Wednesday, April 13, 2016

एक अंतर.... पार केलेलं

         
     ही गोष्ट आहे आम्हा शाळेतल्या मैत्रिणींची, २०१४ मध्ये पुण्यात १० किलोमीटर पळालेल्या एका रेसची. दोनेक वर्षापूर्वी पुण्यात असताना रात्री साधारण अकरा वाजता Whats App वर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता त्यामुळे मी आधी लक्ष दिलं नाही. पण 'मी वर्षा' असे लिहिल्यावर मला शंका आली. म्हणले, 'माझा नंबर कसा मिळाला?'. बाबांकडून म्हटल्यावर मग जरा बिनधास्त झाले तरीही नुसते 'हाय' करून सोडून दिले. दुसऱ्या दिवशी मला एका ग्रुपमध्ये टाकलं कुणीतरी. बघते तर माझ्या शाळेतल्या ७ जणींच्या ग्रुपमध्ये मी सहावी जमा झाले होते. आता फक्त एकच बाकी राहिली होती. लवकरच तीही आम्हाला सामील झाली आणि आमचा रेनबो पूर्ण झाला. आम्ही सर्व जणीनी एकमेकींना पहिलीपासून पाहिलेलं. पण अकरावी बारावी मध्ये एकदम घट्ट मैत्री झाली पण तसेच सर्व दुरावलोही बाहेर पडल्यावर. 
            लवकरच धपाधप सकाळी सकाळी मेसेज सुरु झाले. मी तशी जास्त वापरतही नव्हते Whats App तोवर. खरं सांगायचं तर खूप वर्षांनी कुणीतरी मला 'विद्ये' म्हणत होतं आणि त्याची अजिबात सवय राहिली नव्हती. पण ती व्हायला वेळ लागत नाही. आपली माणसं कितीही वर्षांनी भेटली तरी सूर जुळतातच. आधी, सर्वांनी आतापर्यंत काय केलं, सध्या कोण कुठे आहे असे माहितीपूर्वक मेसेज झाले. सात पैकी आम्ही सहा जणी पुण्यात होतो, एक अमेरिकेत असते. उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्याच वाढदिवसाला आम्ही सगळ्या माझ्या घरी भेटलो. पोरांनाही आणलं होतं आपापल्या. घरात नुसता गोंधळ. खूप वर्षांनी खूप हसले. 
            कोरेगावासारख्या छोट्या गावात वाढलेलो आम्ही. सायकलीवरून सोबत कॉलेजला जायचो, महिन्यातून एक दोन वेळा कॅन्टीन मध्ये वडापाव खायचो, वाढदिवसाला ग्रीटिंग द्यायचो आणि क्रिकेट, मूव्हीस्टार बद्दल भरभरून बोलायचो. सोप्पं आयुष्यं होतं. पण मध्ये १५ वर्षांच्या मोठ्या टप्प्यात भरपूर काही झालं होतं. एक गोष्ट चांगली होती सर्वांना एक स्वत:चं असं स्वप्नं होतं. हळूहळू आम्ही काहीतरी चांगलं करण्याच्या हेतूने एकमेकींना विचारू लागलो. मधेमधे वाढदिवसाला सणाला भेटलोही. भेटलो की दंगा नक्की. साधारण ४-५ महिने झाले असतील, आमचे आता नियमित बोलणे होतंच होते. कधी एखादीची खेचायचो, कधी जास्त खेचली की भांडायचो. मग कुणी ग्रुप सोडून जाणार, त्याला परत घेऊन या. भेटायचं ठरवण्यावरूनही वाद होत, आणि भेटताना उशीर आले की अजून. पण एकूण मजेत चाललं होतं. 
          मला पुण्यात आल्यापासून पळायला अजिबात जमलं नव्हतं. आधीच्या वर्षी मी पुणे मेरेथोन चुकले होते. यावेळी ती करायचीच असं पक्कं होतं. मी म्हटलं सगळ्यांनी एकत्र केली ती तर किती मजा येईल ना? अर्थात आमचं कितीही प्रेम असलं तरी हे काम सोप्पं नव्हतं. प्रत्येकाच्या घरी वेगळ्या अडचणी (ज्याला मी निमित्त म्हणते :) ) मी माझा हट्ट सोडत नव्हते. माझ्या पोस्ट वरून माझा स्वभाव कसा वाटतो हे माहित नाही पण माझ्या मैत्रिणी मात्र, "बाप रे विद्दी चूक काढेल म्हणून स्पेलिंग पण दुरुस्त करून ठेवतात". ;) 'हिचे कोण ऐकून घ्यायचे, म्हणून उशीर होत असेल तर टेन्शन आले आहे', असे दाखवत तरी असत. मीही मला कुणीतरी खोटं का होईना घाबरत आहे तर बोलून घेते. बरेच दिवस झाले कुणी ऐकत नाही म्हटल्यावर माझा एक दिवस टायपिंगचा स्पीड वाढला. माझ्या स्पीडवरूनही त्या ओळखतात की माझा मूड कसा आहे. :) 'अगं हो, करूयात. तू शांत हो.' अशी समजूतीची वाक्यं आली. पण नुसते तेव्हढे चालणार नव्हते. 
          मी सर्वांनी मिळून कमीत कमी दहा किमी तरी करावे असा आग्रह करत होते. जसेजसे रजिस्ट्रेशन ची मुदत संपत आली मी माझे रजिस्ट्रेशन करून टाकले आणि जाहीर केले की कुणाचे उत्तर नाहीये तर मीच एकटी जाते. Black mail, दुसरं काय? शेवटी वैतागून दोघींनी तूच कर बाई म्हणून सर्व माहिती दिली आणि मी त्यांचे रजिस्ट्रेशन केले. बाकी दोघींनी काय सबबी सांगितल्या आठवत नाहीयेत पण आमची पोलिस मेंबर आहे एक जिचा अजून पत्ता नव्हता. म्हटलं, 'काय हे शोभतं का असं पोलिसांना? तू लोकांना उदाहरण दिलं पाहिजेस इत्यादी इत्यादी. बिचारीला कधी कसे काम निघेल याचा पत्ता नसतो त्यात चार आठवडे आधी एखादे बुकिंग कसे करणार ती. आणि नाही जमले तर माझे ऐकून कोण घेणार म्हणून गप्प बसली होती. तिनेही जाऊ दे गप्पं बसेल म्हणून मला बुकिंग करायला सांगितले. अशाप्रकारे सहा पैकी चार जणींनी आम्ही १० किमी च्या रेसला जायचे ठरले. 
         त्या चार मध्ये, भक्ती, ही एक बिल्डर आहे, हे आमचे ग्रुपचे Admin. बिल्डर, म्हणजे पेशाने.  ती आणि तिचे पार्टनर बिल्डरचे कंत्राट घेतात. (चुकले बिकले तर माफ कर गं.) तिची हिम्मत आणि अशा व्यवसायात यश पाहून खूप भारी वाटते आम्हालाच. स्वाती, एक टिचर म्हणू, ती एका इन्स्टिट्युट मध्ये नेट्वर्किंगचे क्लास घेते. स्वाती सर्वात सोशिक आणि नेहमी हसमुख. कधीही मी तिला चिडताना किंवा दु:खी चेहऱ्याने पहिले नाहीये. मी सोफ्टवेअर कामगार आणि शेवटी आमचे पोलिस, पल्ली. पल्ली, आजही आमच्या ग्रुपमध्ये तीच फिट आहे. सर्व पोलिसांसाठी ती एक उत्तम उदाहरण आहे. कधीही तिच्या वागण्या बोलण्यातून ती मोठी ऑफिसर आहे असे जाणवू देत नाही. प्रत्येकीचा पेशा सांगायचे कारण म्हणजे प्रत्येकीचे रुटीन वेगळे होते, वेळा वेगळ्या. भक्ती दिवसभर वेगवेगळ्या साईटवर फिरत असते. कधी वेळेत जेवते, कधी घरी उशिरा जाते. पल्लीचे, पोलिसांचे कधी काम निघेल, कसे असेल याचाही भरवसा नाही. मी आणि स्वाती मात्र वेळेत यायचो आणि वेळेत जायचो. त्यामुळे मी सकाळी हळूहळू थोडे थोडे अंतर पळायला सुरुवात केली होती. स्वातीने घरी जाऊन वेळ मिळत नाही म्हणून दुपारी जेवणाच्या वेळेतच एक तास मोठी चक्कर मारून यायला सुरुवात केली. अधून मधून आमचे ग्रुपवर बोलणे व्हायचे सराव कसा चालू आहे म्हणून. 
