Tuesday, August 23, 2016

खुसपट

        पुण्यात आहे तोवर सानूला मराठी बाराखडी आणि मुळाक्षरे शिकवायची असं डोक्यात होतं. त्याप्रमाणे आईंनी दोन-तीन वेळा तिचा सराव घेतलाही. पण तिला त्या ते सांगत असताना माझ्या डोक्यात विचार होते आपण इथंपर्यंत कसे आलो. अर्थात पाटीवर काढलेली मुळाक्षरे आणि बाराखडी आठवते मला. आई भाकरी करताना उलथन्याच्या दांड्याने काढून दिलेल्या सरळ रेषाही. पाचवीत असताना हजारो वेळा आबांनी  वहीत गिरवून घेतलेली ABCD ही आठवते. पण माझा प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टीसाठी त्यांनी किती प्रयत्न केले असतील. "अक्षर चांगलं काढ", असं हजारो वेळा आपल्या सर्वांच्या आयांनी सांगितलं असेल. आताही आई सानुला शिकवत आहेत तर त्यांचं एकंच वाक्य असतं, "नीट काढ.".
         एकूण काय अक्षर चांगले येण्यात आपल्या घरच्यांचा मोठा वाटा असतो. बरं नुसते अक्षर चांगले असून उपयोग नाही, शुद्धलेखनही हवेच. "हस्ताक्षर आणि शुद्धलेखन" अशा स्पर्धा असत शाळेत. शिक्षक तोंडी एखादा लेख किंवा छोटा भाग सांगत आणि आम्हाला ते लिहायचं असायचं. शाळेतल्या अनेक स्पर्धांपैकी याही. मला कधी बक्षीस मिळालं नाही त्यात, पण भाग घेतल्यामुळे अनेक वेळा अनेक गोष्टी जरूर शिकले. इंग्रजीतही आबांनी स्पेलिंग चुकलंय म्हणून कित्येक वेळा उठाबशा काढावल्या तर कधी कान पिळला. आता अक्षर पूर्वीसारखं राहिलं नाही आणि आता तितकं लिखाणही होत नाही. खरं सांगायचं तर तेंव्हा या गोष्टींचं इतकं महत्त्व वाटायचं नाही, पण आजकाल याच बारीक सारीक गोष्टींनी आपण एक व्यक्ती म्हणून कसे बनलो याचा विचार मात्र नक्की येतो.
          लेख लिहायचं कारण म्हणजे आजकाल अनेक ठिकाणी मराठी, इंग्रजी मध्ये लेख वाचते किंवा फेसबुक वगैरे छोट्या पोस्ट पाहते. त्यातील अशुद्धलेखन पाहून डोळ्याला त्रास होतो. अक्षरश: त्रास होतो. आमच्या घरी, वडील आणि आजोबा दोघेही शिक्षक, त्यामुळे 'चुका काढणे' हा गुण बहुदा साहजिकच माझ्यातही आला असावा. :) त्यामुळे शुद्धलेखनात, व्याकरणात चूक दिसली की ती सुधारायची इच्छा होतेच. बरं, त्या चुका तरी किती साध्या साध्या असतात. 'तू', 'मी', 'की,'ही', 'नाही', 'पण', 'आणि' असे नियमित वापरलेले शब्द, तेही का चुकतात? बरं, नसेल लक्षात एखादा नियम, निदान एकदा तपासून तरी पहावं? 'पन','आणी','मि', 'नाहि' असे शब्द पाहिले की काय बोलावं असं वाटतं. का या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाही? बहुदा त्याचसाठी लहानपणीच या गोष्टी बरोबर शिकण्यावर भर दिला जातो, म्हणजे मोठीपणी ते अंगवळणीच पडते. इथे लोकांचे, दिवसाला अनेक पोस्ट पाहते, 'मराठी माणूस' म्हणून अभिमान असल्याचे. मग त्या भाषेचाही आदर करायला हवा ना?
       बरं, मराठीचे तसे हाल, तर इंग्रजीचेही कमी नाहीत. एकतर मराठीवजा इंग्रजी लिहिण्यात त्याचा खून होतोच. पुन्हा, SMS, tweets मध्ये शॉर्ट मध्ये लिहिण्यात बरेच स्पेलिंग मध्ये काटछाट केली जाते. हे सर्व स्वीकारले तरीही, अनेकवेळा साध्या साध्या शब्दांमध्ये चुका असतात, वाक्यरचनेमध्ये चुका असतात. व्याकरण, काळ वगैरे तर जाऊच देत. तरी बरं, प्रत्येक फोन मध्ये ऑटो करेक्शन आहे आजकाल. इतके असूनही, महिना, आठवड्याचे वार यांचेही स्पेलिंग चुकलेलं असतंच. मी म्हणते, आपण स्वतःच जर अशा चुका करतोय तर आपण मुलांना काय सांगणार? आणि त्यांच्याकडून जर आपण बरोबर शिकायची अपेक्षा ठेवत असू, तर आपण चुकून कसे चालेल?
        आपण अनेकवेळा घरातील एखादी वस्तू अशीच ठेवली पाहिजे किंवा असेच वागले पाहिजे याबद्दल नियम करतो आणि ते सर्वांनी पाळावेत असा आग्रह करतो. मग भाषेच्या बाबतीत उदासीनता का? शिवाय, मला तरी अनेकवेळा चुका दुरुस्त केल्याबद्दल ऐकून घ्यावे लागले आहे ते वेगळेच. म्हणजे एकतर चांगले सांगायला जावं तर, उगाच खुसपट काढल्याचा रोष येऊ शकतो. 'नीट शिकल्याने, शिकवल्याने किंवा कुणी चुकत असल्यास दुरुस्त केल्याने नुकसान तर काहीच नाहीये , उलट फायदाच होईल', असा विचार खूप कमी ठिकाणी दिसलाय. असो. आता माझ्या स्पेलिंग दुरुस्तीच्या त्रासाला कंटाळून मला माझ्या मैत्रिणी एक दिवस मला Whats App ग्रुप वरून काढून टाकतील.  किंवा तुम्ही आपल्या बॉसच्या मेलमधील स्पेलिंग दुरुस्त करून सर्वाना रिप्लाय केल्यावर नोकरी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. किंवा अशा जाचाला कंटाळून मुलं मोठेपणी सांभाळणार नाहीत असे छोटे मोठे धोके आहेत. पण आपण कुणाला थोडीच घाबरतो. :)  त्यामुळे निदान माझ्यापुरते तरी मी हे काम चालूच ठेवणार. बाकी ज्याची त्याची मर्जी. 

विद्या भुतकर.

No comments: