Monday, August 29, 2016

बलात्कार असाही आणि तसाही

       गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले. निदान सार्वजनिक संडास बांधले तर काही मदत होईल का असेही बोलणे झाले. असो. तर माझं त्यावरचं ज्ञान इतकंच. ह्याकडे मी पुन्हा वळेनच.
         सध्या एक मावशी आमच्याकडे साफ सफाईला येत आहेत. आईंनी सर्व सेट करून दिल्याने मला त्यांचे नाव, गाव पत्ता फोन काहीच माहित नाही. त्या नियमित घरी येऊन सफाई करून जातात त्यामुळे त्यावाचून काही अडलेही नाही. मध्ये दोनेक दिवस त्या सलग आल्या नाहीत. म्हणून मी त्यांना विचारलेही, "मावशी काय हो आला नाहीत दोन दिवस?"
त्या,"होय, ते परवा आमच्या इथं असा किस्सा घडला ना? त्यामुळे सगळे घाबरले आहेत. "
खरंतर त्यांनी सांगितले तेंव्हा मला पहिल्यांदा कळले की काय झाले होते.
पुढे मग त्या बोलल्या,"अन दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मुलीला बघायला पाव्हणे आले होते."
मी,"अरे वा ! काय झालं मग?"
त्या,"होय, येतील ते परत बोलनी करायला."
मी,"बरं."
आता हा विषय इथंच संपला असता. पण का कुणास ठाऊक मी विचारलं,"मावशी तुमची मुलगी किती वर्षाची आहे?"
त्या,"१४ झाले की आता."
आणि इथेच माझं धाबं दणाणलं. पण मी शांतपणे त्यांच्याशी बोलत राहिले. म्हटलं,"का हो मावशी इतक्या लवकर करताय? शाळेला जाते का? कितवीला जाते? "
त्या,"आता नववीला आहे. आमचे मिस्टर तर म्हणताय की आता हे असे किश्शे हितं व्हायल्यात. त्यापेक्षा पोरगी तिच्या घरी गेलेली बरी ना? आम्ही पण लवकरच गावाला जाणार आहे. ".
हे ऐकून तर मला अजून काही सुचेना. बरं आता अशा प्रसंगी काय धीर द्यायचा याचे माझ्याकडे हे ऑपशन होते आणि त्यातला कुठलाही योग्य नाहीये.
१. मावशी अहो, असं काय करताय? आता त्या पोरीचं झालं म्हणजे तुमचं असं होईल असं थोडीच आहे? - वा ! म्हणजे जिचं झालं ती बिचारी तर किती कष्टात आहे आणि केवळ त्यांच्या मुलीवर नाही झाला म्हणून हुश्श म्हणायचं? आणि मी तरी कसं सांगणार त्यांना हे ठणकावून?
२. अहो, आपल्या हातात थोडीच आहेत या गोष्टी? आपण आपले प्रयत्न करायचे? - म्हणजे काय? किती होपलेस वाक्य आहे? एक तर त्यात मी त्यांना सरळ सांगतेय की आपल्या हातात काही नाहीये. कुठेही धीर देऊ शकत नाहीये आणि शिवाय आपण प्रयत्न करणे म्हणजे तरी काय? पोरीला नीट अंग झाकून जा म्हणायचं? की आणखी काय?
३.  गावी जाऊन किंवा लग्न करून काय होणार आहे?- म्हणजे लग्नानंतरही मुलीला सुरक्षिततेची काहीही अपेक्षा नाहीये आणि दुसऱ्या गावाला जाऊनही नाही. होय ना?

खरंच, यातलं एकही वाक्य मी त्यांना बोलू शकत नव्हते. मग बोलणार तरी काय?

मी म्हटलं,"मावशी, अहो असं काय करताय? १४ वर्षं लहान आहे."
त्या,"आता लगेच नाही करणार. अजून एक वर्ष आहे."
मी,"म्हणजे तरी १५ च ना? आणि तुम्हाला माहितेय ना १८ वर्षापर्यंत लग्न करता येत नाही कायद्यानं?"
त्या जरा बिचकल्या, म्हणाल्या,"होय माहितेय. पन आमच्याकडं लौकरच करत्यात. इतकी वर्ष नाय थांबणार."
मी,"अहो पण १४-१५ वर्षात लग्न करून मुलीला पुढं मुलंबाळं झाली लवकर आणि त्रास झाला तर?"
मी टीव्ही वरच्या सर्व जाहिराती आठवून त्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याही मला उत्तरं देत होत्या.
मी,"अहो तिला निदान १२ वि तरी करू दे. शिकली तर पुढं स्वतःसाठी काहीतरी करेल."
त्या,"हा आम्ही करूच एक वर्ष तिचं १० वीचं. पन पुढं तिच्या सासरचे शिकवतील की त्यांना वाटलं तर."
मी आता काय बोलणार? म्हणजे एकतर मुलीला शिकवायचं नाही, इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि शिवाय वाटलं तर सासरचे शिकवतील असं म्हणायचं? मी त्यांची उत्तरं ऐकून शांत झाले. एकदाच समजावणीच्या सुरात बोलले,"मावशी, उगाच घाई नका करू. मुलीला थोडं मोठं होऊ द्या अजून. शिकू द्या १२ वि तरी. "
          हे सर्व बोलून मी तो विषय सोडून दिला. पुढं काही झालं तर बोलू म्हणून गप्प बसले. मध्ये दोन दिवस मी जरा बाहेर गेले होते. परत आल्यावर कळलं आमच्या मावशी कामाला येणार नाहीयेत.
आईंना म्हटलं,"काय झालं हो?"
त्या म्हणाल्या, "माहीत नाही. पण जमणार नाही म्हणाली आणि यायची बंद झाली".
         मला वाटलं, त्यांचा नवरा म्हणाला होता की कामं सोडून तिच्यासोबत घरी राहा म्हणून खरंच त्या काम सोडून घरी राहत आहेत की काय. पण परवा मी त्यांना परत बिल्डिंग मध्ये पाहिलं आणि मला कळलं की त्यांनी फक्त माझंच काम बंद केलंय. आणि त्या मला ओळख ना दाखवता घाईत निघून गेल्यात.
         खरं सांगू का, थोड्या दिवसांत मी इथून जाणार. म्हणजे पुढं काय झालं ते मला कळणार नाहीच. जे काही होईल त्यात मी तिकडून काहीही करू शकणार नाही. त्यांचं आणि माझं आयुष्य असंच चालू राहील. त्या सोडून गेल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नवीन व्यक्ती मिळाली कामाला. तीही बिचारी आपल्या लहान मुलींना आता स्वतः शाळेत सोडायला आणि आणायला जात आहे. हे सगळं ऐकून, बघून खूप वाईट वाटतं आणि चीडही येते, या भयानक मनोविकृतीची. आणि मी यात काय करायला हवं हेही कळत नाही. पण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटतेय माहितेय का? या एका बलात्कारामुळे या अशा किती लहान वयातल्या मुलींची लग्नं होऊन अजून जे बलात्कार होणारेत त्यांची.

विद्या भुतकर.

No comments: