण्यासाठी
तुला यावंच लागेल.

दिवसभर काम करताना,
तुला पाहण्याची इच्छा होते.
कधी एखाद्या अवखळ आठवणीने
अचानक हसू येते.
अशीच खूप इच्छा असताना,
अचानक....मला भेटण्यासाठी
तुला यावंच लागेल.

संध्याकाळ होण्याची वाट पाहण्यात
काहीच अर्थ नसतो.
तू नसताना फिरण्यात
फक्त टाईमपास असतो.
दूर पळण्याचा प्रत्येक प्रयत्न व्यर्थ असतो.
माझी प्रत्येक संध्याकाळ फुलविण्यासाठी
तुला यावंच लागेल.

दिवस कसा संपून जातो
एकसुरा कंटाळवाणा
रात्री मग भरून राहतो
तुझ्या आठवणींचा कोपरा.
तुझ्या आठवणींमध्ये राहणाऱ्या
माझ्या मनाला आसरा देण्यासाठी
तुला यावंच लागेल.

आजकाल झोप लागणे
अगदीच अशक्य होते
तुझ्या आठवणींत आसवांनी
उशी ओली होते.
माझ्या आसूभरल्या डोळ्यांमधली
अधुरी स्वप्ने पुरी करण्यासाठी
तुला यावंच लागेल. 

विद्या भुतकर.

Monday, August 15, 2016

प्लास्टिकचे कव्हर

       आमच्या बॉस्टनच्या घराजवळ एक चायनीज आजोबा राहतात. त्यांचे घर शाळेच्या जवळच असल्याने नातवाला आपल्या सोबत सायकल चालवत सोडतात. कधी आम्हाला उशीर झाला तर ते सायकलवरून परत येऊन अंगणात व्यायाम करताना दिसतात. असो. तर त्यांची जी सायकल आहे ना, त्याची सीट आणि हॅन्डल याला त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या घातल्या आहेत कव्हर म्हणून. सायकल घरातच किंवा गॅरेज मधेच असतात नेहमी, निदान थंडीत बर्फात तरी बाहेर कुणी ठेवत नाही. आणि तिकडे धूळही काही खूप नसते. तर त्या सायकलच्या सीट आणि हॅन्डललाच फक्त कव्हर का आणि तेही चांगले घालावे ना मग? आपल्या नेहमीच्या भाजी घेतो तशा छोट्या छोट्या पिशव्या त्यांना घातल्या आहेत. ते कव्हर पाहून मला नेहमी हसू येते. त्यांचं नाही, तर माणूस कुठल्याही देशातला असो ती एखादी वस्तू जपण्याची वृत्ती आहे ना त्याचं.
        आमच्या घरीही पुस्तकांना आम्ही अशी प्लॅस्टिकची कव्हर घालायचो टिकावी म्हणून. आता मुलांच्या पुस्तकांना लावतो. सासरी आई-दादा घरी नसताना सर्व डब्यांना झाडून पुसून वरून असे कव्हर घालून ठेवतात. आम्हीही पुण्यात नव्हतो तेव्हा अशाच वस्तू झाकपाक करून गेलो होतो. अनेक लोकांकडे मी खास करून टीव्ही च्या रिमोटला असे प्लास्टिकचे कव्हर पाहिले आहेत. आणि हो जुन्या टीव्हीना तर आख्खे मोठे कव्हर असायचे पुढून, मागून पूर्ण. कधी देवांच्या आरतीच्या पुस्तकांना, जुन्या फोटोंच्या अल्बमला. आज काल, मोबाईल फोन घेतले की त्याच्या सोबत स्क्रीन साठी आणि फोन साठी असे दोन कव्हर आधी घ्यायलाच हवेत. तर प्रत्येकासाठी जपण्यासाठी म्हणून असलेली वस्तू वेगळी असू शकते, पण ती मूळची जी वृत्ती असते ना, ती एकदम सारखीच. 
        माझी एक आवडती अमेरीकन सिरीयल आहे, Everbody Loves Raymond. त्यात एक एपिसोड होता. त्यात हिरोच्या आईचे घर एकदम नीटनीटके असते आणि त्यावरून ती सुनेला बोलायलाही कमी करत नाही. पण तिच्या घरी तिचा सोफाही एकदम प्लास्टिकचे कव्हर घालून ठेवलेला असतो. तिला जेव्हा सून म्हणते की, तुम्ही या अशा वस्तू जपून ठेवता मग त्याचा आस्वाद कधी घेणार? तेव्हा ती हट्टाने मुलांना कव्हर काढून सोफ्यावर बसायला सांगते. तो एपिसोड पाहिला आणि तो आजवर लक्षातही राहिला. त्याला कारण एकच, ती माणसाची वस्तू जपण्याची वृत्ती. अमेरिकन माणूसही असा विचार करत असेल? असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. आणि त्या एपिसोड सोबत आलेला अजून एक प्रश्नही. 
          या जपलेल्या वस्तू खरंच आपण सांभाळून ठेवून किंवा त्यांना कव्हर घालून त्यांचं आयुष्य वाढवत आहोत की जे काही काही आहे त्याचा उपभोगही घेत नाहीये? आपल्याकडे मी अनेक गाड्या पाहिल्या आहेत. गाडी घेताना ती दिसायला छान आहे, आतून- बाहेरून म्हणून घेतली जाते आणि १५ दिवसातच त्याचा कायापालट होतो. आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणी त्याला कव्हर घातलेलं असतं. मग त्या छान म्हणून आणलेल्या वस्तूचा काय उपयोग? त्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे आजचं. गेल्या कित्येक दिवसांपासून घरातल्या टेबलाकडे पाहून वाटत होतं की तसंच ठेवावं छान दिसतंय. पण त्याच्यावर पडणारे बारीक ओरखडे पाहून विचार चालू होता की एखादं प्लास्टिकचे कव्हर आणावे का? आता भारतात आहे तर एक एकदम पारदर्शी कव्हर घेऊन आलेय. एकूण काय, त्या चांगल्या टेबलचं रूप लवकरच जाणार आहे. पण ते आता त्यावर वापरून ओरखडे पडून नाही तर ते प्लास्टिकचे कव्हर घालून जाणार आहे. :( काय करणार कितीही कळत असलं तरी वळत नाही ना. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
 

Sunday, August 14, 2016

आमचे घड्याळ पुढे आहे...

        परवा हॉस्पिटलमध्ये गेले होते. निघायच्या वेळेला घड्याळ पाहिले आणि लक्षात आले ते एकदम 'राईट टाईम' होते. तसे घर सोडले की बाकी ठिकाणी घड्याळे योग्य वेळच दाखवतात. पण घरात प्रत्येक घड्याळ ५-१० मिनिटे पुढे करून ठेवायची सवय लागली आहे. त्यामुळे कुठेही घड्याळ पाहिले की ते योग्य वेळ सांगतच असेल अशी सवयच राहिली नाहीये.  तरी त्यातल्या त्यात आजकाल मोबाईल वर कॅर्रीएर कडून येणारी वेळ जी दिसते तीच योग्य आहे असे समजून चालते. निदान आपण चुकलो तर आपल्यासोबत बाकी फोन वापरणाऱ्या लोकांचेही घड्याळ चुकीचे असेल. :)
         तर, आपल्याकडे किती घरांमध्ये घड्याळात एकदम बरोबर वेळ दिसते? प्रत्येकाचे घड्याळ थोडे पुढे किंवा मागे असतेच. किती मिनिट ते ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे. बरं, ही गरज तरी काय असते? कुठेही जाताना आपण घड्याळ बघून निघत असू तर निदान १० एक मिनिटे तरी आधी निघणे होईल हा त्यातला हेतू. पण ही वेळ कुणी दुसऱ्या माणसाने सेट केली तर ठीक आहे, पण आमच्या घरी मीच ते घड्याळ लावणार. मग मला माहीतच असते घड्याळ १० मिनिट पुढे आहे, तर त्याचा उपयोग काय ना? तरीही आमच्या घरातले एक दोन घड्याळे १० मिनिटे का होईना पुढे असतातच. सकाळी घाई घाईत आवरताना तोच एक दिलासा असतो की अजून आपल्याला १० मिनटं आहेत. 
       सर्वात त्रास याचा होतो की प्रत्येक रूममध्ये असणारे घड्याळ वेगवेगळ्या वेळेसाठी पुढे करून ठेवलेले असेल. म्हणजे सकाळी उठले की पहिले काम करावे लागते ते म्हणजे गणित. किती मिनिटे पुढे आहे त्यावरून अजून पाच मिनिटे झोपायचे की १०. दुसऱ्या रूममध्ये गेले की वेगळे गणित. नुसता डोक्याला त्रास. त्यामुळे मला आता नियमच केला पाहिजे प्रत्येक खोलीतील घड्याळ एकच वेळ दाखवायला हवे. बरं १० मिनिटे तरी मोजायला पुढे-मागे करायला सोपे आहे. ७ किंवा ८ मिनिटे घड्याळ पुढे केले तर गणित करत बसायला किती त्रास होईल? म्हणजे घड्याळात ९.१५ झालेत,  तर प्रत्यक्षात किती वाजले असतील? करा गणित. चिडचिड आहे की नाही? आणि हो हातातील घड्याळे वेगळीच. प्रत्येकाचे वेगवेगळे टायमिंग. आज काळ तर मला 'डे लाईट सेव्हिंग' मुळे बरीच रिस्ट वॉचेस एकेक तास पुढे मागेही आहेत. शिवाय एखादे अगदीच न वापरलेले भारतातली वेळही दाखवत आहेत. असो. 
        १० मिनिटे वगैरे ठीक आहे, पण काही लोकांकडे अर्धा तास घड्याळ पुढे असलेले पाहिले आहे. म्हणजे ३० मिनिटे आवरून आधीच कुठे जाऊन बसणार आहे?  असो. पण या घड्याळ पुढे असण्याने एक चांगले होते. कुणी मित्र- मैत्रीण आलेत. गप्पा मारत बसलेत मस्त. कुणी घाई करू लागले की म्हणू शकतो, "बस रे, आमचे घड्याळ पुढे आहे". तितकाच अजून १० मिनिटे मिळाल्याचा आनंद होतो की नाही? आणि समजा कुणी नावडता पाहुणा आहे, तो घाईने निघूनही जाईल, वेळ बघून. हो की नाही? :) मला एक कळत नाही, पुढे घड्याळ करण्याचे कारण अगदी समजून घेतले तरी मागे ठेवण्याचे काय कारण असेल? मला उशीर झाला असेल आणि घड्याळ मागे असेल तर मी अजून १० मिनिटे उशिरा निघेन ना घरातून. म्हणजे अजूनच उशीर. कदाचित ऑफिसमध्ये लोक ठेवत असतील का मागे? म्हणजे लोक तेव्हढेच १० मिनटं जास्त काम करतील? जाऊ दे. कुणाला माहित असेल तर मलाही सांगा. 
      आणि सगळीच घड्याळे अशी बदलून जी मूळ वेळ पाळायची आहे ती आहे तरी कशाची, ऑफिसची, शाळेची, ट्रेनची, बसची की अजून कशाची? मला एकदा बघायचे आहे, फक्त आपण भारतीय लोकंच हे असे घड्याळ पुढे करून ठेवतो की बाकी पण करतात? ही पद्धत कुणी सुरु केली असेल याचा इतिहास बघायला हवा एकदा. आणि हो, इतके करूनही आपण कुठेही वेळेत पोहोचत नाही असे का होते? प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतेच. आणि त्यात मीही आहे. अगदी त्या fireworks च्या वेळीही सर्व अमेरिकन लोक पाहण्यासाठी वेळेत आलेले असतात आणि आम्ही मागून जाऊन लोकांच्या मध्ये अंधारात धडपडत असतो.
          किती वेळा मी ठरवते वेळेत करायचं सर्व पण तरीही उशीर होतोच. अगदी शनिवारी संध्याकाळी काहीही काम नाहीये आणि ६ वाजता पार्टीला जायचे आहे कुठेतरी, तरीही वेळेत का पोहोचत नाही. त्यासाठी लागणारे गिफ्ट घेणे असो किंवा ट्राफिक काही ना काही कारण मिळतेच. त्यामुळे प्लॅनिंग मधेच गडबड आहे. एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी योग्य ती तयारी वेळेत करून ठेवली पाहिजे. किंवा वेळेत जाणे जमणार नसेल तर आधीच स्पष्ट सांगितले पाहिजे तसे. जमेल तितके सध्या करत आहे प्रयत्न दिलेली वेळ पाळायचा. घड्याळ पुढे करण्यापेक्षा आहे त्या वेळेत आणि वेळेवर करायची सवय लागायला हवी, होय ना?सकाळी १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमाला वेळेत पोहोचायचे आहे, तेही मुलांना घेऊन. त्यामुळे वेळेत झोपलेले बरे. :)
   
विद्या भुतकर.

Friday, August 12, 2016

डाग

काही दुःखं अशीच असतात सरली तरी डाग राहतोच. पण कालांतराने, त्याच  खुणा कौतुकानं मिरवता येतात आणि एकेकाळी हेही भोगलं व त्यातून सुलाखून निघालो याचा अभिमान वाटतो स्वतःचाच.

विद्या भुतकर. 

Thursday, August 11, 2016

स्वप्ना आणि सत्या- भाग ४

ती (लाडाने) : तुला लक्षात आहे ना माझा वाढदिवस?
तो: म्हणजे काय? मला जगायचंय अजून.
ती: ह्या ह्या ! फालतू जोक मारू नकोस.
तो: मग काय करू? तुझा बड्डे म्हणजे महिन्यभराचा प्रोग्रॅम असतो. कसं विसरेन?
ती(हिरमुसून): हे बघ असं असतं. काहीही बोलायची सोय नाही.
तो: बरं सांग, त्याचं काय?
ती: हां ! मला या बड्डे ला सरप्राईज हवंय.
तो: सरप्राईज? आणि ते असं सांगून?
ती: मग काय? इतक्या वर्षात न सांगून तुला कळत नाही, म्हणून आता सांगून, मागून घेतेय.
तो: आता हे असं सांगितल्यावर ते सरप्राईज होत का?
ती: मला ते काही माहित नाही. मला हवंय म्हणजे हवंय.
तो: बरं आता हे मागूनच घ्यायचंय तर काय हवंय ते पण सांग ना?
ती: ते मला नाही माहित. काय द्यायचं ते तू ठरव.
तो: हे बघ, हे असलं त्रास द्यायचं काम मला सांगू नकोस.
ती: म्हणजे माझा बर्थडे तुला त्रासदायक वाटतो?
तो: तसं नाही, पण तुला जे हवं ते आपण एकत्र जाऊनच घेऊन येऊ ना?
ती: शी ! त्यात काय मजा?
तो: म्हणजे काय? का मजा नाही? आता तू इतकी शॉपिंग करतेस, त्यात मजा नाही वाटत? मग बर्थडे ला पण केली तर काय होणारेय?
ती: मला आवडतं सर्वांच्या वाढदिवसाला स्पेशल करायला. तेव्हढंच स्पेशल वाटतं माणसाला.
तो: अगं पण तू कायमच स्पेशल आहेस माझ्यासाठी. त्यासाठी सरप्राईजची काय गरज आहे?
ती: पण मी म्हणते का नाही?
तो: कारण मला कळत नाही, तुला काय हवं आणि काय नको असतं. मागच्या वेळी आणलेला टॉप तू बदलून आणलास.
ती: अरे मोठा होत होता तो. मग नको आणू?
तो: हो पण तू दुसराच घेऊन आलीस.
ती: अरे हो, तिथे गेले तर मग आवडला दुसरा. पण तू आणलेला छानच होता.
तो: हम्म.. जाऊ दे. तर मी म्हणत होतो, त्यापेक्षा तुला हवं ते आपण बरोबरच घेऊन येऊ.
ती: नाही नको. तुला हवं ते कर, मी काही सारखं असं बदलून आणणार आहे का? आणि मुळात गिफ्टच असं नाही, काहीही चालेल सरप्राईज म्हणून.
तो: तू ना वेडी आहेस. काय सरप्राईज? सरप्राईज?
ती: चिडतोस काय? अरे, मला काय वाटतं?
तो: काय?
ती: आपल्या माणसाला काय आवडतं, नाही आवडत हे आपल्याला तसं माहीतच असतं. आपण प्रत्येकासाठी हे खास असं काही करत नाही. आपल्याच माणसासाठी करतो.
तो: हम्म !
ती: त्याला काय आवडेल याचा जो विचार आपण करतो ना, तो महत्वाचा असतो. एखादे गिफ्ट किंवा सरप्राईज दिल्यावर जो आनंद तिला/त्याला मिळेल याची कल्पना करूनच भारी वाटतं. आणि प्रत्यक्षात केल्यावर अजूनच छान वाटतं, दोघांनाही. दुकानात सोबत जाऊन काही घेण्यात मध्ये, ते विचार करणं हरवून जातं. मला तुझ्याकडून तो विचार हवाय, माझ्यासाठी केलेला.
तो: वेडाबाई, मी तर तुझाच विचार करत असतो दिवसभर. आणि तुला तुझ्या आवडीने एखादी आवडीची गोष्ट घेतली तर त्यात तरी काय वाईट आहे?
ती: जाऊ दे, सोड.
तो: बरं !
ती(मनातल्या मनात) : माझ्यासाठी तो इतके कष्ट घेऊ शकत नाही का? त्याला कधीच नाही कळणार मला काय म्हणायचंय.
तो(मनातल्या मनात): हिला समजावणं अवघड आहे. नको असलेली वस्तू घेऊन वेळ आणि कष्ट का घालवायचे? त्यापेक्षा सरप्राईज न दिलेले बरे ना?

 तर अशा रीतीने, आज पुन्हा एकदा स्वप्नं आणि सत्याचं भांडण झालं होतं. आज पुन्हा एकदा दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटत होते.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, August 08, 2016

नाही का? ;)

माझ्या नेहमीच्या पोस्ट स्टाईल मध्ये हे असे बसत नाही. पण पुण्यात आले की आठवणी येतातच. आणि त्यात पावसाळ्यात गाडीवरून फिरणारी पोरं पाहिली की तेंव्हाची मी आणि आताची मी यातला फरक जास्तच जाणवतो. त्यामुळे नकळत तुलना होतेच. :) त्यातलीच एक ही.
 
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/



Sunday, August 07, 2016

दुरावा

तू माझ्या वाढदिवसाला
मला 'विश' केलं नाही
तुझ्या वेळी मीही
काही बोललो नाही.

तू नाही, तर मीही बोलताना,
काही गोष्टी वगळल्या. 
चांगल्या बातम्याही,
सोयीस्करपणे सांगायच्या टाळल्या.

एकदा आलेली शंकेची पाल 
कायम चुकचुकत राहते. 
त्याच्या प्रत्येक गोष्टीत 
चूकच दिसत राहते.

काही घडल्यावर पहिला फोन
आता त्याला होत नाही
वाटतं, आपलं इतकं दु:खं   
त्याला समजत नाही?

पूर्वी भेटींमध्ये असलेली मजा
केंव्हाच गेलेली असते. 
आता फक्त गेलेल्या दिवसांची
आठवण सोबत असते.

खरंच, दुरावा निर्माण व्हायला
कारण लागत नाही. 
पण तुटलेल्या नात्यांना
पुन्हा जोडता येत नाही.

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/ 
सूचना-कृपया ही कविता कुठेही फेसबुक, Whats App वर निनावी पाठवू नये, पोस्ट करू नये. नाव आणि पेज लिंक खाली दिलेली आहे. 

Thursday, August 04, 2016

'माझं' की 'आमचं'?

        कधी कधी वाटतं मला उगाच बारीक सारीक गोष्टी बघायची फार वाईट सवय आहे. म्हणजे उदा: एखाद्या जाहिराती मधील व्यक्ती अमुक-अमुक सारखी दिसते की नाही? कधीतरी मग मी संदीपला काहीतरी सांगते आणि त्यालाही मग ते तसंच दिसायला लागतं. तो मग माझ्यावर चिडतो, नसते विचार डोक्यात आणून देते म्हणून. तसंच आजही एक विचार आला डोक्यात. म्हणजे ते आधीही पहिले आहे पण कधी लिहायचा विचार केला नाही त्यावर. असंच आपलं एक निरीक्षण. 
        कॉलेज मध्ये असताना माझ्या मैत्रिणी मला म्हणाल्या होत्या,"तू ना आई-बाबा म्हणताना 'माझे आई-बाबा' म्हणत नाहीस. 'आमचे आई बाबा असं म्हणतेस'". म्हणजे त्यांचंही माझ्यासारखंच निरीक्षण होतं म्हणायचं. :) तर त्या म्हणाल्या तेंव्हा माझ्या लक्षात आलं, खरंच की मी 'आमचे आई दादा' असं म्हणते. बरोबर आहे ना? ते आमच्या सर्व भावा-बहिणीचे आई-वडील आहेत ना. तर मग मी 'माझेच' कसे म्हणणार? तर तेच माझं बोलणं आमच्या मुलांनाही लागू होतं. हे बघा, मी 'माझा स्वनिक' 'माझी सानू' असं म्हणू शकत नाही. आता ती आमची दोघांची मुलं आहेत ना, मग 'माझा' असं मी कसं म्हणणार? 
         पण मुलांच्या बाबतीत अनेक व्यक्ती मी पाहिल्या आहेत, "माझा बाळ ना?...." असं कौतुक करायचं असेल तर तो 'माझा' हे निघतंच. यात आपल्या मुलाचं कौतुक तर असतंच पण तो 'माझा' आहे हे सांगण्यात एक हक्कही जाणवतोच. त्या मुलांच्या आईच्या तोंडून अशी वाक्य मी जास्त ऐकली जातात, बाबांपेक्षा. अगदी हीच बाब घरालाही लागू होते. 'माझं घर' आणि 'आमचं घर' यात फरक वाटतोच. 'माझ्या घरात मला हे चालणार नाही' या वाक्यात किती जोर आहे. त्यात त्या घरावरचा हक्क, मालकी आहे आणि नियम हे केवळ त्या व्यक्तीचे आहेत असं वाटतं. पण 'आमच्या घरी हे चालत नाही' किंवा 'आमच्या घरी हे असं असतं' यात घरच्या सर्वांना सोबत घेऊन तो विचार मांडतोय असं वाटतं. नाही का? असो. 
         बस इतकंच काय ते निरीक्षण. कुठल्याही विषयाचा कीस काढायचा म्हणलं तर ते करूच शकतो. पण आज असंच डोक्यात आलंय तर लिहून टाकावं म्हणलं. तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता? 'माझं' की 'आमचं'?

विद्या भुतकर. 

Wednesday, August 03, 2016

लाईट गेलीय

           कालपासून धो धो पाऊस पडत आहे पुण्यात. कधी कधी तर केवळ आवाज कमी व्हावा म्हणून खिडक्या बंद करून घेतल्या, इतका ! त्यामुळे कधी ना कधी हे होणारच होतं. तर पाऊस पडल्यावर कुठेतरी वीज पडणारच, एखादे झाड पडणार आणि मुख्य म्हणजे लाईट जाणारच. तशी ती गेलीही. आम्ही लाईट  जाण्याच्या अनुभवाला गेले एक वर्ष मुकल्याने आमच्या लक्षातही नव्हते की सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करून ठेवायला हव्यात. तशी कमीच वेळ गेली होती, साधारण २.५- ३ तासच. पण त्यातही घरी टॉर्च, मेणबत्या असे साहित्यही नव्हतेच. एकूण काय तर आम्ही आणीबाणीत राहण्याच्या अजिबात तयारीत नव्हतो. 
             पण थोड्याच वेळात आम्ही सरावलो. मुलांसाठी ते थोडे वेगळे होते. कुणाच्या घरी कन्व्हर्टर होते त्यांचे लाईट पाहून स्वनिकने विचारलेही, की त्यांच्याकडेच का लाईट आहे आणि आपल्याकडे नाही. त्यांना लाईट कशी जाते हे सांगणे जरा कठीणच गेले. मुलांचे जेवण झालेले होते. त्यामुळे त्यांना झोपवून आम्ही मस्त पणतीच्या उजेडात जेवलो. बाहेरच्या कॉमन जागेत एक लाईट असतो त्याच्या उजेडात स्वीट पण खाल्लं. मी त्याच उजेडात थोडंसं चित्र काढायचाही प्रयत्न केला. अशा वेळेला मला अगदी आंबेडकरांची आठवण येते. :) अशा कॉमन लाईटमध्ये बसून काही उद्योग करताना. :) थोड्याच वेळात लाईट आलेही आणि आमचे काम परत सुरु झाले.
             हे सर्व सांगायचं कारण म्हणजे 'रात्री लाईट गेली' हा एक इव्हेन्ट असतो. अर्थात नेहमी जाण्यामुळे लोकांचे जे नुकसान होते, विद्यार्थ्यंची आबाळ होते त्याबद्दल वाईट वाटतेच. पण अशी अचानक कधीतरी जाण्यातही एक मजा येते. शेजाऱ्यांशी गप्पा मारणे, मुलेही पळापळ करत राहतात. जे काही टाईमटेबल आहे ते पाळायचे कारण नसतेच. लाईट येईपर्यंत कसलीही घाई नसते. बरं समजा नाहीच आले लाईट तर अंधारात जेवण बनवण्याची कसरत कधी कधी केली आहे. त्यात सर्वात त्रासाचं काम म्हणजे मेणबत्तीच्या उजेडाकडे येणाऱ्या किड्यांना भांड्यात पडू ना देता जेवण बनवणे. तेच जेवण करण्याचेही आहेच. भाजीचा कण म्हणून तोंडात टाकलेला किडा नसेल कशावरून? असो, जास्त बोलायला नको त्यावर. 
         आम्ही लहान असताना आजोबांच्या सोबत अंगणात कॉटवर पडून आकाशाकडे बघत त्यांच्याकडून गोष्टी ऐकायचो. आमच्या घरासमोरच MSCB चे ऑफिस होते. तिथे जाऊन काय झालं विचारायचो. कधी अभ्यास असलाच तर मेणबत्तीच्या उजेडात शाईच्या पेनाने काढलेलं अक्षरही एकदम भारी वाटायचं. उन्हाळ्यात लाईट तर हमखास जायचेच. पण रात्री अंगणात गाद्या टाकून, मच्छरदाणी लावून झोपायची मजाही होतीच. सर्वात त्रासदायक असायचे ते उन्हाळ्यात बिना पंख्याचे झोपायला लागणे. कॉलेजच्या रूममेट सोबत रात्रीच्या अंधारात गप्पा मारणे, अंधारातच धडपडत मेसला जाऊन जेवण करून येणे यात मजा होती. पण शेवटच्या दिवसाच्या भरवशावर ठेवलेला अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी असलेला पेपर हे कॉम्बिनेशन जीवघेणं होतं.
        आता हे सगळं नियमित अनुभवायला मिळत नाही. कुणाला वाटेल काय हिला असल्या गोष्टीत मजा येते. पण खरंच 'लाईट जाणे' यातली मजा खूप वेळा घेतली आहे आणि त्याचा त्रासही सहन केलाय. पण त्यातले अनुभव आणि आठवणी या नेहमीच आनंददायक आहेत. :) आज बऱ्याच दिवसांनी आला म्हणून हे सगळं आठवलं. पाऊस चालूच आहे. अजून कुठे कुठे लाईट गेली होती हे आता उद्याच कळेल. :)

