आमच्या बॉस्टनच्या घराजवळ एक चायनीज आजोबा राहतात. त्यांचे घर शाळेच्या जवळच असल्याने नातवाला आपल्या सोबत सायकल चालवत सोडतात. कधी आम्हाला उशीर झाला तर ते सायकलवरून परत येऊन अंगणात व्यायाम करताना दिसतात. असो. तर त्यांची जी सायकल आहे ना, त्याची सीट आणि हॅन्डल याला त्यांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या घातल्या आहेत कव्हर म्हणून. सायकल घरातच किंवा गॅरेज मधेच असतात नेहमी, निदान थंडीत बर्फात तरी बाहेर कुणी ठेवत नाही. आणि तिकडे धूळही काही खूप नसते. तर त्या सायकलच्या सीट आणि हॅन्डललाच फक्त कव्हर का आणि तेही चांगले घालावे ना मग? आपल्या नेहमीच्या भाजी घेतो तशा छोट्या छोट्या पिशव्या त्यांना घातल्या आहेत. ते कव्हर पाहून मला नेहमी हसू येते. त्यांचं नाही, तर माणूस कुठल्याही देशातला असो ती एखादी वस्तू जपण्याची वृत्ती आहे ना त्याचं.
आमच्या घरीही पुस्तकांना आम्ही अशी प्लॅस्टिकची कव्हर घालायचो टिकावी म्हणून. आता मुलांच्या पुस्तकांना लावतो. सासरी आई-दादा घरी नसताना सर्व डब्यांना झाडून पुसून वरून असे कव्हर घालून ठेवतात. आम्हीही पुण्यात नव्हतो तेव्हा अशाच वस्तू झाकपाक करून गेलो होतो. अनेक लोकांकडे मी खास करून टीव्ही च्या रिमोटला असे प्लास्टिकचे कव्हर पाहिले आहेत. आणि हो जुन्या टीव्हीना तर आख्खे मोठे कव्हर असायचे पुढून, मागून पूर्ण. कधी देवांच्या आरतीच्या पुस्तकांना, जुन्या फोटोंच्या अल्बमला. आज काल, मोबाईल फोन घेतले की त्याच्या सोबत स्क्रीन साठी आणि फोन साठी असे दोन कव्हर आधी घ्यायलाच हवेत. तर प्रत्येकासाठी जपण्यासाठी म्हणून असलेली वस्तू वेगळी असू शकते, पण ती मूळची जी वृत्ती असते ना, ती एकदम सारखीच.
माझी एक आवडती अमेरीकन सिरीयल आहे, Everbody Loves Raymond. त्यात एक एपिसोड होता. त्यात हिरोच्या आईचे घर एकदम नीटनीटके असते आणि त्यावरून ती सुनेला बोलायलाही कमी करत नाही. पण तिच्या घरी तिचा सोफाही एकदम प्लास्टिकचे कव्हर घालून ठेवलेला असतो. तिला जेव्हा सून म्हणते की, तुम्ही या अशा वस्तू जपून ठेवता मग त्याचा आस्वाद कधी घेणार? तेव्हा ती हट्टाने मुलांना कव्हर काढून सोफ्यावर बसायला सांगते. तो एपिसोड पाहिला आणि तो आजवर लक्षातही राहिला. त्याला कारण एकच, ती माणसाची वस्तू जपण्याची वृत्ती. अमेरिकन माणूसही असा विचार करत असेल? असा प्रश्न मला तेव्हा पडला होता. आणि त्या एपिसोड सोबत आलेला अजून एक प्रश्नही.
या जपलेल्या वस्तू खरंच आपण सांभाळून ठेवून किंवा त्यांना कव्हर घालून त्यांचं आयुष्य वाढवत आहोत की जे काही काही आहे त्याचा उपभोगही घेत नाहीये? आपल्याकडे मी अनेक गाड्या पाहिल्या आहेत. गाडी घेताना ती दिसायला छान आहे, आतून- बाहेरून म्हणून घेतली जाते आणि १५ दिवसातच त्याचा कायापालट होतो. आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणी त्याला कव्हर घातलेलं असतं. मग त्या छान म्हणून आणलेल्या वस्तूचा काय उपयोग? त्यातलं अजून एक उदाहरण म्हणजे आजचं. गेल्या कित्येक दिवसांपासून घरातल्या टेबलाकडे पाहून वाटत होतं की तसंच ठेवावं छान दिसतंय. पण त्याच्यावर पडणारे बारीक ओरखडे पाहून विचार चालू होता की एखादं प्लास्टिकचे कव्हर आणावे का? आता भारतात आहे तर एक एकदम पारदर्शी कव्हर घेऊन आलेय. एकूण काय, त्या चांगल्या टेबलचं रूप लवकरच जाणार आहे. पण ते आता त्यावर वापरून ओरखडे पडून नाही तर ते प्लास्टिकचे कव्हर घालून जाणार आहे. :( काय करणार कितीही कळत असलं तरी वळत नाही ना.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment