कालपासून धो धो पाऊस पडत आहे पुण्यात. कधी कधी तर केवळ आवाज कमी व्हावा म्हणून खिडक्या बंद करून घेतल्या, इतका ! त्यामुळे कधी ना कधी हे होणारच होतं. तर पाऊस पडल्यावर कुठेतरी वीज पडणारच, एखादे झाड पडणार आणि मुख्य म्हणजे लाईट जाणारच. तशी ती गेलीही. आम्ही लाईट जाण्याच्या अनुभवाला गेले एक वर्ष मुकल्याने आमच्या लक्षातही नव्हते की सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्ज करून ठेवायला हव्यात. तशी कमीच वेळ गेली होती, साधारण २.५- ३ तासच. पण त्यातही घरी टॉर्च, मेणबत्या असे साहित्यही नव्हतेच. एकूण काय तर आम्ही आणीबाणीत राहण्याच्या अजिबात तयारीत नव्हतो.
पण थोड्याच वेळात आम्ही सरावलो. मुलांसाठी ते थोडे वेगळे होते. कुणाच्या घरी कन्व्हर्टर होते त्यांचे लाईट पाहून स्वनिकने विचारलेही, की त्यांच्याकडेच का लाईट आहे आणि आपल्याकडे नाही. त्यांना लाईट कशी जाते हे सांगणे जरा कठीणच गेले. मुलांचे जेवण झालेले होते. त्यामुळे त्यांना झोपवून आम्ही मस्त पणतीच्या उजेडात जेवलो. बाहेरच्या कॉमन जागेत एक लाईट असतो त्याच्या उजेडात स्वीट पण खाल्लं. मी त्याच उजेडात थोडंसं चित्र काढायचाही प्रयत्न केला. अशा वेळेला मला अगदी आंबेडकरांची आठवण येते. :) अशा कॉमन लाईटमध्ये बसून काही उद्योग करताना. :) थोड्याच वेळात लाईट आलेही आणि आमचे काम परत सुरु झाले.
हे सर्व सांगायचं कारण म्हणजे 'रात्री लाईट गेली' हा एक इव्हेन्ट असतो. अर्थात नेहमी जाण्यामुळे लोकांचे जे नुकसान होते, विद्यार्थ्यंची आबाळ होते त्याबद्दल वाईट वाटतेच. पण अशी अचानक कधीतरी जाण्यातही एक मजा येते. शेजाऱ्यांशी गप्पा मारणे, मुलेही पळापळ करत राहतात. जे काही टाईमटेबल आहे ते पाळायचे कारण नसतेच. लाईट येईपर्यंत कसलीही घाई नसते. बरं समजा नाहीच आले लाईट तर अंधारात जेवण बनवण्याची कसरत कधी कधी केली आहे. त्यात सर्वात त्रासाचं काम म्हणजे मेणबत्तीच्या उजेडाकडे येणाऱ्या किड्यांना भांड्यात पडू ना देता जेवण बनवणे. तेच जेवण करण्याचेही आहेच. भाजीचा कण म्हणून तोंडात टाकलेला किडा नसेल कशावरून? असो, जास्त बोलायला नको त्यावर.
आम्ही लहान असताना आजोबांच्या सोबत अंगणात कॉटवर पडून आकाशाकडे बघत त्यांच्याकडून गोष्टी ऐकायचो. आमच्या घरासमोरच MSCB चे ऑफिस होते. तिथे जाऊन काय झालं विचारायचो. कधी अभ्यास असलाच तर मेणबत्तीच्या उजेडात शाईच्या पेनाने काढलेलं अक्षरही एकदम भारी वाटायचं. उन्हाळ्यात लाईट तर हमखास जायचेच. पण रात्री अंगणात गाद्या टाकून, मच्छरदाणी लावून झोपायची मजाही होतीच. सर्वात त्रासदायक असायचे ते उन्हाळ्यात बिना पंख्याचे झोपायला लागणे. कॉलेजच्या रूममेट सोबत रात्रीच्या अंधारात गप्पा मारणे, अंधारातच धडपडत मेसला जाऊन जेवण करून येणे यात मजा होती. पण शेवटच्या दिवसाच्या भरवशावर ठेवलेला अभ्यास आणि दुसऱ्या दिवशी असलेला पेपर हे कॉम्बिनेशन जीवघेणं होतं.
आता हे सगळं नियमित अनुभवायला मिळत नाही. कुणाला वाटेल काय हिला असल्या गोष्टीत मजा येते. पण खरंच 'लाईट जाणे' यातली मजा खूप वेळा घेतली आहे आणि त्याचा त्रासही सहन केलाय. पण त्यातले अनुभव आणि आठवणी या नेहमीच आनंददायक आहेत. :) आज बऱ्याच दिवसांनी आला म्हणून हे सगळं आठवलं. पाऊस चालूच आहे. अजून कुठे कुठे लाईट गेली होती हे आता उद्याच कळेल. :)
विद्या भुतकर.
No comments:
Post a Comment