विद्या भुतकर.

पाऊस...पुन्हा एकदा



विद्या. 

Monday, August 01, 2016

पुरुषांना घेऊ दे आधी?

         वीकेंडला शाळेतल्या मैत्रिणी भेटलो, नवरे-मुलांसहित मग काय गोंधळ नुसता. मुलांचे जेवण देऊन झाले आणि अजून पोळ्या चालूच होत्या. मग कुणीतरी म्हणाले 'नवऱ्यांना आधी देऊन घ्यायचे का?'.  म्हणले, 'नाही सर्व एकत्रच बसू'. त्यांनाही आता हे माझे नेहमीचे माहित झाले आहे. त्यामुळे त्या लक्ष देत नाहीत. पण या विषयावर बोलून वाद नक्कीच होऊ शकतात. तर विषय असा की कुठेही एखादा कार्यक्रम असो, अनेकदा मी ऐकले आहे की "पुरुषांना आधी बसून घेऊ दे." मग त्यात लग्न असो किंवा डोहाळे जेवण. घरात बाईने कितीही मरमर करू दे. तिला अजून चार बायका मदतीला असू दे, जेवण मात्र पुरुषांना आधी करून घेऊ दे. मी नेहमी विचार करते हे असं किती वर्षं चालू राहणार?
          एकतर आपल्या कार्यक्रमात नेहमी उशीर झालेला असतोच. कुणीही वेळेत येत नाही. अशावेळी प्रत्येकाला असं वेगळं का बसवायचं. आणि समजा थोड्या थोड्या लोकांना जेवण उरकून घ्यायचे आहे, जागा नाहीये, असे असेल तर मग बायकांनी का नाही बसायचं? आणि हे मी भारतातच नाही, अमेरिकेत अनेक गेट-टूगेदर झालेत त्यातही पाहिले आहे. असं काय वेगळं ट्रेनिंग दिलंय आपल्याला लहानपणापासून की आपण ते तिकडे जाऊनही विसरत नाही? घ्यायचंच आहे आधी कुणी तर मग बायकांना घेऊ दे ना? त्यांनी वाट का बघायची? मुळात ही प्रवृत्ती जे आधी बसतात त्यांची नसून जे सुचवतात त्यांची असते. म्हणजे बायकाच म्हणतील, 'आधी त्यांना बसू दे'. कशाला? 'सर्वानी घ्या' म्हणायचे ना? सुनेला,मुलीला, जावेला, मैत्रिणीला का आग्रह करत नाही आपण? बायकांनी काय घोडं मारलंय?
         मी गंमत म्हणून असेही प्रयोग करून पाहिलेत की कुणीही घ्यायच्या आधी आपण जेवण सुरु करायचे. तुम्हीही करून बघा, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात हे जाणवेल तुम्हालाही. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सर्वात आधी हातात ताट घेऊन जेवण सुरु करा, बघा काय होते. कुणी तरी असतीलच बघणारे बोलणारे लोक. का? ते माहीत नाही. किती वर्षे अशा प्रथा चालू ठेवायच्या? मी एकदा असेच एका वाढदिवसाला संदीपला 'मुलांना जेवण दे' म्हणून आधी जेवायला बसले. थोड्या वेळाने एका अनोळखी बाईने संदीपचा व्हिडीओ काढला होता. का तर तो असे मुलांना जेवण भरवत आहे आणि मी जेवत आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांना जेवण 'देणे ही इतकी आश्चर्याची बाब होऊ शकते? अशा कुठल्या जगात राहतो आपण? 
        आमच्या एका मित्राचे उदाहरण आवडते मला मग. त्यांच्या घरी गेलो की मी आणि त्याची बायको जेवण करून घेतो, तेही आग्रहाने तो आधी बसवतो आम्हाला. 'मुलगा लहान आहे तर तू आधी जेवण करून घे आणि मी आवरतो सर्व' असे हट्टाने तो तिला सांगतो. आम्ही जेवत असताना थांबून काय हवं ते वाढून देतो आणि मग तो आणि संदीप जेवण करतात. आता नवऱ्याचे मित्र घरी आलेत आणि बायकोने समोर बसून काय हवं नको ते बघून वाढलं, आवरलं यात काहीही वेगळेपण वाटत नाही. पण कधी कधी हे असे अपवाद पाहिले की वाटतं, किती छोट्या गोष्टी असतात पण त्या मिळणेही किती दुर्मिळ असते. 
        मुले, नवरा, सासू सासरे, नातेवाईक या सर्वांचं करून शेवटी बसणाऱ्या बाईला 'खूप चांगली आहे' असं बोलल्याचं अनेकदा ऐकलेय मी. म्हणजे जेवण कसे बनवले, सर्वांशी कसे वागले यापेक्षा ती कधी जेवायला बसली यावरून तिचे व्यक्तिमत्व ठरवता येते का? मला मान्य आहे की आपल्याच घरी कार्यक्रम आहे, तर आपण सर्वांचे नीट करून, बघून नंतर बसायचे म्हणतो. पण दुसऱ्यांच्या कार्यक्रमातही पुढे होऊन जेवण घ्यायला बायका लाजतात किंवा कुचरतात की लोक काय म्हणतील. 
        बरं कार्यक्रमाचे जाऊ दे, घरीही अनेकदा तीच परिस्थिती असते. खरंतर अनेक जणींना डाएटसाठी म्हणून डॉक्टर लवकर जेवायला सांगतात. पण घरी पाहुणे आले किंवा नवरा उशिरा येत असेल, सासू सासरे उशिरा बसत असतील तर तिलाही मग ताटकळत बसावे लागते. असे का अजूनही अवघडून राहावे लागते? का स्पष्टपणे सांगता येत नाही? एक मैत्रीण लवकर जेवते नेहमी. तर आता आम्हालाही माहित आहे, ती आधी जेवायला बसली तरी चालेल म्हणून. आपण मैत्रिणींना, आपल्या मुलांना, घराच्या सर्वांना समजून घेऊ शकतो तर आपले म्हणणे समजावून का सांगू शकत नाही?
       नक्की करून बघा हे, प्रयोग म्हणून का होईना. भूक लागलीय ना, लोकलाजेस्तव थांबू नका. कुणी 'पुरुषांना बसू दे' म्हणत असेल तर त्याला विरोध करून बघा. घरी पाहुणे आहेत, वेळेत जेवले पाहिजे, ताट करून घ्या. कार्यक्रमात, मुलांना नवऱ्याकडे देऊन, आधी जेवण करून घ्या. बाकी बायकांनाही, तू बैस ग आधी म्हणून आग्रह करा. आणि हो, मुलांनो, नवऱ्यानो, पुरुषांनो, कुणी म्हणाले 'आधी बसून घ्या' तर बायकोला आधी जेवण करायला बसवून बघा. मला बघायचंय एकदा, की काय होतंय. जगबुडी तर नक्कीच होणार नाही, पण कुणाचं तरी पोट नक्की भरेल. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/