थोड्या दिवसांपूर्वी फेसबुक पेज सुरु केलं. गेल्या दोन तीन वर्षात काही लिहिलं नव्हतं. पण गेल्या तीन महिन्यात बऱ्यापैकी नियमित लिहिलं. सुरुवातीला वाटायचं की कुणी वाचेल की नाही. पण आता वाटत नाही. पेज सुरु केले तेव्हा इतकी सुसूत्रता नव्हती. कधी विचार मनात आला तर नुसता एखादा शब्द वहीत लिहून ठेवला. कधी ट्रेन, बसमध्ये, पर्समध्ये ठेवलेल्या वहीमध्ये लिहिलं तर कधी फोनवरच थोडं टाईप केलं आणि नंतर घरी येऊन रात्री निवांतबसून ठीक केलं. अर्थात हे सर्व जेव्हा कधी डोक्यात काही आलं तरच. हळूहळू एक साचा तयार झाला. आता रात्री लिहून पोस्ट दुसऱ्या दिवशी साठी स्केड्युल करू लागले. आता ते रोजचं एक कामच झालंय. पण बरेच वेळा मला वाटलंही की खरंच मला उद्या नवीन काही विचार नाही आला तर? नवीन काही आपण लिहिलं नाही तर? जणू आता नियमित लिहिणे ही माझी जबाबदारीच झाली आहे.
आता मला असे वाटत आहे की, 'बरं झालं ना निदान असं का होईना काहीतरी माझ्या नोकरीशिवाय दुसरं सुरु केलं मी? नाहीतर माझ्यासारख्या अनेक आय टी मध्ये काम करणाऱ्या लोकांत आणि माझ्यात फरक तो काय?'. परवा एकजण आजारी पडला आणि हॉस्पिटल मध्ये होता. तिथून ऑफिस मध्ये लोकांना मेसेज करत होता कामासाठी. म्हटलं, 'अरे कशाला काम करत आहेस?'. तर म्हणाला,'मला ते सोडून दुसरं काय करावं कळत नाहीये'. दोन दिवसात घरी आला की पुन्हा कामाला लागला. म्हणजे विचार करा आपण जर आजारी आहोत आणि बाकी कित्येक करण्यासारख्या गोष्टी असताना आपण कामाचा विचार करत आहोत यासारखे दुर्दैव ते काय? मी अशा ठिकाणी असते तर काय केलं असतं वगैरे विचार करायची माझी इच्छा नाही, उगाच कशाला वाईट विचार हॉस्पिटलात जायचे. असो.
पण माझं म्हणणं असं की जर आपल्याला नोकरी व्यतिरिक्त काही करण्यासाठी वेळ असेल तर त्यात काय काय करता येईल असा प्रत्येकाने जरूर विचार करावा. आणि हो अगदी गृहिणींनी सुध्दा. कारण तीही एक प्रकारची नोकरीच की. तर ते सोडून आपण दुसरं काही करू शकतो का किंवा आपण आपला वेळ कशामध्ये घालवतो हा विचार नक्की करावा. मला माझं काम आवडतं, नवीन नवीन शिकायला मिळतं, कधी एखादी अडचण सोडवण्यसाठी धडपड करावी लागते आणि ते आवडतं. पण म्हणून तेच माझं जग असू नये. अनेकदा लोक केवळ सवय म्हणून रात्री आपले मेल बघतात. वेळ पडली तेव्हा मीही ते केलं आहे. पण त्याचं व्यसन बनू नये असं वाटतं. स्टीव्ह जॉब्स नसताना जर Apple चालू शकते किंवा मायक्रोसोफट ही बिल गेटस नसताना पुढे जातेय तर आपण कुठे आहोत? त्यामुळे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा अजून कुठल्याही गोष्टींचा अडथळा नसल्यास काय कराल?
एखादा नाद असला पाहीजे ज्यात आपलं मन रमेल. नोकरी किंवा घराचं सर्व करताना, त्याचं फळ मिळतं. कुणीतरी केलेल्या कामाला चांगलं म्हणतं. पण काहीतरी असंही हवं जे केवळ आनंद म्हणून करतोय. लहानपणी अनेक आज्या पाहिल्या आहेत ज्या हातात माळ घेऊन जप करत असायच्या किंवा आमचे आबा जे पेपर वाचायचे, पुस्तक वाचायचे. एखादा शब्द अडला तरी त्याचा अर्थ शोधून काढायचे. हे सर्व केवळ स्वत:च्या आनंदासाठी. माझं विचाराल तर, झोप, टिव्ही, गाणी ऐकत साफ-सफाई करणे, रनिंग करणे, एखादं चित्र काढणे (जमत नसेल तरीही), एखादं चित्र रंगवणे, पुस्तक वाचणे, एखादा छान पदार्थ करून बघणे(अर्थात यासाठी खाणाराही कुणी पाहिजे) आणि सध्याचा आवडता नाद म्हणजे लिखाण करणे.
मला नाही सांगितलं तरी स्वत:ला नक्की विचारून बघा. :) असा कुठला नाद आहे तो.सध्या अजून एक आवडतं काम चालू आहे, ते म्हणजे पेनने मेहेंदी सारखे डिसाईन पेपरवर काढणे. गेले आठवडाभर, जमेल तेव्हा थोडे थोडे करून केलेलं हे चित्र.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment