सकाळची घाईची वेळ. घरात गोंधळ घालून शेवटी मुलांना कसेबसे तयार करून मी बाहेर काढलं एकदाचं. ऑफिसला पोहोचायला किती वेळ होणार याचं गणित चालूच होतं. गाडी सुरु करून दोन मिनिट झाले नाहीत तोवर स्वनिक म्हणाला, 'आई 'बेखुदी' सॉंग लाव'. सध्या आमच्याकडे हिमेश रेशमियाचे संगीत असलेलं हे बेखुदी गाणं जोरदार चालू आहे. एकदा शाळेत पोहोचेपर्यंत पाच वेळा रिपीट वर ऐकावं लागलं आहे. गाणं मलाही आवडतं पण किती वेळा ऐकावं याला काही मर्यादा?
गाडी चालवताना सकाळच्या गर्दीत मी काही ते गाणं लावणार नव्हते. नाही म्हणालं तर दोघेही ऐकेनात, मग मी म्हणाले, 'मीच म्हणते, चालेल?' तर 'हो' म्हणाले. :) म्हणजे त्या गाण्यावर हिमेशने न गाऊन उपकारच केले आहेत आणि आता ते मी म्हणायचं. मी डायरेक्ट सूर लावला,'बेखुदीSSSSSS'. तर स्वनिक म्हणाला,' असं नाही त्याच्या आधीचं म्युझिक पण म्हण'. डोंबल माझं. इथे गाडीच्या समोर कोण आडवा येतोय ते बघू, का म्युझिक? सान्वी म्हणाली,'थांब मी म्हणते.' म्हणून तिने सूर लावला. 'mhmhmhmh....' मग म्हणाली,'आता म्हण'. मग माझं 'बे SSSSSSS खुदीSSSSSS मेरी दिलपे... ' . जरा कुठे सुरुवात होणार त्यात मध्ये स्वनिक म्हणाला,'आई अगं ते दोन वेळा म्हणायचं आहे, बेखुदी, एकदा नाही.'
आता आमची गाडी पुन्हा सान्वीवर आली,'mhmhmhmh…. '. पुढे मी, दोन वेळा बेखुदी..' तेंव्हा कुठे गाण्याला सुरुवात झाली. असं करत गाण्याचं एक कडवं कसबसं पार पडलं आणि शाळा आली. सुटले एकदाची. संध्याकाळी संदीपला हे सांगत असताना सानू म्हणाली, 'हो आईने चांगलं गायलं गाणं.' :) झालं, माझा भेसूर आवाजही तिला चांगला वाटला. :)
बरं हे काही एकदा नाही. मी कधी चित्र काढून दाखवते किंवा मी चित्र रंगवत बसले की ती बघत बसते. म्हणते, 'आई, यु आर अन आर्टिस्ट. यू शुड नॉट वर्क.' म्हणलं हो माझ्या चित्रांनी जर पोट भरलं असतं तर काय ना? कधी म्हणते, यू आर द बेस्ट कुकर(शेफ) इन द वर्ल्ड.' एकदा संदीपला म्हणाली,'बाबा तुम्ही आईचं ऐका. तिला माहित आहे बरं वाटत नसताना काय केलं पाहिजे. शी शुड बी ए डॉक्टर.' :) कधी ऑफिसचं काम करत असेल तर म्हणते,'मी कधी तुझ्यासारखं ऑफिसला जाणार?'.
अशा अनेक गोष्टी ऐकून भारी वाटते एकदम. अगदी सुपर वुमन झाल्यासारखे. आजही मला आठवते लहानपणी आमची आई रांगोळी काढायची तेव्हा वाटायचं किती भारी काढली आहे. अर्थात अजूनही वाटतंच. किंवा कुठल्याही महत्वाच्या कामात आम्ही कितीही गोंधळलो तरी दादा अजूनही सर्व शांतपणे करतात. आपल्यासाठी आपले आई बाबा आपले हिरो असतातच, नेहमीच. आपणही कुणासाठी तरी होत आहोत हेही कमी नाही. :) नाही का?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
No comments:
Post a Comment