Thursday, April 28, 2016

नाद

         
         थोड्या दिवसांपूर्वी फेसबुक पेज सुरु केलं. गेल्या दोन तीन वर्षात काही लिहिलं नव्हतं. पण गेल्या तीन महिन्यात बऱ्यापैकी नियमित लिहिलं. सुरुवातीला वाटायचं की कुणी वाचेल की नाही. पण आता वाटत नाही. पेज सुरु केले तेव्हा इतकी सुसूत्रता नव्हती. कधी विचार मनात आला तर नुसता एखादा शब्द वहीत लिहून ठेवला. कधी ट्रेन, बसमध्ये, पर्समध्ये ठेवलेल्या वहीमध्ये लिहिलं तर कधी फोनवरच थोडं टाईप केलं आणि नंतर घरी येऊन रात्री निवांतबसून ठीक केलं. अर्थात हे सर्व जेव्हा कधी डोक्यात काही आलं तरच. हळूहळू एक साचा तयार झाला.  आता रात्री लिहून पोस्ट दुसऱ्या दिवशी साठी स्केड्युल करू लागले. आता ते रोजचं एक कामच झालंय. पण बरेच वेळा मला वाटलंही की खरंच मला उद्या नवीन काही विचार नाही आला तर? नवीन काही आपण लिहिलं नाही तर? जणू आता नियमित लिहिणे ही माझी जबाबदारीच झाली आहे.
          आता मला असे वाटत आहे की, 'बरं झालं ना निदान असं का होईना काहीतरी माझ्या नोकरीशिवाय दुसरं सुरु केलं मी? नाहीतर माझ्यासारख्या अनेक आय टी मध्ये काम करणाऱ्या लोकांत आणि माझ्यात फरक तो काय?'.  परवा एकजण आजारी पडला आणि हॉस्पिटल मध्ये होता. तिथून ऑफिस मध्ये लोकांना मेसेज करत होता कामासाठी. म्हटलं, 'अरे कशाला काम करत आहेस?'. तर म्हणाला,'मला ते सोडून दुसरं काय करावं कळत नाहीये'. दोन दिवसात घरी आला की पुन्हा कामाला लागला. म्हणजे विचार करा आपण जर आजारी आहोत आणि बाकी कित्येक करण्यासारख्या गोष्टी असताना आपण कामाचा विचार करत आहोत यासारखे दुर्दैव ते काय? मी अशा ठिकाणी असते तर काय केलं असतं वगैरे विचार करायची माझी इच्छा नाही, उगाच कशाला वाईट विचार हॉस्पिटलात जायचे. असो. 
           पण माझं म्हणणं असं की जर आपल्याला नोकरी व्यतिरिक्त काही करण्यासाठी वेळ असेल तर त्यात काय काय करता येईल असा प्रत्येकाने जरूर विचार करावा. आणि हो अगदी गृहिणींनी सुध्दा. कारण तीही एक प्रकारची नोकरीच की. तर ते सोडून आपण दुसरं काही करू शकतो का किंवा आपण आपला वेळ कशामध्ये घालवतो हा विचार नक्की करावा. मला माझं काम आवडतं, नवीन नवीन शिकायला मिळतं, कधी एखादी अडचण सोडवण्यसाठी धडपड करावी लागते आणि ते आवडतं. पण म्हणून तेच माझं जग असू नये. अनेकदा लोक केवळ सवय म्हणून रात्री आपले मेल बघतात. वेळ पडली तेव्हा मीही ते केलं आहे. पण त्याचं व्यसन बनू नये असं वाटतं. स्टीव्ह जॉब्स नसताना जर Apple चालू शकते किंवा मायक्रोसोफट ही बिल गेटस नसताना पुढे जातेय तर आपण कुठे आहोत? त्यामुळे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा अजून कुठल्याही गोष्टींचा अडथळा नसल्यास काय कराल? 
            एखादा नाद असला पाहीजे ज्यात आपलं मन रमेल. नोकरी किंवा घराचं सर्व करताना, त्याचं फळ मिळतं. कुणीतरी केलेल्या कामाला चांगलं म्हणतं. पण काहीतरी असंही हवं जे केवळ आनंद म्हणून करतोय. लहानपणी अनेक आज्या पाहिल्या आहेत ज्या हातात माळ घेऊन जप करत असायच्या किंवा आमचे आबा जे पेपर वाचायचे, पुस्तक वाचायचे. एखादा शब्द अडला तरी त्याचा अर्थ शोधून काढायचे. हे सर्व केवळ स्वत:च्या आनंदासाठी. माझं विचाराल तर, झोप, टिव्ही, गाणी ऐकत साफ-सफाई करणे, रनिंग करणे, एखादं चित्र काढणे (जमत नसेल तरीही), एखादं चित्र रंगवणे, पुस्तक वाचणे, एखादा छान पदार्थ करून बघणे(अर्थात यासाठी खाणाराही कुणी पाहिजे) आणि सध्याचा आवडता नाद म्हणजे लिखाण करणे. 
           मला नाही सांगितलं तरी स्वत:ला नक्की विचारून बघा. :) असा कुठला नाद आहे तो.सध्या अजून एक आवडतं काम चालू आहे, ते म्हणजे पेनने मेहेंदी सारखे डिसाईन पेपरवर काढणे. गेले आठवडाभर, जमेल तेव्हा थोडे थोडे करून केलेलं हे चित्र.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, April 26, 2016

मिडलक्लास :)


















विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

बेखुदीSSSSSS

              सकाळची घाईची वेळ. घरात गोंधळ घालून शेवटी मुलांना कसेबसे तयार करून मी बाहेर काढलं एकदाचं. ऑफिसला पोहोचायला किती वेळ होणार याचं गणित चालूच होतं. गाडी सुरु करून दोन मिनिट झाले नाहीत तोवर स्वनिक म्हणाला, 'आई 'बेखुदी' सॉंग लाव'. सध्या आमच्याकडे हिमेश रेशमियाचे संगीत असलेलं हे बेखुदी गाणं जोरदार चालू आहे. एकदा शाळेत पोहोचेपर्यंत पाच वेळा रिपीट वर ऐकावं लागलं आहे. गाणं मलाही आवडतं पण किती वेळा ऐकावं याला काही मर्यादा?
              गाडी चालवताना सकाळच्या गर्दीत मी काही ते गाणं लावणार नव्हते. नाही म्हणालं तर दोघेही ऐकेनात, मग मी म्हणाले, 'मीच म्हणते, चालेल?' तर 'हो' म्हणाले. :) म्हणजे त्या गाण्यावर हिमेशने न गाऊन उपकारच केले आहेत आणि आता ते मी म्हणायचं. मी डायरेक्ट सूर लावला,'बेखुदीSSSSSS'. तर स्वनिक म्हणाला,' असं नाही त्याच्या आधीचं म्युझिक पण म्हण'. डोंबल माझं. इथे गाडीच्या समोर कोण आडवा येतोय ते बघू, का म्युझिक? सान्वी म्हणाली,'थांब मी म्हणते.' म्हणून तिने सूर लावला. 'mhmhmhmh....' मग म्हणाली,'आता म्हण'. मग माझं 'बे SSSSSSS खुदीSSSSSS मेरी दिलपे... ' . जरा कुठे सुरुवात होणार त्यात मध्ये स्वनिक म्हणाला,'आई अगं ते दोन वेळा म्हणायचं आहे, बेखुदी, एकदा नाही.'
             आता आमची गाडी पुन्हा सान्वीवर आली,'mhmhmhmh…. '. पुढे मी, दोन वेळा बेखुदी..' तेंव्हा कुठे गाण्याला सुरुवात झाली. असं करत गाण्याचं एक कडवं कसबसं पार पडलं आणि शाळा आली. सुटले एकदाची. संध्याकाळी संदीपला हे सांगत असताना सानू म्हणाली, 'हो आईने चांगलं गायलं गाणं.' :) झालं, माझा भेसूर आवाजही तिला चांगला वाटला. :)
             बरं हे काही एकदा नाही. मी कधी चित्र काढून दाखवते किंवा मी चित्र रंगवत बसले की ती बघत बसते. म्हणते, 'आई, यु आर अन आर्टिस्ट. यू शुड नॉट वर्क.' म्हणलं हो माझ्या चित्रांनी जर पोट भरलं असतं तर काय ना? कधी म्हणते, यू आर द बेस्ट कुकर(शेफ)  इन द वर्ल्ड.' एकदा संदीपला म्हणाली,'बाबा तुम्ही आईचं ऐका. तिला माहित आहे बरं वाटत  नसताना काय केलं पाहिजे. शी शुड बी ए डॉक्टर.' :) कधी ऑफिसचं काम करत असेल तर म्हणते,'मी कधी तुझ्यासारखं ऑफिसला जाणार?'.
        अशा अनेक गोष्टी ऐकून भारी वाटते एकदम. अगदी सुपर वुमन झाल्यासारखे. आजही मला आठवते लहानपणी आमची आई रांगोळी काढायची तेव्हा वाटायचं किती भारी काढली आहे. अर्थात अजूनही वाटतंच. किंवा कुठल्याही महत्वाच्या कामात आम्ही कितीही गोंधळलो तरी दादा अजूनही सर्व शांतपणे करतात. आपल्यासाठी आपले आई बाबा आपले हिरो असतातच, नेहमीच. आपणही कुणासाठी तरी होत आहोत हेही कमी नाही. :) नाही का?

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, April 25, 2016

सापशिडी

त्यांचं नातंच तसं,सापशिडीचं.

एकत्र असतं खेळायचं 
तरीही चढाओढीचं. 

आईला चुगली सांगून 
कधी खाली ओढायचं 
मागे उभं राहून 
कधी त्याची शिडी व्हायचं.  

एकमेकांची चूक लपवून
एका चौकोनात उभं राह्यचं.
कधी हरल्यावर चिडवायचं 
तर चिडल्यावर मनवायचं. 

एक खेळ संपल्यावर 
झालेलं सर्व विसरायचं.
त्यांचं नातंच तसं,
सगळ्या भावंडांचं !!

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Thursday, April 21, 2016

थोडासा वेळ.....स्वत:साठी

           आजची पोस्ट थोडी वादळी होऊ शकते. यात कुणाच्या भावना दुखविण्याची इच्छा नाहीये, नक्कीच. उलट काही चांगले झाले तर आनंदच आहे. २४-२५ वर्षांपर्यंत मला असं वाटायचं की मी कितीही खाल्लं तरी माझं वजन वाढणार नाही. कॉलेज मध्ये असताना दिवस दिवस चालणं व्हायचं. नोकरी लागल्यावरही बैठं काम वाढलं तरी तगतग होतीच. पण अमेरीकेत आल्यावर माझ्या मेसमधल्या खाण्यापेक्षा जास्त जड, गोड खाणं सुरु झालं.आणि सहा महिन्यात माझं वजन पाच किलोने वाढलं. मला कळलं सुद्धा नाही कधी वाढलं. कारण कधी माहीतच नव्हतं वजन करून, शिवाय ते वाढणार नाही ही खात्री होतीच. पण इथे आल्यावर पहिल्या वर्षातच मला माझ्यात झालेले बदल दिसून येऊ लागले. बारीक होण्यासाठी खाण्यावर नियंत्रण आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींची गरज असते. त्या दोन्हीही कधी मी नियमित केल्या नव्हत्या. पण गेल्या दहा वर्षात आता अंदाज आला आहे काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याचा.
         आजची पोस्ट त्या अनेक लोकांसाठी आहे जे माझ्यासारखा विचार करतात, ज्यांना वाटलेले असते की माझ्यात कधीच काहीच बदल होणार नाही. किंवा त्यांच्यासाठी ज्यांना कळतंय की बदल केला पाहिजे पण कसा ते कळत नाहीये. आणि हो, जरी यात काही संदर्भ केवळ स्त्रियांसाठी असले तरी ते सर्वाना लागू होतात. असो. माझी खरी सुरुवात मुलं झाल्यावर झाली. डिलिव्हरी नन्तर स्वत: मध्ये झालेले बदल हळूहळू जाणवत होते. आणि मुलं होऊन सहा महिने झाले तरी माझं खाणं मात्र प्रेग्नन्सीमध्ये असल्यासारखच होतं. आधी ते पूर्ववत आणलं. मग रनिन्ग्ला सुरुवात केली. बरं, प्रत्येकवेळी पळायला जमेलच असं नाही. भारतात असताना कधी पोहायचा क्लास लावला तर कधी योगाचा. कुणी म्हणायचं तुला बरं आहे गं, सर्व मदत आहे. संदीप सर्व करतो, किंवा ऑफिस लवकर सुटते किंवा मुलं तुझ्यासोबत घरी नसतात दिवसभर. मला या सर्व गोष्टी मला पटतातही. पण मला हे माहित आहे की एका घरात कुठलीही गोष्ट एकट्याने होतच नाही. जर दोघांनी मिळून काही करायचे ठरवले तर ते नक्की होते.
            नोकरीत खूप ताण आहे? तो कसा कमी करायचा बघा. सकाळी वेळ मिळत नाही? दुपारी काढा. कधी रात्री काढा. आपल्या शरीराला आपण का गृहीत धरतो? कधी असं होतं का की मुलांना डबा द्यायचा राहिलंय? देतो न आठवणीने? कधी घर आवरताना, सणाला असे म्हणतो का की राहू दे या वेळी? रात्री जागून का होईना सर्व करतोच ना? मग जेव्हा आपण स्वत: वेळेत जेवायची वेळ येते किंवा स्वत:साठी दिवसातून एक तास काढायचा असतो, तेव्हा ते का जमत नाही? कुणी कधी असेही म्हणते आमच्या घरी सर्वांना ताजेच लागते. त्यामुळे दोन वेळचे जेवण करण्यातच सर्व वेळा जातो, कुणी म्हणतं मुलं लहान आहेत, त्यांचं करण्यातच वेळ जातो. मुळात मला हे कळत नाही, जसे आपण रोजचे रोज जेवतोच तसे रोज किंवा आठवड्यातून चार दिवस थोडा व्यायाम का करू शकत नाही? आणि त्यासाठी लोकांचं छान चालू आहे असं म्हणून रडण्यात काय अर्थ आहे?
           कितीतरी माझ्या वयाचे लोक मी ऑफिसमध्ये बघते, ज्याचं पोट सुटलेलं असतं किंवा डायबेटीस चा त्रास सुरु होत असतो. पण तरीही रात्री १२ वाजता कामाची मेल टाकायला विसरत नाहीत. आपण ज्या शरीरामुळे नोकरी करू शकत आहोत त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो? त्यामुळे कामाचा ताण वगैरे ही कारणं मला पटत नाहीत. आता मुलांचं, लहान असली तर मुलानाही बाहेर घेऊन जायचं, त्यांच्यासोबत पळायचं. मी अनेकदा सानूला माझ्यासोबत सूर्यनमस्कार घालायला लावलेत. अर्थात ती चार नंतर पळून जाते. सध्या मी पळून झाले की ट्रेडमिलवर 'मीही पळते' म्हणून हट्ट करते. मुलांचे कारण देण्यापेक्षा, आपल्यासोबत त्यांनाही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. 
       मध्ये मी एक फोरवर्ड आर्टिकल वाचलं ज्यात लिहिलं होतं की मुलींना कसे सक्षम केले पाहिजे. त्यांना अभ्यासासोबत एखादा खेळही आला पाहीजे. आणि आपण तसे करतोही. मुलींना-मुलांना डान्स किंवा चित्रकला किंवा कराटेच्या क्लासला घालतो, तिथे घेऊ जातोही. पण स्वत: ते का करत नाही? उलट 'मुलांसाठी त्याग करणारी आई-बाबा अशी इमेज का कायम ठेवतो? अगदी जेवायलाही, सर्वांसोबत किंवा नंतर जेवायचा हट्ट का? उलट स्त्रियांची पचनसंस्था अतिशय मंद होते, वय वाढेल तशी. त्यामुळे होईल तितके संध्याकाळी ७-८ च्या वेळेत जेवण केलेच पाहिजे, अगदी बाकी कुणी करत नसेल तरी. आणि चुकीचं वाटत असेल तर सासूबाईनाही सोबत घेऊन जेवलं पाहिजे, त्यांच्या आरोग्यासाठी.
           भारतात डायबेटीसचे प्रमाण वाढत आहे. आपणही त्यात एक होत नाहीये ना याचा विचार केला पाहिजे. मला पुण्यात पळताना, सकाळी अनेक लोक चालताना दिसायचे. त्यांना स्वत:हून कधी सांगितले नाही. पण त्यांनी आपली सकाळची झोप सोडून, चालण्यासाठी वेळ काढला याचे मला कौतुक वाटायचे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो आपण. चिप्स, तळलेले पदार्थ शक्यतो घरी ठेवूच नये. सणाला वगैरे ठीक आहे. नियमित सुका मेवा(ड्राय फ्रुट) ची एखादी डबी पर्समध्ये ठेवावी. किंवा ऑफिसच्या डेस्कवर ठेवावी. घरातून निघताना, एखादे सफरचंद किंवा संत्रे पटकन उचलून पर्समध्ये घालावे. रात्रीच काकडी, टोमाटो किंवा काही सलाड कापून डब्यात ठेवावं म्हणजे घेऊन जाता येतं सकाळी. अशा एक न अनेक गोष्टी. मी पूर्वी कशी दिसायचे किंवा कसा दिसायचो हे आठवून काहीच उपयोग नाही. तसे पुन्हा होण्यसाठी काय केले पाहिजे हा विचार नक्की करा. आणि केवळ दिसणेच कशाला. आपण शारीरिक दृष्ट्या सशक्त आहोत ना हे जरी पाहिले तरी पुष्कळ आहे. वयाच्या ३५ वर्षानंतर जर पळायला लावले तर आपण सलग १५ मिनिट तरी पळू शकतो (जोरात नाही अगदी हळू वेगाने का होईना) का ते एकदा नक्की बघा.
           मध्ये एक पोस्ट वाचली होती, Its not about finding time, its about your priorities. आणि ते मला पटलेही. आपले आरोग्य ही आपल्या साठी सर्वात कमी महत्वाची गोष्ट का असावी? व्यायाम आणि योग्य आहार हे रोजच्या कार्यक्रमाचा भाग बनलेच पाहिजेत असा हट्ट ठेवा. पुन्हा एकदा, या लेखाने कुणाला दुखावण्याचा हेतू नक्कीच नाही. उलट काही फायदा झाला तर चांगलेच आहे. दिवसातून स्वत:साठी केवळ पाऊण ते एक तास काढून बघा, कसं वाटतंय ते. :)



विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, April 20, 2016

तू नसताना


बस स्टॉप, स्टेशन,
किंवा एअरपोर्ट,
कुठेतरी ते दोघे
सामान घेऊन उभे. 

'सगळं घेतलं का?',
हे विचारून झालेलं असतं. 
तिकीट, पैसे, फोन
सगळं घेतलेलं असतं.

'गेल्यावर कळव' सांगून
पोट भरत नाही,
घड्याळ सारखं बघून
वेळ निघत नाही. 

'मी नसताना काय करशील?'
यावर दोघेही बोलतात,  
मान हलवून दुसऱ्याचं 
मुकाट्याने ऐकून घेतात.

बस, ट्रेन, प्लेन 
त्यांची सुटका करतं, 
डोळ्यात पाणी तरी 
ओठांवर हसू असतं.

कधी वाटतं, एकटेपणा…… 
इतकाही वाईट नसतो
पण तू नसण्यापेक्षा,
तू नसण्याचा विचार 
जास्त त्रासदायक असतो.

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, April 18, 2016

पाणीपुरी

           पुण्यातल्या पाणीपुरीच्या गाड्यावर खाता खाता सुद्धा मी तो बरोबर पुऱ्या देतोय ना हे मोजत असते. मुलांनाही घेऊन जाऊ लागले तेव्हापासून आमच्या पाणीपुरी प्लेट वाढतंच गेल्या. एकदा मी अशीच एका माणसाशी भांडत होते की तुम्ही मला २ पुऱ्या कमी दिलयात म्हणून. त्यानंतर अजून २ प्लेट झाल्यावर सानू आणि स्वनिक अजून नुसती पुरी हवी म्हणून हट्ट करू लागले. तेव्हा त्याच माणसाने त्यांना हव्या तेव्हढ्या पुऱ्या खाऊ दिल्या. तेंव्हा मला स्वत:ची थोडी लाज वाटली. माझ्या एका पुरीने तो काही लखपती होणार नव्हता. असो. :) पाणीपुरीत सर्व काही माफ असतं. :)
 एकूण काय, एका वेळी ३-४ प्लेट पाणीपुरी खाणाऱ्या मला, अमरिकेत आल्यावर, पाच डॉलरला पाच पुऱ्या तेही पांचट वाटीभर पाणी आणि चण्याचे थोडे दाणे हे काही झेपत नव्हतं. शिवाय शेवटी 'सुकी पुरी द्या' असं म्हणायलाही कुणी नव्हतं. मला काहीतरी करणं भाग होतंच. त्यात 'खाईन तर तुपाशी.. ' असा अटिटयुड. त्यामुळे सर्व काही सामान आणून घरीच पाणी बनवायला सुरुवात केली. पुऱ्या काही मी अजून घरी बनवत नाही. उगाच त्यासाठी तळणाचं तेल जातं. पण गेल्या काही वर्षात माझी एक प्रोसेस बनली आहे पाणी बनवण्याची आणि ती बऱ्यापैकी नीट चालू आहे. हीच पद्धत भारतातही लोक वापरू शकतात ज्यांना बाहेरची पाणी पुरी खायला नको वाटते. किंवा थोड्या पुरयानी ज्यांचे पोट भारत नाही त्यांच्या साठी सुद्धा.
          मी एकाच वेळी जास्त पाणी बनवून फ्रीजर मध्ये ठेवते त्यामुळे साधारण महिन्याभरात अजून एकदा तरी पटकन फक्त बटाटे उकडले की पाणी पुरी तैयार. :) मी आणि संदीप पटापट मसाला भरून पुऱ्या तयार करून घेतो एकदम २५-२५ दोघांच्या आणि मग वाट्यांमध्ये पाणी घेऊन एकमेकांकडे न बघता खायला सुरु करतो. एकदा तर पुऱ्या कमी पडल्या म्हणून खाता खाता मध्येच दुकानातून जाऊन पुऱ्या आणल्या आहेत, तेव्हापासून माझ्याकडे चार पाच पाकिटे पुऱ्या तर असतातच. कोण जाणे कधी खायची इच्छा होईल? :)

मागे म्हणाले तसे मला रेसीपीसाठी माप वगैरे नीट देता येत नाही. पण तरी प्रयत्न करत आहे.

१. तिखट पाणी: पहिल्या फोटो मध्ये दिलेत ते सर्व पदार्थ, हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, आले आणि लिंबाचा रस हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्या बारीक पेस्टमध्ये भरपूर पाणी घालायचे. मी सुका पाणी पुरी मसालाही घालते. MDH किंवा EVEREST चा तो मसाला साधारण ३-४ चमचे पाण्यात मिसळते. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून तयार केलेले पाणी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते.

२. गोड पाणी: चित्रात दिल्याप्रमाणे, चिंच, खजूर, गूळ आणि थोडी पुदिन्याची पाने घ्यावीत. मी चिंच धुवून मायक्रोवेव मध्ये साधारण एक दोन मिनिट गरम करून घेते. त्यातले पाणी वरचे वर काढून टाकते. त्यामुळे चीन्चेतली घाण निघून जाते. हे न करता थोड्या गरम पाण्यात चिंच घालून धुवून घेतली तरी चालेल. मग चिंच आणि बाकी सर्व पदार्थ भांड्यात घालून शिजू देते. त्यात पेलाभर पाणी घालते. मिश्रण शिजल्या नंतर साधारण तिसऱ्या चित्रात आहे तसे दिसेल. ते सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून त्यात चिमूटभर मीठ घालून, पाणी घालून घेते. तिखट पाण्यापेक्षा ही चटणी थोडी घट्ट असते. त्यामुळे कमी पाणी घालावे. मी थोडा तयार चिंचेचा कोळही घालते. त्याने रंग थोडा छान  येतो. ते नाही घातले तरी चालेल.


















३. सुरु करतानाच मी ३-४ बटाटे उकडायला ठेवते. म्हणजे पाणी तयार होईपर्यंत बटाटे झालेले असतात. त्या बटाट्यामध्ये धने-जिरे पूड, मीठ आणि हवे असल्यास लाल तिखट घालावे.


४. सर्वात शेवटी, पुरीमध्ये बटाट्याचे मिश्रण, बारीक शेव आणि हवे तसे गोड किंवा तिखट पाणी घालून घ्यावे.

सध्या पोरांचीही चंगळ चालू असते पाणी पुरी केली की. मुलगी तर चाटून पुसून खाते सर्व प्लेट. :) शिवाय ज्यादा गोड चटणी वेगळी. :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Sunday, April 17, 2016

बाजार

        रविवारची सकाळ लवकर सुरु झाली त्यामुळे पटकन सकाळी जाऊन Indian Store मधून भाज्या, डाळी, बिस्किटे, लोणची इ सामान घेऊन आलो. भूक लागली म्हणून आधी जेऊन घेतले. पण त्यानंतर तो समोर सामानाच ढीग नको वाटू लागला. आणि हे आजचं नाही. एकूणच आणलेलं सामान जागेवर लावून ठेवणे हा अतिशय कंटाळवाणा प्रकार आहे. सर्व सामान जागेवर ठेवण्यासाठी कधी आहे तो पसारा काढून नीट लावावा लागतो. कधी आधी असलेली वस्तू परत आणली जाते किंवा हवी ती राहून जाते. त्यात फ्रीज कितीही मोठा असला तरी त्यात भाज्या, फळे ठेवायला पुरेशी जागा नसते. मग कधी मागे एखादी भाजी सडलेली असते. कधी एखाद्या शिळ्या भाजीचा किंवा भाताचा डबा तसाच राहिलेला असतो. ते सर्व साफ करणं आलंच. त्यामुळे हे असं सामान लावायचा अतिशय कंटाळा. 
        हा कंटाळा माझ्यात असला तरी आमची आई किंवा संदीपची आई मात्र एकदम विरुद्ध आहेत. कोरेगाव मध्ये दर सोमवारी आठवड्याचा बाजार असायचा. आम्ही शाळेत जायचो. आई एक दोन मोठ्या पिशव्यांमध्ये भाज्या, फलं सर्व घेऊन यायची. कधी आम्ही घरी आलो तरी आईची आवारावर चालूच असायची. पालेभाज्या लवकर निवडून पहिल्या दोन दिवसांत केल्या जायच्या. चवळी, वाटाणे किंवा वाल अशा शेंगा सोलून किंवा तुकडे करून पुन्हा पिशव्यात भरून ठेवयाची.तेंव्हा वाटाणे खूप गोड नसायचे त्यामुळे अगदी छोटेछोटे जे असतील ते मला आवडतात म्हणून बाजूला काढायची. आम्हीही कधी निवडायला बसलो चुकून तर त्यातले काही दाणे तोंडात घालणारच. मिरच्यांचे देठ काढून त्या पिशवीत भरायच्या. अशी छोटी छोटी कामे खूप पुरतात. माझ्याकडून यातलं काहीही होत नाही. ते करण्यासाठी किती डेडिकेशन लागतं ते आता कळतंय.
         पूर्वी घरी फ्रीज नव्हता तोवर पालेभाज्या अध संपून जायच्या. त्यामुळे शक्यतो सोमवारी चाकवताचं गरगट असायचं. मग शेंगा वगैरे आणि आठवड्याच्या शेवटी बटाटा किंवा उसळ नक्की. दर सोमवारी ताजी केळी खायला मिळायची. कधी ठराविक त्या ऋतू मध्ये मिळणारे फळ. किंवा तोतापुरी आंबा अशा अनेक  गोष्टी मिळायच्या. कधी स्वस्त आहे म्हणून घेतलेली कोथिंबीर वडीसाठी जायची. कधी ओल्या शेंगा मिळायच्या. अर्थात आताही हे सर्व मिळतच. पण हे सर्व ठराविक दिवशीच घरी येत असल्याने, बाजारचा दिवस एकदम स्पेशल होऊन जायचा. 
          संदीपच्या आईही कधी आमच्या सोबत आल्या सामान घ्यायला कि आठवणीने सांगतात मागची मेथी वय गेली बरंका. किंवा अगं अजून मिरच्या आहेत दोन आठवडे जातील तरी. किंवा वाटाणे सोलून ठेवतील. फ्रीज नीट लावून ठेवतील. कधी पुदिना आणला तर तो लवकर खराब होतो तेंव्हा एकेक पाने निवडून बाकी टाकून देतील. एखादी भाजी खराब होत असेल तर आजच करून टाकू अशी आठवण करून देतील. पुण्यात असताना बरेच वेळा आम्ही शनिवारी असे भाज्या आणायला एकत्र गेलोय आणि मग आईंनी सर्व सामान निवडून लावून दिलंय. :) 
          मलाही ही अशी मेंटेनन्स ची कामं करण्याची सवय लावली पाहिजे. पण जमत नाही. तरी मी मागच्या वेळी खूप भाज्या आणल्या होत्या. म्हणून एक यादी फ्रिजला लावून ठेवली काय काय आहे त्याची. त्यामुळे शक्यतो सर्व भाज्या वेळेत खाल्ल्या गेल्या. मग कढीपत्ता खराब होतो म्हणून आज मुद्दाम बाहेर काढून थोडा सुकवून एका डब्यात घातला. दुध उकळून दही लावले. (अजून लागले नाहीये. ) तरी मिरच्यांची देठ काढून ठेवली नाहीत, न कोथिंबीर निवडली. बघू कधी जमते ते सर्व करायला. कधी कधी संदीप यातले थोडे फार करून ठेवतो. But I have a long way to go. :) असो, आजचा तरी बाजार लागलेला आहे. :) 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

मेडल्स


       शाळेने एक गोष्ट शिकवली परीक्षा कितीही छोटी असो, अगदी २० मार्कांची चाचणी परीक्षा असो किंवा १०० मार्कांची, परिक्षा महत्वाची. त्यामुळे चाचणी असली तरी थोडंसं का होईना टेन्शन असायचंच. आणि कॉलेजने शिकवलं, अगदी शेवटी नाईट मारून का होईना वेळ निभावायची. (अर्थात शिकवलं नाही, मीच शिकले. वाईट गोष्टी शिकायला वेळ लागत नाही. ) पण रनिंगने, सराव किती महत्वाचा ते शिकवलं. कितीही नाईट मारली तरी दुसऱ्या दिवशी पेपर लिहिता येतो पण रेस पळता येत नाही. परीक्षा काय किंवा अंतर काय कितीही छोटं असलं तरी सराव पाहिजे. आता या तीन गोष्टींचा खालच्या पोस्टशी काहीही संबंध नसेल, पण हे एकदा लिहायची इच्छा होती, ती पूर्ण केली. :)

          काल,  या वर्षातली पहिली रेस पळालो. रेस फक्त म्हणायला, आम्ही काही पहिले वगैरे येण्याच्या नादाला लागत नाही किंवा अगदी 'पहिले कोण आले' हे विचारण्याच्या भानगडीतही पडत नाही. पण पळणे हे फक्त स्वत:साठी आणि आपलाच ठरवलेला वेळ मागे टाकून जाण्यासाठी ही रेस. यावेळी रेस फक्त ५ किलोमीटरची होती. आता तसा जरा अंदाज आला आहे पळायचा त्यामुळे पूर्ण होईल याची खात्री होती. तरीही जसे दिवस जवळ आले थोडी काळजी वाटू लागली होती. गेले तीनच आठवडे सराव करून रेस पार पडली. आनंदाची गोष्ट म्हणजे मी आणि संदीप दोघांचीही ठरवलेल्या वेळेत किंवा त्याहून कमीच वेळेत पूर्ण झाली. 
           पण मला ना पळण्यापेक्षा त्यादिवशी तिथे पोहोचायची जायची जास्त काळजी असते. एकतर खूप पहाटे कधीतरी उठायचं असतं. मग तिथून कुठेतरी ड्राईव करून जायचं. त्यात रेसमुळे कुठले रस्ते बंद असतात. कधी ट्राफिक लागते किंवा पार्किंग कुठे करायचे याची चिंता असते. गाडी लांब लावली तर परत येताना तिथेपर्यंत चालत येत येईल का. आणि हे सर्व करण्यासाठी सकाळी अलार्म वेळेत वाजेल का आणि आपल्याल्या जाग येईल का असे हजारो प्रश्न माझ्या मनात असतात. तरीही सर्व ठीक होत आलं आहे आतापर्यंत तरी. 
         बाकी कशाचीही काळजी असली तरी एका गोष्टीची मात्र आम्हाला काळजी नसते. ती म्हणजे मुलांना ज्या मित्रांकडे सोडून जातो तिथे काय होईल. आता पर्यंत चार तरी रेसेस ना आम्ही दोघे गेलो आणि आमच्या मित्रांनी त्यांना घरी सांभाळले आहे. बर हे लोक नुसते मुलांना बघत नाहीत. रात्री आम्ही झोपायच्या आधी विचारतात सकाळी काही लागणार आहे का? काही हवं असेल तर त्यांच्या घरात सर्व सामान कुठे ठेवलं हे ते सांगून ठेवतात. सकाळीही जाग आली की आम्हाला 'All the best' देऊन परत झोपतात. आम्ही 'रेस संपली' म्हणून कॉल केला तर तोवर मुलं उठून बसलेली असतात. घरी आलं की आम्ही जग जिंकल्यासारखे आमचे अभिनंदन करतात. घरी पोहचेपर्यंत, मुलांचे ब्रश करून, दुध नास्ता झालेले असते. आम्हाला विचारतात चहा नास्ता करायला. जेवणही अगदी तयारच असतं. आम्ही फक्त आयतं जेवून दुपारची झोप काढायची. आमचे पाय-बिय दुखत असतील तर गोळ्याही देतात. हे सगळं बघून मला रेसपेक्षा आपल्याला असे मित्र आहेत याचाच जास्त आनंद होत असतो.
       आता मुलांनाही आम्ही असे रेसला जाण्याची सवय झाली आहे. तेही आनंदाने त्या मित्रांकडे राहतात. घरी आले की विचारतात, 'मेडल मिळालं का? '. मग ते गळ्यात घालून फिरत राहतात. भारी वाटतं ते बघताना. रेस झाल्यावर सर्वांना आनंदाने सांगायला किंवा फेसबुक वर फोटो टाकायलाही भारी वाटतं.पण त्या सगळ्याच्या मागे आमचे हे मित्र आणि त्यांच्या शुभेच्छा असतात त्या कधीच विसरणार नाही. मला वाटतं प्रत्येकाने एकदातरी हा अनुभव घेऊन पहावा. निदान त्यासाठी तरी एखादी रेस पळून पहायला हवी. :) यावेळचे आमचे मेडल्स त्या सर्व मित्र-मैत्रिणींसाठीच. :)


 विद्या भुतकर. 
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/







Friday, April 15, 2016

मर्यादापुरुषोत्तम....रामनवमीच्या निमित्ताने !

             अहो, आज इथे बर्फ पडला. तुम्ही परवा इकडून निघाला आणि थंडी सुरु झाली. किती म्हणत होती मृणाल तुम्हाला,' बाबा थांबा अजून थोडे दिवस'. पण तुम्हाला कुठे जमतंय असं एका जागी शांत बसायला आणि तेही जावयाच्या घरी? माझी अमेरीका फिरायची हौस काही पुरी केली नाहीत तुम्ही. आता मी कुठली जातेय या २ महिन्याच्या बाळाला घरी ठेवून एकटी? किती गोड आहे नाही नातू आपला? पण रडायला लागला की जीव घाबरा घुबरा होतो. तुम्ही तर त्याला कौतुकानं हातात घेतलं पण कसे घाबरला होतात. कधी इतक्या लहान मुलाला घेतलंय कुठे हातात तुम्ही? 
               आपली मुलंही घरी घेऊन आले मी तेंव्हा तीन महिन्याची होऊन गेली होती. नवव्या महिन्याच्या सुरुवातीला माहेरी गेलेली मी एकदम बाळ घेऊनच सासरी मग. पण मला ना खूप भीती वाटली होती, तुम्ही मला माहेरी सोडून जाताना. कुठे काही झालं तर? निदान तुम्हाला बघून तरी गेले असते असं वाटलं. पण त्या काळात बोलता कुठे येत होतं हे सर्व. त्यात तुम्ही तसे पहिल्यापासूनच मर्यादा पुरुषोत्तम. आमची आजी म्हणायचीच,'अगदी रामच आहे हो तुझा नवरा'. कधी कुठल्या कामाला चुकला नाहीत. धाकट्या भावाला शिकण्यासाठी खर्च केलात. बहिणीचं लग्न लावून दिलंत. आई-वडिलांना शेवटपर्यंत सांभाळलंत. माझ्या बाबतीतही, बायकोला वेळेत माहेरी सोड, सासरी आण सगळं केलंत. कधी जावई म्हणून, माझ्या घरी काही मागितलं नाहीत. खूप अभिमान वाटतो तुमचा, लोकांनी हे बोलून दाखवलं की. असो. 
              परवा नोकरीला जायच्या आधी मृणालने मला हा laptop दिला. कसं लिहायचं ते शिकवलं. म्हटलं तुम्हालाच लिहावं आधी. असाही दिवसभर काम पुरतं बाळाचं. तरी विरंगुळा हवाच ना काहीतरी. थोडा जरी वेळ मिळाला तर एकट वाटत राहतं, म्हणून घेऊन बसले. मुलीचं सगळं नीट करायचं म्हणून पुढाकार घेऊन इथे आलात. आता बाळ झालं, सर्व नीट पार पडल्यावर मात्र कुठे राहावतंय तुम्हाला. तिकडे जाऊन अजून कुणाची तरी जबाबदारी पार पडायचीच आहे न तुम्हाला. मला काय वाटतं, तुम्हाला ते व्यसनच लागलंय हे असं काम ओढवून घ्यायचं. ते पार पाडून पुढे जायचं अजून काही करायला. चांगलं वाटतं ना असं सर्वांचं भलं करायला? 
            विचार करत होते, हे सगळं करताना दोन क्षण कधी माझ्यासाठी थांबावं वाटलं का तुम्हाला? अगदी घरच्या सर्वांसाठी पैसे कमवायला शहरात गेलात. मागे या दोन मुलांना घेऊन इतक्या लोकांच्या घरात माझं काय झालं असेल याचा विचार केलात? लोकांचं करण्यात पैसे लावलेत, योग्यच केलंत ते. पण मला कधी काय हवंय म्हणून विचारलंत? आता हे आजचंच बघा ना? तुम्हालाही माहित्येय या परदेशात किती एकतं वाटतं. तुम्हालाही कंटाळा आलाच इथे असा लोकांवर विसंबून राहायचा. तरी बाळंतपण होईपर्यंत थांबलात आणि लगेच निघून गेलात. निदान माझ्यासाठी म्हणून तरी थांबायचं होतं अजून थोडे दिवस? किंवा मला घेऊन जायचं होतं आपल्यासोबत. पण असं कसं होणार ना? मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही. तुम्हाला सोडून जाता आलं सर्व, लोकांसाठी. सीतेला मात्र आपला नवरा, संसार आणि आपल्या मुलांना सोडता आलं नाही तेंव्हाही आणि आजही.
               
विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
            

Thursday, April 14, 2016

आईवर गेलीय ! :)

ते दोघेही माझाच अंश, म्हणजे तसा त्याच्याही.पण तरीही जन्म व्हायच्या आधीपासूनच एक खेळ सुरु होतो.
'ए तुझ्यासारखं नाक नको बरंका. '
'माझ्यासारखी उंची नको.'
'तुझ्यावर नको जायला स्वभावाने, चिडखोर कुठला.'
अगदी डोहाळे जेवणापासून ते जन्मापर्यंत नुसत्या गप्पा त्यावर. जन्म झाल्यावर तर मग काय, बाकी बाहेरचे लोकंही सुरु होतात.
'आईसारखा दिसतो, नै?'
'छे गं, कपाळ बघ बाबासारखा आहे अगदी.'
'अरे तू झालास ना तेव्हां असाच दिसत होता. नाक म्हणजे दोन बिळं होती फक्त. '
'केस मात्र हिच्यासारखेच आहेत हां. जावळ तरी बघ कितीये ते.'

           कितीतरी खुसपट त्या इतकुशा बाळामध्ये काढली जातात. आमची मुलं आता थोडी मोठी झाली तरीही सवय काही जात नाही. कितीतरी वेळा स्वनिक एखाद्या खेळण्यात डोकं घालून बसतो. ते कसं चालतं हे शोधतो. नाही कळलं तर आमचं डोकं खातो. कधीकधी वाटतं, 'अरे बास! किती चिवट आहे हा. सोडत नाही अजिबात'.  पण मग त्याचा बाबा तरी काय वेगळा आहे? कधी पुस्तक घेऊन बसतो सकाळी, संध्याकाळी सतत. तर माझी आई म्हणाली,'आईवर गेलाय अगदी.'
            अगदी खाण्याच्या आवडीही किती सारख्या असतात. आंबट खायची संदीपची हौस, ती मुलामध्ये दिसते. मी भात खाताना नेहमी तूप ताटात बाजूला घेऊन कणकण खाते. सानूही तशीच. संदीप माझ्याकडे बघून म्हणतो,'आईवर गेलीय. ' :) खोबरं, शेंगदाणे किंवा चिंचा असोत. कुणाला आवडत नाहीत? तरीही तो गुण आपल्याकडूनच आला आहे अशी खात्री असते. :)
            पण आम्ही तिथेच थांबत नाही. सानू कधीकधी छान चित्र रंगवते. तिला फुलांची, झाडांची खूप आवडही आहे. नेहमी कुठे गेले की एखादे रोपटे, फुल घ्यायच्या मागे लागते. मग तेव्हा मला वाटते,'अगदी आजीवर गेलीय.'. आमच्या आईलाही अशीच सवय आणि आवड आहे. :) कधी एखाद्या नातवाला आजी म्हणते, 'मामावर गेलाय.', 'काकावर गेलाय.'
           किती छोट्या गोष्टी पण आपल्याच त्या अंशात आपलीच छबी बघण्याची किती हौस असते न आपल्याला? आणि ती सापडली की मोठा शोध लावल्याचा आनंद होतो. अर्थात आपल्यातले वाईट गुणही आपल्याला माहित असतातच आणि त्यातले कुठलेही आपल्या मुलांत येऊ नये अशी खूप इच्छाही असते. पण खरं सांगा त्यातली एकतरी आपण कधी स्वत: मोठ्याने बोलून दाखवतो का? :) जाऊ दे, आत्ताच कुल्फीच्या काड्या मी आणि सानूने खाल्ल्या तिथेच टाकल्या म्हणून संदीपकडून ऐकून घेतलं आहे. :P

विद्या भुतकर.

Wednesday, April 13, 2016

एक अंतर.... पार केलेलं

         
     ही गोष्ट आहे आम्हा शाळेतल्या मैत्रिणींची, २०१४ मध्ये पुण्यात १० किलोमीटर पळालेल्या एका रेसची. दोनेक वर्षापूर्वी पुण्यात असताना रात्री साधारण अकरा वाजता Whats App वर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता त्यामुळे मी आधी लक्ष दिलं नाही. पण 'मी वर्षा' असे लिहिल्यावर मला शंका आली. म्हणले, 'माझा नंबर कसा मिळाला?'. बाबांकडून म्हटल्यावर मग जरा बिनधास्त झाले तरीही नुसते 'हाय' करून सोडून दिले. दुसऱ्या दिवशी मला एका ग्रुपमध्ये टाकलं कुणीतरी. बघते तर माझ्या शाळेतल्या ७ जणींच्या ग्रुपमध्ये मी सहावी जमा झाले होते. आता फक्त एकच बाकी राहिली होती. लवकरच तीही आम्हाला सामील झाली आणि आमचा रेनबो पूर्ण झाला. आम्ही सर्व जणीनी एकमेकींना पहिलीपासून पाहिलेलं. पण अकरावी बारावी मध्ये एकदम घट्ट मैत्री झाली पण तसेच सर्व दुरावलोही बाहेर पडल्यावर. 
            लवकरच धपाधप सकाळी सकाळी मेसेज सुरु झाले. मी तशी जास्त वापरतही नव्हते Whats App तोवर. खरं सांगायचं तर खूप वर्षांनी कुणीतरी मला 'विद्ये' म्हणत होतं आणि त्याची अजिबात सवय राहिली नव्हती. पण ती व्हायला वेळ लागत नाही. आपली माणसं कितीही वर्षांनी भेटली तरी सूर जुळतातच. आधी, सर्वांनी आतापर्यंत काय केलं, सध्या कोण कुठे आहे असे माहितीपूर्वक मेसेज झाले. सात पैकी आम्ही सहा जणी पुण्यात होतो, एक अमेरिकेत असते. उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्याच वाढदिवसाला आम्ही सगळ्या माझ्या घरी भेटलो. पोरांनाही आणलं होतं आपापल्या. घरात नुसता गोंधळ. खूप वर्षांनी खूप हसले. 
            कोरेगावासारख्या छोट्या गावात वाढलेलो आम्ही. सायकलीवरून सोबत कॉलेजला जायचो, महिन्यातून एक दोन वेळा कॅन्टीन मध्ये वडापाव खायचो, वाढदिवसाला ग्रीटिंग द्यायचो आणि क्रिकेट, मूव्हीस्टार बद्दल भरभरून बोलायचो. सोप्पं आयुष्यं होतं. पण मध्ये १५ वर्षांच्या मोठ्या टप्प्यात भरपूर काही झालं होतं. एक गोष्ट चांगली होती सर्वांना एक स्वत:चं असं स्वप्नं होतं. हळूहळू आम्ही काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूने एकमेकींना विचारू लागलो. मधेमधे वाढदिवसाला सणाला भेटलोही. भेटलो की दंगा नक्की. साधारण ४-५ महिने झाले असतील, आमचे आता नियमित बोलणे होतंच होते. कधी एखादीची खेचायचो, कधी जास्त खेचली की भांडायचो. मग कुणी ग्रुप सोडून जाणार, त्याला परत घेऊन या. भेटायचं ठरवण्यावरूनही वाद होत, आणि भेटताना उशीर आले की अजून. पण एकूण मजेत चाललं होतं. 
          मला पुण्यात आल्यापासून पळायला अजिबात जमलं नव्हतं. आधीच्या वर्षी मी पुणे मेरेथोन चुकले होते. यावेळी ती करायचीच असं पक्कं होतं. मी म्हटलं सगळ्यांनी एकत्र केली ती तर किती मजा येईल ना? अर्थात आमचं कितीही प्रेम असलं तरी हे काम सोप्पं नव्हतं. प्रत्येकाच्या घरी वेगळ्या अडचणी (ज्याला मी निमित्त म्हणते :) ) मी माझा हट्ट सोडत नव्हते. माझ्या पोस्ट वरून माझा स्वभाव कसा वाटतो हे माहित नाही पण माझ्या मैत्रिणी मात्र, "बाप रे विद्दी चूक काढेल म्हणून स्पेलिंग पण दुरुस्त करून ठेवतात". ;) 'हिचे कोण ऐकून घ्यायचे, म्हणून उशीर होत असेल तर टेन्शन आले आहे', असे दाखवत तरी असत. मीही मला कुणीतरी खोटं का होईना घाबरत आहे तर बोलून घेते. बरेच दिवस झाले कुणी ऐकत नाही म्हटल्यावर माझा एक दिवस टायपिंगचा स्पीड वाढला. माझ्या स्पीडवरूनही त्या ओळखतात की माझा मूड कसा आहे. :) 'अगं हो, करूयात. तू शांत हो.' अशी समजूतीची वाक्यं आली. पण नुसते तेव्हढे चालणार नव्हते. 
          मी सर्वांनी मिळून कमीत कमी दहा किमी तरी करावे असा आग्रह करत होते. जसेजसे रजिस्ट्रेशन ची मुदत संपत आली मी माझे रजिस्ट्रेशन करून टाकले आणि जाहीर केले की कुणाचे उत्तर नाहीये तर मीच एकटी जाते. Black mail, दुसरं काय? शेवटी वैतागून दोघींनी तूच कर बाई म्हणून सर्व माहिती दिली आणि मी त्यांचे रजिस्ट्रेशन केले. बाकी दोघींनी काय सबबी सांगितल्या आठवत नाहीयेत पण आमची पोलिस मेंबर आहे एक जिचा अजून पत्ता नव्हता. म्हटलं, 'काय हे शोभतं का असं पोलिसांना? तू लोकांना उदाहरण दिलं पाहिजेस इत्यादी इत्यादी. बिचारीला कधी कसे काम निघेल याचा पत्ता नसतो त्यात चार आठवडे आधी एखादे बुकिंग कसे करणार ती. आणि नाही जमले तर माझे ऐकून कोण घेणार म्हणून गप्प बसली होती. तिनेही जाऊ दे गप्पं बसेल म्हणून मला बुकिंग करायला सांगितले. अशाप्रकारे सहा पैकी चार जणींनी आम्ही १० किमी च्या रेसला जायचे ठरले. 
         त्या चार मध्ये, भक्ती, ही एक बिल्डर आहे, हे आमचे ग्रुपचे Admin. बिल्डर, म्हणजे पेशाने.  ती आणि तिचे पार्टनर बिल्डरचे कंत्राट घेतात. (चुकले बिकले तर माफ कर गं.) तिची हिम्मत आणि अशा व्यवसायात यश पाहून खूप भारी वाटते आम्हालाच. स्वाती, एक टिचर म्हणू, ती एका इन्स्टिट्युट मध्ये नेट्वर्किंगचे क्लास घेते. स्वाती सर्वात सोशिक आणि नेहमी हसमुख. कधीही मी तिला चिडताना किंवा दु:खी चेहऱ्याने पहिले नाहीये. मी सोफ्टवेअर कामगार आणि शेवटी आमचे पोलिस, पल्ली. पल्ली, आजही आमच्या ग्रुपमध्ये तीच फिट आहे. सर्व पोलिसांसाठी ती एक उत्तम उदाहरण आहे. कधीही तिच्या वागण्या बोलण्यातून ती मोठी ऑफिसर आहे असे जाणवू देत नाही. प्रत्येकीचा पेशा सांगायचे कारण म्हणजे प्रत्येकीचे रुटीन वेगळे होते, वेळा वेगळ्या. भक्ती दिवसभर वेगवेगळ्या साईटवर फिरत असते. कधी वेळेत जेवते, कधी घरी उशिरा जाते. पल्लीचे, पोलिसांचे कधी काम निघेल, कसे असेल याचाही भरवसा नाही. मी आणि स्वाती मात्र वेळेत यायचो आणि वेळेत जायचो. त्यामुळे मी सकाळी हळूहळू थोडे थोडे अंतर पळायला सुरुवात केली होती. स्वातीने घरी जाऊन वेळ मिळत नाही म्हणून दुपारी जेवणाच्या वेळेतच एक तास मोठी चक्कर मारून यायला सुरुवात केली. अधून मधून आमचे ग्रुपवर बोलणे व्हायचे सराव कसा चालू आहे म्हणून. 
        भक्ती रात्री उशिरा घरी येत त्यामुळे कधी सराव करणार असा नेहमी प्रश्न पडायचा. पण तीही रोज रात्री जेवण झाले की तिच्या पिल्लांना म्हणजे दोन कुत्र्यांना घेऊन चालायला जाउन येऊ लागली. कधी संध्याकाळी वेळ मिळाला तर टेकडीवर चढून येत होती. सर्वात भारी आमचे पोलिस होते. नियमित योगासने करते, टेकडीवर चढून येते, पळणे मात्र नियमित चालू नव्हते तिचे(निदान असे आम्हाला सांगितले) . या निमित्ताने तिने आता हळूहळू पळायला सुरुवात केली. माझे साधारण ७-८ किमी इतका सराव झाला होता. एका रविवारी आमच्या बिल्डीन्गमधली माझी अजून एक मैत्रीण आणि मी पाषाण रोडला पळायला गेलो. खूप भारी वाटले. सकाळ सकाळी बरेच लोक रस्त्यावर पळताना दिसले. पुणं किती सुंदर दिसतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला. आम्ही दोघींनी १० किमी पार पाडले. पुढच्या रविवारी रेस होती...... 
          सहा नाही तर चार जणी का होईना पळणार म्हणून मी जाम खुश होते. त्या शेवटच्या आठवड्यात, सर्वांनी वेळेत या, गोंधळ घालू नका, रेसला कुठून सुरुवात आहे, असे बरेच मुद्दे बोललो आम्ही. रेसच्या दोन दिवस आधी जाऊन रेस पाकीट ज्यात आमचा बिब नंबर इ मिळणार होते. पल्लीने भक्ती, स्वाती आणि मी असे सर्वाना एकेक करत गाडीत घेतले आणि आम्ही रेसचे पाकीट घ्यायला गेलो. एकदम भारी वाटत होते. असं सर्वांनी मिळून जायला किती मजा येणार आहे हा विचार करूनच मी खुश होते. सर्व सामान घेऊन परत येत असताना काहीतरी फालतू कारणावरून माझं आणि भक्तीचं भांडण झालं. अगदी जोरदार. आता तो विषय आठवला तरी हसू येतं. पण तेव्हा ते झालं. मी तावाने गाडीतून उतरून निघून गेले. रेसला दोन दिवस राहिले होते. 
           भांडण झाल्यामुळे सर्वांचा मूड गेला होता. आमच्या सोबत नसणाऱ्या बाकी तिघींना कळेना की काय चाललंय. आणि खरं सांगू का, हे Whats App वर कधी कधी माणूस कोणत्या आवाजात, कोणत्या हेतून बोलत आहे हेकळत नाही. उगाच छोट्या गोष्टी मोठ्या होतात. आणि तसं पाहिलं तर आम्हाला भेटून १५ वर्षं झाली होती. त्याकाळात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगळं काही घडलेलं, प्रत्येकजण तीच शाळेतली व्यक्ती राहिलेली नसते. एकूण काय आमचा संवाद बंद झाला त्या दोन दिवसापुरता. म्हटलं झालं, कधी नव्हे ते काही करायची इच्छा करावी आणि ते असं फिसकटलं. पण मन कुठे ऐकतय. उद्या मी परत अमरिकेत गेले तर केवळ काही फालतू कारणामुळे आपण अशी संधी घालवली याचा पश्चाताप मला करायचा नव्हता. मग आम्ही बोललो १-१ Whats App वरच. रेसच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजता. म्हटलं, 'भांडून तुझी काही सुटका होणार नाहीये यातून. मुकाट्याने तयार राहा'. :) आम्ही सगळ्या दुसऱ्या दिवशी रेसला पोचणार असं तेव्हा तरी वाटत होतं. आमच्या पोलिसाला, पल्लीला, 'वेळेत ये' असा मेसेज टाकून झोपून गेलो. 
           दुसऱ्या दिवशी माझी आई, बहिण, भाऊ सर्व घरात होते. मुलांना त्यांच्या ताब्यात सोडून, मी, संदीप आणि माझी अजून एक मैत्रीण आम्ही म्हात्रे ब्रिजला पोचलो. तिथे भक्ती आणि स्वाती आल्या. पोलीसही आले बाबा वेळेत. :) एकदम जोशपूर्ण वातावरण होतं. सकाळी ७ वाजता आमची रेस सुरु होणार होती. फोटोबिटो काढून घेतले.... आणि रेसला सुरुवात झाली. सुरुवातीचे मोजून २-४ मिनिटच एकत्र असू आणि मी आणि पल्ली एकत्र राहिलो आणि स्वाती आणि भक्ती एकत्र झाले. आम्ही दोघी एका तालात पळायला लागलो. शेजारून इथिओपिया वगैरे देशातले पट्टीचे पळणारे रेस संपवून परत येत होते. लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. साधारण तीनेक किलोमीटर नंतर मला जर दम खायची इच्छा होऊ लागली. पण पल्लीने मला 'नंतर थांबू' असे सांगितले आणि आम्ही पळत राहिलो. पाचेक किमी नंतर ती म्हणाली,'थांबायचं का?'. पण आता माझे पाय थांबत नव्हते. म्हटले, 'चल, जाऊ तशाच'. आम्ही पळत राहिलो. 
             कॅम्प मधून जाताना मला जरा टेन्शन येत होते. म्हटले आपण तर सराव केला आहे. या मागे राहिलेल्या दोघी येतिल ना नीट? आमच्या बिल्डरची, भक्तीची काळजीही होतीच. त्यांनी कधी इतके अंतर निदान रेसमध्ये तरी केले नव्हते. कुठे काही झाले तर?  आपणच भरीला घातले त्यांना. म्हटले निदान फोन तरी करावा म्हणून पळता पळता फोन केला तर तिने घेतला नाही. म्हणून आमच्या टीचरला केला. म्हटलं, 'तुम्ही दोघी सोबत आहात ना?' तर नाही म्हणाली. म्हटलं 'झालं आता'. आम्ह दोघी पळत आता ८ किमी पूर्ण केले होते. पण शेवटचा एक किमी खूप चढ होता. चढलो तसाच. एक काका आमच्या पेक्षा जोरात पळत होते. मग आम्हीही धावलो. लवकरच संदीप दिसला. मग एकदम जोरात पळून रेस फिनिश केली, १ तास १७ मिनिटांत १० किमी. भारी वाटत होते. ढोल ताशे जोरात वाजत होते. लोक टाळ्या वाजवत होते. आम्ही रेस संपवून मेडल घ्यायला लाईन मध्ये उभे राहिलो तरी अजून मागून दोघींचा पत्ता नव्हता.  
           आम्ही मेडल घेऊन परत येणाऱ्या लोकांमध्ये आमच्या मैत्रिणी शोधात होतो. एकदम समोर मला त्या भक्ती आणि स्वाती दिसल्या, अंदाजे दीड तास होऊन गेला होता. त्या दोघींची रेस फिनिश झाली आणि मी जाऊन आमच्या भक्तीला जोरदार मिठी मारली. सगळ्यांचे मेडल गळ्यात घालून फोटो काढून घेतले. पुढचे ४ दिवस लई बढाया मारल्या. वयाच्या पस्तीस वर्षात एकत्र केलेली पहिली पळापळ. मजा आली. तो जो आनंद होता ना तो वेगळाच होता. आयुष्यात अजून रेसेस होतील. पण हि नक्कीच अविस्मरणीय आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षी मी नसतानाही बाकी पाच जणींनी यावेळी मार्च मध्ये अजून एक रेस पूर्ण केली. चौघींनी ५ किमी ची आणि एकीने १० किमी. :)
          Whats App ने अनेक चांगल्या घटना घडल्या त्यातली ही एक. आज काल बरेच ग्रुप होत असतात आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. मजाही येते. पण एक मैत्री असतेच अशी जी नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि तशी ती हवीच. आम्ही अजूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी एकमेकीच्या सोबतीने केल्या आहेत. मग त्यात दिवाळीला छोटा पणत्यांचा व्यवसाय, त्यातून झालेला फायदा. त्यासाठी केलेलं प्लानिंग. बिर्याणीच्या, पिझ्झाच्या व्यवसायाला प्रोत्साहन. कुणाला पुन्हा नोकरी सुरु करण्यसाठी तर कुणाला काम कमी कर म्हणून सांगायला. मग एकीने कन्झुमर प्रदर्शन  स्वत:च्या जोरावर भरवले. दुसरीने त्यात स्टाल घेतला. माईंच्या मुलींच्या आश्रमाला ज्याला जमेल त्यांनी मदत केली. अशा एक न अनेक गोष्टी. कितीही भांडलो आणि फालतू बडबड केली तरी एक धागा आहेच जो एकदा जोडला गेला आहे. जो आजही तितकाच पक्का आहे. तो आता तुटणार नाही हे नक्की. :) 
            

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Tuesday, April 12, 2016

बालपण


बालपण, ते क्षण सोन्याचे 
पाहता पाहता उडून जायचे....  
हाती राहती आठवणीचे 
सात रंग ते इंद्रधनुचे ....

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/




Sunday, April 10, 2016

गुंता

            मी पाचवीत असताना मला स्केचपेन मिळाले होते बक्षीस म्हणून. तेंव्हा सांभाळायची अक्कल नव्हती आणि ते हरवल्यावर नवीन मागायची हिम्मत. बऱ्याच दिवसांपासून मी खूप दुकानांत ही कलरिंग ची पुस्तकं बघत होते, Adult Coloring Books. मोठ्या लोकांना चित्र रंगवण्यासाठी ही पुस्तकं. सान्वीची अशी पुस्तकं पाहिली की मला खूप इच्छा व्हायची आपण पण काहीतरी करावं अशी. एकतर मला काही चित्रकला वगैरे येत नाही. स्वत: चित्रं काढणे, रंगविणे हे सर्व प्रयत्न करून झाले आहेत गेल्या ८-१० वर्षात पण ते जमणार नाही किंवा तेव्हढा संयम नाही रोज सराव करण्या इतपत. त्यामुळे अशी आयती चित्र काढलेली पुस्तकं फक्त रंग भरायला सोप्पी म्हणून मी दोन घेऊन आले, नवीन स्केचपेन चा बॉक्सही. :)
              फोटोत असलेलं हे चित्र गेले दोन आठवडे करत होते, अर्थात रोज थोडं थोडं करून रात्री टी व्ही बघताना.दिसायला सुंदर दिसणारी डिझाईन पण, हातात घेतलं तेव्हा कळेना की कुठून सुरु करावं. कारण नुसते मनाप्रमाणे कसे रंगवणार?बराच वेळ बघत बसले वाटलं उगाच घेऊन येते काहीही. पण कुठून तरी सुरुवात करावीच लागणार होती ना? नाहीतर माझ्यामध्ये आणि माझ्या ७ वर्षाच्या मुलीत फरक तो काय? मग आधी पटकन समोर दिसणारी फुलं घेतली. एकसारख्या दिसणाऱ्या फुलांना एकेक रंग निवडले आणि सुरु केले. मग हळूहळू चित्र उलघडत गेलं. कधी कधी चुका झाल्याच पण एकूण काल शेवटचे रंग देऊन थांबवून टाकलं. मध्ये रिकाम्या जागा पण पाहिजेत ना. शुभ्र पांढरा हा ही एक रंग आहेच की. असो. 
           पण या चित्रात जो अनुभव आला न तो मला नेहमी येतो. म्हणजे एखाद्या दिवशी सिंकमध्ये खूप भांडी पडलीत आणि बघून सुरु करायचीही इच्छा होत नाही इतकी. पण मग मी ती मोकळी करायला लागते. म्हणजे ताट वेगळे, चमचे-पळ्या वेगळे आणि मोठी भांडी वेगळी, काचेची भांडी वाट्या पेले वेगळे. आधी काचेची भांडी जी फुटण्याची शक्यता असते आणि काचेचे ग्लास वगैरे ला मसाल्याचा वासही लागू शकतो घासणीचा. त्यामुळे ती आधी बाहेर जातात. त्यानंतर मोठी भांडी घ्यायची, म्हणजे ती धुवायची कमी असतात पण आकार मोठा त्यामुळे सिंक त्यांनीच भरलेलं असतं. मोठी भांडी धुवून बाजूला गेली की ढीग निम्मा झालेला असतो. मग ताट येतात. ती गेली की फक्त बारीक बारीक वस्तू राहतात. चमचे सर्वात शेवटी येतात. अर्थात घरातली साफसफाई किंवा धुणं यांतही हे नियम लागू होतातच. पण एकून काय की कुठेतरी सुरु करावं लागतं.
         अभ्यास करतानाही हाच प्रयोग मी कधीकधी केला आणि कधी ऑफिसमध्ये खूप काम पडल्यावर सुद्धा मी हट्टाने उठून कामाला लागते सर्व संपवायचेच आज असे म्हणून. बरेच वेळा संपत नाही पण ढीग निम्मा झालेला असतो. मी माझी हाफ मेरेथोन पळताना सुद्धा एकेक अंतर घेते. पहिले ३ किमी सर्वात अवघड मग अर्धे अंतर होण्याची वाट  बघते आणि अर्धे झाले की जोर दुप्पट होतो. बरेच लोक वजन कमी करायचं आहे किंवा व्यायाम सुरु करायचा आहे किंवा अमुक अमुक रेस मलाही करून बघायची आहे असं म्हणतात. तर काही मला इथे राहायचं नाहीये, भारतात परत जायचं आहे असंही म्हणणारे असतात पण खरंच जर एखादी गोष्ट करायची असेल न तर सुरुवात करणं महत्वाचं आहे. दिसताना ते अंतर, ते काम किंवा तो निर्णय अवघड वाटतो. पण एकेक छोटी छोटी अडचण बाजूला करत, छोटे छोटे निर्णय घेत पुढे गेलं की बरंच अंतर पार केलेलं असतं. 
           माझ्या बऱ्याच गळ्यात घालायच्या चेन  एका डब्यात ठेवल्या की हमखास अडकून जायच्या. बरेच दिवस मी त्या तशाच पडू द्यायचे. पण मग एकदा घेतले की हळूहळू कुठे नक्की गाठ बसलीय, कुठली चेन कुठल्या बाजूने आत किंवा बाहेर काढली पाहिजे हे बघत एकेक गाठी सोडवत जायचे. दोन वेगवेगळ्या चेन दिसल्या की भारी आनंद व्हायचा. (आता मी त्या वेगवेगळ्या कप्प्यातच ठेवते. :) ) कधी केसातला गुंता सोडवला आहे? होळी खेळून आल्यावर धुतलेल्या केसातला? ओढून तर चालत नाही. मग एकेक बट सुटी करून घ्यावी लागते आणि हळूहळू तो गुंता सोडवावा लागतो. नात्याचं पण असंच असतं नाही? गुंता हळूवारच सोडवावा लागतो. पण त्यासाठी कुठेतरी सुरुवात तर करावीच लागते. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/




Thursday, April 07, 2016

शेव भाजी

सर्वांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. :)

काही काही पदार्थ आहेत जे त्या त्या ठिकाणीच चांगले मिळतात. असे खानदेशी बऱ्याच पदार्थांचे होते. सासुबाई करतात तेव्हा मी खाते आवडीने पण माझ्याकडून केल्या जात नाहीत. पाटवड्या, शेवभाजी, कांदा कचोरी , वरण बट्टी, हिरव्या मिरचीची भाजी असे अनेक पदार्थ आहेत त्या यादीत. बरेच दिवस झाले संदीपला शेव भाजी खायची होती. आमच्याकडे म्हणजे सातारला काही अशी कधी केली नाही आणि खाल्ली नाही. त्यामुळे मला काही ती येत नाही. त्यांच्याकडे म्हणजे जळगावला मी खाल्ली आहे. पण खानदेशी स्पेशल शेवभाजी घरी बनवण्याचा योग कधी आला नव्हता.
परवा त्याने स्वत:च शेव घरी आणली. आज स्वत: सांगितले की मी शेव भाजी करतो, तू फक्त चपाती कर. मला काय आनंदच आहे. :) शेजारी उभं राहिलं की मला सूचना द्यायची हुक्की येते. म्हणून मस्तपैकी ट्रेडमिलवर ३ मैल पळून आले. तोवर भाजी झालेली होती. जेवायला बसताना फक्त शेव घालून घेतली. काय भारी लागत होती. :)  त्याने या साईटवरून रेसिपी घेतली आहे.
http://healthyvegrecipes.com/how-to-make-shev-sev-bhaji-masala-gravy-rassa-bhaji/

इथे काही फोटो टाकले आहेत. एन्जॉय. :)



विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

कितवा नंबर आला?

        काहीकाही गोष्टींची किती सवय असते, नाही का? त्यातली प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे पोरांची शाळा, अभ्यास आणि पालक म्हणून माझी मानसिकता. आजही कुणी मुलगा मुलगी रिझल्ट घेऊन आले की पहिला प्रश्न मनात येतो, 'कितवा नंबर आला? किती मार्क पडले?'. आता भारतातही शिक्षणव्यवस्था बरीच बदलली आहे म्हणे. मला कुणाला शैक्षिणिक क्षेत्रात जवळून पाहण्याची बरेच वर्ष संधी आली नाही. त्यामुळे सध्या काय चालू आहे याची काहीच कल्पना नाही. उलट त्यामुळे एक पालक म्हणून मी नेहमी काहीतरी महत्वाची गोष्ट विसरून जाईन अशी मला भीती वाटते. अगदी, 'अडमिशन घ्यायला रात्री जायचे होते आणि माझी झोप उघडलीच नाही', अशी स्वप्नंही पडली आहेत. तर एकूण काय मुलगी शाळेत जायला लागल्यापासून जरा थोडे काही पाहत आहे. असो.
           सांवी चार वर्षाची असताना पुण्यात शाळेत जायला लागली. तिथे जरा जरा होमवर्क मिळू लागले.  तिच्या वयाच्या मानाने ते मला जास्त वाटायचे त्यामुळे कधी कधी सोडूनही द्यायचे. शाळेत बरेच नियम होते जे शिकायला आम्हाला बराच वेळ लागला. त्यातला एक म्हणजे होमवर्क असलेलं पुस्तकच फक्त घरी येणार. ते चेक करायचं की कुठल्या पानावरचा अभ्यास आज घ्यायचा आहे. आणि पानेही ओळीने घेतली जातील असे नाहीच. त्यामुळे मागच्या आठवड्यात ५० वे पान केले असेल तर आज कदाचित १५ असेल. असो हळूहळू मला ते समजू लागलेहोते. तरीही  अमेरिकतील पद्धत पहिली होती अभ्यास घ्यायची, त्यामुळे कधीकधी तिला ५० वेळा एकच अक्षर लिहायला सांगायची इच्छा व्हायची नाही माझी. कित्येक वेळा शाळेतून तिच्या बाईंची नोट पण आली, 'अर्धवट राहिलेली पाने पूर्ण करून घ्या' म्हणून.मी विचार करायचे जाऊ दे ना कधीतरी शिकेलच A B C D.
          तरीही एक गोष्ट माझी चुकते ती म्हणजे आपले मुल बाकी मुलांच्या मागे पडत नाही ना हे जाणून घ्यायची इच्छा. सध्याच्या तिच्या शाळेत (अमेरीकेत) तिला रिपोर्ट कार्ड मिळते. त्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिची काय प्रगती आहे ते देतात. म्हणजे अगदी तिचे हस्ताक्षर कसे आहे, ती वर्गात बाकी मुलांसोबत कशी वागते, आर्ट मध्ये तिची प्रगती कशी आहे किंवा आजूबाजूच्या जगात काय चाललंय याची तिला किती कल्पना आहे. ती कुठलेही पुस्तक वाचले की त्यावर कसा विचार करते, इत्यादी. पण त्या रिपोर्ट कार्डमध्ये मार्क न देता, १-४ च्या नंबर लाईन वर ती कुठे आहे हे लिहिलेलं असतं. त्यावरून मला तिला कुठे सुधारणा करायची गरज आहे हे कळते. अगदी चार पानांचं असतं ते कार्ड. पण तरीही माझं समाधान होत नाही. एकतर इथे लोक इतके गोड बोलतात की ते खरंच चांगली गोष्ट सांगत आहे का सुधारणा केली पाहिजे हे सांगत आहेत हे कळत नाही. (तेही एक कारण असेल का माझं समाधान न होण्यासाठी? :) ) असो.
          तसा विचार केला तर सध्याचे जे रिपोर्ट कार्ड आहे ते आधीपेक्षा कितीतरी बाकीची माहिती देतं. म्हणजे फक्त गणित, भाषा, इतिहास आणि विज्ञान या चार विषयांपेक्षा अजून बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आणि तुमच्या मुलाच्या वयासाठी जे त्याला/तिला आलं पाहिजे त्यातलं किती येतं इतके समजले की बास. यापेक्षा अजून काय पाहिजे? पण माझं समाधान होत नाही. मला अजून काहीतरी हवं असतं. ती बाकी मुलांपेक्षा मागे तर पडत नाही हे जाणून घ्यावे वाटत राहते. आजपर्यंत केवळ, 'मार्क किती पडले' आणि 'कितवा नंबर आला' हे दोनच प्रश्न मला विचारले आहेत त्यामुळे असेल. आणि तेच प्रश्न माझ्याही मनात येतात, म्हणजे पहिली आली, दुसरी आली, ५० वि आली, इत्यादी.
           केवळ वर्गात असलेल्या पन्नास मुलांसोबत तुलना न करता, व्यक्तीची स्वत:सोबत तुलना केली पाहिजे आणि पुढे त्याच्यात किती प्रगती होत आहे हे पाहिले पाहिजे. आणि तेच योग्य आहे हे मला कळतंय, पण वळत नाहीये.  माझ्या या मानसिकतेमधून मला बाहेर पडायला हवे पण वेळ तर लागणारच आहे. सान्वी घरातलं पहिलंच मूल असल्याने सर्व प्रयोग तिच्यावरच होणार असं दिसतंय. मुलगा शाळेत जायला लागेपर्यंत थोडी सवय होऊन जाईल अशी अपेक्षा. :) आजच शाळेत बाईंना भेटून आल्यामुळे हे सर्व विचार. :)  असो.

P. S. - इथल्या शिक्षिकेला बाई म्हणायला कसंतरीच वाटतं नाही? :) 
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Wednesday, April 06, 2016

फुलपाखरू

         कॉलेजच्या फर्स्ट ईयर मध्ये ही कविता लिहिली होती. दुसऱ्या वर्षीच्या वार्षिक अंकात दिली होती. एका मैत्रिणीने स्वत: मेसेज करून सांगितले की तिला त्या मासिकात दिसली म्हणून. मला नेहमी प्रश्न पडतो की लोकांना खरेच का इच्छा होत असेल अशी चांगली कामे करायची? त्यांत फक्त त्यांचा चांगुलपणा दिसतो. थंक्यू सो मच. :)

          तर ही कविता विशेष काही नसेलही पण हि आणि अजून एक दोन कविता मी कॉलेजच्या काव्यवाचनात वाचल्या होत्या. विं. दा. करंदीकर यांच्या सोबत एका मंचावर बसले होते. माझ्या डायरीत त्यांनी त्यांच्या सुंदर अक्षरात स्वाक्षरी केली होती. (ती डायरी पुन्हा पहिली पाहिजे.) ती संध्याकाळ अजूनही आठवते. आणि यासर्वानंतर दुसरे पारितोषिकही मिळाले होते.  तो दिवस आठवला आणि वाटलं खरंतर मीच ते फुलपाखरू होते. कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं. Life was so much simpler then. कवितेचा फोटो पाहून सर्व आठवणी जाग्या झाल्या.

फोटो पाहताना लक्षात आले कवितेला काहीही साचा नव्हता आणि ती छापण्यातही. थोडी ठीक ठाक करण्याचा प्रयत्न केला आहे.

फुलपाखरू

असा एखादा दिवस येतो
काही विशेष न वाटता संपणारा
पण नंतर मात्र
खूप काही देऊन जाणारा अन....घेऊनही...
असाच होता तो दिवस
तुझी माझी ओळख होण्याचा. 
तशी नेहेमीचीच होती पद्धत
ओळख करून देण्याची 
पण तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती
अगदी वेगळ्या भविष्याची....
जशा होऊ लागल्या
नियमित आपल्या भेटी
मन माझं शोधू लागलं
शब्द तुझ्याशी बोलण्यासाठी. 
तू मात्र होता तुझ्याच विश्वात रमलेला...
तुझं चिडणं, रुसणं, रागावणं घाबरवायचं मला!
विचार करायचे मी नेहमी,
असेन तरी का मी
तुझ्या मनाच्या विश्वात,
असेलच तर कुठे दूरच्या एका कोपऱ्यात?
वाटायचं काहीच अडत नसेल
तुझं माझ्यावाचून
मनातल्या गोष्टी राहायच्या मनातच राहून
अखेर तो दिवस आला...
मला उंच आकाशात घेऊन जाणारा
प्रशस्त लाटांवर मनसोक्त उडवणारा...
आणि आनंदाची भरती आणणारा.
मी खूप खूष झाले होते
तुझ्या मनातील गुपित समजले होते,
तुझी पसंद तर मीच होते.....
ठाऊक नाही मला
तुझ्या स्वप्नातील परी कशी आहे,
पण मी तरी केव्हांपासून तुझीच आहे
तुझ्या होकाराने, तुझ्या सोबतीने
मला खूप काही दिलं
तेव्हापासून सुरवंटाचं फुलपाखरू झालं.
कारण त्याच्या छोट्याशा विश्वात
तुझं आगमन झालं.
वेडं ते फुलपाखरू आनंदाने नाचलं,
डोळ्यातून हसलं आणि
आपल्या सुंदर पंखांकडे पहात राहिलं.
पंख तरी कसे होते?
सुंदर रंगांचे, नव्या दिशांचे, नव्या स्वप्नांचे.
स्वप्नांची जी दुनिया त्यांनी सजविली होती
तिथले काटे त्यांनी पाहिलेच नव्हते.
वास्तवाचे भान त्यांना होतेच कुठे?
लवकरच त्याचं स्वप्न भंगलं,
कर्तव्याने त्याला वास्तवात आणलं.
स्वप्नांचे रंग केव्हाच उडून गेले
विरहाचे काटे पंखांना फाडून गेले
फुलपाखरू आता स्वत:लाच विचारत राही.....
प्रेम करून त्याला मिळालं का काही?
त्यानंतर ते फुलपाखरू कधीच हसलं नाही.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Tuesday, April 05, 2016

छोटी छोटी बातें....

             कधी द्राक्ष किंवा शेंगदाणे खाताना असं झालंय का, शेवटचे दोनच दाणे उरलेत, कुठला खावा म्हणून विचार करून एक निवडावा आणि नेमका शेवटचा दाणा आंबट किंवा खवट निघावा? माझं होतं बरेच वेळा असं. कधी बरोबर बाहेर पडताना पाऊस सुरु होतो तर आपण जाऊ तेंव्हाच दुकान बंद असतं, काही न काही कारणानं. तेव्हा मग 'नशीबच वाईट' किंवा 'दिवसच खराब' असे मोठे मोठे दोष त्या एका छोट्या गोष्टीमुळे देऊ लागतो. असो. आजची पोस्ट अशा छोट्या छोट्या गोष्टींवरच. 
            सकाळी मी ऑफिसला येण्यासाठी स्टेशनवर पोचते तेव्हा बरेच वेळा ट्रेन अगदी समोरून निघून जाते. पण कधी कधी मात्र अगदी दार बंद होता होता मला ट्रेन मिळून जाते. कधी बसायला निवांत जागाही मिळते. मी मिटींगच्या आधी कॉफी घ्यायला जाते तोवर बरेच वेळा पाणी, साखर किंवा दूध यातलं काही ना काही संपलेलं असतं. पण कधीतरी जाते तर सर्व मिलन जातंच. अगदी कॉफीचा कुठला फ्लेवर घ्यावा असा विचार करत बॉक्समध्ये हात घालते तर पहिलाच माझा फ्लेवर मिळून जातो. आता जगात इतकी दु:खं असताना मला कशाचा आनंद व्हावा असंही म्हणेल कुणी. पण खरंच भारी वाटतं. असो.
             अजून काही अगदी हमखास घडणाऱ्या गोष्टी म्हणजे अशा, एखाद्या सेल मध्ये जाऊन आपल्याला एखादा कपडा आवडावा, किंमत अगदी कमी आणि राहिलेल्या दोनच कपड्यात आपल्या मापाचा एक असावा. सोनं मिळाल्याचा आनंद होतो किनई? :) रेडिओ लावावा आणि अगदी आवडीचं गाणं लागावं. एखाद्या रविवारी भाजी आणायला जावं आणि मटार अगदी ताजे ताजे, १५-२० रु किलोने मिळावेत यासारखा रविवार नाही. पोरांनी, बनवलेलं जेवण आवडीने पटापट संपवून टाकावं आणि लवकर झोपूनही. आणि नेमका त्याच दिवशी आपल्या आवडीची सिरियल बरोबर दोन मिनिटात सुरु होणार असावी. दिवस कसा एकदम सुखात जातोय असं वाटतं, नाही का?  या सर्व गोष्टींमध्ये कुठलीही लाईफ चेंजिंग वगैरे नाहीये. पण आनंद मिळायला छोटं कारणही पुरतं. हो ना? :)

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

मोह

एक सुरेल गाणं ऐकलं,
आवडलं, पुन्हा एकदा लावलं .
मग खेळ सुरु झाला,
शब्दांना ऐकण्याआधीच,
आठवणीत जाण्याचा.
भानावर आल्यावर,
 'पुन्हा एकदा ऐकू ' म्हणून
तेच गाणं लावण्याचा.
आता मला तो खेळ कळलाय
पण शब्दांना संदर्भ लावण्याचा,
मोह कुणाला टळलाय ?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Monday, April 04, 2016

'ए ऐकतेस का?'

         कित्येक वर्षात पहिल्यांदा सुलभाकाकू लेकाकडे एकट्या राहायला गेल्या. कधी वेळ पडली नाही आणि आली तरी नवऱ्याला घेतल्याशिवाय गेल्या नाहीत. नात आजारी आहे म्हणून कळल्यावर मात्र हातचं काम सोडून धावल्या.  १०-१२ दिवस झाले आणि लॉकडाऊन सुरु झाला. नवऱ्याची काळजी होतीच पण एकटीला परत गावाला जाणं जमलं नसतं. 
        रोज पोरगा सून कामाला लागले की काकू काकांना फोन लावायच्या. 'अहो, गोळ्या घेतल्या ना?',  'पोळ्या जमल्या की आज पण भातच?', 'कपडे धुताना स्टूल घेऊन बसत जा, वाकू नका.' अशा अनेक सूचना द्यायच्या, जमेल तसं आठवून विचारायच्या, सावरून घ्यायच्या. काका आपले, 'हो, झालं', 'केलं', 'ठीक आहे', इतकंच उत्तर द्यायचे. 
          आज सकाळीही असाच फोन झाला. ठेवता ठेवता काका म्हणाले,"ए ऐकतेस का?", बोलू की नको या विचारात पुढे बोलले, " हैप्पी बर्थडे हां."
काकूनीही 'हां, हां, ठान्क्यू' म्हणत फोन ठेवला आणि लाजून तोंडाला पदर लावला.

विद्या  भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Friday, April 01, 2016

लव असो की अरेंज


प्रेमाला, घराची चौकट दिलीस
तेंव्हाच संपलं सगळं.
सुरुवातीला प्रत्येकालाच वाटतं
आपलंच प्रेम जगावेगळं.

खिडकीशिवाय कुठूनही
आता येत नाही वारं.
सगळीकडे लागतात
कडी, कुलुपं अन दारं.

शेवटी सर्वांचा
तोच असतो संसार. 
घरं, पोरं, नोकरी
त्याच भानगडी हजार. 

घड्याळाच्या तालावर
जो तो नाचतो. 
प्रेमासाठी फक्त आता
विकेंडच मिळतो.

लव असो की अरेंज
तरी लग्न सेमच असतं.
दोघे कसे भेटलो
या 'गोष्टी'त फक्त अंतर असतं.
  
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

तू

तुला आठवल्याशिवाय..
कविता हसत नाहीत,
पण त्यासाठी तुला आठवावं,
हे मला पटत नाही. 


- विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/