वीकेंडला शाळेतल्या मैत्रिणी भेटलो, नवरे-मुलांसहित मग काय गोंधळ नुसता. मुलांचे जेवण देऊन झाले आणि अजून पोळ्या चालूच होत्या. मग कुणीतरी म्हणाले 'नवऱ्यांना आधी देऊन घ्यायचे का?'. म्हणले, 'नाही सर्व एकत्रच बसू'. त्यांनाही आता हे माझे नेहमीचे माहित झाले आहे. त्यामुळे त्या लक्ष देत नाहीत. पण या विषयावर बोलून वाद नक्कीच होऊ शकतात. तर विषय असा की कुठेही एखादा कार्यक्रम असो, अनेकदा मी ऐकले आहे की "पुरुषांना आधी बसून घेऊ दे." मग त्यात लग्न असो किंवा डोहाळे जेवण. घरात बाईने कितीही मरमर करू दे. तिला अजून चार बायका मदतीला असू दे, जेवण मात्र पुरुषांना आधी करून घेऊ दे. मी नेहमी विचार करते हे असं किती वर्षं चालू राहणार?
एकतर आपल्या कार्यक्रमात नेहमी उशीर झालेला असतोच. कुणीही वेळेत येत नाही. अशावेळी प्रत्येकाला असं वेगळं का बसवायचं. आणि समजा थोड्या थोड्या लोकांना जेवण उरकून घ्यायचे आहे, जागा नाहीये, असे असेल तर मग बायकांनी का नाही बसायचं? आणि हे मी भारतातच नाही, अमेरिकेत अनेक गेट-टूगेदर झालेत त्यातही पाहिले आहे. असं काय वेगळं ट्रेनिंग दिलंय आपल्याला लहानपणापासून की आपण ते तिकडे जाऊनही विसरत नाही? घ्यायचंच आहे आधी कुणी तर मग बायकांना घेऊ दे ना? त्यांनी वाट का बघायची? मुळात ही प्रवृत्ती जे आधी बसतात त्यांची नसून जे सुचवतात त्यांची असते. म्हणजे बायकाच म्हणतील, 'आधी त्यांना बसू दे'. कशाला? 'सर्वानी घ्या' म्हणायचे ना? सुनेला,मुलीला, जावेला, मैत्रिणीला का आग्रह करत नाही आपण? बायकांनी काय घोडं मारलंय?
मी गंमत म्हणून असेही प्रयोग करून पाहिलेत की कुणीही घ्यायच्या आधी आपण जेवण सुरु करायचे. तुम्हीही करून बघा, लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात हे जाणवेल तुम्हालाही. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात सर्वात आधी हातात ताट घेऊन जेवण सुरु करा, बघा काय होते. कुणी तरी असतीलच बघणारे बोलणारे लोक. का? ते माहीत नाही. किती वर्षे अशा प्रथा चालू ठेवायच्या? मी एकदा असेच एका वाढदिवसाला संदीपला 'मुलांना जेवण दे' म्हणून आधी जेवायला बसले. थोड्या वेळाने एका अनोळखी बाईने संदीपचा व्हिडीओ काढला होता. का तर तो असे मुलांना जेवण भरवत आहे आणि मी जेवत आहे. म्हणजे स्वतःच्या मुलांना जेवण 'देणे ही इतकी आश्चर्याची बाब होऊ शकते? अशा कुठल्या जगात राहतो आपण?
आमच्या एका मित्राचे उदाहरण आवडते मला मग. त्यांच्या घरी गेलो की मी आणि त्याची बायको जेवण करून घेतो, तेही आग्रहाने तो आधी बसवतो आम्हाला. 'मुलगा लहान आहे तर तू आधी जेवण करून घे आणि मी आवरतो सर्व' असे हट्टाने तो तिला सांगतो. आम्ही जेवत असताना थांबून काय हवं ते वाढून देतो आणि मग तो आणि संदीप जेवण करतात. आता नवऱ्याचे मित्र घरी आलेत आणि बायकोने समोर बसून काय हवं नको ते बघून वाढलं, आवरलं यात काहीही वेगळेपण वाटत नाही. पण कधी कधी हे असे अपवाद पाहिले की वाटतं, किती छोट्या गोष्टी असतात पण त्या मिळणेही किती दुर्मिळ असते.
मुले, नवरा, सासू सासरे, नातेवाईक या सर्वांचं करून शेवटी बसणाऱ्या बाईला 'खूप चांगली आहे' असं बोलल्याचं अनेकदा ऐकलेय मी. म्हणजे जेवण कसे बनवले, सर्वांशी कसे वागले यापेक्षा ती कधी जेवायला बसली यावरून तिचे व्यक्तिमत्व ठरवता येते का? मला मान्य आहे की आपल्याच घरी कार्यक्रम आहे, तर आपण सर्वांचे नीट करून, बघून नंतर बसायचे म्हणतो. पण दुसऱ्यांच्या कार्यक्रमातही पुढे होऊन जेवण घ्यायला बायका लाजतात किंवा कुचरतात की लोक काय म्हणतील.
बरं कार्यक्रमाचे जाऊ दे, घरीही अनेकदा तीच परिस्थिती असते. खरंतर अनेक जणींना डाएटसाठी म्हणून डॉक्टर लवकर जेवायला सांगतात. पण घरी पाहुणे आले किंवा नवरा उशिरा येत असेल, सासू सासरे उशिरा बसत असतील तर तिलाही मग ताटकळत बसावे लागते. असे का अजूनही अवघडून राहावे लागते? का स्पष्टपणे सांगता येत नाही? एक मैत्रीण लवकर जेवते नेहमी. तर आता आम्हालाही माहित आहे, ती आधी जेवायला बसली तरी चालेल म्हणून. आपण मैत्रिणींना, आपल्या मुलांना, घराच्या सर्वांना समजून घेऊ शकतो तर आपले म्हणणे समजावून का सांगू शकत नाही?
नक्की करून बघा हे, प्रयोग म्हणून का होईना. भूक लागलीय ना, लोकलाजेस्तव थांबू नका. कुणी 'पुरुषांना बसू दे' म्हणत असेल तर त्याला विरोध करून बघा. घरी पाहुणे आहेत, वेळेत जेवले पाहिजे, ताट करून घ्या. कार्यक्रमात, मुलांना नवऱ्याकडे देऊन, आधी जेवण करून घ्या. बाकी बायकांनाही, तू बैस ग आधी म्हणून आग्रह करा. आणि हो, मुलांनो, नवऱ्यानो, पुरुषांनो, कुणी म्हणाले 'आधी बसून घ्या' तर बायकोला आधी जेवण करायला बसवून बघा. मला बघायचंय एकदा, की काय होतंय. जगबुडी तर नक्कीच होणार नाही, पण कुणाचं तरी पोट नक्की भरेल. :)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
1 comment:
सुंदर लिहलंय.. अगदी माझ्या डोक्यातलं तुम्ही शब्दात मांडलाय असं वाटतंय..
Post a Comment