        भक्ती रात्री उशिरा घरी येत त्यामुळे कधी सराव करणार असा नेहमी प्रश्न पडायचा. पण तीही रोज रात्री जेवण झाले की तिच्या पिल्लांना म्हणजे दोन कुत्र्यांना घेऊन चालायला जाउन येऊ लागली. कधी संध्याकाळी वेळ मिळाला तर टेकडीवर चढून येत होती. सर्वात भारी आमचे पोलिस होते. नियमित योगासने करते, टेकडीवर चढून येते, पळणे मात्र नियमित चालू नव्हते तिचे(निदान असे आम्हाला सांगितले) . या निमित्ताने तिने आता हळूहळू पळायला सुरुवात केली. माझे साधारण ७-८ किमी इतका सराव झाला होता. एका रविवारी आमच्या बिल्डीन्गमधली माझी अजून एक मैत्रीण आणि मी पाषाण रोडला पळायला गेलो. खूप भारी वाटले. सकाळ सकाळी बरेच लोक रस्त्यावर पळताना दिसले. पुणं किती सुंदर दिसतं याचा पुन्हा एकदा अनुभव आला. आम्ही दोघींनी १० किमी पार पाडले. पुढच्या रविवारी रेस होती...... 
          सहा नाही तर चार जणी का होईना पळणार म्हणून मी जाम खुश होते. त्या शेवटच्या आठवड्यात, सर्वांनी वेळेत या, गोंधळ घालू नका, रेसला कुठून सुरुवात आहे, असे बरेच मुद्दे बोललो आम्ही. रेसच्या दोन दिवस आधी जाऊन रेस पाकीट ज्यात आमचा बिब नंबर इ मिळणार होते. पल्लीने भक्ती, स्वाती आणि मी असे सर्वाना एकेक करत गाडीत घेतले आणि आम्ही रेसचे पाकीट घ्यायला गेलो. एकदम भारी वाटत होते. असं सर्वांनी मिळून जायला किती मजा येणार आहे हा विचार करूनच मी खुश होते. सर्व सामान घेऊन परत येत असताना काहीतरी फालतू कारणावरून माझं आणि भक्तीचं भांडण झालं. अगदी जोरदार. आता तो विषय आठवला तरी हसू येतं. पण तेव्हा ते झालं. मी तावाने गाडीतून उतरून निघून गेले. रेसला दोन दिवस राहिले होते. 
           भांडण झाल्यामुळे सर्वांचा मूड गेला होता. आमच्या सोबत नसणाऱ्या बाकी तिघींना कळेना की काय चाललंय. आणि खरं सांगू का, हे Whats App वर कधी कधी माणूस कोणत्या आवाजात, कोणत्या हेतून बोलत आहे हेकळत नाही. उगाच छोट्या गोष्टी मोठ्या होतात. आणि तसं पाहिलं तर आम्हाला भेटून १५ वर्षं झाली होती. त्याकाळात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगळं काही घडलेलं, प्रत्येकजण तीच शाळेतली व्यक्ती राहिलेली नसते. एकूण काय आमचा संवाद बंद झाला त्या दोन दिवसापुरता. म्हटलं झालं, कधी नव्हे ते काही करायची इच्छा करावी आणि ते असं फिसकटलं. पण मन कुठे ऐकतय. उद्या मी परत अमरिकेत गेले तर केवळ काही फालतू कारणामुळे आपण अशी संधी घालवली याचा पश्चाताप मला करायचा नव्हता. मग आम्ही बोललो १-१ Whats App वरच. रेसच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजता. म्हटलं, 'भांडून तुझी काही सुटका होणार नाहीये यातून. मुकाट्याने तयार राहा'. :) आम्ही सगळ्या दुसऱ्या दिवशी रेसला पोचणार असं तेव्हा तरी वाटत होतं. आमच्या पोलिसाला, पल्लीला, 'वेळेत ये' असा मेसेज टाकून झोपून गेलो. 
           दुसऱ्या दिवशी माझी आई, बहिण, भाऊ सर्व घरात होते. मुलांना त्यांच्या ताब्यात सोडून, मी, संदीप आणि माझी अजून एक मैत्रीण आम्ही म्हात्रे ब्रिजला पोचलो. तिथे भक्ती आणि स्वाती आल्या. पोलीसही आले बाबा वेळेत. :) एकदम जोशपूर्ण वातावरण होतं. सकाळी ७ वाजता आमची रेस सुरु होणार होती. फोटोबिटो काढून घेतले.... आणि रेसला सुरुवात झाली. सुरुवातीचे मोजून २-४ मिनिटच एकत्र असू आणि मी आणि पल्ली एकत्र राहिलो आणि स्वाती आणि भक्ती एकत्र झाले. आम्ही दोघी एका तालात पळायला लागलो. शेजारून इथिओपिया वगैरे देशातले पट्टीचे पळणारे रेस संपवून परत येत होते. लोक त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते. साधारण तीनेक किलोमीटर नंतर मला जर दम खायची इच्छा होऊ लागली. पण पल्लीने मला 'नंतर थांबू' असे सांगितले आणि आम्ही पळत राहिलो. पाचेक किमी नंतर ती म्हणाली,'थांबायचं का?'. पण आता माझे पाय थांबत नव्हते. म्हटले, 'चल, जाऊ तशाच'. आम्ही पळत राहिलो. 
             कॅम्प मधून जाताना मला जरा टेन्शन येत होते. म्हटले आपण तर सराव केला आहे. या मागे राहिलेल्या दोघी येतिल ना नीट? आमच्या बिल्डरची, भक्तीची काळजीही होतीच. त्यांनी कधी इतके अंतर निदान रेसमध्ये तरी केले नव्हते. कुठे काही झाले तर?  आपणच भरीला घातले त्यांना. म्हटले निदान फोन तरी करावा म्हणून पळता पळता फोन केला तर तिने घेतला नाही. म्हणून आमच्या टीचरला केला. म्हटलं, 'तुम्ही दोघी सोबत आहात ना?' तर नाही म्हणाली. म्हटलं 'झालं आता'. आम्ह दोघी पळत आता ८ किमी पूर्ण केले होते. पण शेवटचा एक किमी खूप चढ होता. चढलो तसाच. एक काका आमच्या पेक्षा जोरात पळत होते. मग आम्हीही धावलो. लवकरच संदीप दिसला. मग एकदम जोरात पळून रेस फिनिश केली, १ तास १७ मिनिटांत १० किमी. भारी वाटत होते. ढोल ताशे जोरात वाजत होते. लोक टाळ्या वाजवत होते. आम्ही रेस संपवून मेडल घ्यायला लाईन मध्ये उभे राहिलो तरी अजून मागून दोघींचा पत्ता नव्हता.  
           आम्ही मेडल घेऊन परत येणाऱ्या लोकांमध्ये आमच्या मैत्रिणी शोधात होतो. एकदम समोर मला त्या भक्ती आणि स्वाती दिसल्या, अंदाजे दीड तास होऊन गेला होता. त्या दोघींची रेस फिनिश झाली आणि मी जाऊन आमच्या भक्तीला जोरदार मिठी मारली. सगळ्यांचे मेडल गळ्यात घालून फोटो काढून घेतले. पुढचे ४ दिवस लई बढाया मारल्या. वयाच्या पस्तीस वर्षात एकत्र केलेली पहिली पळापळ. मजा आली. तो जो आनंद होता ना तो वेगळाच होता. आयुष्यात अजून रेसेस होतील. पण हि नक्कीच अविस्मरणीय आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या वर्षी मी नसतानाही बाकी पाच जणींनी यावेळी मार्च मध्ये अजून एक रेस पूर्ण केली. चौघींनी ५ किमी ची आणि एकीने १० किमी. :)
          Whats App ने अनेक चांगल्या घटना घडल्या त्यातली ही एक. आज काल बरेच ग्रुप होत असतात आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. मजाही येते. पण एक मैत्री असतेच अशी जी नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि तशी ती हवीच. आम्ही अजूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी एकमेकीच्या सोबतीने केल्या आहेत. मग त्यात दिवाळीला छोटा पणत्यांचा व्यवसाय, त्यातून झालेला फायदा. त्यासाठी केलेलं प्लानिंग. बिर्याणीच्या, पिझ्झाच्या व्यवसायाला प्रोत्साहन. कुणाला पुन्हा नोकरी सुरु करण्यसाठी तर कुणाला काम कमी कर म्हणून सांगायला. मग एकीने कन्झुमर प्रदर्शन  स्वत:च्या जोरावर भरवले. दुसरीने त्यात स्टाल घेतला. माईंच्या मुलींच्या आश्रमाला ज्याला जमेल त्यांनी मदत केली. अशा एक न अनेक गोष्टी. कितीही भांडलो आणि फालतू बडबड केली तरी एक धागा आहेच जो एकदा जोडला गेला आहे. जो आजही तितकाच पक्का आहे. तो आता तुटणार नाही हे नक्की. :) 
            

विद्या भुतकर.
 https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

No comments: